माय मराठी
एके काळी मी स्वतःला अगदी मॉडर्न - नव्या युगाची प्रतिनिधी वगैरे समजायचे. साहजिकच प्रस्थापितांविरुद्ध माझा लढा असायचा, आणि निरनिराळ्या पातळ्यांवर माझ्या चकमकी चालू असायच्या. त्यातलीच एक म्हणजे मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन.
" व्याकरण हा शब्द 'शिक्रण ' सारखा लिहिला तर काय बिघडलं ? " असं आईशी भांडायला लागले की ती हतबुद्ध व्हायची . " बिघडायचं काय आहे ? तसं लिहायचं नाही, म्हणजे नाही. बास , ह्या विषयावर चर्चा बंद.
'ऋषी' हा शब्द रुशी किंवा रुषी किंवा रिशी लिहिलास , तर जेवायला मिळणार नाही अशी धमकी मिळायची. शाळेतही तोच प्रकार, - 'उंदीर' च्या ऐवजी एकदा 'ऊंदीर' असं लिहिलं आणि वर्गात पेपराचं जाहीर वाचन झालं ; मी लिहिलेल्या उच्चारासकट , आणि वर्गात हास्यकल्लोळ उठला ! त्यातही सगळे मुलगेही हसले हा आणखी अपमान !
तेव्हापासून मला शुद्धलेखनाची गोडीच लागली आणि भीतीही बसली. काहीही लिहितांना मी फारच काळजीपूर्वक लिहू लागले. आर्शीवाद का आशीर्वाद , चपलख का चपखल , ख्यातनाम का ख्यातमान , असे नसते गोंधळ. नुसते गोंधळ! 'मायलेक' हा शब्द कोणीतरी बरेच दिवस मायकेल असा वाचत होतं .
संस्कृत शिकायला लागल्यावर ऱ्हस्व-दीर्घांच्या चुकांनी काय उत्पात होतात ते मार्कांवरून दिसायला लागलं . आणि मग एक शब्द ५ - ५ वेळा लिहिण्याच्या शिक्षेपेक्षा वाचतानाच जरा डोळे उघडे ठेवून वाचायचं ठरवलं.
आईचा आदेश शब्दशः असाच होता !
लवकरच माझं मध्यम वयात पदार्पण झालं. सुरवातीला भावंडांची पत्रं आणि मग मुलांच्या वह्या वाचताना कधी काटे बोचल्यासारखं व्हायचं तर कधी चक्करच यायची. " अगं बाई, हे 'ति' म्हणजे काय? ती ss मुलगी, ती ss शाळा ..., आपण 'ति बाई ' असं म्हणतो का ?" मी बहिणीला रागवायची आणि ती हसायची. "अशी मूssग गिळून बसू नको . मूssर्खपणा करू नको ..." वगैरे. मुलांचंही तेच. " काय रे, आपण मीssळाली म्हणतो का? तुला दुध हवंय का? असं बोलतो का? " मला एका पाठोपाठ ठसके लागायचे. मुलं गप्पच. नवरा म्हणायचा, मराठी लिहिताहेत हेच खूप आहे, जरा पेशन्स ठेव.
तसंही बंगलोरला आल्यावर ' ती मला फूल दिली, त्यांनी घरी आलेत ' वगैरे मी बरंच सहन करायला शिकले. मी लिहिलेलं वाचतांनाही मुलांना त्रास व्हायचा. " लिहिलेलं मराठी आणि बोललेलं मराठी किती वेगळं आहे... तू असं लिहितेस ," झालम् गेलम् गंगेला मिळालम् , आता आपण जुनम् विसरलम् पाहिजे. नाहींतर नव्या पिढीचम् कसम् होणार? इतकी टिंबं का देतेस सगळीकडे? ..." असे वाद व्हायचे !
एकदा अशीच खूप हाणामारी झाल्यावर मी जरा अबोलाच धरला. मग मुलाने मला पत्र लिहिलं ,
ते असं " ए चूकलच माज काल . माला खर्रच मराठी कै येत नै , कै म्हैती नै , खुप खुप सॉरी . पण तु शीकव ... बै द वे , आपण काल पाह्यलेला प्यूळा टिशर्ट आणैचा का?... i must say u r gr8..."
माय माझी, यांना क्षमा कर, ते काय लिहीताहेत हे त्यांना खरंच कळत नाहीये ...
Mast remembered so many thinks
ReplyDelete