मोहमाया
ही गोष्ट तशी जुन्या काळचीच म्हणावी लागेल. जग तेव्हा बरंच वेगळं होतं . मोबाईल फोन हळूहळू स्वस्त होत होते, पण अजून whatsapp नी डोळे उघडलेले नव्हते. sms वगैरे होते, पण फारच कमी. त्यामुळे रोजच्या सुविचारांचा पाऊस नव्हता, की सकाळी उठल्या उठल्या कोणी मशीनला तेल घालावं तसं चमचाभर ज्ञान पाजत नव्हतं. ह्या जगात आपण वाटसरू आहोत, इथल्या कोणत्याच गोष्टीत जीव लावू नका, हे सर्व इथेच सोडून जायचंय, वगैरे फक्त हिंदी सिनेमाच्या गाण्यांत आणि संत साहित्यात असायचं !
संसार करतांना घरातल्या सामानावर जीव लावणं जमलं नाही. सासूबाईंच्या हाताखाली 'पडेल ते काम' एवढंच ठरलेलं ! मी कसलाच हट्ट कधी केला नाही. असं वाटायचं , आपण अध्यात्म जगतोय ! हे सगळं असंच्या असं सुनांच्या सुपूर्त करून मी जाईन .... हसत हसत ... !
मोठ्या मुलाचं लग्न झालं, सासू म्हणून प्रमोशन मिळालं, आणि spiderman म्हणाला तसं, great powers बरोबर great responsibilities पण आल्या !
मुलगा सून नवीन घरात रहायला जाणार म्हंटल्यावर सुनेला सांगितलं, " अगं , एवढी भांडी आहेत, हवं ते घेऊन जा, तुमचंच आहे सगळं ! आजीची भांडी मी फक्त वापरतेय !" ती भांडी बघत, काढत होती, मी एक डोळा ठेवून होते !
" ऑ , हे नेहमीचं चहाचं भांडं ..., ok "
" हे ... हे तर मी लोणी कढवायला वापरते ..."
ही चाळणी नेणार ? ... माझे oval bowls ... हे जाड बुडाचं पातेलं ! आता मी पुरण कशात करू ... .
गेलं ... गेलं ... गेलं ! एक एक पातेलं निघत होतं. ' हे नको, ते घे, ..' माझं मन मनातल्या मनात बोलत होतं.
शेवटी मी म्हणालेच, " ती कान तुटकी कढई कशाला नेतेस ? दुसरी घे. "
" नाही आई, ती फार मस्त आहे, त्यात भाज्या फार छान होतात !" असं म्हणत ती कढईला अक्षरशः कवटाळून बसली ! असं करत, भांडी गोळा झाली. त्या दोघांची पाठवणी करतांना डोळे पाणावले ! ते, ते निघाले म्हणून की माझी लाडकी कढई चालली होती म्हणून, कोण जाणे !
धाकट्याच्या लग्नाच्या वेळी मी शहाणी झाले ! आधीच भांडी, क्रॉकरी वगैरे काढून ठेवलं तिच्यासाठी. प्रश्नच नको. पण हे पाणी वेगळंच निघालं. No, no, no, don't want this steelware , we will be using microwave , mom ." ती म्हणाली.
"हुश्श, चला माझी भांडी मलाच रहाणार तर ! असा विचार करत्येय तोच ती पुढे म्हणाली, " mom , can I borrow a few of your sarees ?" "Yes , of course " असं म्हणत मोठ्या मनाने मी तिला कपाट उघडून दिलं.
"देवा, आता रे काय ? Please , please , ती नको, ही नको न्यायला ... असा मनात धावा !
" ya , this one , this one , and ... this will do ," असं करत माझी अत्यंत जीव की प्राण अशी हिरवी कांजीवरम, पोचमपल्ली, आईनी दिलेली शेवटची साडी ... एक एक करत तिच्या बॅगेत जाऊन बसल्या !
" दिल्या घरी सुखी रहा गं बायांनो .." असं म्हणत मी कामाला लागले. चार दिवस अन्न पाणी गोड लागेना !
दिवाळीत तर गंमतच झाली ! वर्षभर लॉकरमध्ये वस्तू पडून होत्या. त्यांना जरा हवा लागावी म्हणून काढून आणल्या. आणि त्यातलं एक गळ्यातलं घातलं लक्ष्मीपूजनाला . तयार होऊन बाहेर येतेय, तर खोलीच्या दारात नात वाट पहात होती. वय वर्षे ५ ! " आजी, ready ? wow, you look nice in this saree . पण तुझी neck lace मला खूप म्हणजे खू SSS प आवडली. तू ती कोणाला देणार आहेस ? I know , it will be for me ! कारण मी तुला खूप आवडते आणि तू पण मला खूप आवडतेस !"
"अगं अगं , पण मला अजून ते घालायचंय , इतक्यात नाही देणार कोणाला. "
" मग मी काय घालू ? मला माझं कोणतंच आवडत नाहीये, हेच खूप आवडतंय " ... रडका चेहरा, केविलवाणे डोळे आणि छोट्या हातांची मिठी जिंकली, आणि मग ते तिच्या गळ्यात जाऊन बसलं .
वाटलं तेवढं माझं मन संसारातून बाहेर पडलं नाहीये ! अजून बरीच मजल मारायची आहे तर ! अजूनही ह्या असार संसारात मला खूपच रस आहे, याची तर खात्रीच पटलीय !
सगळ्या सुविचारांना, संदेशांना, whatsapp ला .... गोली मारो ! ! !
मोहमाया वाचून ह्या blog च्या मोहात पडले.Excellent!👍
ReplyDeleteकसलं भारी आहे
ReplyDeleteमज्जा आली वाचायला
मोबाईल मोह मायापाशात कधी लक्षात आला नाही
ReplyDelete