लग्न पहावं करून
मुलाचं लग्न ठरलं, आणि घरात एकदम गडबड सुरु झाली ! ग्रहण सुटावं आणि चंद्र - सूर्याचं मुखदर्शन व्हावं तसं ! हे करू, ते करू, आधी हे करायचं, ते मात्र अजिबात नाही ..... चर्चा, चर्चा आणि वाद ! घरात एकदमच लोकांचं येणं जाणं वाढलं. एरवी शांत झोपलेलं घर एकदम उठून कामालाच लागलं ! ...
आणि जाणीव झाली की आपल्याला काहीच माहीत नाही, अनुभव नाही, आणि मुख्य म्हणजे हे सर्व जगाला आपल्या आधीच माहीत आहे ! नातेवाईक आणि मित्र मंडळी पुढे सरसावली, सल्ले आणि अनुभव ह्यांचा पाऊसच. अधूनमधून खणखणाटही , खरंय,लग्न म्हणजे काही खेळ नाही ...
खेळ नाही कसा ? खेळच . अगदी मैदानी खेळ, बायकांचे खेळ, बुद्धिबळाचे डाव ... सर्व काही. पहिल्याच सलामीला बहीण आली, "बाई गं , ताई गं , हा ' मेमरी गेम ' बरं का ! कधी, कुठे, केंव्हा, काय नेसणार आहेस, दागिने काय घालणार आहेस, लिस्ट कर. काही नसेल तर करून घे. " काय मस्त आयडिया ! परत परत तेच घालायचं नाही ! एकवेळ साड्यांचं जमेल, पण दागिने ? एकूण मेमरी गेम नकोच. पण असं कर, तसं कर ... तिचे चालूच.
लोकांचं येणं जाणं रोजचंच होतं . एका पाठोपाठ मंडळी आली की कुठे बसवायचं त्यांना, असा प्रश्न ! मग आधी आलेली मंडळी, चला आता आम्ही निघतो करत नव्या मंडळींकरता जागा रिकामी करून देत . अगदी खो sss! अक्षरशः खो - खो चा डाव, आणि त्यांच्या सल्ल्यातून निसटण्याचा प्रयत्न करणारे आम्ही दोघं ! जास्त करून आऊटच व्हायचो !
ह्यातच मधेच वेळ मिळाला की आम्ही निमंत्रणं करायला सटकायचो ! आलेल्यांवरच घर टाकून. आता निघालोच आहोत तर निदान पाच तरी भोज्ज्यानां शिवून यायचं - आपलं पाच तरी घरं उरकायचीच ! असा आणखीन एक खेळ. पण तो निघायचा अगदी कबड्डीचा डावच . आपण निघायचं, या, या, या करत आणि कमीत कमी वेळात, दम जाऊ न देता जास्तीत जास्त गडी आउट करायचे, आणि ५ - ६ चहा, २ - ३ सरबतं, १ - २ कॉफ्या, लाडू, मिठाया ... कोणी कितीही पकडायचा प्रयत्न केला तरी जेवायच्या वेळेला - दिवसा नाहीतर रात्री घर गाठायचं ! बहुतेक वेळी दम टिकत नसेच ...
पण खरी मजा आली ते खेळ पत्त्यांतलेच होते ! रोजच्या खरेदीनंतर मी रात्री लांबच लांब लिस्ट्स घेऊन बसत असे, हे झालं, ते राहीलं करत. नवरा दिवाणावर आडवा लोळून - दमणूक म्हणे - पेपर वाचत माझं बोलणं ऐकायचा . एक दिवस असंच झालं. मी म्हणाले "ए , एक विसरलेंच बघ. आज साड्या आणल्या नं आपण , त्यांत निदान ७ - ८ तरी आणखीन आणायला लागणार आहेत, ... एक सुनेची डिझाइनर साडी, .. पण ती शेवटी, ... मोलकरणींकरता ३ साड्या, ... ५ - ६ अशा जरा मिडल लेव्हलच्या, ... २ - ३ ड्रेस मटेरियलस, ... जमलंच तर मला अजून एक साडी आवडेल ... एखादी कांजीवरम, कारण तशी पैठणी एकच एक घेतेय ... खरं तर जामेवारच ... पण बघू ..."
बहुदा नवऱ्याचा पेशन्स भंग झाला असावा. तो उखडलाच, "काय चाललंय काय ? ७ साड्या , मग १ साडी, त्यावर आणखी २, त्या उप्पर माझी अजून एक .... खेळ आहे का हा पत्त्यांचा ? की आपलं , ... ही एक राणी , मग २ राण्या ... त्यावर आणखी ३ राण्या ... चॅलेंजच आहे, का आपला गड्ड्या झब्बू ."
" हो, आहेच चॅलेंज. लग्न करणं काही सोपं नाही म्हटलं, अन मला चॅलेंज करू नकोस ... बिलं तुलाच उचलायची आहेत सगळी ... आणि ह्या सगळ्या साड्या आणतेय ना, त्या तुझ्याच साईडच्या राहिल्यात. माझं काय आहे त्यांत ? अन् मी तरी कुणासाठी करत्येय हे सगळं ? तुझ्याच झब्बूचं लग्न आहे नं ? .....
एकदम मस्त
ReplyDeleteसगळे खेळ एकदम मस्त फिट्ट झाले आहेत लग्नाच्या तयारीत ! तुझी कल्पनाशक्ती अचाट आणि लिहिणं मस्तच !!👍👌
ReplyDelete