MY मराठी - २
" इतकी सुंदर भाषा आहे, नका रे तिचा असा चुथडा करू ..... " कोण म्हणतेय हे वाक्य ?
आई म्हणत असेल तर काळ आहे ४० वर्षांपूर्वींचा, आणि मी म्हणत असेन तर आहे आपला १० - २० वर्षांपूर्वीचा.
आई इंग्लीश भाषेबद्दल म्हणायची, कारण मी मराठी शाळेत होते. मी म्हणायची कारण मुलं इंग्लिश शाळेत शिकायची आणि त्यांना मराठी आलं पाहिजे हा माझा अट्टाहास होता ...
दर उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी गेल्यावर मराठीचं शिक्षण सुरू व्हायचं . घरात सुट्टीत मराठीच बोललं पाहिजे हा दंडक माझा . आई-वडील म्हणायचे "असं मागे लागू नकोस, वर्षभर असतातच कटकटी अभ्यासाच्या "
" पण मराठी शिकणे ही कटकट नाहीये ..." हे असंच चालू असायचं .
एक दिवस सगळी भावंडं जवळच्याच बागेत हिंडून-फिरून आली. मुलं बस ऐवजी टेम्पोतून आली , आणि मला म्हणाली , " धन्यवाद देवा, एका तुकड्यात घरी पोचलो... "
" ह्या वाक्याचा अर्थ काय? मला नीट सांग ..."
" सोपं आहे, thank god , we reached in one piece "
"शी रे देवा, हे काय मराठी आहे ? असं इंग्लिशचं भाषांतर करू नका रे ..."
"का ? तुम्ही असंच करता ...मराठीतलं translate करून बोलता ... परवा आगगाडीतली मुलगी कसं म्हणाली,..
...I am having two tickets ..." मी माघार घेतली.
एका शब्दाचे दोन-तीन अर्थ आणि एका अर्थाचे दोन-तीन शब्द, हे भाषा समृद्धीचं एक लक्षण. पण मुलं त्याचा अगदी कीस पाडायची . एक दिवस पोस्टमन आला म्हणून माझे वडील म्हणाले, " जा बघ, पोस्टमन पत्र वाटतोय. आपलं आहे का काही? ". त्यावर मोठा हसायला लागला. " आजोबा, तो पत्र वाटतोय as in चटणी वाटतोय ? "
"अरे बाबा, वाटतोय म्हणजे distribute करतोय " मी मधे तोंड घातलं .
वडील म्हणाले, " अगं , असू दे, त्याला वाटतंय... "
" no, no आजोबा ... ' तो वाटतोय ' ... असं ग्रामर चुकलं की आई वाट लावेल पूर्ण दिवसाची ..."
" वाटणे, वाटणे, वाटणे,... ठीक आहे. पण वाट लावेल हे कसं वापरता आलं बरोबर ? "
" अरे, संदर्भ म्हणून काही असतं का नाही ? "
एक दिवस असंच धाकट्याने येऊन विचारलं , " आई, कपटा म्हणजे काय ? "
मी जरा कामातच होते म्हणून घुश्श्यातही. " हं , कपटा म्हणजे कागदाचा तुकडा. तुम्ही घरभर करता नं ,
वह्या फाड-फाडून , तेच ..."
" त्यानी माणूस मरतं ?"
" त्यानी माणूस कशाला मरेल ? ..."
" नाही... आजोबा गोष्ट सांगत होते ... दुष्ट प्रधानाने राजाला कपटाने मारलं ..., म्हणून ..."
" अरे ... तो कपटा नाही रे , ते कपट ..."
मी मग हातातली कामं सोडून तासभर त्याला अशी उदाहरणं देत बसले...
आणि तेंव्हा आईचं हे वाक्य आठवलं ..... !
हसून हसून पुरेवाट झाली.
ReplyDelete😅😅
सविता