My मराठी - ३
' ह्या मालिकेतील प्रसंग , पात्र, कथा सर्व काही खरं आहे. त्यात कोणाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजू नये. आजकाल सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
असं TV तल्या सारखं का लिहितेय मी ? कारण त्याचा माझ्या मनावर फार परिणाम होतोय. TV वरचं मराठी ऐकलं की वाटतं आपण बखरीतली भाषा तर बोलत नाही ? का मराठी भाषेचं जग फारच पुढे गेलंय ? बहुतेक काही दिवसांनी पहिलं जुनं मराठी साहित्य उदा. ' लीळा चरित्र ' कोणाला कळणं राहिलं दूर, वाचताही येणार नाही. असो .
एकदा एक तरुण जोडपं भेटलं रस्त्यात. " तुमच्या मंगळसूत्रावरून ओळखलं मराठी आहात म्हणून, ... तुम्ही कुठून आहात ?" मी बुचकळ्यात पडले. हिला काय म्हणायचंय " तुम्ही कुठून आलात ? की इथे कुठून कडमडलात ? तरी मी तिच्याच स्टाईलमधे म्हटलं, " हं , आम्ही घरून आहोत... " " no, no I mean तुमचं गाव कुठलं ?" हां , आता कसं ? हे आधीच विचारायचं. " हा आमचा मुलगा मानव, त्याला आम्ही मनू बोलवतो ..." पुढचं ऐकणं न ऐकणं सारखंच होतं . अर्थात अशी भेसळ होणारच म्हणा. अशीच भाषा समृद्ध होते. पण ऐकताना उचक्या लागल्यासारखं होतं. माझी दिल्लीची भाची म्हणते, " मामी, जरा मला सोचू दे, बहुतेक दीदीच्या आणि माझ्या ड्रेसेसची चेंजाचेंजी झालीय..." कधी कधी मजा येते. कधी कधी घुस्सा...
जाता जाता एक खरी घडलेली मजा सांगते. एक परदेशी मुलगी Ph. D. साठी मराठी साहित्यावर संशोधन करायला पुण्याला आली. तिचे गाईड मराठीतले एक मान्यवर. तिची मराठीची समज किती आहे हे पहायला त्यांनी तिला लक्ष्मीबाई टिळकांची 'स्मृतिचित्रे' दिली आणि कोणत्याही एका पानाचं इंग्लिशमध्ये भाषांतर करायला सांगितलं.
तासा दीड तासाच्या झटापटीनंतर ती मुलगी विजयी मुद्रेनी कागद घेऊन आली. तिने लिहिलं होतं, " after finishing all house work, I fell down and hurt my eye ..."
तिच्या गुरुजींना हा प्रसंग वाचल्याचं आठवेचना म्हणून त्यांनी तो उतारा पहायला मागितला. तो असा होता "... घरची सगळी कामं आटोपल्यावर , मी जरा पडले आणि माझा डोळा लागला..." !
बहुधा Ph. D. संपल्यावर ती मुलगी ' नेति नेति ' म्हणून गेली असावी, ... किंवा खांदे उडवत, माना डोलवत म्हणाली असेल, " my god, मराठी, ...उफ् ... " ! ! !
Comments
Post a Comment