लघु शब्द
Abbreviation : एका मोठ्या शब्दाच्या लघु रुपाला केवढा मोठा शब्द ! खरं तर शॉर्टफॉर्म म्हणावं ! पटकन कळतं !
नुकतंच WhatsApp वर एक फॉरवर्ड आलं होतं . वर मथळा होता 'पापोचाकुकुची ' ! म्हंटलं , साऊथ अमेरिकेतल्या एकाद्या डोंगराचं नाहीतर तसलंच कशाचं वर्णन असेल. तिथे अशीच नावे असतात. माचु पिचु , पोपोकॅटॅपेटल वगैरे . उघडून पाहीलं , तर एका पॅकेटचा फोटो होता. त्यावर हे लिहिलेले. खाली विस्ताराने लिहिले होते ' पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा ' !
सतत काहीतरी, कधी कधी , काहीच्या काही तरी, काढत असतात. हा काय शॉर्ट फॉर्म झाला ? अजूनही लहान करता आलं असतं ! पापोचि चाललं असतं !! आणि , मग आठवलं, आपणही शाळेत असतांना असेच 'लघु शब्द' वापरायचो ! तेव्हांचा असाच एक आवडीचा लघुशब्द म्हणजे ' श्रीबालाजीचीसासू ' ! नुसता विचार केला तरी तोंडाला पाणी सुटायचं ! पण त्यात पुरणपोळी, उकडीचे मोदक, करंजी यांची वर्णी लागली नाही म्हणून जरा वाईट पण वाटायचं ! आणि ते मिळवून घेणं कोणालाच अजूनही जमलेलं नाही !
लहानपणी , रोज सकाळी वडील ऑफिसला जायला निघाले की पेन, रुमाल, चाव्या, पाकीट, आणि पास अशी उजळणी करूनच निघायचे . पेरुचापापा !! त्या काळच्या सर्व मराठी भाषिक घरात ' पेरुचापापा ' हा रोजचा कार्यक्रम असणार ! आणि घरोघरी असे खूप लघुशब्द ही तयार होत असणार !!
इथे बंगलोर मधे काही वर्षांपूर्वी tourists करता एक नवीन बस सेवा सुरु झाली. बंगलोर दर्शन ! सगळी प्रेक्षणीय स्थळे जोडणारा एक route ! एक दिवसाचं तिकीट काढायचं आणि त्या बस मध्ये बसायचं . हवं तिथे उतरा , हवा तितका वेळ स्थळ पहा, अन् पाहून झालं की पुढच्या बस मध्ये बसा नी पुढे जा. ही बस साधारण दर अर्ध्या तासानी असायची. Idea छान होती , ह्या बसचं नाव होतं 'हो-हो बस' ! वाटलं , बहुतेक इथली बस सर्विस हा विनोदाचा विषय आहे हे लक्षांत आलं असावं ! आणि 'हा-हा क्लब' आधीच अस्तित्वात असल्याने 'हो-हो बस' म्हटलं असेल ! नंतर कळलं की ते 'Hop On Hop Off ' असं होतं . पण शॉर्टफॉर्म मस्त होता ! Ho-Ho बस !!!....
नुकतीच झालेली गंमत ! मागच्या वर्षी पहीला लॉक डाउन संपल्यावर एक दिवस मोठा मुलगा , आम्ही कसे आहोत , हे पहायला आला. आम्ही नुकतेच बाजारात जाऊन आल्यामुळे सगळ्या वस्तू, पाकीटे, भाज्या इ . इ . धुऊन पुसून , corona - dry करायला टेबलवर पसरवून ठेवल्या होत्या . तो सर्व बघत होता. मग चहा पितांना म्हणाला, " By the way , तुमची health कशी आहे? "
" का ? चांगले टुणटुणीत दिसतोय की आम्ही ! आणि सगळी कोरोना सूत्रं पाळतो म्हंटलं ... " त्यावर तो म्हणाला, " I mean, financial health ?" "ऑ ?...."
"नाही, इथे खूप बोगो गोष्टी दिसताहेत ..."
" बोगो म्हणजे ? काही नवीन ब्रँड आहे का? लेबल पाहील्याचं आठवत नाही मला ..."
" बोगो म्हणजे Buy One Get One फ्री ! एकेकाळी तुम्हाला ते पटायचं नाही . तुम्ही म्हणायचात " त्याची खरी किंमत अर्धीच असेल ! उगीच कोण कशाला काही free देईल? There is no free lunch ....." तुम्ही अशा ऑफर्स बघायचां पण नाहीत ! "
" अरे आता दुकानात तेच असेल तर आम्ही तरी काय करणार? बाकी BOGO ... मस्त आहे हं शॉर्ट फॉर्म ! "
... आणि त्यानंतर अगदी परवाचीच गोष्ट! धाकटी बहीण पाहुणी आली होती. काही कामानिमित्त माझा नवरा बाहेर जायला निघाला होता. तशी ती म्हणाली, "दादा, 'मोरूचा मासा' घेतला का? "
"म्हटलं , ही काय आता नवीन भानगड, का काही कुडमुडं - जडी बुटी, कशाचं नख ,हाड, वगैरे? अपघात , संकट , रोग-राई , वगैरे घालवायची युक्ती ?" ती म्हणाली, " हं , तसंच काहीसं . अगं , आता आपला 'पेरुचापापा' जुना झाला, आता 'मोरूचा मासा' असतो ! मोबाईल , रुमाल, चाव्या, मास्क आणि सानिटायझर ! ....."
......अगदी latest short form बरं का !.......
Comments
Post a Comment