फोनेटीक्स
इंग्रजी भाषा - परक्यांची भाषा, गुलामीची भाषा वगैरे वाद नेहेमीचेच , आणि ही ग्लोबल भाषा, essential for survival वगैरे प्रवाद ही नेहेमीचेच. तरीही सर्वांना ही शिकायला लागतेच अन् काहींना आवडतेही. कारणं काहीही असोत, आपण ही भाषा शिकतो, शिकवतो, आणि हे करतांना गमतीचे किस्सेही होतातच !
एकाच अक्षराचे वेगवेगळे उच्चार ( cat मधे C चा 'क' आणि city मधे C चा 'स' ), spelling मधल्या anomalies, आणि atrocities, आणि त्यावरचे विनोद नेहेमीच ! पण प्रत्यक्षात घडलेल्या मजा काही औरच असतात ! माझा धाकटा मुलगा जरा 'dreaming type' आहे . हाताने एक काम करत असतो, आणि मनात काहीतरी वेगळाच विचार चालू असतो. आणि भूक वगैरे लागली की मग तर विचारूच नका. एकदा 'बनाना' चे स्पेलिंग पाठ करत होता आणि काहीतरी विचारही . नंतर मी वहीत पाहीलं तर दहा वेळा स्पेलिंग लिहून काढलं होतं पण ते bananana असं ! बी ए एन ए एन ए लिहितांना कुठे थांबायचं हेच विसरला. मग चालू na, na, na, .... अजूनही आम्ही केळ्याला बनानानाच म्हणतो !
अशीच एकदा मैत्रिणीकडे गेले होते. संध्याकाळी आम्ही चहा पीत बसलो होतो. तिची मुलगी खेळून दमून आली . लहानशीच. पहिली दुसरीतच असेल. आणि ती ही स्पेलिंग पाठ करायला बसली. अगदी पेंगळून गेली होती, पण अभ्यास तर केलाच पाहिजे ! वही घेऊन ती बसली. डी, यू, सी, के, इ, टी डकेट , डी, यू, सी, के, इ, टी डकेट , " अगं , काय म्हणते आहेस ? नीट वाच " तिची आई कडाडली ! त्यावर ती म्हणाली "ते बकेट आहे पण मी डी लिहिलाय म्हणून डकेट म्हणतेय. " आईला हसूच आलं अन मला ही ! .... शेवटी वह्या पुस्तकं बंद करून आईने तिला जेवू घातलं नि झोपायला पाठवलं ! उद्या बघू म्हणून !
आता आजकालचा जमाना वेगळा आहे. नवीन विचार, नवीन पद्धती ! आता फोनेटिक्स वर भर आहे . स्पेलिंग पाठ करणे वगैरे हळू हळू phase out होतंय. ऐकायला जरा विचित्र वाटतं पहिल्यांदा . माझी नात KG १ - २ मधे A B C D शिकत असतांना , शब्द वाचतांना ती क - कॅट, ब - बॅट असं वाचायची. तसंच शिकवलं होतं. असं चाचरत बोलणार का काय ही मुलं ? अशी मनात भीती वाटायची की , हे काय आहे ? अशीच सवय लागेल . मग पाहीलं तर २ - ३ महिन्यांत ती सगळं धडाधड वाचायला लागली ! न भिता मोठाले शब्द ती पटपट वाचायची आणि ९० % वेळा उच्चारही बरोबर असायचे. नवलच हं ! अर्थ वगैरे हळूहळू कळतीलच. पण ही नवी पिढी खरंच खूप लवकर शिकतेय सगळं . आम्हाला acknowledgement हा शब्द शिकायला, कळायला, आणि पाठ करायला दहावी उजाडली ! अन् ही तो शब्द वाचून म्हणते " त्याचा अर्थ 'broadly thanksgiving ' ! अबब ...
नुकतीच तिने माझी छान विकेट घेतली ! आम्ही बाहेर कुठेतरी चाललो होतो . गाडीत मागे बसून ती पाट्या वाचत होती . "आजी , HDFC म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे आपण सी ए टी ला कॅट म्हणतो तसं ? " ह्यावर मी काय उत्तर देणार तिला ? म्हटलं "मला कळत नाहीये, ते तसंच म्हणायचं ..." . तिला वाटलं असावं की आजीच्या 'medium of instruction' मध्ये सांगितलं तरच कळेल तिला.
थोड्या वेळाने ती म्हणाली, "आजी, टवस म्हणजे काय ?"... " टवस ? असं लिहिलंय ? कुठे ? दाखव मला " ही काय वाचतेय कोण जाणे . ती म्हणाली "ही काय, एवढी मोठी पाटी आहे ना समोर !" मी पाहीलं, तिथे लिहिलं होतं T V S ! मी गप्प !...
जय फोनेटिक्स !....
Comments
Post a Comment