लोण्याची सासू


    कलती दुपार , चहा आटोपून  आजी आजोबा व्हरांड्यात खुर्च्या घेऊन बसले होते. मी असेन पाच एक वर्षांची . बाजूला एका बाकावर बसून मी खेळत होते. माझे भुलाबाई - भुलोजी घेऊन त्यांना फुलं पानं वाहात , मी गाणी म्हणत होते , हे मला चांगलं आठवतं . 

    विदर्भातली भुलाबाई म्हणजे पुण्या - मुंबईचा भोंडला ! शंकर भगवान तप करत बसले असतांना, पार्वतीने भिल्लीणीचे रूप घेतले आणि त्यांचे मन जिंकायला,  ती त्यांची सेवा करू लागली. त्यांच्या आश्रमाची झाडलोट वगैरे ! ती भिल्लीण होऊन रानात आदिवासींबरोबर राहिली, तिचं नाव भुलाबाई आणि तिचे नवरोजी - भुलोजी - म्हणजे शंकर अशी आदिवासींची गोष्ट असते  आता तिथेच राहायचं तर भुलाबाईला जन सामान्यांप्रमाणे रहाणं क्रमप्राप्तच ! तिची ही रोजच्या संसारातली गाणी

     ती भुलाबाई आणि तिची गाणी माझ्या आवडीची !त्यांचा अर्थ कळो , न कळो !!! तेव्हा - न कळतच - मी गाणं म्हणत होते ..." माहेरच्या वाटे, हळदकुंकू दाटे । सासरच्या वाटे, कुचुकुचु काटे ..." .बहुतेक ते आजोबांना आवडलं नसावं. ते आजीला म्हणाले, " अहो, ऐकताहात का ?  नात  काय म्हणतेय !"     आजी म्हणाली, " हो, ऐकतेय ना !  सगळं गाणं अगदी बरोबर म्हणतेय ! पाठांतर चांगलं आहे तिचं ! एकदा ऐकलं की  बरोबर तस्संच म्हणते !!! ..." .  

 " अहो, पाठांतराचं सोडा, ... गाण्याचे शब्द ऐका !  हेच शिकवलंय का ?  काय चाललंय हे ?... "     आजी म्हणाली, " अहो भुलाबाईचं गाणं आहे ते. अशीच असतात ती गाणी ! मलाही सगळी येतात हो, मी ही म्हणायची !"    

 " अहो पण सासर - माहेर ?  सुनबाईंचं मुलीकडे लक्ष नाही ?  तिलाही असंच वाटतं का ? "    बहुतेक आजी आजोबांची जुंपली  असावी ! आजी म्हणाली, " अहो, वळण वेगळं, ती गाणी बरोबरच म्हणतेय ! त्यात काही चुकीचं शिकवणं वगैरे मी मानत नाही ! आणि सुनबाईला ही असंच वाटलं ना, तरी ते चूक नाही ... मलाही माझ्या सासराबद्दल असंच वाटायचं ... ! साहजिकच आहे, आई-वडील ,  घरदार सोडून आलेल्या मुली ... सासरी रुळायला वेळ लागतोच. आणि , तुम्ही काहीही  म्हणा, काहीही करा ... अगदी लोण्याची केली ना, तरी सासू ती सासूच ! .....ती टोचणारंच बरं मुलींना !..."

 नंतर काय झालं ते माहीत नाही . 

    मला घरात गेल्यावर चांगलीच तंबी मिळाली, पण आजीचं ते वाक्य जे मनात घर करून बसलं, ते बसलंच !

     मग  मोठी होत असतांना , अधून मधून इकडची - तिकडची , शेजार - पाजारची , नातेवाईकांतली ,   अशा तऱ्हेची धुसफूस कानावर यायची आणि आजीचं वाक्य आठवायचं, पण त्यातला seriousness किंवा त्यातलं universal truth कळलं नव्हतं     तिकडे परदेशात म्हणे , बायकोच्या आईचा धाक नवऱ्यांना असतो, ते काय म्हणत असतील बरं ? कोण जाणे !! 

...पण लोण्याची - किंवा लोण्यासारखी प्रेमळ माणसं ! मला ती उपमा खूप आवडली , आणि पक्की मनात बसली आणि मी नेहमी विचार करायची की लोण्यासारखी म्हणजे कशी माणसं ? की कोणतं नातं ? का हा स्वभाव असेल एखाद्या माणसाचा ?

   मग, मुलं लहान असतांनाची गोष्टसगळ्या मैत्रिणींनी भिशी करायचं ठरवलं. जवळच राहणारी एक मैत्रीण      ' बरोबर जाऊ ' म्हणून आमच्याकडे आली.  ती आल्यावर मी सासूबाईंना विचारलं 'जाऊ का '. त्या म्हणाल्या  "जा गं बाई,  जा,  आम्हाला नाही मिळालं, तुम्हाला मिळतंय तर जा.  मी बघीन मुलांना !"     मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मुलांना त्यांच्याकडे सोपवून देऊन भिशीला पसार ! आजी आणि नातवंडं खुष आणि भिशीला जायला मिळालं म्हणून मीही ! सांगायचा मतलब   ...आजी नेहमी लोण्याचीच असते !! ....ते नातं लोण्यासारखंच !!

    पुढे मुलांची लग्नं झाल्यावर, मी सासूच्या role मध्ये आले !!!   आणि पुन्हा 'लोण्याची सासू 'आठवली !!! आपण असू का तशा ? पण , छे ! Chances फारच कमी ! कारण , आपण स्वतःला चांगलंच  ओळखतो !!!मग सुनांना बसवून सांगितलं की ,  " पहा , आपली नुकतीच ओळख होतेय. एकमेकींना समजून घ्यायला वेळ लागणारच ! सगळे views  पटतीलच असं नाही, खरं तर पटणारच नाहीत ! कारण आपल्यात पिढीचं अंतर आहे .पण , ह्या घरच्या चाली रीती मला तुम्हाला सांगाव्या लागणारच. लोकांचं तुमच्या बद्दलचं  मत चांगलं व्हावं, गैरसमज होऊ नाहीत म्हणून ! मी कधी तुमची  परीक्षा घेणार नाही आणि लोकांसमोर फजितीही होऊ देणार नाही.  पण एक लक्षांत असू द्या .. मी न लोण्याची आहे,  न दगडाची !...मी एक बाई आहे , आणि सासू ..तर मी असणारच आहे ..! तेव्हा , काही बोचलंच , तर ...चूक-भूल देणे-घेणे !!...."

पण मला वाटतं , माणसाने माणूस म्हणूनच रहावं , आणि माणूसकीनेच वागावं !! लोणी .... दगड ....काय गरज आहे ह्या विशेषणांची ?....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland