अस्सं बंगलोर सुरेख बाई

  

    लहानपणीची एक संध्याकाळ, हळू हळू अंधारतंय, आणि रेंगाळणाऱ्या उजेडात मुली गाणी म्हणताहेत.  वय वर्षे ३ ते ८३, तरी त्या सगळ्या मुलीच.  सगळ्याजणी नाती-गोती विसरून गाणी म्हणताहेत ... 

    ' अस्सं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळं SS तं  !

      अस्सं आजोळ सुरेख बाई, खायाला मिळं SS तं  !'

मधेच कोणाच्या द्वाडपणाचाही उल्लेख !  त्या  वयात माहेर - सासराबद्दल काहीच माहीत नव्हतं, समजत नव्हतं, पण काहीतरी 'स्पेशल'  'आवडणारं' असलं की ह्या ओळी सुचायच्या, आणि त्यात काहीही  'बसवता'  यायचं.    'अस्सा फ्रॉक सुरेख बाई' असंही !  ह्याच वयात केव्हातरी स्वप्नं पहायची सवय लागली.  त्यातलंच एक स्वप्न होतं बंगलोर पहाण्याचं.  'अस्सं बंगलोर सुरेख बाई,'  हे ही जमलं होतं, पण गाडी पुढेच जात नव्हती.  त्याच स्वप्नाची ही कथा ... 

    एखाद्या गावाबद्दल असं असतं की तिथे जावंसं  वाटतं, राहावंसं वाटतं.   परिकथेतल्या गावासारखं सुंदर, सुबक.    वळणदार रस्ते, कडेला टुमदार घरं, घरांपुढे चिमुकल्या बागा.    'ही वाट दूर जाते '  ह्यातल्या स्वप्नातल्या गावातच मन अडकायचं.   वाटायचं गाणं लिहिणाऱ्या आणि गाणाऱ्या दोघींनाही बंगलोरला जायचं असेल ... 

    त्याला कारणं ही तशीच होती.  आजोबा दर सुट्टीत बंगलोरला जायचे.  तिथे मोठमोठ्या शास्त्रज्ञांबरोबर रहायचे, काम करायचे.  ऐकतांना वाटायचं,  तिथे फक्त हुषार लोकांनाच जाता येतं.  तिथे आखीव सुंदर लॅब असतात.  चकचकीत बाटल्या, चित्रविचित्र काचेच्या गोष्टी, रंगीबेरंगी रसायनं आणि प्रचंड मशीन्सच्या आसपास जया भादुरी सारख्या मुली नाहीतर दाढीवाले शास्त्रज्ञ शुभ्र लॅब कोट घालून सतत काहीतरी करत असतात, मधून मधून लिहीत असतात. 

    नंतर केव्हातरी लक्षात आलं की भूगोलात प्रसिद्धी लिहितांना दिल्ली - मुंबईच्या पाठोपाठ बंगलोरचा नंबर असतो.  विमानांचे, घड्याळाचे कारखाने,  जवळच म्हैसूर इ. इ. कमीत कमी दहा ओळी !  पण तिथे जायचं कसं आणि केव्हा ? 

    दिवसेंदिवस हे वेड वाढतच जात होतं. त्यामुळे जेव्हा खरंच बंगलोरला जायचं, ते ही नवऱ्याबरोबर तिथे रहायला - बहुतेक कायमचं - असं ठरल्यावर माझे पाय जमिनीवर ठरेनासे झाले.  फुलोंके शहरमें हो घर अपना ... सगळी गाणी म्हणून झाली.  खूप भाव खाऊन घेतला मैत्रिणींच्यामधे.  आणि बंगलोरला विमानातून, हो विमानातून अवतरले आणि स्वप्नातून वास्तवातही. 

    ' फुलोंके शहरमें' घर छान आहे हो, पण भाडी काय भयानक आहेत,  इथपासून सुरुवात  झाली. त्यात रेशन कार्ड, Gas, BWSSB, KEB सगळ्यांनी आपापल्यापरीने हातभार लावला, आणि मी व्यवस्थितपणे भूतलावर पाय ठेवले.  ऑटोवाले फार लुटतात, दुसरं काय ?  मग लांब रुंद रस्त्यांचं कौतुकही कमी व्हायला लागलं. एवढे खड्डे चुकवत जायचं म्हणजे रस्ते रुंद हवेतच.  कामाला जायला दीड तास आधी निघावं लागतं आणि तेव्हढाच  घरी यायला उशीर होतो म्हटल्यावर रस्त्यांची लांबी ही स्कूटर वरून भटकतांना छान वाटली तरी एरवी तिचा संबंध दोन ठिकाणातल्या अंतराशी आहे हे लक्षात आलं.  हळू हळू कमर्शियल स्ट्रीटवरच शॉपिंग करायचं हा नेम सोडून मल्लेश्वरम बरं वाटायला लागलं.  आता तर कोपऱ्यावर सगळं मिळतं.  उद्या बहुतेक दारावर येणाऱ्या हातगाडीवरूनच भाजी घेऊन टाकीन,  झालं. 

    बंगलोरच्या फुलांचं कौतुक कधी कमी झालं ते मला चांगलंच आठवतंय.  बाळाची सर्दी बरी होत नाही म्हटल्यावर एक दिवस डॉक्टरांनी सांगून टाकलं, 'ह्याला pollen ची allergy आहे.  इतकी फुलं म्हटल्यावर वर्षभर कोणते न कोणते पराग असणारच.    '३ - ४ वर्षाचा झाला की ठीक होईल.'    त्या दिवशी कधी नव्हे ते सिमेंटच्या जंगलात जाऊन रहावसं वाटलं.   कशाला हवी ती फुलं आणि flower show ?    अजून ३ वर्ष रात्रभर धड झोप मिळणार नाही !    बायकांना कागदाची, व्हेल्वेटची फुलं का करावीशी वाटतात, ह्याचं रहस्य माझ्यापुरतं मला कळलं. 

    आता जशीजशी वर्ष पालटताहेत, तसं माझ्या डोळ्यांना सगळं वाईटच दिसतंय.  जग बदललंय का मी बदलले आहे कोण जाणे ?   कोपऱ्या कोपऱ्या वरचे कचऱ्याचे ढीग, तोडलेली झाडं, वाहनं, धूर, आवाज, गल्लोगल्ली भटकणारी अन गेटमध्ये घाण करणारी कुत्री, ह्या सगळ्याचा वीट आलाय.  आज पाणी येणार नाही म्हणून चिंता करावी का कोपऱ्यावरच्या फुटक्या पाईपमधून भळाभळा वाहणारं पाणी आजच्या दिवस थांबेल म्हणून सुख मानावं ?  वीज गेल्यावर मुलांच्या अभ्यासाची काळजी करू का पलीकडच्या गल्लीतला लाऊडस्पीकर बंद   पडला म्हणून समाधान मानू  ?   काहीच कळेनासा झालंय.  पाहुणे आल्यावर त्यांच्याबरोबर खरेदीसाठी हिंडायचं आणि घरी आल्यावर पटापट स्वैपाक उरकायचा ही सर्कस कधी कधी नकोशी वाटते.  शाळेचा हिसका वेगळाच.  मुलं ५ - ६ वीत आहेत का कुठे Ph.D. करताहेत कोण जाणे.  आपल्याला होतंय तरी काय ?   'कुठे तरी जा चार दिवस'  सगळेजण सल्ला देताहेत.   'तुला बदल हवा आहे.  कसा ओढलेला चेहरा झालाय.  कुठे गेला तुझा उत्साह आणि सगळं करायची हौस ?'   

    गेलंच पाहिजे कुठेतरी.  धीर बांधून मी एक मोठ्ठा प्लॅन   लांब लांबची ठिकाणं पाहून यायची, तिथली हवा, निरनिराळे रंग - गंध - सूर - चवी अगदी सगळं अनुभवायचं म्हणून निघते, मुला बाळांसह.  पंधरा दिवसांचा कार्यक्रम.  मग येतांना १५ दिवस माहेरी.  जवळ जवळ रोज नवीन जागा, नवीन भाषा, नवीन पेहेराव !

    पंधरा दिवस मी पैशांचा विचार सोडून देते.  स्वच्छता, शुद्धता इत्यादींना सुटकेसच्या तळाशी टाकून देते.  मिळेल ते , मिळेल तेंव्हा खाते,  हवं तिथे भटकते.  हवं तसं आयुष्य जगायचा प्रयत्न करते.  प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक कणाचा आस्वाद घेऊ बघते.  कधी कशातला फरक तर कधी कशात साम्य शोधते.  पण मधूनच जाणवतं ... आपण 'आपल्याला हवं तसं' म्हणण्यापेक्षा,  टूरवाल्याला हवं तसं जगतो आहोत.  सकाळी तयार रहा म्हणजे रहायलाच हवं.  नाहीतर आपल्याला सोडून चालता व्हायचा.  उगीच 'टेन्शन' यायला लागतं ... 

    जसे जसे परतीचे दिवस जवळ येतात, तसा सगळ्यांचा उत्साह मावळायला लागतो.       'परवासारखीच बाग आहे नं ?  मग जाऊ दे, मी इथेच बसते.'     'डोंगर, ?नको रे बाबा, पाय दुखले माझे.'    'हा ड्रेस १००० रु. ला ?  काय फेकतोय, २५० ला दे.'     'हे ?  ह्याच्यापेक्षा विधान सौधा बरा. टी.व्ही.त रोज हेच तर पहातो नं ...'     'मग मी हेच म्हणत होतो नं ...'     'हे बघ, हे वाक्य तू कितीदा म्हणणार आहेस ?  मला कंटाळा  आलाय.'    'मला सुध्दा.' 

    कधी एकदा माहेरी पोहोचीन असं होतं.  नागपूर फार गरम असतं उन्ह्याळात, तरी हरकत नाही, आता सगळा शीण घालवीन प्रवासाचा.  हा विचार पूर्ण व्हायच्या आत शेजारची काकू येते, "उद्या या गं सगळ्याजणी , बागेत आंब्याचा सण करूया."     झालं माझ्या झोपेचं खोबरं.  दुपारी टेबल खुर्च्याच काय सतरंजीही गरम लागतेय.  आता कसली झोपतेय.  प्रवासातले कपडे धुवून पाठ दुखली,  तर आई म्हणतेय,  'जमिनीवर झोपलीस,  म्हणून दुखत असेल  ... उकडतं कसं इतकं जगावेगळं  ?'   आजी म्हणतेय, 'उठा बाई, मोगऱ्याला किती फुलं आली आहेत बघ तरी, गजरे करून घाला सगळ्या बहिणी ...'        'नको, झाडावरच बरी दिसतात.  कशाला तोडून टाकायची ?'    ह्यावर आई म्हणते, 'काही नाही. उठायला नकोय म्हणून तत्वज्ञान चाललंय.  दोन मुलांची आई झाली तरी लोळणं सुटत नाहीये.'  

    'काय गं सारखी रागवतेस ? तुला माझं काहीच कसं पटत नाही ?'   मी जुनाच वर्षानुवर्ष चालत आलेला डायलॉग म्हणून टाकते. 

    बंगलोरला परतायचा दिवस उजाडतो.  डोळे पुसत मी आगगाडीत बसते.  दोन दिवसांच्या कंटाळवाण्या प्रवासात मी गेल्या महिन्याभराचा आढावा घेत असते.  इतकं काही बंगलोर वाईट नाहीये.  खरं म्हणजे खुपच चांगलंय बऱ्याच गावांपेक्षा.  इथून दूर गेल्यावर इथल्या गोष्टींची किंमत कळतेय.  रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टींवर धूळ, माती जमली होती.  ते आता स्वच्छ झालंय.  मनातली मरगळ झटकून  टाकली. स्वप्नातलं गाव आणि जागेपणीचं गांव ह्यात फरक असणारच हे  कळतंय.  जुनी स्वप्नं खोटी नव्हती, त्याला वास्तवाची बैठक नव्हती हे पटलंय. 

    'अस्सं बंगलोर सुरेख बाई'च्या पुढचं खूप सुचतंय, खूप जमतंय ... 

    अस्सं बंगलोर सुरेख बाई, ...   झाडांनी सजतं ... फुलांनी बहरतं  ... सरींनी शहारतं ... 

    पहाटे पहाटे गाडी बंगलोरला पोहोचते.  काय थंडी आहे इथे.  दोन चार दिवस पाऊस पडून गेलेला दिसतोय.  एका ऑटोत मुलं, सामान सगळं कोंबते.  तेवढीच थंडी कमी वाजेल.  घर जवळ येतं तशी नेहेमीची ठिकाणं, दुकानं दिसायला लागतात.  दुधाच्या गाड्या, निळ्या बसेस, सगळं तसंच आहे.  नेहमीचे morning walk ला निघालेले ओळखीचे अनोळखी लोक.  चेहेरे ओळखीचे,  पण नावानी अनोळखी. 

    मी घरी पोहोचते.  महिनाभर बंद होतं घर.  जरा कोंदट वाटतंय, पण किती उबदार आहे.  आल्या आल्या मी मुलांना झोपवून टाकते.  अर्धवट झोपेतून उठवून आणलंय.  आताच चिड - चिड नको व्हायला.  त्यापेक्षा झोपा दोन  तास.  आता काय बरं करू ?    आवरायला पसाराच नाही.   चहा करू म्हटलं, तर दूधवाला सातच्या आधी काही उगवणार नाही.  

    'तिकडून ' खुडबुड सुरु झालीय कपाटात.  म्हणजे तासभर जाईल आता कामाचे कागद शोधण्यात.  आजच ड्युटी जॉईन करायची आहे ना त्याला.  असं करते, एक तासभर मीही झोप  काढते.  गरम गरम,  मऊ मऊ पांघरुणात शिरता शिरता मला आणखी एक ओळ सुचते ... 

    अस्सं बंगलोर सुरेख बाई, ... झोपायां  मिळतं ... SS .....!!!

     


*******

हा लेख मी बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाच्या   " स न वि वि - गणेशोत्सव विशेषांक २००२ "   करता लिहिला होता.

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland