दिवाळीनंतरची पहाट ...

 

    छान गार हवा, मऊ मऊ रजईमध्ये मी मस्त गुरफटून झोपले आहे.  अजून सकाळ होते आहे.  आनंद सिनेमातल्या कविते सारखं, ... दिन अभी पानीमें हो, रात किनारेके करीब  ... , अर्धवट जाग, अर्धवट झोपेत मी, कालचं सगळं डोळ्यासमोर आहे ....  सुंदर कपडे, दागिने, ... सगळीकडे चमचमणारे दिवे अन फटाके, गप्पाटप्पा, हसणं, दंगा, ... फराळाच्या पदार्थांची चव अन वास ... 

    आणि मला खडबडून जाग  येते. तळणीचा वास नाकात भरलाय, नी फटाक्यांचा धूर ही ! ... जसं मावळत्या दिनकराचं कोणीच कौतुक करत नाही, तसंच या दिवाळीनंतरच्या पहाटेचं  .... कारण ही तसंच ! दिवाळीचा 'hangover' असतो नां ! ... आता आवरासावर म्हणजे डोकेदुखी ...?

     दिवाळी जशी बायकांना चढते म्हणजे स्वच्छता, फराळ, खरेदी ... तशी घरात कोणालाच चढत नाही.  आणि साहजिकच, तिचा hangoverही बायकांनाच सर्वात जास्त !  

    ... रजईतून बाहेर निघू का नको, असं वाटत असतांनाच माझ्या डोळ्यांसमोर घरातला scene नाचत असतो ... 

    तळणीच्या वासावरून स्वैपाकघर आठवतं ... कालच्या रात्रीच्या get together, ओवाळणे वगैरे कार्यक्रमानंतर, जेवणाचा कार्यक्रम, ... sink भरून भांडी पडली आहेत, घरात असेल नसेल ते प्रत्येक भांडं वापरून झालेलं, चहा करायला त्यातलंच एक घासून घ्यायचं, मग सगळी खरकटी भांडी त्यांचा डोंगर निस्तरून एकात एक घालणे, चमचा - दोन चमचे उरलेलं , काल काढून ठेवायचा आळस भोवला, झोपायला बारा वाजून गेले ... तेलाच्या ३ कढया, चिवडा-चकलीची एक, करंजीची एक ... शेवटच्या करंजीला फुटायला काय झालं होतं देव जाणे, म्हणून शंकरपाळे चिरोटे अनारसे वगैरे करता अजून एक ... लाडू वळल्यावर पाकाचं भांडं, त्यातला बाजूचा पाक दगडापेक्षा कडक, कामाचे डोंगर ..... 

    तोच प्रकार आहे कपड्यांच्या बाबतीत !  खोलीत ३ - ४ दिवसांचे नवीन कपडे, ते sort out करून एकाचे ४ डोंगर करणे, dry-cleaning, घरी धुणे, हाताने धुणे, रंग जाणारे,  त्यातच नवऱ्याचे शर्ट.  महा त्रासदायक, नेमका माझा रंग जाणारा blouse आणि त्याचा पांढरा शर्ट  एका washing cycle मध्ये आणि सगळ्या कपड्यांना गुलबाक्षी झांक ...!  म्हणजे ओसंडून वाहणारं प्रेमच जणू, फक्त ते दिवसभर रागीट डोळ्यांनी आपल्यावर लादलेलं ... 

    आणखी एक गठ्ठा, पाहुणे मंडळी - आपली मुले नातवंडे . येतात पाहुण्यांसारखी २ दिवस, आणि हक्कानी पांघरुणांची रास मागे ठेऊन जातात !  त्यात हात पुसायचे टॉवेल, नातवंडांची खेळणी, वगैरे.  दिवाळीच्या किल्ल्यावर कमी खेळणी असतील ... 

    दिवाळीनिमित्त आपणही उगीच फापट पसारा काढत असतो हं !  काय जरूर होती सगळी covers, पडदे बदलायची ?  कोण एवढं पहाणार होतं ?  ... आता त्याचा एक ढीग ... आठ दिवस पुरेल धुवायला !  त्यात पाऊस नाही आला म्हणजे मिळवली, नाहीतर प्रत्येक गठ्ठा वाळायला  दोन-दोन दिवस ... !

    हॉलमध्ये एका खुर्चीवर giftpapers चा गठ्ठा, एका पलंगावर gifts चं collection ... अंगणात जळलेल्या - न जळलेल्या फटाक्यांचे अवशेष, त्यांच्या डब्यांचा कचरा, जाईन तिथे आवरायला काहीतरी आहेच !   पणत्या, दिव्यांच्या माळा, आकाश कंदील नीट काढून आवरून ठेवायला हवे !  आणि एवढ्यावरच नाही तर पुढचे ८ - १० दिवस मला घरभर गोष्टी सापडणार आहेत.  कोचाच्या मागे फ्रिजवरची magnets , जिन्यात चमचे,  भांड्यांच्या कप्प्यात चेंडू, अगदी खजिनाच सापडणार - न शोधता !  

    खजिन्यावरून आठवलं, काल घाई घाईनी कानातलं घालतांना फिरकी पडली नि ती पलंगाखाली गेली. ती शोधायला हवी नाहीतर , बाई झाडून टाकायला कमी करणार नाही. अशावेळी अगदी साफ झाडेल !   म्हणजे पुन्हा धुळीत काम, शिंकांना आमंत्रण ... ऑ ... पण धूळ कशी काय ?  आठच दिवसांपूर्वीच तर सगळं स्वच्छ केलं होतं ना दिवाळी निमित्त .....??



Comments

  1. छान. खरंच आहे गं बरोबर लिहिले आहे. वाचताना तू समोर बसून सांगतेय असे वाटते.

    ReplyDelete
  2. अगदी हाच अनुभव!!! प्रत्येकीच्या मनातलं शब्दांत मांडलं आहेस.छान लेख

    ReplyDelete
  3. धन्यवाद !! ☺️ खूप खूप शुभेच्छा !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland