गूगल aunty

 

    एकदा " Laughter the best medicine"  मध्ये खूप छान गोष्ट वाचली होती.   एक बाई मैत्रिणीला आपल्या सुट्टीतल्या trip बद्दल सांगत होती .  घरच्या गाडीने कसे सगळे गेले, मग बर्फाच्छादित शिखरं,  घाटवळणाचे रस्ते,  उंच उंच हिरवीगार झाडं, मधूनच दिसणाऱ्या दऱ्या,  सरोवरं  ... ऐकता ऐकता मैत्रीण म्हणाली, "अगं, पण तू तर म्हणत होतीस की तुम्ही समुद्र किनारा दाखवणार आहात मुलांना ... सुंदर beach, वाळूत किल्ले -घरं ... तिथे आराम खुर्चीत पहुडून तू पुस्तक वाचणार आहेस,  मग एकदम डोंगर - दऱ्या  ... ?"       असं म्हटल्यावर त्या बाईला रडूच फुटलं.      "काय सांगू बाई,  माझ्या नवऱ्याला पत्ते - रस्ते  विचारायला बिलकुल आवडत नाही ... मग काय करु गं मी ?"   गोष्ट अमेरिकेतली असो नाहीतर कुठलीही ...  तात्पर्य काय, तर नवरे लोकांना कोणाला विचारायला आवडत नाही, पत्ता असो का रस्ता ! 

    मग मी आणि माझा नवरा त्याला अपवाद कसे असू ?     त्याला पत्ता विचारायला आवडत नाही आणि मला सांगायला आवडत नाही.     मला २००m  का ५००m  कळत नाही, आणि हा पट्टीशिवाय चालणार नाही !    मी एखाद्या ठिकाणी - चौकात पोहोचले की मग दुकानं वगैरे पाहून आठवते की आता कुठे जायचं आहे आणि हा आधीच्या चौकापासूनच डावीकडे का उजवीकडे वळायचंय  हे सांग , म्हणून धोशा लावतो.  त्यात नकाशातली दुकानं वगैरे प्रत्यक्षात अजिबात दिसत नाहीत, कारण ती आतल्या गल्लीत असतात.  आणि हे त्याला पटतच नाही.   "तू फोनवर map लाव आणि तुझ्या blue tooth वर ऐक ती काय सांगते ते आणि मला खिडकीतून गंमत  पाहू दे " म्हटलं,  तर ते पण त्याला चालत नाही. Map लावून , तो गोळा किंवा बाण कसा जातोय , ते मीच पहायचं , त्यात कधी तो मॅप फिरतो , तर कधी बाण सरकतो ! त्यात पहात , आजूबाजूच्या खुणा शोधायच्या !.....

   एक स्मार्ट फोन्स च्या आधीची गोष्ट आहे ! आम्ही पहिल्यांदाच बंगलोरहून पुण्याला जात होतो घरच्या गाडीने .  चित्रदुर्गला पोहोचलो.   तिथे highway वर flyover चं  काम चालू होतं.   रस्ता म्हणण्यासारखं काहीच नव्हतं.   ' Take Diversion' चा बोर्ड आडवा.    सगळे बाण आकाशाकडे !  लोक आपल्याला हवीतशी diversions घेत होते.  मी एक 'मुंबई' दाखवणारी पाटी पाहिली, अन विचार केला, मुंबईला जाणारा रस्ता पुण्यावरूनच जाणार, म्हणून नवऱ्याला म्हटलं उजवीकडे वळायचं !  थोडं अंतर गेल्यावर वेगळ्याच गावांच्या पाट्या दिसायला लागल्यावर उलटे वळलो.   पण माझी ही एक चूक नवऱ्याने सगळ्यांना सांगून अजरामर करून टाकलीये !

    नुकतीच एक post वाचली, google बाईची !     ही जगातली एकमेव बाई म्हणे, सगळे पुरुष जिचं गपगुमान ऐकतात.  तिला आम्ही सगळे गुगल आंटी म्हणतो .  ती , तिला हवं तसं नाचवते-फिरवते लोकांना.   आणि कधी कधी आपण तिचं ऐकलं नाही की लगेच दल बदलु सारखं re-route करते.  "मी असं म्हंटलंच नाही"  type ! तशी ही बेभरवशाची आहे . कधी  अर्ध्या गावाला प्रदक्षिणा घालून नेईल , तर कधी गाडी जेमतेम  मावेल अशा बोळातनं . मी एकदा मैत्रिणीच्या मुलीच्या डोहाळ जेवणाला निघाले होते.   साडेबारा होऊन गेले होते.  मोठ्या मिनतवारीनं नवऱ्याला तयार केलं 'सोड मला तिथे'  म्हणून.   google ऑंटीला गप्प करून , मी सांगते त्या shortcutनी  ने म्हटलं त्याला,  तर मैत्रिणीच्या घराच्या आधी , गल्लीच्या तोंडाशी पाईप टाकायला खंदक  खोदलेला, अन त्यातून निघालेल्या मातीच्या डोंगरावर काही फांद्या खोचून ठेवलेल्या . एका काडीला लाल रिबिनीचा तुकडा बांधलेला !   नवरा म्हणाला, ".... म्हणून map लावायचा असतो "....  आता मला काय माहीत की आजच ते रस्ता खोदणार आहेत ?...by the way , मैत्रिणीची नात वर्षाची झाली , अजून खंदक जैसे थे च !!!!....    

      एकदा आम्ही पुण्याहून आंबेजोगाईला चाललो होतो.  इंदापूरच्या रस्त्यावरून दिंडी जाणार , रस्ता बंद असेल , म्हणून नगर कडून निघालो.  नगरला बीडच्या फाट्याला वळलो आणि थोड्याच वेळात ही बाई गप्प ! ... आजूबाजूला सुनसान जंगल,  एक प्राणी किंवा माणूस नाही औषधाला.   mobile वर सिग्नलची एकसुध्दा काडी नाही.  लांब एका टपरीवर २ - ३ मोटरसायकलवाली माणसं ...  आता ते सभ्य, का गुंड, का दरोडेखोर ?   बरोबरचे ड्रायव्हरकाका म्हणाले, "ताई घाबरू नका,  google बाई नव्हत्या तेव्हापासून,  गेली ३० वर्षं गाडी चालवतोय, रस्ता  माहीत आहे मला ... "      तरी मी आपली "सर्व मंगल मांगल्ये  आणि दुर्गे दुर्घट  भारी " जपत बसले.   दोन अडीच तासांनी आली ही बाई जागेवर ! ...   "at 2 km, turn right to enter  बीड ". मी मनात म्हटलं, "  बाई , आता कशाला सांगतेस ? मी वाचली ती पाटी तुझ्या आधी ...." ....

   

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland