मुगुट
कधी कधी आपल्याला घर आवरायचं भरतं येतं. उत्साहाच्या भरात , आपण अगदी माळ्यावरच्या बॅगांपासून सुरु करतो, आणि पहिल्याच बॅगेत आपल्या आवरायच्या इराद्याचा शेवट होतो ....
एकदा , मी अशीच एक बॅग काढली, त्यात काय आहे ते आठवत नव्हतं म्हणून . आणि त्यात जुन्या फोटोंचे अल्बम सापडले ! "इतके फोटो काढले आपण" ... "तेव्हा फिल्म लागायची ना"... "इतके पैसे उधळले "... "तेव्हा मोबाईल नव्हते ना कॅमेरावाले "... "असू दे रे , त्यामुळे आज बघ किती सुंदर आठवणी पुन्हा हाती लागल्या ..."..." निव्वळ अडगळ ..."! दोन मनांचे संवाद मी ऐकत होते. एक माझं मन आणि दुसरं नवऱ्याचं मन .... शिडीवर चढून बॅग काढायला लागल्याचं दुःख बाहेर येत होतं !
हा बघ काय मस्त फोटो ! फोटो मुलांचा ! दोघे मुगुट घालून बसलेले ! मन ३० - ३५ वर्ष मागे गेलं ... मुगुटांची आठवण ... त्या दिवशी गुरुवार होता. हो नक्कीच आठवतं, कारण सासूबाईंच्या मैत्रिणी गुरुवारच्या भजनाला येणार होत्या. आपल्या घरी काही, लहानसा जरी कार्यक्रम असला की आपल्या आधी तो कामवालीला कळतो. म्हणून तर ती दोन दिवस सुट्टीवर ... मोठ्याचं पोट दुखत होतं. अगदी खरं खरं, पण त्याचं कारण , आदल्या दिवशी शाळेत ५० sit-ups का push-ups केल्या उत्साहाच्या भरात, सवय नसतांना ... आणि मग बसला घरी ! मी इकडे सतरंज्या, गालिचे घालतेय, खुर्च्या सरकवतेय, खिचडी टाकलीयव, आंब्याच्या वड्या चिक्कीवर जाऊ पहाताहेत, आणि हा मुलगा, " आई, कागद देतेस का ? ... fevicol कुठेय ? ... माझी फुटपट्टी पाहिलीस का ? ... " पोट दुखतंय म्हंटल्यावर, झक्कत हातातलं काम सोडून सगळं देत होते. त्याच्या हस्त कलेला आत्ताच उधाण आलं होतं .
असो, भजन झाल्यावर, तो कसा आहे हे पहायला गेले, तर ... कागदाचे दोन सुंदर मुगुट तयार झाले होते ! पांढऱ्या कागदाचे, त्यावर रंगीत पेन्सिलीने 'stones' काढलेले ! निळे आणि लाल, हिरवे, पिवळे ... सगळे ! मी पहाताच राहिले. खोलीभर कागदाचे कपटे केले , म्हणून रागावू तरी कशी ?
धाकटा घरी आल्यावर home-work, खाणं पिणं आटोपून, मग त्यांचा actual खेळ ! सगळा पसारा आवरून मी आरामात चहा पीत बसले होते. दिवाणावर मोठ्याने त्याची वेताची ची खुर्ची ठेवली. त्यावर एक भरतकाम केलेला table-cloth, त्या सिंहासनावर धाकटा विराजमान - मुगुट घालून! त्याला बरोबर कळायचं, केव्हा आपल्याला भाव मिळतोय ! तेव्हा मोठयाचं गुमान ऐकायचं ... तर मोठाही मुगुट घालून प्रधानजी होऊन बसलेला ! खेळ इतका झकास रंगला होता की, एरवी कामाच्या विचारात बुडलेल्या त्यांच्या वडिलांनाही राहवलं नाही आणि त्यांनी कपाटातून कॅमेरा काढून फोटो काढले, आणि तेच मला सापडले !!! गोजिरवाणी मुलं ! डोक्यावर मुगुट, आणि अंगात night-suit ... ! कितीतरी वेळ मी त्यातंच !....फोटो पहात !...
नंतरच्या weekend ला मुलाकडे गेलो होतो, तेव्हा त्या फोटोचा मोबाईलमध्ये फोटो काढून नेला, दाखवला ! "काहीतरी सापडतं तुला ... " मुलानी मला dismiss करून टाकलं, सूनबाईने तो फोटो स्वतःला forward करून घेतला !! आणि तो विषय मग तिथेच राहिला .
मधे बरेच महिने गेले असतील - आणि एकदा तिथे गेलो असतांना......अक्षरशः योगायोग ! शाळेतून नातू आला तो नाचत नाचतच ! "आजी, Ma'm नी आज crown दिला आम्हाला , हा बघ... !" पिवळ्या कार्डबोर्डचा केलेला, अगदी साधासा - त्यावर सोनेरी वगैरे काही नाही. एक दोन लाल -निळे गोल - चौकोन चिकटवले होते, अगदी सुबक ! आणि तो डोक्यावर घालून मिरवण्याचा काय आनंद ! त्याच्या पाठोपाठ नात ही शाळेतून आली, तिनेही 'try' केला crown !.."मस्त आहे नं !!"... डोक्यात idea , डोळ्यांत चमक !
"OK, let us have a procession !!!" नातीचा हुकूम. तिने कुठून तरी म्हणजे माझ्याच बॅगेतून माझा एक कुडता उपसून काढला. त्याचा robe करायला , कारण , त्याला एक 'गोल्डन लाईन ' होती ! त्यांना काहीही पुरतं खेळायला ! फक्त त्यांनी त्याचं पोतेरं केलं , तरी आपण काही बोलायचं नाही .
मग नातवाने तो robe घातला, चांगला पायघोळ झाला ! "आजी, मी बिगुल वाजवते, तू सोल्जर होतेस का, राजाच्या मागे ?" "अगं, मग vdo कोण काढणार ?" "अगं, आबाला दे ना फोन ..." "छे गं, त्याला काही येत नाही ..." आबानी त्याचा पेपर आणि वाचायचा चष्मा, दोन्हीतून फक्त डोळे वर करून पाहिलं. "vdo काढतोस का सोल्जर होतोस ?" म्हंटल्यावर काही न बोलता, पुन्हा डोळे पेपर आणि चष्म्यात !
"Here comes the King ...... , tu tu tu tu ... " " अगं , राजेसाहेब , राणीसाहेब म्हणा ना" ..." अं ...मग ते जरा रागावल्या सारखं वाटतं ... राणी साहेब उठा , आज शाळा आहे असं ...." ..."ok , ok , कळलं ...." ! मग राजा आणि बिगुलवाली घरात एक चक्कर मारून आले , कवयातीसारखे एक दो , एक दो , करत !! वाटेत vdo काढणाऱ्या जनतेला एक दोन gifts मिळाल्या. खेळातले blocks, एक गोष्टीचं पुस्तक , एक छोटी कार ... जातांना राजा "bye, आजी " करून विंगेत ! ...
... इतका मस्त vdo आला ! .....History repeats itself and repeats so cutely ! .....
Very nice !Childhood:s make believe world!
ReplyDeletewho is witness for both the occasions ? yourself or media
ReplyDeleteWho else , me only ! Photographs were rare 35 years ago !
ReplyDelete