तुझं माझं जमेना ... २
काही कुळं अशी असतात की त्यांचं आणि आपलं कधीच पटत नाही ... पण तरीही वेळ आली की आपल्याला त्यांचीच आठवण येते आणि मनाविरुध्द आपले पाय त्यांच्याकडेच वळतात. Strained relationships ! Strain आहे तर मग relation कशाला ठेवायचं ? कारण नवीन प्रयोग करायची भीती वाटते किंवा 'जास्तीत जास्त काय होईल ?' असा प्रश्न स्वतःला विचारून आपण मनाचं समाधान करून घेतो.
शिंपी ! ज्याच्याशी कधी पटत नाही, पण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय ... आता हळूहळू येताहेत, पण इतकी वर्षं नव्हते.
मला आठवतं ! लहानपणी तिसरी - चौथीत असतांना , आजोळी गेलं की आई पहिलं काम काय करत असेल, तर आम्हाला घेऊन शिंपी गाठणे. "माणिकराव, मुलींचे फ्रॉक शिवायचेत. आठ दिवस आहे मी इथे ... " "अरे वा, कधी आली माहेरवाशीण बाई इथे ? आणि काय हो , असं आठ दिवस यायचं आणि चिमण्यांसारखं भुर्रकन परत जायचं ? " माणिकराव चष्म्यावरून पहात बोलायचे. "आई, मी आधीच सांगतेय, मी फ्रिल आणि फुग्याच्या बाह्यांचा झबल्यासारखा फ्रॉक घालणार नाही. मला खरंतर स्कर्टच पाहिजेय !" "स्कर्ट अजिबात नाही, अजून कंबरेचा पत्ता नाही आणि ढेरी एवढी आहे, ... फ्रॉकच शिवणार ... " शिंपी दादांचं वक्तव्य ...! ऑ, हे मला असं बोलताहेत ... आणि आई हसतेय .... मग काय , ते शिवतील तेच घालायला लागायचं. मग दरवेळी गावांत - बाजारात गेलं की एक चक्कर माणिकराव. आणि मग आईची आणि त्यांची शाब्दिक रस्सीखेच ... "आज मी एक तरी नेणारच ... " "अहो, पण बटणं व्हायची आहेत ... " "आणा बटणं, मी लावून टाकीन " "असं कसं, पैसे घेतोय ना त्याचे ... " "मग नका घेऊ ... " वगैरे करत, परतायच्या आदल्या दिवशी कपडे मिळायचे. एकदा तर तीन महिन्यांनी मिळाले. तेव्हा ते कपडे घालेपर्यंत आम्ही उंच झालो असू, म्हणून त्यांनी खालची हेम उसवूनच आणली होती ! ...
आमचे दुसरे शिंपीदादा , मी कॉलेजमधे असतांनाचे ! ते लखनौच्या बिरादरीतले आहोत, असं सांगायचे. कॉलेजमधून येतांना त्यांच्या दुकानावरून चक्कर मारून मी यायचे, "चाचाजान, कपडे सिलाने है ... " असं म्हटलं की ते संध्याकाळी घरी हजर ! मग नेहेमीसारखं 'कपडा थोडा कम है बेटी ! ... लेकीन बना देंगे ... " "नेक थोडा बडा , थोडा डीप चाहिये और आस्तीन ना हो तो अच्छा होगा ... " मी जमेल तेव्हढं सभ्यपणे त्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचे. "नही बेटा , ये ठीक नही है, ... अच्छे बच्चे ऐसे कपडे नही पहनते ... " त्यांना बुरखे शिवायची सवय , sleeveless वगैरे कसं चालणार मग ? शेवटी त्यांनी शिवलेले कपडे अगदी बुरखे नसले ,तरी ते घातल्यावर बुजगावणं बरं , म्हणायची वेळ यायची ! वाद घालायचा प्रश्नच नाही ! त्यांना शिवायला द्यायचा एकच फायदा, म्हणजे ते घरी येऊन कापडं घेऊन जायचे आणि शिवून झाले की घरी आणून द्यायचे - सांगितलेल्या दिवशी ! न चुकता ! नंतर फक्त एकच काम राहिलेलं असायचं. घरचं मशीन काढून, दोन्हीकडून एक एक इंच आतून शिवण मारणे ! बुरख्याचं बुजगावणं ! ...
इथे बंगलोरमधे आल्यावर शिंपी शोधणं भाग पडलंच. दर वेळी नवा शिंपी. पैशावरून भांडण कधीच नाही. जी काय घासाघीस व्हायची, ती वेळेवरून. मी म्हणायचे, "तुम्ही आधीच दोन दिवस extra सांगा, मी तेव्हा येईन, उगाच खेटे घालायला लावू नका." त्याचं म्हणणं, "त्यांत काय एवढं ? भाजी आणायला येताच की, तेव्हा डोकावून जा ..." "अहो पण मला ते ब्लाउज function ला घालायचंय ... " "मग काय, आता लग्नाला नाही , तर नंतर बारशाच्या function ला घाला." ...सगळ्या शिंप्यांचा आवडीचा जोक !
... असं करत करत, एक शिंपी सापडला ! सगळं कुटुंबच दुकान चालवायचं. बायको एका कोपऱ्यात साड्यांना फॉल लावत बसली असायची. मुलगा आणि मुलगी शिवत असायचे. शिंपीदादा , मी सांगीन ते लिहून घ्यायचे, पण शेवटी त्यांच्या मनासारखंच करायचे. त्यांच्या मते आजकालची बुटीक्स म्हणजे शिंपीकलेला बट्टा आहेत. "ती बुटीक असतात ना, लिपस्टिक लावलेल्या बायका चालवतात ती , ... ते सगळे tailoring accidents बरं का ऑंटी. अशी कुडत्याची खालची edge मी वाकडी शिवली असती ना, तर माझ्या वडिलांनी घराबाहेर काढलं असतं ... " पण असो, एक दोनदा आधी फोन करूनआठवण करून दिली , की कपडे मिळतात वेळेवर. कधी कधी "या वेळी उशीर नका करू, मला गावाला जायचंय" असं म्हटलं की म्हणतात, "हो हो, आता सणाला सगळेच गावाला जाणार ... मी ही ... " म्हणजे आणखीन ४ दिवस पुढे !
मागच्या वेळी मात्र गंमत झाली. मी ब्लाउज टाकायला गेले , तेव्हा मुलगी in-charge होती. आई-बाबा खरंच गावाला गेले होते म्हणून. ती सर्व लिहून घेत होती. "गोल गळा ... मागे ती पाठीवर बांधायची दोरी नको. ते पोटली बांधल्या सारखं वाटतं, शिवाय दोरीचं फूल सुटलं तर पंचाईत ..." माझं चालू होतं. तिला ते ऐकवेना बहुतेक. "ते जाऊ दे ऑंटी , मी असा latest assymetric गळा करते ... " "नको नको, तो विचकलेला गळा वाटेल कुणाला ... " मी अजीजीने म्हणाले . "OK, ऑंटी, मग असं करते पाठीवर बारीक पट्ट्यांची जाळी करते window तऱ्हेची. aunty , you should look mod " (बंगलोरची आहे ना ती, इंग्लिश बोलते !) ... म्हणजे आपण लहानपणी कागदाच्या पट्ट्यांची चटई करायचो तशी असणार ... मी पटकन विचार केला. "छे छे, पाठीवर खिडक्या नको गं बाई " हे ब्लाउज मिळेपर्यंत समोर पडतीलच त्या. "जरा सैलच शीव " "no no no, ऑंटी, मी मस्त शिवते. बघाच तुम्ही, परवा या बघा." बरं म्हणत, मी तिच्या पुढे हात टेकले. मग मी पण idea केली. मी 'परवा' गेलेच नाही. Function आटोपल्यावरच गेले ! कधी नव्हे ते कपडे वेळेवर न मिळाल्याचा मला आनंद वाटत होता ...
Your writing is gigling me . Manala gud.gulya karanarya ahet. Buck up for more sripts.
ReplyDeleteThank you , Yashodhar ! I feel so good to read your encouraging comment !!!
ReplyDelete