मालगुंड ट्रिप
"काय ? येणार का ट्रिपला ? जायचं कोकणात ?" ... सतीशचा फोन आला आणि मी चकीत !! एका पाठोपाठ एक धक्के ! एकतर सांगलीहून सतीशचा फोन, ट्रिपला येतेस का , विचारायला, ती ही कोकणात ! "येते की... " म्हटलं आणि तयारीलाच लागले ! ३ महिन्यात पुन्हा GT ! ... मालगुंड आणि गणपतीपुळ्याला जायचं ठरलं !
आणि मग planning सुरु ! GT सारखंच ! रोज रात्री कामं धामं आटोपली की फोनवर फोन ... मी हे आणते, त्याला ते आणायला सांगू, अमका हे करेल, तो ते करेल ...नव्हे ...केलं , झालं ,असंच ! ... सतीश आणि अनील ! दोघे सगळ्यांसाठी एक पायलट ट्रिप करून आले ! दोघे सगळं बघून, शोधून आले ! त्यांनी पाठवलेले फोटो आणि VDO अप्रतीम ! मुळात , हे सर्व आपल्याच देशात, नव्हे, आपल्या महाराष्ट्रातच आहे, हे पाहून तर इतकं छान वाटलं ! झक मारत गेले जगभरचे समुद्र किनारे !
हो , नाही , करत अर्ध घर बरोबर घेऊन आम्ही निघालो. कपडे, टोप्या तर नेहेमीचंच, शिवाय भेळ करायला मोठ्ठ पातेलं, डाव, चमचे, इथपासून तर कांदे, टोमॅटो, मिरच्यांपर्यंत ! .. पुराणपोळ्या, तूप , लाडू - चकल्या, वड्या, चिवडे - भडंग, खाकरे, खारेदाणे, निरनिराळी "सरबतं, पेयं ... !" इथपर्यंत सगळ्यांनी तयारी केली होती !!
आंबे घाटाला वळलो आणि 'हिरवी पर्वतराजी कुरणं, घनदाट जंगल, असे शाळेत शिकलेले शब्द खरे खरे दिसायला लागले ! इतकं शांत वातावरण, आवाज, कडकड... काही नाही. ह्या वळणानंतर ते वळण , ह्या टेकडी नंतर तो डोंगर ... असं पार करत मालगुंडला पोहोचलो ! आम्ही लांबून आल्यामुळे नंतर पोहोचलो, पण सगळे वाट पहात होते !...आणि ज्या उत्साहाने सगळ्यांनी 'या sss ' म्हटलं, ते ऐकून पुन्हा एकदा पटलं, की खरंच मी ह्यांच्यातलीच आहे !
'स्वाद' मधे, कोकणातल्या पहिल्याच जेवणाला फणसाच्या भाजीची सलामी ! 'व्वा sss ' शिवाय शब्दच नाही ! जेवून resort ला पोहोचलो, आणि अजून एक सुखद धक्का ... काय सुंदर परीसर, हिरवंगार लॉन, नावाप्रमाणे माडाचे बन, दाट सावली ! खोल्याही मस्त ! लॉनमधे खुर्च्या टाकून सगळी मंडळी गप्पा-टप्पा, हास्यविनोद आणि खाऊ खाणे ! त्या दिवशी संध्याकाळचे मोदक ... फक्त 'अहाहा' ... बाकी शब्दच नाहीत !
संध्याकाळी , जवळच्या जिंदाल गणपती देवळात गेलो . भव्य मंदीर , भोवताली सुंदर बाग ,काजूची झाडं , सुंदर मूर्ती !! मन प्रसन्न झालं ....!!!
दुसऱ्या दिवशी , सकाळी , समुद्राच्या लाटांमधे पाय बुडवायचे म्हणून गेलेली मंडळी डोक्यावरून जाणाऱ्या लाटांमधे भिजूनच बाहेर ! दंगा, मस्ती, डुंबणं !!!... त्यात प्राची आघाडीवर ! ह्या पोरीच्या उत्साहाला नेहेमीच उधाण आलेलं असतं ! मग ते गाणं, नाचणं असो नाहीतर पाण्यात खेळणं असो. मला पाण्याचा phobia आहे, तरीही मी गेले , घोटाभर पाण्यात ... पण त्यांच्या इतकं नाही ... बहुतेक पुढच्या वेळी ! ...
गणपतीपुळे - तिथे रेखा join झाली ! तिथे गेल्यावर , श्रीकांत कूलपणे तिथल्या पोलीस चौकीत गेला , आणि " duty वर कोण आहे ? " असं विचारताच , तिथली पोलीस मंडळी... एकदम कडक सॅल्युट !!! .... power म्हणजे काय ते एका क्षणांत पाहिलं !! असा आपला great मित्र ! आपलीच कॉलर ताठ !... देवाचं दर्शन इतकं सुंदर झालं ! त्यानंतर तिथेच सभामंडपात बसून, मग १२ वाजताची आरती झाली, प्रसाद घेतला, आणि मग वरवडे गावातल्या जोश्यांकडे जेवायला गेलो. अळूवडी, डाळिंब्यांची उसळ, फणसाची भाजी, आणि सोलकढी ! तिथले पदार्थ, तिथला आसमंत, वातावरण, ambience, मित्रमैत्रिणी, सगळ्याची चवच न्यारी ! त्या रात्री पुरणाची पोळी, खोबऱ्याची पोळी, तूप आणि भेळ !... आता सगळे म्हणताहेत की आपण खूप जास्त नेलं, पण मला असं वाटतं , की आनंदानीच पोट इतकं भरलं होतं, की भूक आणि जागाच नव्हती पोटात !
संध्याकाळी आम्ही काहीजणच केशवसुतांचं स्मारक बघायला गेलो ! त्यात काय बघायचंय, पण एक tick mark म्हणून मी गेले, तेव्हढंच सगळ्यांबरोबर हिंडायला. आणि तो ही सुंदर धक्काच ! तिथे steel च्या पत्र्यांनी केलेलं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं शिल्प ! आणि त्याच्यामागे चौकात त्यांच्या सुंदर, प्रसिद्ध कविता granite मध्ये कोरलेल्या ! एकेक कविता वाचतांना, लहानपणी पाठ केलेले शब्द आपोआप ओठांवर येत होते ! दुसऱ्या हॉल मधे सर्व मराठी कवींची चित्रं, त्रोटक माहिती, आणि एक प्रसिद्ध कविता ! ..... अनुभवावं असंच सारं ! ...
आणि आमच्या संध्याकाळच्या गप्पा ! त्यांना मैफलच म्हणावं ! प्रसादची चंद्रगाणी आणि त्यावर लिहिलेलं शब्दचित्र ! विनु - अनिकेतनी सांगितलेले 'शल्य - कौशल्य' लिहितांनाचे अनुभव ! स्मिता -अनिकेतची सौ- बालगंधर्वांवरचं पुस्तक अनिकेतनी लिहिलं ,तेव्हा तिला आलेला अनुभव ! अश्विनी , वासंती , सीमा यांनी केलेला आमचा 'game' , संध्या ची दादागिरी , ज्योत्स्ना, शुभांगी आणि भारती यांच्याशी गप्पा !! बाबूचं गाणं अप्रतीम !त्याला काय येत नाही ,कोण जाणे ! आणि surprise of surprises ... सतीशचं गाणं ! ह्या दोघांना गाणं ही येतं हे माहीत नव्हतं ! पण सतीश, 'प्रेमगीता'ला असा twist देऊन देशप्रेमगीत ? ते ही इतक्या romantic surroundings मध्ये ? ....हाय कंबख्त .....
चंदूनी पैशांची बाजू संभाळली ! खाऊन पिऊन झालं की हात तोंड धुवून सगळी मंडळी लहान मुलांसारखी हुंदडायला बाहेर ! चंदू आपला, आपल्या बाबांसारखा ... पैश्याचं बघतोय ... !
गजाभाऊ आणि श्रीकांत, त्यांचे अनुभव, गप्पा ऐकत रहाव्यात ! सगळ्यांच्या सौ ही त्या सर्वांना उत्तम साथ देत होत्या ! अनोळखी लोकही कधी आपले होऊन जातात, ते कळत नाही ! माझा नवराही ह्या मित्रांमधे कधी सामावून गेला ते कळलंच नाही !...
चंदू, एक गोष्ट मात्र अगदी मनापासून सांगावीशी वाटतेय. तुझा नातू - अबीर बाळ - त्याने सगळा limelight खाल्ला !!!! बाळ आलं की कोणी ना कोणी जाऊन त्याला घेऊन मिरवायचं ! त्याला चिमणी नाहीतर माऊचं बाळ दाखवायच्या निमित्तानं ! त्याचे आई - बाबा आपल्या सगळ्यांचा धांगडधिंगा पहात , हसत होते ...!
जे आले नाहीत, त्यांची आठवण काढत जात होतो. तुम्हाला सर्वांना खूप miss केलं, पदोपदी GT च्या आठवणी निघत होत्या ! परतीच्या प्रवासाची वेळ झाली, आणि मग आपण आणलेले पदार्थ प्रत्येकाला मिळावेत म्हणून सगळे वाटावाटी करू लागले. प्रत्येकालाच अशी return gift / goodie bag मिळाली. असं वाटतं, कोणी राहिलं असेल, तर केवळ आणि केवळ माझ्या वेंधळेपणामुळे ! असा सगळ्या खाऊचा चट्टामट्टा करून निघालो !....
रुसणं, रागावणं, चिडणं, दुखणं - बहाणं , सगळे negative thoughts समुद्रात बुडवून टाकले आपण ... का त्यांना तडीपार केलं !!
... हे मैत्र असंच राहो, आणि ही आनंदयात्रा अशीच मोठी होत, आणखी मित्र - मैत्रिणी जोडत पुढे जात राहो ... हीच सदिच्छा ... !...
अलका कसलेल्या लेखिके सारख लिहलय. याला असा टच आहे कि प्रत्यक्ष तुमच्या बरोबर आपणही आहोत असच वाटतय. छानच
ReplyDeleteThank you , विक्रम ! हे वाचलं की लिहायला उत्साह येतो !!
Deleteमीना प्रभू वाचतोय की काय?
ReplyDeleteकसलं भारी शब्दात गुंफलंय....मजा आया.....
ReplyDeleteअलका खूपच छान लिहिले आहेस. तुमच्या बरोबर माझी पण मालगुंड ट्रीप झाली
ReplyDeleteAGAIN YOU ARE GIGLING MY MIND. BRAVO. GUDA GULYA MHANJE KAY, HE SAMAJATE.
ReplyDeleteI AM ENVIOUS FOR YOUR /OUR TRIP. YASHODHAR
ReplyDelete