Posts

Showing posts from July, 2023

सुख म्हणजे ...

       सुख म्हणजे नक्की काय असतं ... ? ... म्हटलं की प्रशांत दामले यांचं गाणं आठवतं !   पण खरं म्हणजे, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळीच असणार, आणि ती स्थळ-काळ-वेळ परत्वे बदलणारही !   तितक्या खोलात नको जायला ... कुणाला आयफेल टॉवर बघणे म्हणजे सुख, तर कुणाला एव्हरेस्ट चढणे म्हणजे सुख ... तितकंही भव्य दिव्य नको बोलायला ... साध्या माणसांची साधी साधी सुखं ... पण ती ही किती छान असतात ... सहज शक्य असणारी ... किंवा ती तशी आहेत,  असं वाटणारी ... पण न मिळणारी ... तर कधी अचानक मिळणारी ही !   सुखाची कल्पना, व्याख्या, भाषा, लिपी प्रत्येकाची वेगवगळी !     लहानपणी माझ्या सुखाच्या कल्पना खूपच वेगळ्या होत्या आतापेक्षा !    खूप खेळायला मिळणं, मित्रमैत्रिणींबरोबर दंगा आणि वाढदिवसाला आईने बासुंदी करणं ... बस... सुखाची परिसीमा !  अधून मधून एखादा काजूकंद, नाही तर आईसफ्रुट ... त्याच्या पलीकडे काही दिसायचं नाही, आणि असायचं ही नाही ... तेव्हा शाळेत आणि घरीही काहीही दुःख वगैरे नसायचं ... आपला बुडलेला अभ्यास भरून काढायला मैत्रिणीला ...