सुख म्हणजे ...

 

     सुख म्हणजे नक्की काय असतं ... ? ... म्हटलं की प्रशांत दामले यांचं गाणं आठवतं !   पण खरं म्हणजे, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळीच असणार, आणि ती स्थळ-काळ-वेळ परत्वे बदलणारही !   तितक्या खोलात नको जायला ... कुणाला आयफेल टॉवर बघणे म्हणजे सुख, तर कुणाला एव्हरेस्ट चढणे म्हणजे सुख ... तितकंही भव्य दिव्य नको बोलायला ... साध्या माणसांची साधी साधी सुखं ... पण ती ही किती छान असतात ... सहज शक्य असणारी ... किंवा ती तशी आहेत,  असं वाटणारी ... पण न मिळणारी ... तर कधी अचानक मिळणारी ही !   सुखाची कल्पना, व्याख्या, भाषा, लिपी प्रत्येकाची वेगवगळी !

    लहानपणी माझ्या सुखाच्या कल्पना खूपच वेगळ्या होत्या आतापेक्षा !    खूप खेळायला मिळणं, मित्रमैत्रिणींबरोबर दंगा आणि वाढदिवसाला आईने बासुंदी करणं ... बस... सुखाची परिसीमा !  अधून मधून एखादा काजूकंद, नाही तर आईसफ्रुट ... त्याच्या पलीकडे काही दिसायचं नाही, आणि असायचं ही नाही ... तेव्हा शाळेत आणि घरीही काहीही दुःख वगैरे नसायचं ... आपला बुडलेला अभ्यास भरून काढायला मैत्रिणीला वही मागणं आणि तिने ती देणं,  मित्राने पेरू वगैरे share करणं,  हे सगळे आपले हक्क !   आणि बहिणीने आईबाबांजवळ आपल्या चुगल्या न करणं, हा एक प्रचंड मोठा आनंद !!!

    नंतर,  कॉलेजमधे वगैरे सुखाच्या कल्पना बदलल्या !   आपल्या बसमधे पाहीजे ती 'व्यक्ती' चढणं, ती दिसणं, इथपासून ते बहिणीने कपड्यांना इस्त्री करून देणं ... किमान,  आपण इस्त्री करून ठेवलेले कपडे 'न' घालून जाणं ... अशी कित्येक सुखं !    फक्त आपल्यालाच कळणारी ... त्यात मार्क - बिर्क वगैरे कशालाही थारा नसायचा !   आपलं भविष्य - भूत कशाचा विचार नसायचा ... ना आपल्याला मेडल मिळतंय वगैरे स्वप्न !   स्वप्नं सुद्धा पहातांना आपल्याला झेपतील तेव्हढीच !..

    मोठेपणी  तर व्याख्याच बदलल्या सगळ्या !   मुलं लहान असतांना ती रात्रभर शांत झोपणं ... आणि आपल्याला झोपू देणं म्हणजे अलभ्य लाभ !  " देवा, असंच असू दे रे बाबा आता, वैताग आलाय ! " देवाला सकाळी thank you हे असं !   जेवतांना उठायला न लागणं, ही त्यातलीच एक कल्पना, आणि कुठल्या सणाच्या - समारंभाच्या वेळी मुलं आजारी न पडणं ... म्हणजे नक्कीच देव पावला असावा !   अगदी 'या सुखांनो या'  असे क्षण हे सगळे !..

    आता अजूनही मी सुखाच्या ideas क्षणोक्षणी - पावलो पावली बदलत असते !   अगदी गूगलऑन्टी जसे आपले  ETA सारखे revise करते तसे !  "देवा, वेळेवर पोचू दे आम्हाला, ट्रॅफिक जास्त नको.... इथपासून ते घरी पोहोचेपर्यंत पाऊस नको यायला" ... इथपर्यंत !

    अर्थात मला ultimate असे सुखाचे क्षण ही खूप मिळाले आहेत !   मी जेव्हा classes घेत होते, तेव्हा रोज संध्याकाळी ७ वाजता सगळी मुलं घरी गेली , की मागचा पसारा आवरून, मग शांतपणे बसून , चहाचा मोठ्ठा कप घेऊन, तो थंड होईपर्यंत हळूहळू पीत बसणं,  ही माझी सुखाची कल्पना !   नवरा गावात असेल तर हे सुख मिळायचं ही !! पण तो नसेल तर ?... कधीकधी खूप दमणूक झालेली असायची, हातपाय डोकं दुखत असायचं, मुलांना सांगता येणार नाही असं...  तेव्हा सगळं आवरून,  ५ मिनिटं डोळे बंद करून बसावं ...आणि न सांगता ही मुलांना कळावं की आज आईला काहीतरी होतंय ... आणि न बोलता, दोघांपैकी जो ही घरी असेल,  तो हातात चहाचा कप आणून द्यायचा ... !     हेच ते ... माझ्या सुखाच्या व्याख्येत चपखल बसणारं ... !

    मुलांची लग्न झाल्यावर , सुखाच्या व्याख्या पुन्हा बदलल्या.  विमानात बसण्यापेक्षा मुलाच्या घरात शांतपणे बसणं ! आता , 'ऐहिक' सुखापेक्षा मनःशांती जास्त महत्वाची !   समाधान जास्त आवडणारं ... !

   ...मागच्या महिन्यातली गोष्ट !   मोठ्या मुलाकडे गेलो होतो, नातवंडांच्या वाढदिवसाची पार्टी म्हणून ... ! संध्याकाळी छान कपडे घालून बसणे -हिंडणे, ह्याहून विशेष कामही नव्हतं.  Decorator, Caterer वगैरे येणार होतेच, पण बाकी तयारी, म्हणजे return gift च्या बॅगा भरणे वगैरे मधेच खूप दमछाक झाली होती !   दुपारी जेवण shortcut करू असं ठरलं होतं ! वरण भात ... !  तेवढ्यात मोठ्या सुनेचं फर्मान सुटलं ... "आई, आता ते ठेवा खाली आणि पानावर बसा .."     "अगं,  पण हे हातातलं उरकते ... "  "नको, आधी बसा " ...  "अगं नको, इतकं गरम खाता ही येत नाही ..."     "मग पानात ठेऊन गार करा, पण ठेवा ते ..."   काय धाक बाई हिचा ...असं म्हणत पानावर जाऊन बसले ... आणि ...एकदम गरम गरम छोले - भटुरे पानात ... ! ...  ही तर नसेल सुखाची व्याख्या ?   हो नक्कीच ... !

    आणि,  अगदी कालची गोष्ट ... !   धाकटा मुलगा-सून  आले होते ... हे काही औरच काम आहे.   ती केरळची आहे . तिच्या माझ्या नात्याला 'सासू-सून' हा flavour किंवा रंगही नाही.   ती मला फोनवर सांगते, "I will come, but you should make साबुदाणा वडा and पुरणपोळी ... !"    "अगं अगं अगं, सासू मी आहे बाई, तू नाही ... !"   असं म्हणत , मी पुरण करायला घेते आणि साबुदाणा भिजवते ... !    काल ही तेच केलं. पण बाहेरची कामं करून घरी यायला उशीर झाला . नंतर पानं वाढून सर्वांना जेवायला बोलावलं, म्हटलं मी हे एवढं तळते आणि येते, तुम्ही सुरु करा ... " खरं म्हणजे खूप भूक लागली होती ...

    पाच मिनिटांत ही किचनमध्ये आली, "you go आई, have food, I will do this ... " म्हणत माझ्या हातातला झारा तिनं काढून घेतला ... !   मी गुपचूप पानावर ... !    

   ... आता मला कळलंय ... सुख म्हणजे नक्की काय असतं  !!!...




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland