रुमाल
'दूंगी तेनु रेशमी रुमाल, ओ बांके जरा डेरे आना ... '
प्रेमपुजारी सिनेमात एक लाल रुमाल घेऊन वहीदा रेहेमान छान dance करते नां ! तिचा तो हातखंडाच , तिच्या हातातला लाल रुमाल ही खूप मस्त दिसतो ...
रुमाल ही अशी चीज आहे , की ती छानच असावी ! केवळ एक कापडाचा चौकोनी तुकडा ... असं त्याचं रूप होऊ शकत नाही, की केवळ utility item - वापरायची वस्तू असंही होऊ शकत नाही ! रुमालावर कधी नाजूक फुलाफुलांचं print, आणि त्याला matching दोऱ्याने कडा शिवलेल्या, त्याही सुबकपणे, कधी अगदी नाजूक अशी लेस, कधी हाताने केलेली किंवा मशीनची ! असं वाटतं की 'व्यक्ती तितक्या प्रकृती 'हे रुमालाबद्दलच लिहिलेलं असावं ! प्रत्येक रुमालाला स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतंच असतं. आणि खरं म्हणजे ,त्यावरून तो रुमाल ज्याचा किंवा जिचा असेल तिच्याबद्दलही बरंच कळतं ! माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचा रुमाल खूप मस्त दिसायचा. पांढरा शुभ्र आणि त्यावर आईनी त्यांच्या नावाचं आद्याक्षर सुबकपणे भरलेलं ! प्रत्येक रुमालावर वेगळ्या dark रंगानी ! आणि रुमाल नेहेमी सुंदर घडी केलेले ! मी दिल्लीला शाळेत जायला लागले , तेव्हा फ्रॉकवर खांद्याशी पिनेने लावलेला रुमाल ! त्यावर सुंदर फुलांची नक्षी आणि लेस ! मला त्याचंच खूप कौतुक असायचं .नंतर जशी मोठी होत गेले, तसा रुमाल खिशात गेला . पुढे printed रुमालाचं युग आलं, आणि मग त्यांचं विशेष अप्रूप राहीलं नाही. तसे काही स्पेशल असे, आवडते असायचे. पण ते कुठे समारंभाला घेऊन गेले की हटकून कुठेतरी पडायचे, किंवा हरवायचे. आणि मग ते पुन्हा कधी दिसायचा प्रश्नच नसायचा. बेफिकीर असं आयुष्य आणि attitude ही तशीच.
नंतर मात्र हळूहळू रुमालापेक्षा त्याच्या संबंधित भावनांना जास्त महत्व यायला लागलं - मनात ! अर्थात कुणी अशा रुमालांच्या देवाण-घेवाणीपर्यंत पोहोचलं नाही , पण गोष्टीतले सिनेमातले तसे प्रसंग उगीचच मनाला हुरहूर लावून जायचे ! पण तितपतच. पुढे मुलं झाल्यावर मात्र रुमालाची उपयुक्तता फारच पटली. सतत गळणाऱ्या नाकांना रुमालाचा आधार ! तेव्हा पर्समध्ये तीन तीन रुमाल असायचे. मी ही कौतुकाने - हौशीने छान छान नर्सरी प्रिंट, A - B - C -D, 1 - 2 - 3 -4 , किंवा छान चित्रं वाले शोधून आणायचे, आणि माझीच हौस भागवायचे. त्यातले एक-दोन मी अजून ठेवले आहेत !
माझा नवरा त्या मानाने जरा अरसिकच असल्यामुळे, त्याच्या रुमालावर मी माझी painting - भरतकामाची हौस कधी केली नाही. आणि जसं माझं माझ्या रुमालांवर 'प्रेम' असायचं, तसा ह्याचा काहीच प्रकार नाही ! खादीचे - जाडेभरडे रुमाल, तोंडापेक्षा हाताचं ग्रीस पुसायला चांगले, हा खाक्या ! आणि checksचे वगैरे असले की brown checks काय आणि निळे, किंवा grey काय ? काय फरक पडतो ? कालचाच आज नाही ना , एवढा फरक दिसला की झाले ! पण कधी कधी, कुठे meeting किंवा conference ला जायचं असलं की मात्र शर्टला मॅचिंग रंगाच्या चेकचा रुमाल हवा असायचा ! बाकी कोण बघतंय रूमालाकडे !
पण मी मात्र सगळ्यांच्या रुमालांकडे बघते. आणि गंमत म्हणजे , आजतागायत मी दोन बायकांकडे same रुमाल पाहीला नाहीये ! रुमाल कसा आहे, नवीन का जुना, इस्त्री केलेला का बोळा झालेला, प्लेन का डिझाईन वाला, साडीला matching का भलताच कुठलातरी, लहान का मोठा ?....किती तऱ्हा ....माझ्या एका मैत्रिणीचा भला मोठा रुमाल असतो. तिचं मनही तसंच मोठं आहे ! एकजण तर रुमालालाही इस्त्री करते असं म्हणते ! चेहेऱ्याचीही घडी कधी इकडची तिकडे होत नाही तिची ! रुमाल हे त्या त्या बाईचं प्रतीक असावं-असतं , ते असं माझा स्वतःचा रुमाल हा जास्त मऊपणाकडे झुकतो. कडाही कडक नाहीत, जरा रया गेलेला, थोडेफार दोरे निघालेले, वरचं प्रिंट जरा - नव्हे - बरंच फिकट झालेलं ... असा ! कारण , मला सारखी सर्दी होते, अन सतत नाकाला सूत नव्हे पण तसाच मऊ सूत रुमाल ! माझ्या whims ही असतात. कधी कधी एकाच type च्या रुमालाचा ध्यास असतो ... कधी दुसऱ्याच रुमालावर मन जडलेलं असतं ...
आणि मग एखादा हरवला की जीव कासावीस होतो ! १०-१२ दिवसांपूर्वीची गोष्ट ... माझा एक सुंदर रुमाल हरवला. सुंदर मोठ्या मोठ्या फुलांचं डिझाइन, खूप रंग त्यात. कड म्हणाल तर अशी गोल गोल महिरपीसारखी ... तो धुवायला washing machine मधे घालतांना, का कुणास ठाऊक, वाटलं की मी हा हरवणार तर नाहीये ना ! आणि झालं ही तसंच ! तो रुमाल काही दिसेना. मला त्याची आठवण ही जरा दोन तीन दिवसांनी आली. मुलं - नातवंडं रहायला आली होती, जरा कामात होते , म्हणून एवढं बघितलंही नाही. आणि तो गायब ! मग माझा जीव खालीवर. सगळीकडे शोधलं. सगळी कपाटं, कपड्यांचे गठ्ठे, टॉवेल्सचे गठ्ठे ... सगळं शोधलं, पण नाहीच कुठे. असा कसा गायब झाला ? उडून गेला का दोरीवरून, पण छे, मी clip लावली होती ! मग त्या कपड्यांच्या घड्यांत गेला का ? नाही , मी नीट झटकून घड्या करते. मग कोण नेणार ? washing machine नीच खाल्ला तो ! कुठेतरी अडकलाय ?... मशीनच्या आत ... ? पार मुलगे-सुनांपर्यंत ही बातमी पोहोचली ! ...इतका मी कालवा केला ...
... शेवटी नवरा मदतीला आला, "काय एवढी घराची उलथापालथ करतेयस, काय झालंय ... " "अरे, तो मोठ्या फुलाफुलांचा रुमाल ... "... " बरं, शोधतो"... असं म्हणत तो ही शोधायला लागला ! आणि शोधतांना, त्यानी ह्या कपाटातून एक, त्या पर्समधून एक, दुसऱ्या बॅगेतून अजून एक, एवढंच नव्हे तर उशीखालून एक , असे खूप रुमाल शोधून दिले ! त्याला त्या लाकूडतोड्याचा देवदूत म्हणायचं कारण नाही, कारण त्याने काढून दिलेले सगळे रुमाल माझेच होते. आणि, एवढे करूनही तो हरवलेला मिळालाच नाही ... ! शेवटी तो वैतागून म्हणाला, "जाऊ दे ना. मला शंभर टक्के आठवतंय की तो घडी करून टेबलावर ठेवला होता... इतके दुसरे आहेत ना, after all, it is just a utility item ..., why glorify it so much ? ...
काल मात्र गंमत झाली ! नातवंडांशी गप्पा-गोष्टी सुरु होत्या . नात तिने काढलेली चित्रं दाखवायला तिची बॅग घेऊन आली ... आणि चित्रं बाहेर काढता काढता एकदम म्हणाली, "आजी, हे बघ काय ... " एखाद्या मेलेल्या उंदराला शेपटीने उचलावं तसं एक brown-काळं, ओलं असतांना ज्या आकारात असेल, त्याच आकारात वाळलेलं असं काहीतरी तिनं काढलं ... "हेच ना ? तुझं नाक पुसायचं फडकं ?" ... "फडकं?... नाक पुसायचं फडकं ?"...मी . " काय झालं नं .....त्या दिवशी , म्हणजे , काल का परवा गं... , मी painting करत होते नं ... तर टेबलवर पाणी सांडलं होतं ...तर, ते पुसायला ..". ."..हं .. , कळलं ...." ...some glorified utility item ... !!!
अलका,मस्त..किती छोट्या गोष्टीच्या हरवण्यातून तुला केवढा मोठा विषय सापडला !!..जीवनाचा भला मोठा अर्थही माणसाला अशा छोट्या रुमालात शोधता आला तर केवढं समाधानात जाईल आयुष्य !
ReplyDeleteThank you so much , संजू !
Delete