रांगोळी
मी तिसरीत असतांनाची गोष्ट. त्या दिवाळीच्या सुट्टीत कशी कुणास ठाऊक, काहीतरी नवीन वेगळं करायची हुक्की आली आणि आईच्या मागे लागले. "काय करू ?..काहीतरी वेगळं करायचंय .."..दिवाळीत आजोळी जायचं , तर तिथे आजीवर impression पाडायला काहीतरी करणं भाग होतं ... !
आई म्हणाली "ये, रांगोळी शिकवते" ... "ठिपक्यांची नको" ... "बरं , ठिपके सोडून शिकवते" ..."ते नको".. पण या वेळी आई दाद द्यायला तयार नव्हती ...तिला सगळ्याच तऱ्हांच्या माहीत होत्या !... +, X , ।। , कंसात कंस ( ( .. ) ) अशा ही ! तिने ४ ठिपके ४ ओळी काढल्या आणि मी रांगोळ्यांच्या जगात प्रवेश केला, आणि खरंच अनंत असं विश्व मला सापडलं ! कधी ओळीत ठिपके काढत, तर कधी ते कमी कमी करत ! ..भूमितीतली चित्रं , फुलं- पानं , माणसं , प्राणी , गालिचे आणि देखावे ही !!!...
... आणि त्या विश्वात मी रमले ! ठिपके नीट ओळीतच काढायचे ... रेघ जितकी बारीक येईल तितकी चांगली ... तुटक नको ... गिरवायचं नाही, पुसायचं नाही ... रांगोळी काढून झाली की इकडून तिकडून ओढल्यासारखी नाही दिसली पाहिजे ... पट्टी वापरायची नाही ...तुला कोण दरवेळी पट्ट्या आणि भूमितीचं साहित्य आणून देणार ? ... कितीही मोठी काढलीस , तरी १५ मिनिटांत उरकली पाहिजे, तास-तासभर बसायचं नाही ... आणि मांडा ठोकून तर नाहीच नाही ... पटपट , सारखे रंग भरायचे ... रंग नासायचे नाहीत ... नंतर बाजूचा पसारा उचलायचा ... किती सूचना ... एका पाठोपाठ !! ... "अगं, तू मला असं बंदिस्त करू नको गं रूल्स मध्ये...मला चौकटी बाहेरचं चित्र काढू दे " म्हंटल्यावर ती म्हणे, "ते यायला अजून अवकाश आहे आपल्याला, आधी चौकटीतलं शिका, म्हणजे मग बाहेर पडायचा रस्ता दिसेल." ... "फिलॉसॉफी नको ना please " ... हे मी मनात ... अर्थातच ... !
'रंगोली सजाओ' हे किशोरकुमारचं गाणं ऐकलं आणि त्यातला भाव कळायच्या आधी त्यातले शब्द आवडले ... 'सजाओ', नुसतं काढा नाही, तर सुंदर काढा ! कलकत्त्याला ही रांगोळी 'अल्पना' म्हणून सजली, तर तामिळ नाडू मधे 'कोलम' म्हणून ! बंगाली रांगोळी - मी जी पाहिली - ती म्हणजे सुंदर designs ! आणि त्यांना तर limit च नाही, सगळ्या आकारात ... वेलांट्या, वलयांत, रेषा रेषांत सौन्दर्य गुंतलेलं, गुंगलेलं ! माझ्या एका मावशीने कलकत्त्याहून एका बाईंना आपल्या घरी बोलावून घेतलं, त्यांची महिनाभराची सोय केली आणि त्यांच्यांकडून खूप रांगोळ्या शिकून - काढून घेतल्या आणि त्याचं पुस्तक छापलं ! माझं नशीब थोर, म्हणून मावशीनी मला ते रांगोळ्यांचं पुस्तक दिलं ! ते मी जीवापाड जपते !
लग्नानंतर मद्रासला गेल्यावर तिथे रोज सकाळी प्रत्येक घरापुढे सुंदर रांगोळी ! ठिपके सोडून काढलेली ... सगळी वळणं - वळणं ... जिलब्या जशा त्यांच्या लिपीमधे, तशाच रांगोळ्यांमधे ! सकाळी गल्लीतून चक्कर मारली की मी प्रत्येक घरासमोर थांबून पहायचे. पण तेव्हा आत्तासारखे मोबाईल कॅमेरे नव्हते, त्यामुळे फोटो नाही काढता आले. मजा म्हणजे सकाळी काढलेली रांगोळी दुपारपर्यंत अर्धी गायब ! मग सासूबाईंनी सांगितलं, की तिथे तांदुळाची पिठी पाण्यात कालवून त्याची रांगोळी काढतात ! दुपारपर्यंत मुंग्या - रांगोळी फस्त !
कर्नाटकात रांगोळीची इतकी designs आणि पद्धती ! ठिपके जोडून, तर कधी ठिपके वगळून ... कधी बोटांच्या फटीतून रांगोळी गाळत गाळत सुंदर चित्रं ! कधी उभ्या - आडव्या ३ - ३ रेषा आणि त्या जोडून मोठाल्या रांगोळ्या ! अजूनही कर्नाटकात रोज घरासमोर वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात ! अगदी gated communities मधल्या फ्लॅट्स मधे सुद्धा ! आळशी पणाचा ठेका मात्र मी घेतला आहे ....त्यांच्यासारखं काढणं मला विशेष काही जमत नाही. आपण आपलं आपल्या रांगोळ्या काढाव्या, आणि त्यांच्या appreciate कराव्या ! मावशी सारखं आपणही काहीतरी करावं ,म्हणून एक दिवस माझ्या घरी काम करणाऱ्या मुलीला खूपसे कागद आणि बॉलपेन दिलं आणि म्हटलं, तुला येत असतील त्या सगळ्या रांगोळ्या काढून दे ! तिला विणकाम, भरतकाम, विणी, टाके, चित्रं, हस्तकला सगळ्यांची खूप आवड आहे. माझं काम बारकाईने बघते, आवडलं की 'सक्कथ इदे' म्हणते ! माझ्या मुलाच्या लग्नानंतर, पुण्याहून इथे घरी आल्यावर तिला म्हटलं, सुनबाईचा गृहप्रवेश आहे, छान काहीतरी काढ ... आणि तिने मोठी रांगोळी काढली ... आपला 'फुलांचा झेला' ! " अम्मा, आम्ही या रांगोळीला फुलांचा गुच्छ म्हणतो !!" ...मला एकदम आठवलं...
वेगवेगळी फुले उमलली , रचुनी त्यांचे झेले ..... एकमेकांवरी उधळले , ( गेले ....ते दिन गेले..)
म्हणजे ह्या रांगोळ्या universal अगदी नावासकट ! तशा महाराष्ट्रात - आपल्याकडे काही रांगोळ्या सगळीकडे सारख्याच ! 'कासव' , किंवा 'कारल्याचा वेल' म्हटलं की त्यांची एकच basic रांगोळी ! शाळेत चौथी-पाचवीत वहीच्या मागच्या पानावर मैत्रिणींकडून शिकलेला 'रामाचा पाळणा' ! तो ही अगदी तसाच सगळीकडे ! मग आपापल्या मगदुराप्रमाणे तो तुम्ही कितीही वाढवा !
काही स्पेशल रांगोळ्या मात्र खरंच स्पेशल ! कर्नाटकात संक्रांतीला सूर्याचा रथ काढलेला पाहिला ! ठिपके वगळून ळ ळ जोडत ! इतका सुंदर !! मी तो माझ्या 'गॅलरीत' जपून ठेवलाय. जेव्हा बोडण भरतात, तेव्हा परातीखाली काढायची रांगोळी ही खूप स्पेशल - अतिशय पवित्र ! ती रांगोळी दारासमोर, किंवा पाय पडू शकेल अश्या ठिकाणी काढायची माझी तरी हिम्मत नाही ! ती रांगोळी एरवी काढली जात नाही, म्हणून विसरायला नको म्हणून - practice म्हणून काढली, तरी तो कागद मी कचऱ्यात / रद्दीत जाऊ देत नाही ... पाटीवर - फळीवर काढायची आणि मग व्यवस्थित पुसून ठेवायचं ...तिचा अपमान नाही झाला पाहिजे !
आजकाल संस्कार भारतीची रांगोळी खूप जण काढतात. त्यातही खूप प्रतीकं, symbols आणि पद्धती आहेत. पण... 'रांगोळीची रेघ अगदी बारीक आली पाहिजे' ... ह्या घाटाची मी ! त्या करंगळीएवढ्या जाड रेषा पाहिल्या की माझं डोकं उठतं !! किती बटबटीत, आणि रांगोळीची, रंगांची नासाडी ! रांगोळी आणि रांगोळीचे रंग बनवणाऱ्यांची ही बिझनेस वाढवायची नवीन strategy वाटते मला ! ह्यांच्या एका रांगोळीत माझी दिवाळी होईल चार दिवसांची !... मोठ्या सुनबाईला ह्याची खूप हौस आहे. आणि धाकट्या सुनबाईला, ती केरळची असल्यामुळे फुलांच्या रांगोळीची - 'पू कोलम 'ची ! दोन्ही पद्धती मला अतिखर्चिक वाटतात ...म्हणजे .... वाटायच्या ... ! ह्या संक्रांतीला मोठ्या सुनेने 'नथ' ही theme घेऊन संस्कार भारतीची सुंदर रांगोळी काढली, आणि मी माझं मत बिनशर्त मागे घेतलं... !!! धाकटी सून सणाला फुलांची मोठ्ठी रांगोळी काढते ! चार-पाच तास बसून तिघी-चौघी मिळून ती रांगोळी काढतात ....आणि , पूर्ण झाली की नुसतं पहात रहावंसं वाटतं ! इथेही माझी पूर्णपणे माघार..... !!!
अजून एक रांगोळीची वेगळी प्रथा ! इथे कर्नाटकात नवग्रहपूजन - ग्रहमखाला ग्रहांची प्रतीकं मांडतात, त्यांची एक रांगोळी काढतात आणि सुंदर रंग भरतात, त्या त्या ग्रहाच्या आवडीचे ! आणि त्यावर सगळं पूजेचं मांडतात ! अतिशय सुंदर ! प्रत्येक ग्रहाचं चिन्ह, रंग आणि चित्र तेच, पण कधी गोल, कधी चौकोनी, आणि त्यातही, मूळ कल्पनेला - चिन्हांना धक्का न लावता काढलेली रांगोळी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते ! दशावताराच्याही खूप तऱ्हतऱ्हेच्या रांगोळ्या इकडे काढतात. महाराष्ट्रात हे पाहिलं नव्हतं !
आणखी एक खूप महत्वाची रांगोळी ! ती ही अतिशय सुरेख, अगदी सोपी, कुणालाही जमेल अशी ! आपल्याला हवी तितकी सजवावी, आणि वाढवावी ... ! चैत्रांगण !!... गुढी पाडव्यानंतर, गौरी तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत रोज काढायची ! चैत्र गौरीच्या स्वागतासाठी 'श्री' पासून सुरुवात करून, पुढे आपल्याला येतील ती सगळी प्रतीकं, चित्रं काढायची ... गणपती, स्वस्तिक, त्रिशूल, शंख, चक्र, गदा, कमळ, गोपद्म, तुळशी वृंदावन, नाग, कलश, सूर्य, चंद्र, चांदण्या, कुंकवाचा करंडा, तोरण, कोयरी, समई, देवीची पाऊलं, कासव, खण, विडा ... जे येईल ते, जे सुचेल ते ...पवित्र - शुभ चित्र ! मला हे चैत्रांगण काढायला फार आवडतं ! त्याचेही सापडतील ते फोटो मी गोळा करते !
आता तर वेगवेगळ्या माध्यमांतही हे चैत्रांगण काढतात ! एखाद्या tile वर paint करून, किंवा मण्यांचं, क्रोशाचं विणून, कापडावर भरतकाम करून ! अगदी quilling चं ही ! खूप तऱ्हा ... !
मागच्या वर्षीची गोष्ट ... वार्षिक परीक्षा संपल्यावर नातवंडं सुट्टीला आली होती. नात तेव्हा आठ वर्षाची, म्हणाली, "आजी , तू ते एका टाइल वर सगळ्या symbols चं चित्र काढलंयस नं, ते मला शिकायचंय ... पण मी ते कागदावर काढते " ... "माझा आनंद गगनात मावेना "... म्हणजे काय ते मला कळलं ... आणि मी कागद घेऊन बसले ... तिला शिकवायला ...!
- सौ. अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
रांगोळी प्रांतानुसार इतकी वैविध्य पूर्ण असु शकते अशी कल्पनाही नव्हती पण तूझ्या पोस्ट ने तीन पीढ्यातील रेखाटनातील स्थित्यंतरे दिसून आली.तूझ नवीन पीढी बरोबर जुळवून घेणे मनाला भावले
ReplyDeleteThanks a lot , चंदू !!!
ReplyDelete