उन्हाळी वर्ग

 

    वार्षिक परीक्षा संपली.  आता उन्हाळ्याची मोठी लांबलचक सुट्टी !     नातवंडं आठवडाभर सुट्टीला आली.    दोन दिवसात नवलाई संपली आणि मग सुरु झालं, "आजी, .. काय करू ? , काहीतरी करायला दे ..."   झाडांना पाणी घालून झालं, मातीत खेळून झालं, माझ्या पोळ्या झाल्यावर शेवटची पोळी - चिऊ साठी- करून झाली, घरभर पसारा करून झाला ... मग ... "कंटाळा आला ... !"     आईच्या मागे टुमणं सुरु झालं ... "आई, पेंटिंग आंटीला विचार नं  ... summer class घेतेस का , म्हणून !"     "ऑ, समर क्लासला जायचं ?  आवडतं तुम्हाला ? "   मी आपलं उगीच म्हटलं, कारण समर कॅम्प बद्दल आरडा-ओरडा, कुरकुर करायचा आजचा शिरस्ता आहे !     "हो आजी,  तिथे खूप छान असतं ... नातवाने lead घेतली ... तिथे पेंटिंग करायला करायला मिळतं ... हवे तितके water colors ... घरी आई फक्त crayons देते, नाहीतर color pencils...  that is no fun ... मला water  colors शी   खेळायचंय ..."     सत्य बाहेर आलं हळूच !  "आणि तुला गं ?    काय करायला आवडतं तिथे ?"     " काय आवडतं  तिथे ... art and craft, डिंक, कात्री, कागद, आणि beads, टिकल्या आणि माझ्या friends सगळ्या ... मग आम्ही खूप मजा करतो ... "     

        अजबच आहेत मुलं ... इथे मला सगळा वेळ वाटतंय की हे उन्हाळ्यातले क्लासेस म्हणजे मुलांच्या मानेवरचं वह्या-पुस्तकांचं जोखड उतरवून, त्यांच्यावर हे दुसरं लादायचं ...!  मी ऐकत असते, पुण्या-मुंबईकडे सकाळी ६ ते ८ क्रिकेट नाहीतर पोहोणं, मग घरी येऊन जरा खाऊन काहीतरी भाषा किंवा गाणं बिणं शिकायला ११ ते साडे बारा, मग जेवण झालं की ३ ते ५ वेदिक maths, अन संध्याकाळी ६ वाजता ग्राउंड मधे खेळायला जायचं ,  ते 'शुभं करोति' वाला संस्कार वर्ग उरकूनच ८ वाजता घरी !! ... 

    माझी मुलं शाळेत असतांना,  सुट्ट्या लागल्या की आठ दिवस बरं वाटायचं . सकाळी लवकर उठायची-उठवायची घाई नाही,  डबे करायला नकोत, मुलांना अंघोळीला बाथरूममधे ढकलायला नको ... वगैरे ... पण लवकरच कळायचं की, एरवी ८ वाजता उरकल्या जाणाऱ्या गोष्टी दुपारी ३ वाजेपर्यंत चालूच ... आणि नंतर सगळं आवरून  मी जरा डुलकी घ्यावी म्हणतेय तोवर एकजण यायचा, "मेकॅनो देते म्हणाली होतीस ... देतेस आता माळ्यावरून काढून ? ... "     तर दुसरा म्हणायचा, "तू सकाळी प्रॉमिस केलं होतंस ... दुपारी ludo खेळशील म्हणून ... "....

    एका वर्षी वैतागून मी उन्हाळी वर्गांचा खूप शोध घेतला आणि नाव नोंदणीच्या लाईनीत उभी राहिले.  ( तेव्हा गुगल आणि सबकुछ online चे दिवस नव्हते नां ... )   माझा   नंबर आला तोपर्यंत  art and craft चा क्लास फुल झाला होता.    पण ती बाई चांगली होती.    म्हणाली की दुसरा क्लास wealth from waste आहे, बराचसा same च आहे.  त्यात घालते ... पण थोडं waste तुम्ही म्हणजे मुलांनी घरून आणायचं ...      "हो ss , एवढंच नं, वाट्टेल तितकी waste पुरवते .... सगळ्या मुलांना पुरेल एवढी आहे घरात ... !    आणि क्लास सुरु झाला.    पहिल्या दिवशी greeting card , छान कागदावर जुन्या रंगीत कागदाचे तुकडे चिकटवणे वगैरे .... मी "छान " म्हणतेय तोपर्यंत demand आली, 'एक मोज्यांची जोडी पाठवा ... OK ... न्या ... एक जरा बऱ्यापैकी पाठवली ... उगाच इतर मुलांमधे शोभा नको म्हणून ... त्या not so waste ची जेमतेम दोन फुलं होऊन घरी आली, शिवाय उरलेल्या मोज्याचे  दोरे, बरेच तुकडे, वायरचे तुकडे ... wealth जेमतेम, waste दुप्पट ... मग दोन दिवसांनी फुगे मागवले ... आणि fevicol ची मोठी बाटली ... ते फुगवून त्यावर कागद चिकटवून lamp shade  ... इतकं fevicol ... इतकं fevicol  की त्या ओलेपणात त्या फुग्याला काय झालं कुणास ठाऊक ... पण ती lamp shade जन्मलीच नाही ... !...waste from waste ....!!!!

    परवा मात्र कमालच झाली !     माझी एक मैत्रीण खूप मोठ्या आजारपणातून, सर्जरीतून उठली सहीसलामत आणि अमेरिकेला मुलीकडे मोठ्या सुट्टीला गेली होती.   ५ - ६ महिनेतरी मुक्काम.   सतत काहीतरी करणारी, उद्योगात , कलाकुसरीत गढलेली, अशी.    तिथे इतके दिवस आराम कसा काय जमणार तिला,  ६ महिने स्वस्थ बसेल का ती ?...काय करेल , कसा वेळ घालवेल...  माझ्या मनात प्रश्नच होता.    आणि परवा तिच्या मुलीचा फोन आला ... "मावशी, काय म्हणतेस ?"     "अगं तू सांग, आई कशी आहे, बरी आहे ना ?   काय करतेय ... ?"     "  तेच सांगायला फोन केला, ती अगदी मस्त आहे.   पहिला आठवडा जरा झोपून झोपून होती ... मग सुरु झालं ... ४ पोळ्या करते ... कपाट आवरून देऊ का ... झाडांना पाणी घालू का ... काय मदत करू ... नुसता वात आणला होता ... "     " मग ?"     " काही  नाही, जरा google केलं आणि जवळच एक activity group सापडला !     तिच्याच वयाच्या बायका ... आहेत १० -१५ जणी !   आठवड्यातून तीन दिवस दोन दोन तास ... लोकरीचं विणकाम, क्रोशे, embroidery, macrame   ... नाव घालून टाकलं तिचं ... जरा कुरकुर करत होती ... मला काय आता शिकायचंय , मला येतंय , आणि आता शिकून काय ...वगैरे ... म्हटलं,  मग तूच शिकव त्या बायकांना ... "     " मजाच आहे, मग ...?"    माझं आश्चर्य अजून उतरलं नव्हतं.   " मग काय, खूप मजा येतेय तिला.   Join केल्यापासून ३ आठवड्यात, एक birthday party, आणि एक पिकनिक पण झाली.  इथून जवळच एक छोटासा lake आहे तिथे गेल्या होत्या.   आता उद्या त्यांच्याकरता नारळाच्या वड्या करून नेणार आहे ... !"     "अगं, आणि तिचा walker ? Manage करू शकतेय ? "     "तो सुटला कधीच, आता ३ टोकंवाली काठी नेते घरून, आणि कोपऱ्यावर गेली की घडी करून पर्समधे !  खूप खूष आहे ती... आणि मी ही ....!"     

    व्वा, हे मस्तच दिसतंय ... इतकी मजा येत असेल तर आपणही असलं काहीतरी केलं पाहिजे   ... म्हणूनच का मुलं -सुना मागे लागलेत ... तुझं yoga class चं   subscription भरतो म्हणून ... !???...               मला काय ... ? ... जाईन बापडी ... !!!



- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५   

Comments

  1. Do'nt do any yoga or figa . just write more essays on nostalgia events

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , Yashodhar !!! ऐसा फ्रेंड मंगता !!!👌 ☺️ नक्की लिहीत राहीन !!!!

      Delete
  2. सिनिअर्स म्हणजे जणू मोठी बाळच आहेत त्यामुळे एक्टीव्हीटी ग्रुप जाॅईन करणे हा सर्वात ऊत्तम ऊपाय आहे त्यांची म्हणजेच आपली घरातील कटकट बंद करण्याचा.ऊन्हाळी सुट्टीतील चणेकुरमरे अधिकच टेस्टी

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , चंदू !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland