कव्हर्स

         

    मे महिन्याचा तिसरा-चौथा आठवडा .. हा लागला की कसली तरी अनामिक हुरहुर लागते मनाला.   अगदी लहान असल्यापासूनची सवय आहे.   त्याचं कारण म्हणजे, 'आता लवकरच शाळा सुरु होणार'  म्हणून .   एकीकडे खूप उत्सुकता तर दुसरीकडे आपलं ह्या वर्षी कसं निभणार आहे, अशी थोडीशी धाकधूक ... आणि त्याचं कारण म्हणजे, घरात येऊन पडलेला नवीन वर्षाच्या वह्या-पुस्तकांचा गठ्ठा ! ... दरवर्षी तो मोठा मोठा होत जाणारा ... आणि ह्या वर्षीची कुतरओढ बघता  ...कुतरओढ नाहीतर काय ?     शाळेत प्रत्येक सर आणि बाईंना आपलाच विषय सर्वात महत्वाचा वाटणार, आपल्याला काय ?    सगळेच विषय तितपतच ... !

    ते जाऊ द्या ... पण खरी मजा आणि हौस असायची, ती वह्या-पुस्तकांना कव्हरं घालायची !    पुस्तकं जुनी hand-me-downs - परंपरागत चालत आलेली, मोठ्या भावंडांची, दुकानातली second -hand , तर कधी brand-new !     त्याने काही फरक पडायचा नाही !    पुस्तकं ... आता ती आपली, आणि आपल्याकरता नवीनच !   त्यांचं बरं-वाईट करणं आपल्या हातात ...आणि आपलं भलं बुरं त्यांच्या ...!   तर , कव्हरं घालायला ब्राऊन पेपर वगैरे चंगळ फारच क्वचित असायची !  वडिलांचा मूड त्या दिवशी छान असेल तर ब्राऊन पेपर यायचा, नाहीतर जुन्या वर्तमानपत्रांवर भागवायचं !     तेव्हा पेपरात रंगीत चित्रं वगैरे नसायची आणि सिनेमातले हिरो-हिरॉइन्स तर फक्त सिनेमाच्या जाहिरातीच्या चौकोनात !    त्या चौकोनातलं वाचतांना पण भीती वाटायची ... देमार चित्रपट, अफलातून फाईट,  xxx  सौन्दर्याचा atom बॉम्ब ... !    देवा देवा ... !     हे सगळं वगळून तो पेपर वापरायचा ! 

    मात्र हळुहळु परिस्थिती सुधारली, माझ्या मार्कांची आणि इयत्तांची आणि ब्राऊन पेपर मिळायला लागला !    कोरा करकरीत आणि आपल्या हातात कात्री !   मनमुराद कापाकापी ... !  अजून एक मजा होती ... !     लेबल्स !   सुरुवातीला बुकशॉपवाला त्याची जाहिरात करायला त्यांच्या नावाची लेबलं द्यायचा ! मग हळुहळु सुंदर सुंदर लेबल्स मिळायला लागली होती, आणि एरवी सुट्टीला गेलं,  की सतत चिडवणारे  मामा लोक लेबल्सचा मोठा तक्ताच आणून द्यायचे !     सुंदर चित्रं, फुलं , प्राणी-पक्षी, जगातली सात आश्चर्य - पुतळे वगैरे, नाहीतर विमानं, मोटारी, आगगाड्या, जहाजं वगैरे !   तेव्हा,  वेताळ , जादूगार मँड्रेक, लोथार, फ्लॅश गॉर्डन ह्यांची चलती  होती !    इतकी सुंदर लेबलं ... ती वहीवर लावून रोज पहायची, त्यावरून हात फिरवायचा, का ती आपल्या कप्प्यात नीट ठेवून,  रोज संध्याकाळी घरी आलं की बघायची ?    फार मोठा प्रश्न असायचा !

    अजून एक प्रश्न म्हणजे कोणच्या पुस्तकाला कसलं लेबल !  सायन्सला फुलं-पानं का इंजिन-विमान- रॉकेट वगैरे ... इतिहासाला जगातल्या आश्चर्यांपैकी एखादं ... preferably ताजमहाल ... !    आणि भूगोलाला फुजियामा नाहीतर आल्प्समधलं चित्र !   गणितासाठी सगळ्यात वाईट चित्रं  ... पण कितीही शोधलं तरी ते तितकंसं वाईट नसायचं ... मग जाऊदे म्हणत एखादी बाळबोध सिनरी !  चंद्रसूर्य - डोंगरदऱ्या - घरं झाडं ... !   काही वर्षांपूर्वी त्यातली २ - ३ लेबलं सापडली... वडीलांच्या खर्च लिहायच्या डायरीत.  ठेवून दिली परत ... डोळ्यांना लावून... ! 

    कव्हर घालतांना, त्या  कागदाच्या छान घड्या घालायच्या, त्याचे कोपरे कापायचे - पुन्हा आत व्यवस्थित दुमडायचे, आणि लेबल लावून, नाव-विषय-इयत्ता वगैरे लिहून गठ्ठा करायचा ... तो सगळा एक मोठा कार्यक्रमच असायचा !

    पुस्तकांना कव्हरं घालून, लेबलं लावून झाली की मग हळूच ती उघडायची !   almost अलिबाबाच्या गुहेसारखी.    नव्हे पँडोराच्या बॉक्ससारखी !   अलिबाबाच्या गुहेत रत्न-हिरे-माणकं ... तर पँडोराच्या बॉक्समधे चित्रविचित्र प्राणी-किडे आणि ते ही  चावणारे.    मराठीचं पुस्तक उघडलं की पहिलीच कविता, 'शर आला तो, धावुनी आला काळ' ... नाहीतर 'निज निज रे लडिवाळा' type रडारड.    मला फार वाईट वाटायचं ... मग 'काळ'कर्ते परांजपे किंवा 'माला'कार चिपळूणकरांचं लिखाण ... ओ का ठो कळायचं नाही ... वाक्य संपणार आहे का नाही - कधीतरी !    हिंदीचं पुस्तक त्यामानाने बरं ... दोन चार क्लिष्ट धडे सोडले तर बाकी सगळं manageable !   इंग्लिशचं पुस्तक ठीक ठीक.   गोपाल - सीता - अहमद यांना जरा tolerate केलं की मग छान  रॉबिनसन क्रुसो वगैरे गोष्टी असायच्या.   भूगोल पाठ . कारण, वडिलांची बदलीची नोकरी असल्याने भारताच्या उभ्या-आडव्या सगळ्या राज्यांची थोडीफार माहिती - काही तर first hand  !     इतिहासाची वेगळीच तऱ्हा, काही झार, ३-४ लुई, ७-८ जॉर्ज हे फारसे ढवळाढवळ करत नव्हते.   पण २ बाजीराव, दोन छत्रपती ...सातारा-कोल्हापूर, नवाब-निजामांचा घोळ, राणा प्रताप आणि पृथ्वीराज चौहान... कोण कधी झाले ?   चंद्रगुप्त - मौर्य का गुप्त ?   आणि त्यानंतर मेकॉले, वेलस्ली, डलहौसी ... कोण हे सगळे आणि का ? अगदी बाजीरावाची शेंडी अब्दालीला नाही लागायची , पण , या व्हॉइसरॉयच्या सुधारणा त्या व्हॉइसरॉयच्या खात्यात जमा !   इतिहास वाचून कधी कोणी शहाणं होत नाही ... तेच तेच करतात ..! ... गणित आणि संस्कृत, दोन अक्राळ विक्राळ जुळे भाऊ ... !

    Cut to ... मुलांचं लहानपण आणि त्यांची शाळेची पुस्तकं !     शाळावाले सांगतील त्या दिवशी शाळेत जायचं, रांगेत उभं रहायचं, 'no गप्पा' with other parents ते देतील तो गठ्ठा घेऊन घरी !   ब्राऊन पेपर तेच देणार ! ह्या सगळ्यातली मजा पुरती घालवून, शाळेचं नाव असलेली रटाळ लेबल्स !    मलाच वाईट वाटायचं !   तोपर्यंत इतकी सुंदर सुंदर, गुळगुळीत,  चित्रांची लेबल्स निघाली होती !     आपल्या वेळी गोंदाची बाटली सतत संभाळायला लागायची, न सांडता, न पसरवता, शिवाय ती संपली पण नाही पाहिजे ... !  पण,   मुलांच्या वेळी sticker type labels होती.   मी ती घेऊन यायचे.   मग मुलं त्यातली काही वापरायची आणि त्यांची हौस म्हणून घरातली सगळीकपाटं , fridge , भिंतींवर लावत सुटायची !    बॅटमॅन, सुपरमॅन, ही- मॅन , स्पायडरमॅन ,   asterix आणि obelix घरभर !   थोड्याच वेळात त्यांना कंटाळा आला,  की मग आपण बसायचं आणि उरलेल्या अर्ध्याच्या वर पुस्तकांना कव्हरं घालायची ...आपल्यावेळी ही सोय नव्हती... ! पण , मला ते ही करायला आवडायचं ... एक काम हातावेगळं झालं म्हणून !

    हे सगळं लिहायचं कारण ?   .... सध्या मुलाकडे आलो आहोत.   ते सगळे गावाला गेले आहेत म्हणून, त्यांची झाडं  , fish tank , मासे सांभाळायला .   Dining table वर नातवंडांच्या पुस्तकांचे गठ्ठे ठेवले आहेत आणि सक्त ताकीद ... "तू त्यांना हात लावू नकोस ... plastic covers आहेत, प्रत्येक पुस्तक, वहीच्या मापाची ... आत cello tape वगैरे लावायची आहे ... ते आम्ही आल्यावर बघू ... "

    म्हटलं, "बरं, मला काय ?"  ...  पण तरी मी हळूच त्यांची पुस्तकं उघडून पाहिली !     काय मस्त प्रिंट, आणखीनच सुंदर !    प्लास्टिक कोटेड !    रंगीबेरंगी चित्रं, कार्टून्स,  बागडणारी मुलं, पऱ्या, फुलपाखरं, झाडं, फुलं, अगदी किडेसुद्धा cute !   कव्हरं फारच भारी !    आणि लेबल्स तर विचारूच नका !     Stickers आणि ती ही  कशी ?  तर... holograms आहेत, त्या त्या आकारात कापलेली आहेत आणि त्यातल्या चित्रांचे डोळे वगैरे हलणारे, पुस्तक हलवलं की असं वाटतं की ती चित्रंच इकडे तिकडे बघताहेत ! रंग बदलताहेत !   माशा, बटरबीन, minions, angry birds  आणि जोडीला छोटा भीम सुद्धा !...

    ... मी ठरवलंय, आता बाहेर गेले की मी स्वतःकरता असलीच stickers आणणार आहे ... आणि माझ्या चष्म्याच्या केसवर, पर्समधल्या पाण्याच्या बाटलीवर, आणि औषधाच्या गोळ्यांच्या डबीवर ती स्टिकर्स चिकटवणार आहे ... !!!


- सौ अलका कुंटे, बंगलोर 

  +९१ ८७६२३ १६३८५


Comments

  1. After all you got the good subject with keen observation--- hurray

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , Yashodhar !! I always look forward to your comments !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland