लग्नाला जाते मी
मुक्ताबाई दीक्षित ... जुन्या म्हणजे आपल्या आजीच्या काळातल्या प्रथितयश लेखिका ! जरा बादरायण संबंधाने त्या माझ्या आजी. त्यांचं प्रसिध्द पुस्तक 'हे तो प्रचितीचे बोलणे'. त्यात त्यांचा एक लेख आहे, 'लग्नाला जाते मी sss ' असा. मी १०-११वीत असतांना तो वाचला होता. त्यानंतर नाही. पण त्यातलं जे आठवतंय, ते मनात अगदी ताजं आहे आणि आता सत्तरीच्या जवळ आल्यावर तर ते अगदीच पटतंय ...
कुठे लग्नाला जाणं, मग ते गावांत असो का परगावी ... ते एक मोठं आव्हान वाटतं आजकाल, काही वर्षांपूर्वीही तसंच वाटायचं, पण तेव्हा ते thrill मधे जमा व्हायचं, आता adventure वाटतं ! आता कुणाचं निमंत्रण आलं की , माझ्या पोटात गोळा उठतो. उन्हाळा-पावसाळा असेल , तर तो गोळा दिवसागणिक मोठा होत जातो ! पहीला प्रश्न ... काय कपडे ? अर्थात साडीच ... लग्नाला जातांना , ड्रेस घालण्याइतकी मी आता तरुण नाही, आणि पुन्हा ड्रेस घातलेला 'चालण्या'इतकी म्हातारी ही नाही, तेव्हा साडी ही ओघाने आलीच ! उन्हाळा असेल , तर एक कथा....गरम आणि घाम ! आणि पावसाळ्याची निराळी व्यथा ...सगळी कडे ओलं आणि चिखल , रबरबाट !... त्या मानाने थंडीतली लग्नं बरी , एक छानपैकी शाल घेतली की काम भागतं ...! असो .
तर , मी विचार करायला लागते ... ह्या आधी कोणत्या function ला गेले होते, मुख्य म्हणजे तिथे कोण कोण आलं होतं ... त्याप्रमाणे साडी ठरवायची ! न जाणो, आधीच्या कार्यक्रमातलं same public असेल, तर म्हणतील, "अय्या, ही तुझी favourite आहे का ? ... अमक्या-तमक्यांकडच्या मुंजीत तू हीच साडी नेसली होतीस ."... मला आठवत नसतं , पण , त्यांना नेमकी आठवण ! की मग, आपला चेहरा पडणार आणि त्यांचा खुलणार ... आणि, आजकाल तर काय, फट् म्हणता mobile वर जुने फोटो दिसतात ... ! पुरावेच पुरावे ... !
लग्नाला जायच्या आठ दिवस आधी final count down सुरु होतो ! एक गाणं आहे ... Jazz का काय कोण जाणे ... मुलं म्हणायची ते ... It's a final count down ... ! दोन साड्या short-list केल्या की अर्धं काम झालं ... मग त्यांच्या accessories ... ब्लाऊजची डागडुजी - जी लागतेच .... matching बांगड्या - त्या असतातच ... मग दागिने, पर्स, चपला ... सगळं ठरतं ! मग logistics...ऑटो का गाडी ... म्हणजे नवऱ्याचा mood ..!. "तू येणार आहेस नं ... यायला पाहिजे ... आता कामाचं excuse नको ... मुख्य म्हणजे एवढ्या पावसात साडीचं कल्याण व्हायला नको म्हणून "..वगैरे ... साम - दाम - दंड - भेद करून शेवटी तो तयार होतो ... मग तो कोणते कपडे घालणार ह्यावरून चर्चा-वादविवाद ... आणि , मुलं तर त्याचीच ! एकदा त्यांच्या लहानपणी , मोठ्याने मला सांगितलं, - तेव्हा तो तिसरी-चौथीत असेल - "असे कपडे दे, की जे मळले तरी तू रागावणार नाहीस ..." "मळतील कशाला ? तिथे काय लोळायचं आहे ? आणि कपडे तर घाण करायचे नाहीतच अजिबात ... दर लग्नाला काही मी नवीन आणणार नाहीये" ...वगैरे !
दुसरा टप्पा म्हणजे इस्त्री करणे. माझी इस्त्रीची पद्धत नवऱ्याला पटत नाही, आणि त्याचं करणं इतकं हळूहळू असतं की, मी ....."पुरे, आता उचल ती इस्त्री... नाहीतर जळेल कापड ... " त्यानी तसं केलंही आहे एकदा ... आणि कसं , तर ब्लाउजची उजवी बाही जाळली ... ! एकवेळ डावी चालली असती .... पण उजवी ... ! ती दुरुस्त करायला खूप हिंडून, दुकानंच्या दुकानं पालथी घालून दोन जरीचे matching बुट्टे आणले आणि ते लावले ... तरीही ती साडी नेसली की अजूनही मला वाटतं की सगळं जग माझ्या उजव्या बाहीकडेच बघतंय ... !
नातेवाईकांच्या लग्नाला दुसऱ्या गावाला जायचं म्हटलं की फारच planning ... मी दोन बॅगा भरते. एकीत लग्नाचे कपडे, आणि दुसऱ्या बॅगेत एरवीचे - नेहमीचे ! तरी घोळ होतोच ... कार्यालयात रहायचं असेल एखाद दिवस, तर नेमकी चुकीची बॅग नेणे, वगैरे असे घोटाळे होत असतात ... मग ... "तुम रुठी रहो , मैं मनाता रहूं .....!!! थोडक्यात जबरदस्त भांडण ....!
अजून एक चिंता ...! आजकाल destination wedding चा जमाना आहे . आणि कधी कधी dress code .. ! दोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले होते ... destination wedding ... गोवा ! वा वा ! ... काय मस्त ! त्याच्या आधी चार दिवस सांगलीला शाळेचं 50 years reunion ! सगळं कसं जुळून आलं ! नवरा म्हणाला "आपण गाडीच घेऊन जाऊ म्हणजे बुकिंग वगैरेची कटकट नको. " मला काय, सोन्याहून पिवळं ! चांगल्या मोठ्या बॅगा काढल्या ! शाळेत आदल्या दिवशी कोणीतरी म्हणालं, उद्याचा dress-code ...?! सगळ्यांनी एका सुरात "नाही" म्हटलं. शाळेचा dress-code म्हणजे uniform सारखं वाटतं ... म्हणून ते झटकून टाकलं. पण गोव्याला गेल्यावर कोणाला तरी शंका आली ... "अगं, इथे club मधे म्हणजे dress-code असणार ..". म्हणजे evening wear - party gown वगैरे की काय ? माझं धाबं दणाणलं ... विकतचा party dress म्हणजे नवरीला competition माझी ... तिच्या gown पेक्षा माझ्याच gown ची train जास्त लांब ... कारण आजकालच्या भाषेत ' I am vertically challenged '... सगळे readymade dresses किमान ८ इंच तरी कापावे लागतात ! देवा रे , कशाला हे बँडवाले- छाप dress codes ???? सुदैवाने तसलं काही नव्हतं ...!
शाळा कॉलेजमधे असतांना नटायची वगैरे जरा जास्तच हौस ...... पण मी सगळ्यात मोठी म्हणून no make-up . साडीला पिना not allowed . एकूण ध्यान जुन्या सिनेमातल्या हिरॉईन सारखं, कोपरापर्यंत बाह्यांचं, बंद गळ्याचं ब्लाउज आणि काठा पदराची साडी ! पुलंच्या इंदू वेलणकर सारखं !!
असो, पण तेव्हा आणि नंतरही हौस खूप असायची, आजकाल मात्र तसं नसतं, असं वाटतं ! कधी , बायका मुली नको तितकं नटतात , तर कधी मणी, दगड, बिया नाहीतर दोऱ्याचे दागीने ?? त्यांना दागिने कशाला म्हणायचं ? कुठे लग्नाला गेलं, लग्न लागलं की तरुण मंडळी ice-cream खायला वगैरे हॉल मधून नाहीसे होतात ! कारण आपणच त्यांना 'जा' म्हणतो ! म्हणजे , पूर्वी आपलं मुलांना संभाळून सगळं असायचं ... आता नातवंडांना संभाळून ! सगळी नातवंडं आपापल्या आजी आजोबांबरोबर ... मग जेवतांना, हात धुतांना आपणच त्यांचे कपडे सांभाळायचे ... आपल्या कपड्यांची पर्वा न करता ... थोडक्यात , आपला लळा-लोंबा अजून चालूच !
उन्हाळा असला , तर बोलायची सोय नाही ... उकाडा, चेहेऱ्यावरून घामाच्या धारा, पदर सदैव खोचलेला , पैठणी असो का आणि काही ! हाताला नातवंडं.... एक इकडे पळणार, दुसऱ्याला तिकडे जायचंय... त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, टोप्या , नातीच्या cute , शोभेच्या , पर्स वगैरे गोष्टी , spare कपड्यांची बॅग ! 'जेवताना पाणी सांडलं , तर असू दे' , म्हणून !!! थोड्या वेळाने त्यांना कंटाळा आला की , त्यांचे दुपट्टे , दाग- दागिने , रुमाल , चपला , बूट , एक एक आपल्या हातात, आणि ती हॉल मध्ये बाकीच्या , एकदाही न भेटलेल्या , अनोळखी मुलांबरोबर दोस्ती करून त्यांच्याशी हॉलमध्येच शिवाशिवी खेळायला पसार ... !!
हे सगळं उरकून कधी घरी पोहोचते , आणि नेहमीचे कपडे घालते असं होतं ... जरा निवांतपणे पंख्याखाली बसून चहा प्यावा आणि नेम करावा, की आता ...'ह्यानंतर कुणाचं लग्न वगैरे attend करूच , असं नाही ... not worth the trouble ... आम्ही नाही गेलो , तरी लग्नं होतीलच ... जग चालू राहीलच...अगदी पक्का असा नेम ...!
..… जो पुढच्या बोलावण्यापर्यंत नक्कीच टिकेल !! ...मग पाहू.... पुढचं पुढे ... !!!
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
लग्न पहावे Attend करुन
ReplyDeleteThank you , प्रमोद !😊
Deleteबायकांच् कार्यक्रमाला जाताना होणाऱ्या धांदलीच तंतोतंत वर्णन अणि आपल्या वायाच भानही.
ReplyDeleteThank you very much .!
DeleteThanks a lot !!! 😊
ReplyDelete