नट्टापट्टा


    चार दिवसांपूर्वी शाळेतल्या मैत्रिणीचा फोन आला, ... "काय गं, येतीयेस नं प्रसादच्या मुलीच्या लग्नाला ? ... आपलं ठरलंय नां, सुंदर साडी नेसायची ,  नट्टापट्टा करायचा, खूप मिरवायचं नं ... "  ...हे शाळेचं reunion झाल्यापासून शाळेतल्या कुणाकडे जायचं, भेटायचं म्हटलं, की सगळेजण शाळेतल्या वयाचे होतात .... ! उत्साहाला  उधाणच  येतं....

    काल एका मित्राचा फोन आला, ... "काय ?     तयारी झाली का ?"     "हो !  बॅग पण भरून तयार आहे ! ... तुझं काय ?   तुझी तयारी कुठपर्यंत ?"     "अर्धी झाली !    म्हणजे कपडे कालच  कपाटातून काढले, अन धुवायला टाकलेत.   उद्या शर्टाला इस्त्री केली की झालं ... आम्हाला काय, no  नट्टापट्टा ... आता गळ्यात साखळी, तीन तीन बोटांत अंगठ्या घालून गोजिरवाणं दिसायचे दिवस गेले गं ... "     त्याच्या आवाजात काहीतरी miss केल्याचा सूर होता किंचितसा ... 

    तो मला माझ्या लहानपणात घेऊन गेला ... आधीच नट्टापट्टा म्हंटल्यावर मागची सगळी चित्रं मनात घोळत होती !    खरंच, नट्टापट्टा म्हटलं की किती आठवणी !     सातवी-आठवी-नववी पर्यंत नटण्याच्या कल्पना खूपच साध्या सरळ सोप्या होत्या, अगदी वाजवी म्हणा !     लग्न-कार्य, समारंभाकरता नटण्याची सुरुवात म्हणजे, आईच्या मागे कंगवा घेऊन लागणं ..." छान वेणी घालून दे ... एक वेणी ? ... की , "नाही, जन्मभर तीच घालायची आहे . आत्ता दोनच !" ...  OK, compromise  ... दोन छोट्या आणि मग दोन मोठ्या ?"     "अजिबात नाही ... वेळ नाहीये मला "     "बरं, मग जिलबीची वेणी ... झोपाळा ... पाच किंवा सात पेडी वेणी ?"     "नाही ... नाही ... नाही ..."     "मग कमीतकमी गुच्छ तरी सोड वेणीच्या शेवटी ... "     "बघीन ... "     मग आई तेव्हढं करून द्यायची ... चला एक गड पार झाला.     मग गुच्छांना रिबिनी ... ribbons चं मराठी स्वरूप ! माझ्या लाडक्या !  इतके सुंदर सुंदर रंग .!.. पण ह्या रिबिनीही  फार क्वचित मिळायच्या आणि त्या सठी-सहा माशी लावता यायच्या !     आईचा मूड असेल तेव्हा, तिला वेळ असेल तेव्हा, सगळं साहित्य तयार असेल तेव्हा ... आणि सकाळपासून आपण काही घोळ घातला नसेल तरच ... तेव्हा ... कधीमधी  ,आई रिबिनींच्या टोकाला छान ३ मोत्यांचे झुपके, घागऱ्या नाहीतर टिकल्या, मणी लावून द्यायची !     माझा एक सुंदर डबा होता ... त्या काळी Morton - रावळगाव टॉफीवाल्यांचे टिनाचे डबे मिळायचे ... गोळ्या, बिस्किटांचे !   कोणी पाहुणे आले कीच तसे डबे यायचे !     त्यावर खूप सुंदर सुंदर चित्रं ... प्राणी-पक्षी, सीनरी, सोनेरी केसांच्या मुली-पऱ्या-राजकन्या ... तशा एका डब्यात मी सगळ्या रिबिनींची गुंडाळी करून ठेवायचे !     आई सांगेल तेच परकर - पोलकं घालायचं , पण त्यांना matching रिबिनी मात्र मी ठरवणार !

    दुसरी आवडीची गोष्ट म्हणजे कानांतली  !     तेव्हा प्लास्टिक नव्हतं, म्हणून कानातल्यांचा फारसा चॉईस नसायचा.    जे काय असेल ते 'खरं' - म्हणजे सोन्याचं, म्हणून ते आईच्या ताब्यात ... ते घालायला मिळणं म्हणजे ३ll मुहूर्ता पैकी एक, किंवा गणपती, किंवा first order नातेवाईकांचं म्हणजे मामा, मावशी, आत्याचं लग्न नाहीतर ,  भावांच्या मुंजी !      पण कानातल्या रिंग्स काढून, दुसरं काही घातलं की आकाश ठेंगणं वाटायचं !   लाल खडा आणि त्याच्या खाली लटकणारा एक मोती !  किंवा दोन  ! नाहीतर एखादा लाल लोलक ... किंवा छोटंसं भोकरं !     मान हलवली की ते मोती हलले , डुलले की फार भारी वाटायचं ...म्हणूनच त्यांना डूल म्हणतात का ? ....मग , कुठून तरी आईचा आवाज यायचा , " हं , माना- काना पुरे ...एवढं मटकायचं कशाला ...? " .. असो .... मी अजूनही 'कानातल्यां'ना  डूलच  म्हणते !     Ultimate happiness ... !     अजूनही माझं collection आहे ... 'खऱ्या' डुलांचं !

    हे सगळं आपल्या हातात नसलेलं !     पण, अशी एक गोष्ट मात्र नक्की होती, जी माझ्याच हातात होती - असायची - आहेही.   त्या म्हणजे बांगड्या ! ... ह्या सोसाला ना आदि ना अंत ... शब्दश: आणि 'अलंकारीक' ही !     असा हा अलंकार !    लहानपणी आमचा बहिणींचा एक bangle-box होता.  वडील All India Radio मधे, म्हणून आजीनी रेडियोच्या डिझाईनचा आणला होता.   आत बांगड्या ठेवायला दोन लाकडी रुळ ... त्यावर ओवून ठेवायच्या !    एक रुळ माझा, एक धाकट्या बहिणीचा !    खरं तर दोघींमधे वयाचा खूप फरक, म्हणजे बांगड्यांचा वीड वेगळा, पण ती माझ्या बांगड्या घालू शकायची, त्यामुळे दर वेळी मी डबा उघडला की माझ्या काही बांगड्या तिच्या रुळावर बसलेल्या !    मग भांडाभांडी ....!     बांगड्यांचे रंग, त्यांच्या वरचं डिझाईन ... सोनेरी ठिपके, मणी !  अहाहा ....!!   बहुतेक सगळ्या बांगड्या काचेच्याच !   पण आजी, मावशी वगैरे कोणी कुठे ट्रीपला गेल्या की मग त्या वेगवेगळ्या बांगड्या आणायच्या !   राजस्थानांतून लाखेच्या बांगड्या, त्यावर मणी-आरसे . कधी कधी अगदी plain पण रंग असा एकसंध !     कलकत्त्याला गेले तर तिथे मोठ्या शिंपल्यातून कोरलेल्या बांगड्या !    दक्षिणेत-उटी-कन्याकुमारीला कोणी जाऊन आलं की हस्तिदंती बांगड्या ... !     नंतर नंतर ... चूडी नही ,  ये मेरा दिल है ... पासून ते..  मेरे हातोंमे नौ नौ चुडियाँ  हैं...सगळी गाणी पाठ !!!..

    इतक्या बांगड्याच बांगड्या !    अजूनही मला हौस आहेच !   आता त्याला थोडीफार heritage ची किनार पण आहे.   आजीची एक बांगडी,  सासूबाईंची एक पाटली, आईच्या गोठ-तोड्यांपैकी एक-एक ! कारण , मी आणि बहीण ....सगळ्याची वाटावाटी !!!!.. आईच्या मावशीच्या लहानपणीच्या बांगड्या ... त्या आता नातींना देऊन झाल्या ... !
       आता bracelet चं युग येतंय ... त्यात नवऱ्याने लग्नाच्या २५व्या वर्षी दिलेलं ब्रेसलेट ... अगदी close to my heart ... !    हे झालं विषयांतर ... उगीचच... 
      ....तर असा हा लहानपणचा cute सा नट्टापट्टा ... रिबिनी, कानातलं आणि बांगड्या ... !!!     हे सगळं लिहायचं कारण ... कोणत्या बांगड्या न्याव्यात ... साडीच्या रंगाला मॅचिंग, का काठाला मॅचिंग ... का दोन्ही रंग असलेल्या ... मोती का टिकल्या का सोनेरी रंग लावलेल्या ... ?....  प्रश्नच प्रश्न ... साडी वगैरे ठरवणं फार सोपं आहे ... त्या मानानी ... !!!!  





- सौ. अलका कुंटे, बंगलोर 
    +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. बाल सुलभ भावनांच छान वर्णनात्मक लेख

    ReplyDelete
  2. धन्यवाद !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland