दुर्गापूजा


    हे शारदीय नवरात्र सुरु झालं,  म्हणता म्हणता,  संपलं देखील ... रोज सकाळी उठल्यावर, आज कोणतं रूप देवीचं,  त्याचा अर्थ काय, पूजा - नैवेद्य ... सगळ्याचीच घाई.   दररोज एक नवीन फुलांची माळ, धान्य कसं उगवतंय, किती उगवतंय ... समईत पुरेसं तेल आहे नं ... नऊ दिवस अखंड समई हवी नं ... !   हे सगळं बघण्यात आणि सर्व रूपांचे लाड, कौतुक पुरवण्यात घरच्या बाईला नवरात्र सुरु झाल्यापासून संपेपर्यंत एक क्षण उसंत नसते ... नऊ दिवस अखंड एक दिवसासारखा घालवतात ... without break, अगदी रात्री दोन वाजता जरी जाग आली , तर आधी ताडकन उठून समई-दिवा चालू आहे नं  ते बघून येतील, ... स्वैपाकघरात जाऊन थोडीशी उद्याची तयारी पहातील, काहीतरी विसरलेलं करून येतील ... मगच पुन्हा झोपतील ... शिवाय सगळ्यांच्या आधी उठून, काही नाही तर उपासाचं वगैरे काहीतरी करून ठेवतील ... 

    असं हे नवरात्र ! घट बसवण्यापासून सुरु होतं . पूजेचं सर्व सकाळ-दुपार मधे होऊन जातं.   आणि मग एकमेकींना हळदकुंकू देणं, कन्या पूजन, भजन वगैरे सगळा संध्याकाळचा कार्यक्रम.   माझ्या लहानपणी 'आज कोणता रंग' वगैरे काही नसायचं, पण उत्साह काही कमी नसायचा !   विदर्भात आणि उत्तरेकडे कन्या-पूजन फारच महत्वाचं !   त्यामुळे नवरात्रात शेजारपाजारची खूप बोलावणी !   मग पायावर दूध-पाणी घालणं, स्वस्तिक काढणं, औक्षण, मग खूप खाऊ खाणे आणि शिवाय घरी जातांना काहीतरी 'present' मिळायचं.   तेव्हा त्याला gift असं  म्हणत नसत ... कधी खाऊला पैसे ... घरी जाऊन कधी ते आईच्या सुपूर्द करून , जबाबदारीतून सुटते असं व्हायचं ... !    परवा नातीला विचारलं की तुला काय gift देऊ गं ... तर म्हणाली "आजी, money आणि चॉकलेट सोडून काहीही ... "    "का गं " ... "अगं, ते आई घेऊन टाकते ... !"    काय स्मार्ट मुलं आजकालची !!

    मला नवरात्राची अजून एक आठवण, म्हणजे कलकत्त्यातली !  तिथे तर त्यांचा मुख्य सण दुर्गापूजा ... !!   दिवाळीहूनही मोठा !!!   आम्ही अगदी वाट पहात होतो ... इतकं वर्णन ऐकलं होतं !   आणि होतंही तसंच ... सगळी दुकानं तुडुंब भरलेली - नव्हे, माणसांनी आणि सामानानी ओसंडून वहात असलेली ... साड्या, दागिने, फुलं, भांडीकुंडी, फर्निचर आणि मिठाईवाले ...! हातगाड्या-फेरीवाल्यांनी आणि वस्तूंनी भरलेले फुटपाथ, पथारी पसरून बसलेले दुकानदार, ... सगळ्या आसमंतात एक उत्साह आणि अक्षरशः एक नशा ... !   कोपऱ्याकोपऱ्यावर मांडव ( तिथे त्याला 'पंडाल' म्हणतात ) ... पण बंद ... ! 

    पहिले चार दिवस पडदे लावून सगळे बंद.   एखाद दुसरा माणूस शिडीवरून काहीतरी ठोकत ... बहुतेक इतपतच दिसतोय actual पूजेचा उत्साह ... असं म्हणतेय, तोवर ललितापंचमी आली, आणि एक एक पडदा उघडायला लागला ... आणि काय सुंदर ... सगळा मांडव पांढऱ्या, गुलाबी, लाल, कनातींनी सजलेला- नुसताच सजलेला नाही, तर त्यात वेगवेगळी डिझाइन्स, आपण smocking हा embroideryचा प्रकार कपड्यांवर करतो, तश्या डिझाईन्स च्या कनाती, त्यात चक्रं, फुलं, कमळं ... हे मी फक्त तिथेच पाहिलं ! ... आणि त्यात उंच, भव्य दिव्य, रेखीव अशी दशभुजा देवीची मूर्ती ... दागदागिने घातलेली आणि सर्व तऱ्हेची आयुधं घेतलेली, त्रिशुळाने महिषासुराचा वध करणारी, करारी पण शांत, किंचित स्थितप्रज्ञ असा चेहेरा ... एका बाजूला सरस्वती, कार्तिकेय आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी, गणपती अशाही मूर्ती ... !    बंगाली लोकांकडे कार्तिकेय हा बुद्धी, सौन्दर्य, कला-नाट्यशास्त्र यांचा अधिष्ठाता !   सगळ्याच मूर्ती अतिशय सुंदर !   गणपती हा केवळ खादाड आणि काही न करणारा-बसून राहणारा, असा त्यांचा कल ... ते नाही आवडायचं .  असो, ललिता पंचमी पासून त्यांचे कार्यक्रम सुरु !   आरती तर कितीही वेळ चालत असे !   सगळे पुरुष झब्बा ( त्याला ते पंजाबी म्हणतात ) घालून आणि सगळ्या बायका लाल काठाची पांढरी साडी नेसून !   मग त्या बायकांचं देवी समोर फेर धरणं , हातातल्या मातीच्या भांड्यात निखारे आणि त्यावर धूप टाकून ते घेऊन 'धुनुची नाच' , नंतर मोठ्या देवळांत वगैरे 'सिंदूर खेला' ... सगळ्या जणी एकमेकींच्या अंगावर सिंदूर उधळत, गाल माखत, हसतखेळत देवीसमोर गुंग !   सगळंच सुंदर ... श्रद्धा, भक्ती आणि हौस यांचा संगम !   रात्रभर चालणारी गाणी, नाटकं, स्पर्धा ... !   आणि मग प्रसाद, किती किलो 'संदेश' आणून ठेवत असतील ... दर ठिकाणी मांडवात जाऊन देवीला नमस्कार केला की  हातावर प्रसाद !   ती सुंदर दशभुजा मनात कोरली गेली आहे !

    तशीच आपल्याकडची अष्टमीची महालक्ष्मी !   मला आठवतं ... अष्टमीला आई बरोबर संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायचो ते !   ही आठवण सांगलीची आणि मग पुण्याची !  अष्टमीच्या दिवशी ,  संध्याकाळी तांदुळाच्या पिठीची उकड काढून त्याचा चेहेरा बनवणं ... येरा गबाळ्याचे काम नोहे ... ती उकड नीटच झाली पाहिजे, तिला भेगा पडता कामा नाही, तिचे तुकडे पडले नाही पाहिजेत, रंग बदलला नाही पाहिजे ... तिथे चुकीला माफी नाहीच !!!    कोण करत असतील ... कसं करत असतील !    आपल्याला दिसते ती एकदम सुंदर, सजलेली, नटलेली देवीच !    तिची अभय मुद्रा, शांत चेहेरा, किंचित हसू आणि डोळ्यांत खूप प्रेमळ भाव !    Da Vinci ने एक चित्र जन्माच्या कर्मी काढलं आणि त्याचं केवढं कौतुक !    इथे पहा, साधी सरळ, सामान्य माणसं दर वर्षी तांदुळाच्या पिठीसारख्या क्षणभंगुर गोष्टीतून इतका सुंदर आश्वासक - मोहक चेहरा साकारत आहेत ... वर्षानुवर्षं तेच रूप ... !! ही जिवंत कला आहे ... !!! पण , एकाही कलाकाराचं नाव माहीत नाही ...

    संध्याकाळ झाली, देवीचं रूप सजलं की बायकांची लगबग सुरु होते.   सगळ्यांकडे ही पूजा नसते.   मग जिथे असेल तिथे जाऊन दर्शन तरी घ्यायचंच !   तिथे घागरी फुंकणं ... हे ही खूप unique !   विस्तवावर - निखाऱ्यांवर धूप टाकून त्या धुरावर घागर उलटी धरायची, तो धूर आत गेला पाहिजे, घागर गरम झाली पाहिजे, मग ती घागर घेऊन देवीसमोर फुंकायची ... किमान पाच वेळा तरी !   म्हणजे तो धुपाचा वास सगळीकडे ... धूप broncho-dialator.   त्यामुळे आपोआपच  खूप energetic वाटतं, छान वाटतं, उत्साह येतो आणि नाचावंसं वाटतं !   आपल्याकडे घरात तान्हं बाळ असेल, तर डास,  चिलटं जावीत म्हणून संध्याकाळी निखाऱ्यावर उद-धूप घालतातच .. !  तर घागरी फुंकतांना वगैरे काही जणींना elation चा अनुभव येतो, तो ह्या धुपाचा परिणाम असतो.   अंगात येणं वगैरे असतंच !   माझा त्यावर विश्वास आहे... म्हणण्यापेक्षा, अविश्वास नाहीये असं म्हणा ... मला आलेला अनुभव चांगला आणि भलाच आहे ... 

    इथे कर्नाटकातला दसरा खूपच प्रसिद्ध !   म्हैसूरच्या राजांचा हा मुख्य सण. अर्थातच प्रजेचाही तोच सण.  अजूनही इथे शाळांना नवरात्रात १०-१२ दिवस सुट्टी असते.  दिवाळीत एखाद-दोन दिवस !   म्हैसूरची देवी चामुंडेश्वरी हिची हत्तीवरून मिरवणूक.  स्वातंत्रपूर्व काळात आणि नंतर काही वर्ष राजे स्वतः हत्तीवर बसत.   नंतर त्यांनी स्वतः न बसता फक्त देवीची मिरवणूक सुरु केली.   आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळालेला हा सण, खरंच अतिशय प्रेक्षणीय असतो.   नवरात्रात पूजा-अर्चा ह्यांना प्राधान्य असणारच.   त्याच बरोबर इथे एक खूप छान प्रथा आहे.  हे लोक नवरात्रात 'बाहुल्यांचा सण' करतात.   कानडीत त्याला  'गोम्बे हब्बा' असं म्हणतात !   पूर्वी घरोघरी ही प्रथा होती, आता काही जणच करतात.   घरातल्या समोर च्या किंवा एखाद्या मोठ्या खोलीत-hall मध्ये एका भिंतीशी almost छतापासून ते खाली जमिनीपर्यंत पायऱ्या-पायऱ्यांची उतरंड करतात, त्यावर एक छान पांढरीशुभ्र चादर घालतात, सभोवती आरास करतात.  आणि ह्या पायऱ्यांवर बाहुल्या मांडतात.  सर्वात वरच्या पायरीवर त्रिदेव आणि देवी, मग खाली बाकीच्या देवांच्या छोट्या-छोट्या मूर्ती-बाहुल्या, मग दशावतार, रामायण-महाभारतातले प्रसंग, नंतर एखादा गावातला - खेड्यातला scene,  कुठे एखाद्या पायरीवर परदेशी बाहुल्या, चिनी, जपानी, ते यूरोपियन !  चिनी मातीच्या , लाकडी , लाखेच्या अशा बाहुल्या . मग आपल्या देशातल्या निरनिराळ्या प्रदेशातलं  वैशिष्ठ्य दाखवणाऱ्या बाहुल्या ... !   आणि अगदी खाली जमिनीवर , घरातली छोटी मुलं-नातवंडं  भातुकली, खेळ-गाड्या, विमानं ही मांडून घेतात !   ह्या मांडलेल्या उतरंडीला  'गोलु'  म्हणतात,  आणि आपला 'गोलु' बघायला आपल्या शेजारणी-मैत्रिणींना बोलावतात !हळदकुंकू तिथेच करतात !

    माझ्या एका कन्नड मैत्रिणीची हौस  विचारू नका !  तिच्याकडे ४-५ पेट्या भरून बाहुल्या आणि त्यांचं सामान  आहे.  दरवर्षी ती विचार करते, यंदा काय theme करायची !    आणि त्याप्रमाणे ती बाहुल्या मांडते.   स्वतःही घरी कागद, मणी, कापड,   जे हाताला लागेल ते घेऊन बाहुल्या करते, त्यांना दागिने करते !   दुसरी एक शेजारीण सुट्टीला जिथेही जाईल तिथून बाहुल्या घेऊन येते.   ती श्रीलंकेला गेली, तिथून तर तिने एक संचच आणला बाहुल्यांचा !   लंकेचा राजा रावण, हा अतिशय बुद्धिमान, दशग्रंथी. ज्ञानी,  उत्तम गायक-वादक आणि कवी !  ( त्याचं  'शिव तांडव स्तोत्र' - रवींद्र साठे ह्यांनी गायलेलं - अप्रतिम ... केवळ अप्रतिम ! U tube वर आहे .)  त्या संचात सिंहासनावर बसलेले रावण, मंदोदरी, आणि समोर त्यांची संगीत सभा ... तबला, पखवाज, मृदंग, वीणा, सतार, घटम अशी वाद्यं वाजवणाऱ्या महिला !!! 

    आता अगदी नुकताच WApp वर मला एका मैत्रिणीनी फोटो पाठवला, ह्या बाहुल्यांच्या देखाव्याचा !    त्यातल्या सगळ्या बाहुल्या , वस्तू क्रोशाने केलेल्या आहेत !!   ज्यांनी ही कोणी हे केलं आहे, त्यांना आणि त्यांच्या कलेला शतशः प्रणाम .  अगदी मनापासून ... !   केवढा उत्साह, कौशल्य, आणि पेशन्स ... !!!!! 


    तर असं हे नवरात्र खंडेनवमी - आयुधपूजेच्या दिवशी संपणार.   कलकत्त्याच्या दशभुजा दुर्गेचं विसर्जन दसऱ्याला होतं.   आपल्याकडे दसऱ्याला सोनं लुटणं,  सीमोल्लंघन !   साडे तीन मुहुर्तातला एक पूर्ण  मुहूर्त !   त्याचा वेगळाच थाट ! ....  दसरा सण मोठा ... नाही आनंदा तोटा !!! 

सोनेरी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 


- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५


Comments

  1. *अलकाचे चणे कुरमुरे*

    *दुर्गा पूजा*

    त्रिस्थळी यात्रा करतात तस अलकाने आपल्याला घरबसल्या दुर्गापूजा उत्सवासाठी बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशी सुंदर सफर घडवून आणली.सण साजरा करताना   वेगवेगळ्या प्रथा आणि त्या  साठी केलेली  हौस मौज वाचून खूप मस्त वाटलं.तिच्या ओघवत्या  लिखाणातून कोलकात्याच्या दुर्गामातेचा पंडाल भरलेल्या बाजारपेठेत  मी सुद्धा फेरफटका मारतोय असा भास झाला.घागर फुंकल्यावर पसरलेल्या धुपाचा सुवास  मला जाणवला.

    लोकरीच्या बाहुल्यांची उतरंड बघून *हौसेला मोल नसते* असं का म्हणतात ते कळलं. हा गोलू  बघितल्यावर आपल्या इथे दिवाळीत किल्ला करून सजवतात  त्याची आठवण झाली.

    अलकाच्या दुर्गापूजेच्या लिखाणात माझी थोडीशी भर

    नवरात्रीचा सण उत्तर भारतात आणि ईशान्य भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस मनोभावे देवीची पूजा केली जाते.

    दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचे महत्त्व असते. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे.

    आपल्यापैकी अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, दुर्गा देवीची मूर्ती बनविण्याकरिता वेश्यालयाची (soil of Red light area) माती वापरली जाते.

    *कशी सुरु झाली परंपरा*

    या परंपरेमागे असे कारण दिले जाते की,  वेश्यागृहात पाऊल  टाकणारी महिला असो वा पुरुष आत जाण्यापूर्वी सर्व पवित्रता आणि चांगुलपणा बाहेरच सोडतात  त्यामुळे वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र बनते. त्यामुळे ही पवित्र माती देवीची मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते.ज्यांनी  राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरचा अमरप्रेम बघितला आहे त्यांना त्या वस्तीत जाऊन मूर्तिकार माती घेऊन जाताना दाखवला आहे त्याची आठवण होईल.


    प्रसाद 

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland