दिस चार झाले ...
शाळेत असतांनाची गोष्ट. एकदा रेडिओवर एक श्रुतिका लागली होती. नाव-गाव काही आठवत नाही. त्यातली गोष्ट थोडीफार आठवते. पण त्यात एक गाणं होतं ... मन पाखरू पाखरू, किती दूरवरी जाय ... ! कोणी गायलं होतं माहित नाही, पण त्या मुलीचा आवाज, चाल आणि हे शब्द. कसे कुणास ठाऊक ... मनात जाम घट्ट जाऊन बसले ... न विसरण्यासारखे ..! मनाचं पाखरू ...कसं , कधी , किती दूर आणि कुठे जाईल , काही सांगता येत नाही ...त्याचा वेग ही कसा , तर निमिषार्धात पोचलेलं असेल ...अशा अर्थाचं गाणं . आणि जेव्हाही मी खूप अस्वस्थ होते, विनमस्क अशी असते, तेव्हा ते शब्द आपोआप येतात ... आणि , मी माझ्या आवडीच्या गावात , सांगलीतल्या घरात पोचलेली असते , मन आपोआप शांत होतं .. !आणि , ते शब्द माझ्या मनांत नाचत असतात , सतत .....
१५-२० दिवसांपूर्वीची गोष्ट ... खूप थंडी ... सतत बुरबुर पाऊस ... एकही गोष्ट मनासारखी जमत नव्हती ... कोणाचंच काहीही पटत नव्हतं ... सगळं एकसुरी, एकरंगी, grey रंगाचं जग ... अर्धवट झोप, अर्धवट जाग, आणि ... सूर्याचा रस्ता जसा काही हरवलेला ... येईच ना तो, आणि मला तर त्याच्या शिवाय रोजचं जगायलाही उर्जा कमी पडते ... असं सगळं चाललं होतं ... अंगाचं मुटकुळं करून झोपून जावं आणि जागच येऊ नये , असं वाटत होतं . शेवटी ठरवलं की ह्यातून आपणच आपलं बाहेर पडायचं ... कोणी येणार नाहीये ह्या विहिरीतून बाहेर काढायला ... आपण कोणी देवयानी नाही आहोत ...
...आणि सांगलीला जायचा प्लॅन केला, सगळ्या मित्र-मैत्रिणींना फोन केले, "मी येतेय ... आता पुढचं तुम्ही बघा ... आपण मजा करूया ... भेटू, गप्पा करू ... खाउ खाऊ ... काय वाट्टेल ते, काय मिळेल ते खाऊ ... नुसत्या गप्पा ... एका ठिकाणी बसून फक्त गप्पा ... " आणि त्यांचं 'हो' येता क्षणी निघाले ... माझा motto ... happiness is along the road, not just at the end of the road ! ... त्यामुळे ८ + ४ तासांचा कारमधला प्रवास ... रस्त्यातल्या खाच-खळग्यांसकट एन्जॉय करत निघाले ... लक्ष्य एकच ... सांगली, मित्र आणि गप्पा !
आपण impressionable वयात जे बघतो , अनुभवतो , ते आवडतं असं म्हणतात ... त्याच्या जोडीला, तिथले अनुभव, टेन्शन विरहित जग, कशाचीच काळजी नसलेलं आयुष्य, अशा ठिकाणच्या आठवणी छानच असणार ... दुसरं म्हणजे तिथून मनाविरुद्ध बाहेरच्या जगात फेकलं गेल्यावर, आणि मोठेपणीच्या कडू-गोड अनुभवांच्या background वर तर ते अजूनच उठून दिसतं ! त्यातही ते खूप वर्षांनी पुन्हा मिळाल्यावर, ज्याची आशा जवळजवळ सोडलीच होती , तर त्याची गोडी अजूनच वाढते ... एक heady cocktail, का wine, का काय म्हणावं ... !
तर अशी पोचले सांगलीत. आणि प्र-भा च्या म्हणजे प्रसाद आणि भारती ह्या मित्र जोडीच्या 'मर्मबंध' वर डेरा टाकला ... त्यांनी 'ये' म्हणताच ... त्या सुताला धरून मी स्वर्गात ! फोनवर प्रसाद म्हणाला, " तू येच, आपण सगळे गप्पा करू ... आताच भारतीने तुम्ही आहात, तोवर स्वैयंपाकाला एका बाईंना बोलावले आहे, म्हणजे आपण कोणीच 'मुदपाकगृहात' नको !" नुकतीच चिकूनगुनियातून उठली आहे ती ! एवढं अंग , सगळे सांधे दुखताहेत , तरी हसून स्वागत !!...परफेक्ट होस्ट्स ! आणि , स्नेहा ! पण , रिद्धी ची भेट नाही झाली ...
त्या नंतरचे चार दिवस म्हणजे नुसती मजा, मजा आणि मजाच ... eat, chat, and sleep ... हेच routine ! सोबतीला आणि चार मित्र आणि त्यांच्या बायका ! एकाने तर सांगून टाकलं ... तुझा काहीही कार्यक्रम, भेटीगाठी काहीही असू देत, पुढचे चार दिवस, तू जाशील तिथे आम्ही येणार ... आणि सर्वांनी तो शब्द पाळला ! रोज नवनवीन पदार्थ खाणे , गप्पा मारणे आणि अधूनमधून झोप काढणे ... कुणाच्याही कुचाळक्या-गॉसिप न करता, उखाळ्या-पाखाळ्या न काढता, नाटक-सिनेमा , हिरो-हिरॉइन्स च्या लफड्यांवर चर्चा न करता, एकदाही TV न लावता ... नुसत्याच गप्पा होऊ शकतात ... विषय संपत नाहीत आणि गप्पा पण संपत नाहीत हे २०० % खरं आहे ...!!! ते अनुभवलं ! थंडी वाजली नाही, पाऊस आला नाही, कुणाचंही मन मोडलं नाही ... ग्रुप मधली एक मैत्रीण - संध्या तर, केवळ एक दिवस तिला मिळाला, घरच्या जबाबदाऱ्यांतून ... तेवढ्यात पुण्याहून गप्पा मारायला येऊन गेली ... आम्ही सगळे अवाक् ... तू आलीस ! ... G R E A T !!! ...
सतीशच्या घरी माझ्या खोकल्याचा जोर ! ताप येतोय, सर्दी-खोकला वाढतोय ... बोलून बोलून घसा जाम बसतोय ... आता पडते की काय मी ... मग आपलीच गंमत बुडेल म्हणून ओढून ताणून आणलेलं चंद्रबळ ... शेवटी 'ज्यो' च्या हातचा गरम गरम चहा आणि सतीशनी प्यायला लावलेलं Benadryl ... एरवी इतकी नाठाळ मी, पण तेव्हा ते गुपचुप प्यायले !
अनिल-कुसुमचं घर - नवीन फ्लॅट - चित्रासारखं नव्हे चित्रच ! एक स्वप्नवत वाटणारं घर, अप्रतीम रंगसंगती, प्रत्येक गोष्ट सुंदर ! कधी कधी फार सुंदर घरात गेल्यावर वाटतं की आपण ह्यांचं घर मळवणार तर नाही ? आपल्या हातून काहीतरी तुटेल, मोडेल म्हणून जपून-सावरून बसायचं ... सुंदर बशीतून मिठाई उचलतांना हाताला कापरं वगैरे ... पण इथे त्यांच्या सुंदर सोफ्यावर मी शांतपणे मांडी घालून बसले ! संध्या चुकता चुकता तिथे येऊन पोहोचली ... खरं तर हे तिचंच गांव ... पण उगीचच टेन्शन ... तिला पाहून सगळे हुश्श्श ... ! तिथून संभाची भेळ खायला निघालो . तिथे इतकी गर्दी की पाय ठेवायला , गाड्या पार्क करायला अजिबात जागा नाही ... मग गजाभाऊ नी एक छान ठिकाण सुचवलं , मिरजेतलं . तिकडे सगळे रवाना ! एका नवीन स्पेशल ठिकाणी जेवायला ! राजस्थानी पद्धतीची थाळी . रबडी , उकडीचे मोदक , गव्हाची लापशी हे स्पेशल !! प्रत्येक पदार्थ स्पेशल ! एकेक घास खाल्ला , तरी पोट तुडुंब ... उत्तम चवी ... प्रेमानं वाढणं ... शेवटी 'चमचाभर तरी दहीभात घ्या' असा आग्रह ! गजुच्या मित्राचं हॉटेल , त्यामुळे आम्हाला सगळ्यांना भारी ट्रीटमेंट !!! आणि icing on the cake म्हणजे तिथे फोटो ... डोक्यावर रंगीत राजस्थानी फेटे घालून ... हातात तलवार घेऊन ... ते चमचमतं म्यान आणि तलवार इतकी जड ... की ह्या झाशीच्या राणीचा तलवार धरलेला हात आता पडतो का मग ... ! हसून हसून पुरेवाट ... ! तिथून गजा - वासंतीच्या घरी ! पसारा आहे , पसारा आहे , म्हणतेय , तर घर spic and span ! माझ्या खोकल्याला सौरभ नी औषध दिलं ,एका चमच्यातच घसा एकदम गरम ! म्हंटलं , एवढंच औषध बास !!! ☺️
दुसऱ्या दिवशी सगळे प्राचीकडे ! गुळाची पोळी, मटर करंज्या, भरली वांगी, बाजरीची भाकरी, खिचडी - कढी ... चार मेनू एकात, पण आपलं पोट एकच ... आमच्याहून वयाने इतके लहान प्राची आणि उदय ... वयाने मोठ्या लोकांशी गप्पा मारणं , आणि इतका जीव लावणं ... कसं जमतं त्यांना !!!!
मधे एक दिवस घरी बसूनच खाणे ! भारतीचा मुगाचा शिरा ! चिकुचं आईसक्रीम ! नॅचरलस् ने दोन चार धडे घ्यावेत प्रसाद कडून !!. तेवढ्यात दुपारी वेळ काढून , मी जाऊन चरणी, शांती आणि शोभी ... नव्हे ... सुनंदा, शांता आणि शोभाला भेटून आले ... आमराईत शाळेच्या ट्रिपला जायचो तसं ...! मग लॉन मधे कोरडी जागा शोधून, तिथे बसून सांबार वडी , मसाला चुरमुरे-भडंग, चॉकलेट असं खात खात, बाकी सगळ्या मैत्रिणींची आठवण काढत ... "तू संध्याला थांबवून नाही घ्यायचीस ? ... तू तरी ... ?" असं ऐकत ... सगळ्या मुलांना - 'मुलग्यांना' तात्पुरतं हद्दपार करून, हसून, चिडवून ... "...आता जायला पाहिजे बाई ... घरी वाट पहात असतील ... " करत करत, अजून अर्धा तास गप्पा करून , फोटो वगैरे काढून ... शेवटी घरी परत ...
एक दिवस गजाभाऊ-वासंतीच्या दुकानात ... दुकान कसलं ... भांड्यांचा mall ... गजाभाऊ नव्हता ... असता तरी दिसला नसता, इतकी भांडी ... नव्या-जुन्या तऱ्हेची, लहान-मोठी, सगळी चकचकीत , आणि भांड्यांइतकीच लोकांची गर्दी ! २-४ ठिकाणी बायकांचा घोळका आणि खाली बसून मोजणी, वजन करणं, लिस्ट बघणं ... त्यांच्या दिमतीला कामकरी वर्ग आणि हा सगळा झमेला लीलया संभाळणारा त्याचा मुलगा - सौरभ ! शांतपणे, हसऱ्या चेहऱ्याने, एकदाही न त्रासता, सगळ्यांशी गोड बोलणं ... ! काय पेशन्स !!
मग खिद्रापूर ! तिथलं देऊळ, कोरीव काम, गाईडनी सांगितलेली माहिती आणि पुराणातल्या गोष्टींची त्या देवळाशी घातलेली सांगड - सगळंच सुंदर ... असं म्हणतात की ८व्या शतकात सुरु केलेलं ह्या देवळाचे बांधकाम ११-१२व्या शतकात पूर्ण झालं ... त्याला सती-महादेवाच्या गोष्टीची जोड ... अतर्क्य नाही, पण अशक्य , पण , छान वाटलं ऐकायला ! तिथून नरसोबाची वाडी गाठली. खूप गर्दी होती तरी जेवायला थांबलो, मात्र बासुंदी-पुरी खाऊन पोट भरल्यावर दर्शनाला जायला गर्दी फार वाटली. पोटोबा झाल्यावर विठोबाला लांबूनच नमस्कार करून, ह्या वेळेला नाही जमत रे, पुढच्या वेळी नक्की भेटू ... जसा काही आपला मित्रच ... खरं तर मित्राला असं म्हटलं, तर तो रागावेल, पण हा पडला देव ... मित्रांची ओढ काय ते त्यालाही कळतंय ... !
संध्याकाळी मिलिंद-सुखदाकडे पहिल्या दिवशीचा राहिलेला पाव-मिसळीचा बेत ! वर इथे क्वचितच मिळणारा खरवस ! आणि हो, केळ्याचा बन , दहीभात विसरलेच की ! आईला मदत करायला अपूर्वा . तिला पहील्यांदाच भेटलो . अगदी हसत मुख आणि शांत ! परीक्षा असूनही ती मदत करत होती . अभिषेकची चित्रं ही पाहिली ! त्यातलं बाकी काही कळत नाही , पण पोर्टरेट्स अप्रतीम ...! जेवण झाल्यावर , ज्याला काळ-वेळ , काहीच बंधन नाही , असे ice-cream ! तिथेही गप्पा करतांना हसून हसून तोंड दुखायला लागलं ! ... फक्त संध्या missing ... हे प्रत्येकाने किमान एकदा तरी बोलून दाखवलं ...
ह्या सगळ्यांत दिवस नुसते एका पाठोपाठ एक सरत होते ... आणि परतीचा दिवस उजाडला. वसुमतीला भेटायला जमलं नाही, विवेकला पण भेटता आलं नाही अशी रुखरुख ... पण पुढच्या ट्रिपसाठी काहीतरी असावं , अशी मनाची न पटणारी समजूत करून देत तिथून निघाले ...
चार दिवस इतके बोलले की निघतांना तोंडातून एक शब्द फुटेना, आणि तो डोळ्यातून तर काढायचा नव्हताच ... सगळ्यावर पाणी नाही पडलं पाहिजे ... त्यापेक्षा निःशब्द ... निःशब्द हाच शब्द ... सगळं एका दमात सांगून टाकणारा ... शब्द .....निःशब्द ... !
माझं मन-पाखरू अजून तिथेच आहे ... सांगलीत ... त्या लहानश्या गावात ... इतकी वर्ष माझ्या मनात लपलेलं गाव ... !
......आता चैन पडत नाहीये ... आठवण येतेय ...तिथून परत येऊन .....
...दिस चार झाले , मन ... पाखरू होऊन ...
- सौ अलका थत्ते-कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
अलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteदिस चार झाले मन
नुकतीच तू सांगलीला येऊन *रिचार्ज* होऊन परत गेलीस त्या मुळे यंदाचे चणे कुरमुरे वाचायची उत्सुकता होती.त्या प्रमाणे वाचायला सुरवात केली आणि तू सगळ्या दोस्तांना उंच उंच हरभऱ्याच्या झाडावर चढवल्या सारखं वाटलं. तुला आणि विवेकला सांगलीला येऊन सगळ्यांना भेटावं वाटत हे वाचून आम्हीच सगळे खुश झालो. इतक्या दूरवरून *भेटी लागी जीवा लागलीसे आस* असं तुम्हाला वाटत हेच सांगलीतल्या दोस्तांना तुम्ही दोघांनी शाबासकी दिल्यासारखं आहे.
तिकडे तुम्ही निघायची तयारी करत असाल तेंव्हा आम्ही इथे तुम्हाला वाटून घेतले होते.तू आलेल्या दिवशी लगेच आपण अनिल कडे गेलो.दुसऱ्या दिवशी सकाळी अनिलला पुण्याला जायचं होत म्हणून पहिला नंबर त्याचा लागला. दुसऱ्या दिवशी प्राचीच्या घरी सगळे जमलो ती तर आपल्या ग्रुप मध्ये दुधात विरघळलेल्या *साखरे* सारखी झाली आहे.सुखदा मिलिंद च्या घरी सुद्धा धमाल केली. त्यांची लेक अपूर्वा सुद्धा सरबराई करायला एकदम पुढे होती. अभिषेकने काढलेल्या एका चित्रात व्हरान्ड्यातल्या जमिनीवर पडलेली उन्हाची तिरीप बघून चित्रातले बारकावे बघून मस्त वाटले.
तुम्ही येऊन घराचं *मर्मबंध* नांव सार्थ केलंत. कारण आमच्यासाठी तुम्ही तसेच आहात. येताना गाडीला ओझं म्हणत काय काय घेऊन आलात इथे.भारतीची आवड लक्षात ठेऊन बागेत लावायला चार रोपं सुद्धा आणलीत.पूर्वी कधी ना ऐकलेली वेगळीच भाजी आणि बेंगळुरूचे खास चिरोटे त्या बरोबर खाण्यासाठी तिथल्या नंदिनी डेअरीचे सुगंधी दूध सुद्धा आणले धन्य आहे तुमची.
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणतात तस अलका विवेक गेले गावा चैन पडेना आम्हाला असं वाटलं.पण गणपती जस पुन्हा येतात तस निघताना तू मनात म्हणाली असशील की *मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन* आणि आम्ही सुद्धा तुमची वाट पाहू.
प्रसाद / भारती
स्नेहा
Faarach çhchaan,both.Tjanls,Alka and Prasad!
ReplyDeleteThank you , ताई ! ☺️
DeleteThank you , प्रसाद आणि भारती !! 😊
ReplyDelete