२६ जानेवारी

 

    २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन  .  कधी नव्हे ते लवकर उठून, स्वैपाक, अंघोळ, देवपूजा आटपून ९च्या ठोक्याला मी TV समोर हजर ... परेड पहायला !    बाकी इतर वेळी ,  कोणाचं सरकार असो , त्याला घालून-पाडून बोलायला कमी न करणारी मी, परेड पहायला बसले की त्यांचं कौतुकच वाटतं, आणि  'अभिमानाने ऊर भरून येणे'  म्हणजे काय ते कळतं ..!   भले ही TV वर सगळं दाखवत नसतील, आपण super-powers पेक्षा ranking मधे खूप खाली असू, पण आपण अगदीच 'बिचारे' नाही आहोत , असं वाटतं.    एरवीचा गलथानपणा, मुजोरी, बेशिस्तपणा,   'चलता है' अशी प्रवृत्ती, भ्रष्टाचार, महिलांना दिली जाणारी वर्तणूक ... घरात-बाहेर सगळीकडेच ... हे परेडमधे कुठे दिसत नाही, आणि जिवाला 'सुकून' मिळतो.   ' दिलासा' हा शब्द कमी पडतो,  'सुकून' मधे जो  'सुकून' आहे तो special च ... !! 

    दिल्लीतला विजयपथ, राष्ट्रपती भवन, हे सगळं इंग्रजांनी बांधलं, पण त्याची चाळण नं  करता, आपण ते निदान नीट maintain करतोय ह्याचं अप्रूप वाटलं.    आणि तिथली व्यवस्था, स्वच्छता निदान TV वर तरी खूप वाटली !   

    काय एक एक पथक !  शिस्तीत चालू असलेलं संचलन !  सगळ्यांत पहिले  President's Body Guard ... त्यांची पहिली अट म्हणे उंची किमान ६ फूट पाहिजे ... मग बाकीच्या अटी ... किती परीक्षांतून जात असतील कोण जाणे !  मग actual सैन्यातले लोक, Army, Navy आणि Air Force  !    आधी शरीर घट्ट-स्वस्थ पाहिजे, सहनशक्ती, बुद्धी, प्रसंगावधान, कठीण परिस्थितीतही डोकं जागेवर ठेवून बरोबर निर्णय घेण्याची क्षमता  आणि आपल्या प्रमुखावर विश्वास, त्याचं ऐकलंच पाहिजे, आपला आणि सहचाऱ्यांचा जीव त्याच्यावर अवलंबून ... !    कधीही, कोणत्याही परिस्थतीत, बाकी सर्व सोडून लढायला तयार ... !    आपली विमानं, जहाज, special वाहनं ... सगळंच डोळे फाड-फाडून, आ वासून बघितलं ... एरवी रस्त्यावर गुंडागर्दी करणाऱ्यांनी दटावलं तरी दोन दिवस घरात बसून रहाणारे आपण ... थोडा वेळ तरी स्फुरण चढलं ...!!! 

   संपूर्ण परेड पहात असतांना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली !   ह्या वेळी सर्व पातळ्यांवर मुली खूप होत्या.  मेडिकल कोअर च्या नर्सेस आणि डॉक्टरच नाही तर ... Tanks आणि Missiles ऑपरेट करणाऱ्या, ट्रान्सपोर्ट आणि फायटर पायलट मुली पाहून धन्य वाटलं !   Slim, Trim and Fit... confidence अगदी नसां नसांत भरलेला ... आणि अगदी ठामपणे  रोखलेली , स्थिर नजर ... खरंच खूप छान वाटलं !   मला खात्री आहे, की मी आता नातीला भेटल्यावर ती म्हणेल, "आजी, परेड पाहिलीस ?   Lot  of Girl Power !.... मलाही असंच काहीतरी 'छान' करायचंय ..." 

       ... ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देणं ... ते हेच !!!  खूप appropriate आहे हे ...! असं काहीतरी दाखवलं पाहिजे मुलांना !!   त्या TV वरच्या, करमणुकीच्या नावाखाली कचरापट्टी सिरियल्स मधे, सगळा अन्याय सहन करत बसणाऱ्या दोन तरी मुली, एकाच मुलाच्या प्रेमात पडून त्याला जिंकायला - प्रेमाने, त्यागाने  etc - रडूबाई , किंवा , घर सांभाळण्याच्या नावाखाली वाट्टेल तो अपमान सहन करणाऱ्या सासवा , ... अशा गोष्टी लिहिणाऱ्यांना हे सर्व दाखवलं पाहिजे !  ... जुन्या काळचे, आजकालचे अत्याचार, फाळणी, बुरसटलेले विचार , संस्कारांच्या नावाखाली नको तिथे सहनशक्ती वाढवणं ... सतत तेच तेच  उगाळत बसण्या पेक्षा, सर्वांचाच भविष्यकाळ चांगला होईल, प्रेरणा मिळेल, उत्साह वाटेल असं काहीतरी दाखवावं, आणि त्यात ही परेड हा मोठा भाग असेल !    दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बेचिराख झालेले जपान-जर्मनी तो भूतकाळ मागे टाकून जग जिंकण्याच्या तयारीत आहेत ... शिस्त, वेळ पाळून, आपल्या असामान्य कष्टांनी, प्रयत्नांनी, नवीन technology वापरून ... ! 

    ह्या निमित्ताने WApp वर आलेल्या एकदोन पोस्ट आठवल्या !   ... एकदोन दिवस जरा देशभक्ती उधार द्या ... अश्या तऱ्हेची एक !   हो, आपण तसंच करतो.   १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी च्या अलीकडचे पलीकडचे दोन दिवस 'जहाँ डाल डाल पर ..' ,  'विजयी विश्व तिरंगा ..',   'सारे जहाँ से अच्छा ..'   नाहीतर 'मेरे देश की धरती ..'  ऐकत रहातो ... ते करावंच ... गाणी चांगलीच आहेत !    पण त्यातला भाव गळी उतरवला पाहिजे ... 'मिले सुर मेरा तुम्हारा ..'  'देस राग ..'  ही National TV वरची गाणी ideas, आणि अशा तऱ्हेचे कार्यक्रम ... ठाकून ठोकून, घोकून सगळ्यांच्या मनात ठसवलं पाहिजे ... IIT साठी लातूर पॅटर्न का कोटा पॅटर्न ...तसाच एक  चालवा ना NDA त जायला !   आपल्याकडे ideas, imagination, innovation ची कमी नाही ... कमी आहे ती दूर दृष्टीची आणि एकजुटीची !   

    साताऱ्या जवळचं गाव  'अपशिंगे'  आणि राजस्थानमधील झुनझुनू  ... अपशिंग्यातून घरटी किमान एक जण आपल्या सैन्यात आहे, तर  झुनझुनू  चा रेकॉर्ड आहे की एकाच गावातून सगळ्यात जास्त सैनिक सैन्यात आहेत.  थोडी शिस्त अंगी बाणावी, देशाबद्दल प्रेम वाटावं,  म्हणून NCC सारख्या  उपक्रमांची नितांत गरज आहे . 

    आपल्याकडे सर्व काही आहे ... पण कुरघोडी करणे, हेवेदावे, हारतुऱ्यांची हौस यापायी सगळं वाया जातं ... एकीकडे चंद्रयान, मंगळयान पाठवणारे आपण, राष्ट्रपती अन प्रधान मंत्र्यांकरता Mercedes आणि Toyota गाड्या का वापरतो ?   स्वदेशी का नाही ?   Tata, Mahindra काय त्या तोडीच्या गाड्या बनवू शकत नाहीत ?    हे काही केल्या  माझ्या  मनाला  पटत नाही... कारण माझा आपल्या देशातल्या बद्धिमत्तेवर विश्वास आहे ... !   कमी खर्चात, आपलं ज्ञान वापरून अनेक ठिकाणी, हॉस्पिटल्स मध्ये ,  लहान गावात, शेत-शिवारात मोठाले बदल घडवून आणणारे इंजिनियर्स - डॉक्टर्स - कलेक्टर्सआहेत आपल्या भारतात  ... त्यांच्या पायात घातलेले ते खोडे काढा जरा ... पुन्हा सुवर्ण भूमी होईल भारत ... !

    आणि , हो , आजची संध्याकाळची पावणे पाच च्या सुमाराला असलेली ' Beating the retreat ' ही परेड पहायला विसरू नका ....!!! 

    

- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. Replies
    1. २६ जानेवारी चे प्रजासत्ताक दिनाचे संचलन मला आवडत अगदी बालपणापासून .टी व्ही नसताना पोलिस परेड ग्राऊंडवरचे आणि नंतर टी व्ही वर . मध्ये काहीशी खंडित झालेली आवड या वेळी आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीं नी भाग घेतलेले लेझीम पथक सुरवातीला आहे हे समजल्यावर अगदी पहिल्या पासून कार्यक्रम पाहिला.खरसांगू मला त्यातील सैनिकी क्षेत्रात संशोधन केलेली नवनवीन आयुधे पहायला खूप आवडते.एकदा दिल्ली येथे जानेवारी च्या कडाक्याची थंडी असताना गेस्ट लेक्चर च्या निमित्ताने जायचा योग आला होता पण नेमकं २६ जानेवारी झाल्या वर, तरी दुधाची तहान ताकावर या न्यायाने राजपथ, इंडीया गेट येथे जाऊन आलो तेव्हा सुद्धा खूप रोमांचक वाटलं.असो एकंदरीत तु या निमित्ताने वैचारिक मंथन चांगल्या प्रकारे केले आहेस.हे वाचून माझ्या ही ही या संदर्भात जुन्या आठवणी जाग्या झाल्या

      Delete
    2. धन्यवाद, चंदू ! ती परेड रोमांचकारीच असते !!😊

      Delete
  2. *अलकाचे चणे कुरमुरे*
    *२६ जानेवारी*

    भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून लिहिलेले तुझे चणे कुरमुरे वाचले. तुला काही वेळा आपल्या सामर्थ्याचा, सगळ्या पातळ्यांवर महिलांचा वाढत असलेल्या सहभागाचा अभिमान वाटला  आणि  त्याच वेळी काही महाभाग फक्त १५ ऑगस्ट  आणि २६ जानेवारीला राष्ट्रभक्ती  दाखवायसाठी  कडक पांढरे कपडे घालून झेंडावंदनाला हजेरी लावतात बाकी इतर दिवशी सगळी बोंबाबोंब. हे लिहिताना  मला रामदास फुटाण्यांची कविता आठवली त्यात ते म्हणतात

    *भारत कधी कधी माझा देश आहे*
    आम्ही सारे भारतीय
    अलग अलग आहोत
    माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही
    त्यामुळे अन्य जाती धर्माशी
    माझा काडीचाही संबंध नाही
    माझ्या जातीचा माणूस
    माझ्या धर्माचा माणूस
    हाच माझा भाऊ आहे
    माझा देश माझा खाऊ आहे
    खाऊन खाऊन तो संपणार आहे
    प्रांता प्रांताची जुंपणार आहे
    जुंपल्यांतर फाटतील
    एकमेकांना लुटतील
    पुन्हा नवे परकीय
    साम्राज्यवादी येतील
    पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी
    नवे टिळक नवे गांधी होतील
    त्यांचेही पुतळे उभे राहतील
    पुतळ्यावर कावळे बसतील
    पुन्हा आम्ही एक होऊ
    स्वातंत्र्याचे गाणे गाऊ –
    हम सब एक है
    हिंदु-मुस्लिम भाई भाई
    हिंदु-सीख भाई भाई
    हिंदु-इसाई भाई भाई
    हिंदु-बौद्ध भाई भाई
    हिंदु-जैन भाई भाई
    हिंदु-हिंदु...
    सुद्धा भाई भाई
    तोपर्यंत मित्रांनो,
    मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे
    या देशापेक्षा मीच महान आहे
    मी माझ्याचसाठी जगतो
    मी माझ्याचसाठी मरतो
    आरशात पाहून
    मी मलाच नमस्कार करतो
    तेव्हा –
    माझा जयजयकार असो
    माझ्या धर्माचा जयजयकार असो
    माझ्या पंथाचा जयजयकार असो
    माझ्या प्रांताचा जयजयकार असो
    झालंच तर
    कधी कधी
    माझ्या देशाचासुद्धा
    जय-जय-कार असो

     रामदास फुटाण्यांनी जरी असं  लिहिलं असलं तरी आपण दुख्खी न होता (इथे मी दुख्खी च्या ऐवजी हिंपुटी म्हणणार होतो.) देशावर अपार प्रेम करतो.

    तू सैनिकांच्या गावाचा उल्लेख केला आहेस. गेल्या महिन्यात तू सांगलीला आलेली असताना आपण खिद्रापूरला गेलो होतो त्याच्या जवळच एक गाव आहे. त्याच्या नावातच सर्व काही आहे *सैनिक टाकळी* आहे ना वैशिष्ठयपूर्ण.

    आता मेक इन इंडिया बद्दल, तू आपले मंत्री परदेशी बनावटीच्या गाड्या वापरतात असं म्हटलं आहेस म्हणून तुझ्या माहितीसाठी आपले पंतप्रधान जी रेंज रोव्हर गाडी वापरतात तिची मालकी टाटा मोटर्स कडे २००८ पासून आहे. आता हे वाचून झाला का तुझं समाधान.

    मग आपण सारे म्हणूया *मेरा भारत बदल रहा है*
    प्रसाद 

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद , प्रसाद ! आपला देश बदलेल !! नक्कीच !! मला खात्री आहे !😊

      Delete
  3. राष्ट्रपती भवन व पार्लमेंट यांची स्वच्छता व देखरेख बीव्हीजी कंपनी करते हनुमंत गायकवाड हे रहिमतपूरचे असून त्यांनी कंपनी स्थापन केली आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे

    ReplyDelete
  4. एनडीए व यु पी एस सी परीक्षांकरिता एस पी आय औरंगाबाद व कोल्हापूर येथे आहेत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland