एका हाताची टाळी


    परवा मैत्रिणीशी फोनवर बोलत होते . दुसऱ्या एका मैत्रिणीची सहज चौकशी केली . तर ,  बोलता बोलता मैत्रीण म्हणाली, "अगं, मीच किती सारखी चौकशी करायची, खुशाली विचारायची तिची ?  मैत्री काय एकतर्फी टिकते का ?   एका हातानी टाळी कशी वाजणार ?"   आणि , मी  विचार करू लागले ... 

    ... एका हाताची टाळी ... किती वेगळी कल्पना आहे ... टाळी वाजवायला दोन हात लागतात.   स्वतःचाच दुसरा हात नाहीतर दुसऱ्या कुणाचा.   पण दोन हात हवेतच ...

    माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ... social animal ... त्याला सुखात ,आनंदात जगायला त्याच्या अवती भोवती कोणीतरी हवं असतं.   मौखिक भाषा येते , म्हंटल्यावर तर नक्कीच हवं.   आणि मग आनंद-सुख-समाधान , कुणाचं कौतुक , दाखवायला expression हवं - म्हणजे टाळी आलीच !  आणि मग दुसरा हात ही हवाच ! 

    अगदी लहान बाळाला 'टाळ्या पोळ्या गुळाच्या'  आपण शिकवतो.   ते बाळ पण टाळ्या वाजवत हसतं, जसं काही त्याला  आपण  expression शिकवतो.   काहीतरी चांगलं, positive दाखवायला !   नंतर शाळेत कुणीतरी "दे टाळी, घे पोळी' शिकवतं, आणि मग काही दिवस तोच खेळ असतो.  पुढे जरा मोठं झाल्यावर मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात कुणाला चिडवायचं, कधी कुणाच्या मागे लागायचं आणि आपला 'point' पटला की ... "दे  टाळी" ... !   आणि नाहीच पटला किंवा गप्पांना भांडणाचा सूर लागतोय असं वाटलं, तर मधेच  "टाळ्या... टाळ्या...."  असं करत, हसून सगळं tension diffuse करून टाकायचं ... !

    माझ्या मते 'टाळी' ह्या शब्दाला आणि त्या action बद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक प्रतिसाद आहे, जो हवासा वाटतो ... आपण काहीतरी छान करावं, गावं आणि कुणाचा प्रतिसादच आला नाही तर काय उपयोग ?   आपण छानसा शेर नाहीतर जोक सांगावा, आणि समोरची प्रजा ढिम्म बसून राहिली, तर काय होतं ... जे होतं ते नक्कीच आवडत नाही.   पण हा प्रतिसाद तेव्हाच मिळेल, जेव्हा आपण कुणाशी तरी संवाद साधत असू ... संवाद दोन्हीकडून हवा आणि तो ही अनुकूल असावा ... कधी कधी भाषण, कार्यक्रमाला  जावं आणि ते रटाळ असेल तर जांभया देत, तुरळक चार-पाच टाळ्या ऐकू येतात   आणि त्या  सादरकर्त्यापेक्षा मलाच जास्त वाईट वाटतं ... त्याला काय वाटत असेल ह्या कल्पनेनी !    माझी आई तिच्या लहानपणची एक मजा सांगायची ... शाळेतल्या कार्यक्रमात कुणाचं भाषण खूप लांबलं, तर सगळ्या मुली ते भाषण संपल्यावर पालथ्या हाताने टाळ्या   वाजवायच्या. एकदा बाईंच्या ते लक्षांत आलं आणि मग कार्यक्रम संपल्यावर हातावर छडीनी टाळी दिली बाईंनी !  ... पण तसं पाहीलं तर , खरं म्हणजे idea चांगली होती ... !! 

    टाळीच्याच संदर्भात मला एक गोष्ट सुचली !   झिम्मा !   दोघी, नाहीतर तिघी, नाहीतर असतील तितक्या सगळ्या जणी एकाच वेळी मिळून खेळू शकतात !   ... टाळ्यांचा हा खेळ आनंद देणारा !   हाच विचार जरा पुढे वाढवला , तर सर्व समावेषक - all inclusive - असा एखादा उपक्रम, सुधारणा, किंवा socially useful - रंजल्या गांजल्यांना थोडीफार मदत मिळेल असा ही होऊ शकतो,  शेवटी कल्पना विस्तार हा आपल्या मनन-चिंतनावरच अवलंबून आहे !

    'एका हाताची टाळी' ह्या वाक्प्रचाराचा उपयोग थोडा वेगळाही करतोच आपण.   तरुणपणी माहेरी सणावाराला, सुट्टीला जमलो की मैत्रिणींच्या  गप्पांच्या मैफिलीच असायच्या.  गाणी , गपों , गोष्टी , मजा ... त्यात थोड्याफार आपापल्या सासरच्या कागाळ्या-गाऱ्हाणीही  असायची,  की मग आई म्हणायची, "काय गं सारखी कुरकुर करता, तुम्हीही काहीतरी करत असाल ... एक लक्षांत ठेवा, टाळी काही एका हातानी वाजत नाही ... "

    टाळीवरून अजून एक मजेदार गोष्ट आठवली.   आम्ही सांगलीला असतांना वडिलांचे बॉस होते, Mr रुस्तम लाल.   पारशी, गोरे गोरे, सहा- सव्वा सहा फूट उंच.   हात पाय लांब लांब, आणि हाताची बोटं  तर इतकी लांबसडक की पहात रहावं !   ते कधी कधी रविवारी वगैरे घरी यायचे.   ते बोलतांना, काहीतरी वेगळं आठवलं, एखाद्या  problem वर  काही सुचलं की पटकन आपल्याच तळहातावर आपल्या लांब लांब बोटांनी टाळी वाजवायचे !   चुटकी वाजवल्यासारखी ! पण ती टाळी एकदम लक्ष वेधून घ्यायची !   ते गेले की आम्ही बहिणी सांगायचो, 'ते uncle नं एका हाताने टाळी वाजवतात ... अगदी unique !'   मग तो पूर्ण दिवस आम्ही दोघी तेच करत बसायचो ... पण आमची कधी वाजलीच नाही ... !

    आता या वयात वाटतंय , की काही बाबतीत तरी एका हातानं टाळी वाजवायला जमायला हवं ... नसेल एखादा मित्र-मैत्रीण फोन करत ... पण म्हणून लगेच त्यांना 'शिष्ठ' catagory त  घालण्या पेक्षा आपणच विचारावं ... "बऱ्याच दिवसांत काही फोन नाही, सगळं ठीक आहे ना ?"   ... अर्थात हे लिहिणं सोपं, पण करणं कठीण !   समजा काही misunderstandings असतील, तर  स्पष्ट बोलून ती दूर करायला काहीच हरकत नसावी ... निदान प्रयत्न करावा ... आपण हात पुढे करावा.   तिकडून हात आला, टाळी वाजली तर उत्तमच.  नाहीतर,  निदान आपण प्रयत्न केल्याचं समाधान !   काही कुणाला मदत हवी असेल, पण मागायची लाज वाटत असेल, विचारायला अवघड वाटत असेल, तर आपणच का नं विचारा ?   कदाचित कुण्या जिवाला सुकून मिळेल !

    एक महत्वाचा पॉईंट राहीलाच !   साधारण माणसांना 'कंपनी' लागते, आवडते   असं आपण म्हणतो.   पण काही लोकांना थोडं फार एकटं रहायला आवडतं ... ISOLOPHILIA   ... !     निसर्गाच्या सान्निध्यात - मग तो रिसॉर्ट असो किंवा गॅलरीतलं छोट्या कुंडीतलं फुलझाड असो, आपल्या आवडत्या खुर्चीत बसून ते स्वतःचीच कंपनी एन्जॉय करतात, ध्यान करतात, विचार करतात. त्यांची टाळी एकट्यानेच वाजते ! असं ही असू शकतं .... 

  .... एक प्रकारचं तप , किंवा साधना , ध्यान लावणं म्हणा.....  एखादा इंजिनियर आपल्या मशीन मधे दंग होतो,  डॉक्टर- सर्जन पेशंटसाठी जीवाचं रान करतात.   कुणी चित्रकार चित्रात, तर कुणी आपल्या रियाजात देहभान विसरतो....  हे लोक आपल्या ध्येयाशी, कलेशी, पेशाशी, दैवताशी एकरूप झालेले असतात.   जगाला विसरून  , तहान भूक हरपून , ते त्यांच्या passion शी तादात्म्य पावलेले असतात ... 'ब्रम्हानंदी टाळी' याहून काय वेगळी असते ?   ... अशी टाळी वाजणं .....वाजवता येणं ... याहून विशेष ते काय असणार ? ...     

      




- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. वाह् मस्त लेख ! शेवट तर फारच छान ! ब्रह्मानंदी टाळी ..... 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland