सर्टिफिकेट
बरेच दिवस आळसात, सुखात घालवल्यावर, अचानक एक दिवस मला एक कल्पना सुचली - नव्हे आवडली. फेसबुक वर वर-खाली करतांना एक 'सुविचार ' दिसला. DE-CLUTTER !! ...Declutter your house, living-space, kitchen, wardrobe, your mind and lofts !!! ... जमेल तेवढंच करू ... म्हणजे आपला उत्साह किती टिकणार आहे, वेळ आणि आळस किती असणार आहे ?? ...
घरातलं विशेष काही disturb नं करता, 'declutter अभियान' सुरु करायचं ठरवलं. ही मोहीम 'राबवायला' 'मनुष्यबळ' हाताशी घेतलं, आणि loft वरची समोरची पहिलीच दिसली, ती बॅग ओढली. जुन्या तऱ्हेची airbag ... माझीच ... आणि तिच्याबरोबर आठवणींची पोतडीही ! लाल निळ्या रेक्सिनची, त्यावर ३-४ वेगवेगळ्या रंगांची फुलं ... एक 'बॉब कट' वाली मुलगी ... आणि Air France असं लिहिलेलं ... इतपत 'फेमिनिझम' पुरायचं तेव्हा !... कॉलेजच्या पहिल्या, आणि शेवटच्या - एकुलत्या एका ट्रिपला नेली होती ती ... अर्थातच, काही रम्य आणि काही 'not so रम्य' आठवणी ... तिच्याशी जोडलेल्या ... पाय अडकून मी पायरीवरून पडतांना कोणीतरी हात दिला, ही रम्य आठवण, आणि त्याच वेळी चप्पल तुटली ही 'not so रम्य' आठवण ... !
तर ती बॅग दिसली, आणि आत काय असेल, ... तर २-४ फाइल्स ... जुन्या पुराण्या... अमरावतीच्या bookstore च्या नावाची file ... वरती माझं नाव ... शिडीवरून उतरून तिथेच बसले ... file चाळायला ...
हे तर माझं birth certificate ! भला मोठा फॉर्म ... आईचं नाव, वडिलांचं नाव, अमका भाग, तमकी हद्द, कोणतं जन्म मृत्त्यू केंद्र आणि मग ८-१० नावं लिहायला पुरेल इतकी मोकळी जागा ... तिथे 'मुलगी' इतकाच उल्लेख आणि तारीख वार ... झालं ! ओ हो ... इतकी वर्षं टिकलंय हे प्रकरण ... आता पुढे काय ? मग एक एक करत निघत गेली certificates ... पहिली ते अकरावी पर्यंतची प्रमाणपत्रं - गद्य पाठांतर, वादविवाद स्पर्धा, काव्य गायन, हस्ताक्षर, चित्रकला, गाणं , शिवणकाम .. काय वाट्टेल ते ... त्यात 'प्राविण्य' मिळवलं हे सांगणारी प्रमाणपत्रं ! ह्यांचं काय करायचं आता ? Nostalgia ही म्हणता येणार नाही. नुसती तोंडओळख झाली या सर्वांची ... पुढे एकही वाद जिंकला नाही, का शिंप्याकडच्या फेऱ्या चुकल्या नाहीत ! चित्रकला राहिली doodles काढण्यापुरती आणि गायन ... अंघोळीला गेल्यावर ...
मग सापडलं SSLC पास झाल्याचं सर्टिफिकेट ... आणि मग सर्टिफिकेट ची मालिकाच सुरु झाली ... एका मागून एक ... school leaving certificate, domicile certificate, मग एक character certificate ... त्याला काही किंमत आहे का ? १५-१६व्या वर्षी मुलाचं character चांगलं असणारच ... शाळेच्या मधल्या सुट्टीत मित्रांशी गुद्दा गुद्दी केली म्हणून काही त्याला 'हा गुंड आहे' असं म्हणणार नाहीत, की केसांत रंगीत पिना लावल्या म्हणून कुणा मुलीला 'हिचे ताल बघा जरा' असं म्हणणार नाहीत ... पण ते प्रमाणपत्र लागायचं. सगळ्यात चीड आणणारा प्रकार म्हणजे migration certificate. वडिलांची बदली झाली , म्हणून एका गावातून त्याच राज्यातल्या माझ्या जन्मगावी मी जातेय तर migration certificate ? मला मी निर्वासित-स्थलांतरित का काय आहे असं वाटलं ... मग एक देश, एक राष्ट्र ... ही सगळी नाटकं कशाला ? पण ते लागायचं, आणि म्हणून ते माझ्याजवळही होतं ... असो ... मग एक ओळखपत्र ... कॉलेजमधे एक Id Card लागायचं ... नशीब, तेव्हा ते आजच्या सारखं गळ्यात घालून मिरवायला लागायचं नाही. लायब्ररीचं पुस्तक घेतलं की ते जामीन म्हणून ठेवायचं ... माझ्याजवळ आहे ते कार्ड अजून !
ह्या सगळ्यातून वाट काढत पुढे गेल्यावर मला माझं B.Sc. आणि M.Sc. ची प्रमाणपत्रं सापडली ! जाड टिकाऊ कागद, त्यावर सुंदर अक्षरांत माझं नाव वगैरे ... पण वरचं 'स्नातक प्रमाणपत्र' वाचल्यावर, का कुणास ठाऊक , पण 'गंगेत घोडं न्हायलं ' असं काहीतरी feeling आलं. 'स्नातक' शब्दाची व्युत्पत्ती, अर्थ वगैरे माहीत नाही, जाणून घ्यायची इच्छा ही नाही, पण feeling मात्र तेच होतं हे नक्की. अगदी दोन्ही मुलांच्या PhD ची प्रमाणपत्रं पाहील्यावर तर ह्या feeling चा खराखरा अर्थ कळला ... !
पुढचं प्रमाणपत्र marriage certificate ... जे नव्हतं, पण त्याचा एक पुरावा जतन केलेला होता ! एकदा असंच कुठे तरी ते मागितलं ... "बघ ! ....तरी मी सांगत होते ...."... इतका संवाद ऐकल्यावर समोरच्या माणसाने खूपच समजूतदारपणा दाखवला, आणि त्यानंतर अगदी आत्ता आत्ता पर्यंत त्याची गरज पण पडली नाही ! खरं तर ते प्रमाणपत्र अजून हातात आलेलं नाही, ह्या गोष्टीला ४७ वर्षं होऊन गेली . marriage रजिस्टर करण्या करता रु. ३ फक्त भरल्याची पावती आहे , पण ते प्रमाणपत्र आणायला कोणालाच वेळ झाला नाही, आणि मग सगळेच विसरले. आमच्या लग्नाच्या पत्रिकेला ती रिसीट मी टाचून ठेवली आहे आणि ते सर्व एका प्लास्टिक च्या पिशवीत जपून ठेवले आहे ...एक आपलं proof ... !
त्यानंतर मधली २०-२५ वर्षं मुलांची प्रमाणपत्रं जपून ठेवण्यात गेली ! मी एक छान गोष्ट केली, की ती म्हणजे - मुलं नोकरी-लग्न वगैरे नंतर आपापल्या मार्गाला लागल्यानंतर, त्यांची सगळी certificates, त्यांच्या फाइल्स त्यांना देऊन टाकल्या. आपापल्या गोष्टी संभाळा म्हणून ... तरी मधूनच त्यांना काहीतरी आठवतं ... "माझ्या पहिल्या bike ची spare किल्ली आणि त्यांनी दिलेलं 'proud owner' वालं certificate तू कुठे ठेवलं आहेस ... ?" मी कशाला ठेवू ते ? पण तसं न म्हणता, मी त्याची कपाटं, कप्पे उपसत बसते ... असो. लहानपणी मुलांनी अधून मधून दिलेली प्रमाणपत्रं आहेत माझ्या जवळ, "world's best mother, world's best अमुक तमुक" अशी ती आहेत. त्यांचं प्रयोजन असेल तेवढ्या पुरतं, पण माझ्यासाठी ते क्षण खूप सुंदर आहेत. ती हस्तलिखित प्रमाणपत्रं माझ्या दागिन्यांच्या पेटीत आहेत ! वहीतलं एक पान फाडून, त्यावर फुलं - पानं, प्रत्येक अक्षराला वेगळ्या रंगाचं पेन, असं लिहिलेलं ! माझ्यासाठी ती सर्व अनमोल आहेत !
आणखीन एक महत्वाचं प्रमाणपत्र - passport - पारपत्र ! पारपत्र का म्हणतात माहीत नाही. कदाचित देशाच्या सीमा पार करून जातांना ते लागतं म्हणून असेल. ते मिळवतांना एकटंच आत जायला लागतं म्हंटल्यावर माझं धाबं दणाणलं. आपण काहीतरी चुकीचं बोललो तर ... विवेकही tense झाला होता, वाघाच्या गुहेत आपण हिला ढकलतो आहोत, असा चेहरा ! मी आत गेले, आणि अगदी सुखावह प्रवास - ३-४ केबिन्समध्ये पटपट कामं ... सगळे अगदी polite लोकं ... इतकी मदत, इतकी मदत की वाटलं आपण इतक्या 'म्हाताऱ्या' झालोय का ? येणारा जाणारा प्रत्येक माणूस "M'am .. M'am" करतोय, फाईल धरू का विचारतोय, बसायला खुर्ची देतोय ... ५-६ तासांचा वेळ ठेवून , सोबत बिस्किटं, चिक्की, चॉकलेट, पाणी, वाचायला नेलेलं पुस्तक , घाम पुसायला नॅपकिन, wet tissue चा पॅक ... सगळी तयारी फुकट गेली ... २५ मिनिटात मी ऑफिसच्या बाहेर होते आणि मग नवरा येईपर्यंत अर्धा तास ताटकळत बसले ... मला २-३ तास तरी लागतील म्हणून हा कॉफी प्यायला पळाला होता. त्या काळी काही मोबाईल नव्हते .. तिथे बाहेर security वाल्याच्या खुर्चीवर बसून होते, असो. तर ते पारपत्र काढून २५ च्या हुन जास्त वर्ष झाल्यावर यंदा ते पहिल्यांदा वापरलं ! आता ते 'कोरं' नाही, त्यावर 'छाप' आहेत !
ह्या प्रमाणपत्रांच्या पलीकडे आपण गेलो आहोत असं वाटत होतं, म्हणून ही फाईल लॉफ्ट वर टाकून दिली . तोवर नवीन प्रमाणपत्रं येऊ लागली, मग नवीन फाईल पण सुरु केली. आधी PAN card, मग Voter Id Card, आणि पाठोपाठ आधार कार्ड ! मग त्यावरचा फोटो, त्यावरून झालेलं रामायण, त्याच्यासाठी ५-५ तास रांगेत उभे !! पण दुःखात सुख म्हणजे बसायला खुर्च्या होत्या, आणि प्यायला पाणी ! मग मिळालं ते एकदाचं. त्याच्या शिवाय तुम्हाला ओळख - नव्हे अस्तित्वच नाही ? मग त्या डिग्र्या वगैरे काय ? का ते केवळ कागद ? कागदाच्या किंमती एवढीही किंमत नसलेले ? पण आता ते up to date ठेवायलाच लागतंय ... नाहीतर पहिली पंचाईत बँकेपासून सुरु होते ... ! आता काय मोबाईल मधेही आपण ही सगळी ठेवू शकतो. कोविडची vaccination वाली ३ प्रमाणपत्रं तशीच तर ठेवली आहेत !
ह्या प्रमाणपत्राच्या खूप मजेदार गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात - अनुभव येतात. आजच एक जोक पाठवला कुणीतरी. एका बँकेने एका pensioner ला आधीच्या वर्षीचं life certificate मागितलं, कारण त्यांच्याकडचं हरवलं ! त्यावर त्या माणसाने - नाव माहीत नाही, पण गावाचा अंदाज बांधता येईल - कळवलं की माझं ही हरवलं आहे, आणि वयपरत्वे , मी मागच्या वर्षी जिवंत होतो का नाही ह्याचं विस्मरण झालंय, तरी क्षमस्व !! ( किती नवल ... चक्क 'क्षमस्व' लिहिलंय ! )...
अशीच एक खरी घडलेली घटना, मी माझ्या वडिलांच्या मित्राबरोबर LPG डीलर च्या ऑफिसात गेले होते. ते अमेरिकेला मोठ्या मुलाकडे कायमचे जाणार होते, म्हणून त्यांना त्यांचा गॅस धाकट्या मुलाच्या नावे करायचा होता, अन त्यांनी तसे पत्र लिहिले होते. तर तिथली मुलगी म्हणाली, "काका, असं नुसतं करता येत नाही. death certificate सोबत जोडायला हवं. मगच होईल. " मला हसावं का रडावं काही कळेना, काकांना म्हटलं,"जाऊ द्या, चला ..."
अशाच काही फाईल्स काढल्यावर खाली तळाशी एक खूप जुनी फाईल सापडली, वडिलांच्या नावाची ... ग्रे रंगाची, जरा विटलेली, एका दोरीने बांधलेली , ... पण वरची अक्षरं, वडिलांचं नाव, त्यांच्याच सुबक हस्ताक्षरातलं, जसंच्या तसं ... माझ्या मनात त्यातली वळणं, रेघा, same तसंच ... त्या फाईल वरून हळूच हात फिरवला, नसलेली धूळ पुसली आणि ती उघडली ... त्यांचं birth certificate नागपूरचं, जीर्ण शीर्ण झालेलं, degree certificate, नोकरीचं joining certificate , पुण्याच्या High Power Transmitter ला best installation म्हणून मिळालेल्या medal, shield बरोबरचं प्रमाणपत्र, एखाद - दोन life certificate च्या कॉप्या . जसं वय झालं तसं सही बदलू नाही, म्हणून रोज ८-१० सह्या ते practice म्हणून करायचे, त्यातला एक कागद ... आणि शेवटचा कागद ... त्यांचं death certificate ...
... Birth certificate ने सुरु झालेल्या आयुष्याचा ... Death certificate ने end ... ह्या दोन प्रमाणपत्रांमध्ये एक जीवन प्रवास ... File closed ...
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
अप्रतीम लिखाण ! 👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !
Deleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteसर्टिफिकेट
तुझे आजचे चणे कुरमुरे वाचताना माणूस जन्माला आल्या पासून त्याच्या अंतापर्यंत मधल्या काळात काय केलं ते सांगायचं काम ही सर्टिफिकेट करतात. *अ* पासून *ज्ञ* पर्यंत आपण केलेला प्रवास, हा माणूस *अज्ञ* राहीला नाही याची खात्री देतात .पुलंचा हरितात्या पुराव्यानिशी शाबीत करतो म्हणतात तस हे काम सर्टिफिकेट करतात.
तू *स्नातक* झाल्याच्या सर्टिफिकेट बद्दल लिहिलं आहेस,पण एके काळी हीच सर्टिफिकेट घरातल्या भिंतींवर फ्रेममध्ये अभिमानानं टांगलेली असायची आणि ती बघून बघणाऱ्याच्या भुवया उंचावायच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या त्या उंचावलेल्या भुवया बघितल्या की आत कुठेतरी आनंद व्हायचा. खर की नाही ?
माझे आजोबा कामानिमित्त १९२० साली इंग्लड,फ्रांस आणि स्वित्झर्लंडला गेले होते त्या वेळचा त्यांचा पासपोर्ट १०५ वर्ष झाली तरी मी जपून ठेवला आहे
माझ्या भयानक मोठ्या अपघातानंतर जवळपास वर्षांनी मला घरी सोडताना डॉक्टरनी जे *discharge certificate* दिले ते certificate माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होता.
जपून ठेवलेली ही सर्टिफिकेट पुन्हा बघताना आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आणि तू लिहिल्या प्रमाणे त्या वेळच्या कडू गोड आठवणींनी कधी हसवतात तर कधी डोळे नम्म करतात. एक सोडून बाकी सगळी सर्टिफिकेट आपल्याला बघायला मिळतात आणि *ते सर्टिफिकेट* मात्र आपली पुढची पिढी बघते.
नातवंडांना ही सर्टिफिकेट बघायला दिली की ती सुद्धा म्हणतील,अरे वा काय ग्रेट आहे आपली आज्जी.आणि कॉलर ताठ करून तुझं कौतुक मित्र मंडळींना सांगत बसतील आणि खर पाहिलं तर हीच असते त्या सर्टिफिकेटची किंमत आणि आपल्या साठी असतो तो
*मनात दरवळणारा स्मृतिगंध*
प्रसाद
Thank you , प्रसाद !! ते एक certificate सोडून , बाकीच्यांनी दिलेला आनंद काही वेगळाच असतो !! तुझं इतकं छान लिखाण हेच एक छान certificate आहे !!☺️
Delete