ठोकताळे

    काही दिवसांपूर्वी मैत्रिणीशी फोनवर बोलतांना  ठोकताळे हा शब्द बोलण्यात आला .  तसा नेहमीचाच शब्द, पण अर्थ कसा ठासून भरलेला.   त्यात किती गोष्टी compact करून भरलेल्या आहेत.   अनेक वर्षांचा, कधी अनेक पिढ्यांचा, हजारो वर्षांचा अनुभव, त्यावरून काढलेले निष्कर्ष, ते ताडून पहाणं... हे सगळं करूनही थोडंसं suspense element...अंदाज खरा ठरेलंच असं नाही,  असा disclaimer  - म्हणजे ठोकताळा ! ...

    शाळा-कॉलेजमधे असतांना, तसे आमचे बरेच  संकेत असायचे.   ईश्वरी संकेत  नव्हे,  निसर्ग संकेत !  उदा. अमरावतीला पाण्याची चणचण, रुक्ष जमीन.  तिथे आमच्या आवारात एक शेवग्याचं झाड होतं , त्याला डिसेम्बर मधे फुलं यायची.   शेवग्याला फुलं यायला लागली, की आपला अभ्यासाचा मौसम आला, असा परीक्षेचा संकेत !    तेव्हा शाळा-कॉलेजात सतत अभ्यास नसायचा !   डिसेम्बर संपता संपता सुरु केलेला अभ्यास, परीक्षेत पास व्हायला पुरेसा असायचा !   आजकाल इथे बंगलोरमधे पहाते तर १२ महिने शेवग्याला फुलं ... !   तरीच आजकाल शाळेतली छोटी छोटी मुलंही इतकी पिसली जातात, अभ्यास आणि दप्तराच्या ओझ्याखाली ... 

    गम्मत जाऊ द्या, पण हे ठोकताळे खूप महत्वाचे आहेत !   थोडक्यात, नुसतं थोडं ध्यान देऊन गोष्टी पाहील्या, केल्या तर खूप काही सांगून जातात.  त्या  पहाणारा मात्र पाहिजे.   पूर्वीच्या काळी आपल्या जवळ खूप ज्ञान-विज्ञान, माहिती ... सगळं होतं, असं लोक म्हणतात.   मग ते सगळं कुठे गेलं ? ..तर , ते जळून गेलं ... इतिहास वाचा... शहाबुद्दीन घोरी सारख्या लोकांनी त्याचा स्वतःला उपयोग करून घेतल्यावर, काय केलं ... तर ते ज्ञान अक्षरशः जाळून टाकलं ... तक्षशिला, नालंदा सारखी विद्यापीठं उभी जाळली ... राहिली ती फक्त राख, काही लहानसे पुरावे, आणि थोडं ज्ञान ... ठोकताळ्यांच्या स्वरूपात ... 

    आपले पूर्वज खूप हुशार होते.   सर्वांना एवढं ज्ञान एका आयुष्यात आत्मसात करणं जमणार नाही म्हणून त्यांनी  'घागर में सागर'  स्वरूपात ठेवलं .   ज्या गोष्टी लोककल्याण, समाजव्यवस्था, तब्येती- health, general well-being साठी चांगल्या आहेत त्यांना थोड्याफार rituals मधे गोवून टाकलं.   कर्मकांड म्हणजे तरी काय - पिढ्यानपिढ्या खूप पक्क्या झालेल्या सवयी !   त्यात हे सगळं आवश्यक ज्ञान भरून टाकलं ... एखाद्या capsule मधे औषध भरावं तसं, आणि आपल्याला दिलं ... की जेणेकरून ते आपसूकच केलं जाईल !   वसंत ऋतु आला की आमराईत जायचं, श्रावणात पानाफुलांचं स्वागत, नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा, दसरा दिवाळीला सुगीचं स्वागत, आणि नवीन पेरणी, संक्रांतीला पुन्हा harvest, सुगी, नवान्न पौर्णिमा, ... असे सणच आखून दिले.   ह्यात काही संकेत ही होते ... कसे ते सांगते ...

    गोष्ट खूप मागे जाते ... हजारो वर्षं ... बलरामाने जमीन कशी नांगरायची हे शिकवलं ... लोक मिळेल ते खात,गवताळ प्रदेशाच्या शोधात भटकत न राहता,  स्वतः शेती करून, धान्य पेरून उगवून, त्यावर उदरनिर्वाह करु लागले ... तेव्हा थोडीफार भविष्याची चिंता किंवा थोडेफार कयास बांधायला लागले ... शेतीच्या दृष्टीने भविष्यकाळ कसा असेल हे पाहण्याची जरूर भासली ... आणि ठोकताळे बांधण्याची सवय लागली ... ही सगळी प्रस्तावना लिहिण्याचं कारण ...

    ... म्हणजे आता जवळ आलेली रथसप्तमी ... हा सण !   संक्रांतीला धान्य घरात घेतल्यावर वेध लागतात - नव्हे वारे वाहू लागतात ते रथसप्तमीचे - म्हणजे भविष्याचे !   कसं असेल पुढचं वर्ष ... सुबत्ता असेल ना ... असं !   आणि त्याचा संबंध आहे आपल्या जुन्या काळच्या पद्धतीचा ...

    माझा थोडा संबंध आला ह्या सगळ्या जुन्या पद्धतीशी , तो आजीकडे लहानाची मोठी झाल्यामुळे ... रथसप्तमीला घरी गडबड असायची ... आजी आधल्या दिवशी घराच्या मोठ्या आवारात-अंगणात, बरीच मोकळी जागा - जी वर्षानुवर्षे ठरलेली होती - आजूबाजूला झाडं नाहीत, मोकळं आकाश दिसेल अशा ठिकाणी कामकऱ्यांकडून छान झाडून, सारवून, लहानशी चूल बांधून लिंपून घ्यायची .   मग रथसप्तमीच्या दिवशी ती चूल फक्त गोवऱ्यांनी नीट सारखी भरून, त्यात थोडं वाळलेलं गवत वगैरे घालून ठेवायचं.   मग व्यवस्थित रांगोळी काढून, सूर्यनारायणाची पूजा करून, ओवाळून, एका छोट्या मातीच्या घड्यात निरसं दूध घेऊन ते त्या चुलीवर ठेवायची.   चूल पेटली की सगळे जण काही अंतरावर बसून बघायचे ... आपण चुलीला वारा वगैरे घालायचा नाही, फुंकणी तर अजिबात नाही !   चूल व्यवस्थित पेटायची, आणि दूध वरवर यायचं ... आणि उतू जायचं ... त्याला थांबवायचं नाही ... !    दूध ज्या दिशेला उतू जाईल, तो घडा ज्या दिशेला कलंडेल , त्या दिशेला सुबत्ता येणार  !!! ... आणि मग आनंदात सगळेजण आपापल्या कामाला लागायचे !

    मी आजीआजोबांच्या मागे लागायची ... सुबत्ता म्हणजे काय ?   तुम्हाला कसं कळलं की तिकडे  'सुबत्ता'  येणार ?    आजी म्हणायची सांगते ... मग आजीआजोबांबरोबर रेवडी, तिळगुळाचा second round  खात मी गोष्टींचं विश्लेषण ऐकायची ... जुन्या काळी सर्व शेती ही   हवामान, पाऊस, वारे ह्यावर अवलंबून असायची.  हवामान हे वारे कुठून कसे वहातात, त्याबरोबर येणारे pollen, हवेतली humidity - बाष्प, त्यावर शेतीचं सगळं गणित असायचं.   त्याची झलक ही रथसप्तमी.   उत्तरायण सुरु झाल्यावर, हवा गरम व्हायला लागते, आणि त्यासुमारास वारेही सुरु होतात.   उत्तरेकडून आणि पश्चिमेकडून येणारे वारे हे मुख्य.    तर घरी अंगणात मोकळ्या जागी, वाऱ्याला झाडांची आडकाठी येणार नाही, तो मुक्तपणे वाहू शकेल  अशा अशा ठिकाणी चूल बांधायची.   त्यात गोवऱ्यांचंच इंधन, पटकन जळणारं, त्यावर लहानश्या घड्यात दूध ... वारे ज्या दिशेने येतील त्याप्रमाणे पेटलेल्या गोवऱ्यांच्या ज्वाळा सरकणार, साहजिकच घड्याच्या तिथल्या भागाला जास्त उष्णता लागणार, घडा तिकडे कलंडणार, आणि त्या दिशेला दूध उतू जाणार, म्हणजे त्या दिशेला पीक चांगलं येणार, सुबत्ता येणार !   ... असा हा सगळा प्रपंच ... ज्यांना टीका करायची असेल, त्यांना हा बादरायण संबंध लावला असं वाटेल, पण जर प्रत्येक aspect चा नीट विचार केला, तर त्यातले बारकावे आणि त्यांचे inference लक्षांत येतील !   हे हजारो वर्ष चालत आलेलं ज्ञान - आणि त्याचे ठोकताळे !   

    अजून एक-दोन गमती सांगते ... पाऊस-पाणी-शेती यावर अवलंबून असलेला देश म्हटल्यावर पेरणीसाठी कोणती वेळ, कोणता महिना, पावसाच्या किती आधी नांगरणी, आणि त्यानंतर केव्हा पेरणी ... हे मुख्य आणि ह्याचा आधार पंचांग ... !     पंचांग फक्त लग्न-मुंजीचे मुहूर्त काढायला, किंवा वधूवरांच्या पत्रिका जुळवायला नसतं ... ज्योतिष शास्त्र आणि फलज्योतिष ही दोन विरुद्ध टोकं आहेत पंचांगाची  !  तर ज्योतिष शास्त्र हे पाऊसपाण्याबद्दल ही सांगतं, पावसाची नक्षत्रं कोणती ही माहिती असतेच, पण त्या नक्षत्रावर पाऊस येणार का नाही, किंवा कसा येणार हे ही पंचांग सांगतं.   आता आपण वाचतो की शास्त्रज्ञांना हवामान सांगायला ४० parameters चा विचार करावा लागतो, अनेक weather models लागतात, कॉम्प्युटर्स ची मदतही घेतात आणि एवढं सगळं करूनही ते forecast म्हणजे prediction च असतं.   ह्याउलट आपलं पंचांग ही सगळी माहिती एकत्र करून आपल्याला एका शब्दात हे ज्ञान देतं .     सूर्याचा पावसाच्या नक्षत्रात प्रवेश होतो, तेव्हा त्याचं वाहन काय आहे हे ... कोणता प्राणी आहे, हे पहायचं.   पाणी आवडणारा प्राणी असेल तर भरपूर पाऊस येणार, नाहीतर नाही किंवा कमी प्रमाणात !  ४०च्या वर parameters एका शब्दात !

    पण फक्त आपणच हे ठोकताळे बांधतो.   प्राणी आणि पक्षांना हे ज्ञान उपजतच असतं.    कदाचित आपली उत्क्रांती होत असतांना स्वत्वाची  जाणीव, वाणी, भाषा, भावना, हसणं, empathy आणि हुशारी हे करता करता काही नैसर्गिक शक्ती आपण गमावून बसलो.   कोकणात एक पक्षी - गूगलवर नाव सापडेल - दर वर्षी पावसाच्या आधी उंच झाडावर घरटे बांधतो ... जमिनीपासून १८ फुटावर बांधलं तर दुष्काळ, २०-२१ फुटावर बांधलं तर normal monsoon आणि २४ फुटावर बांधलं तर अतिवृष्टी !   हा हमखास बरोबर ठरणारा ठोकताळा ... कारण हा पक्षी पावसाळ्याच्या महिनाभर आधी पावसाचा अंदाज बांधतो . त्याची पिल्लं अंड्याबाहेर आल्यावर त्यांची सुरक्षा, त्यांना अन्न म्हणून कीटक, ह्या सगळ्याचा विचार करण्याची क्षमता  तो ठेवून आहे ! 

    सांगायचा मतलब, आपले rituals - कर्मकांड, प्रथा ह्यात बराच अर्थ दडलेला आहे ... त्याचा आपण आदर करतोच ... नव्या पिढ्यांनी ही केला पाहिजे ... उगीच अंधश्रद्धा, देवदेव करणे  , थोतांड आहे ...अशी नावं ठेवत ,  हे सगळं delete नको करायला ... त्यापेक्षा थोडा शांतपणे सखोल विचार केला पाहीजे ... meditation पण होईल आणि थोडा प्रकाश ही पडेल ... !     


- सौ अलका कुंटे,  बंगलोर 

+ ९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. अगदी खरय ! आपले पंचांगातील हे ठोकताळे stastistical methods वरच अवलंबून आहेत ! अमुक एका नक्षत्रावर अशी ग्रहस्थिती असताना हजारो वर्ष गोळा केलेला डेटा सांगतो की पाऊस पडण्याची शक्यता आहे ! पत्रिकेत अमुक इतके गुण जमले तर....... Based in statistics !

    ReplyDelete
    Replies
    1. हो , खरंच . Thanks a lot !

      Delete
  2. आपल्या भारतीय पारंपारिक प्रथा ह्या अशा शास्त्रीय ज्ञानावर आधारित आहेत.आज जगात सगळीकडे त्याचा अभ्यास चालू आहे.हे ठोकताळे आमचं भारताचं वैभव आहे.आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना ! आपलं ते सगळं जुनाट , अर्थहीन हा समज घालवला पाहीजे . खूप कठीण आहे , पण आपापल्या परीने केलं पाहीजे .

      Delete
  3. फारच छान. तुझा शब्द कोश , मांडणी व सादरीकरण उत्तम.

    ReplyDelete
    Replies
    1. अलकाचे चणे कुरमुरे

      ठोकताळे

      एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान करणे म्हणजे ठोकताळा असं म्हणता येईल. ठोकताळे हे परंपरागत अनुभवातून आलेले असतात. पूर्वजांनी अभ्यास केला होता त्या मुळे बरेचदा या ठोकताळ्यांची प्रचिती येत असते. म्हणूनच सर्वसामान्य जनांना पटकन कळावं म्हणून त्याची सांगड पुराणाशी घातलेली दिसते.

      ह्या मागचं विज्ञान गेलं कुठं, हे लिहिताना तू घोरीने तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठ जाळून इतिहास नष्ट केला असं लिहिलं आहेस. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आक्रमणकर्त्या जर्मनीने त्या त्या देशातली वाचनालय जाळून टाकली आणि इतिहास पुसायचा प्रयत्न केला.अगदी अलीकडे पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये अशीच नासधूस केली गेली . हिटलरचं म्हणणं असे की भूगोल घडवायचा असेल तर इतिहास नष्ट केला पाहिजे. असं असलं तरी मौखिक रित्या हे विज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिले आणि म्हणून हे ज्ञान थोड्याफार प्रमाणात ठोकताळ्याच्या रूपात अस्तित्वात राहीले.

      रथसप्तमीला तुझी आजी खुल्या अंगणात चुलीवर दूध ठेऊन ते ज्या दिशेला उतू जाऊन कलंडेल तिकडे सुबत्ता येणार असा ठोकताळा सांगायची असे वाचल्यावर मला भेंडवळची घटमांडणी आठवली. ही बुलढाणा जिल्ह्यातील ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे, ज्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पूर्णा नदीकाठी घट मांडून पाऊस, पीक आणि देशाच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीबद्दलचे भाकीत वर्तवले जाते; या परंपरेत एका विशिष्ट विधीद्वारे मातीचे घट, धान्य आणि इतर वस्तू ठेवून हवामानाचा अंदाज लावला जातो आणि यांनी केलेले भविष्य बऱ्याच वेळा खरं ठरते म्हणून ही भाकणूक ऐकायला श्रद्धेने लोक येतात.

      सोशल मीडियावर बहावा फुलला की नंतर साठ दिवसांनी पावसाळा येतो अश्या पोस्ट येत असतात हे सुद्धा अनुभवातून आलेले ठोकताळेच आहेत ना. सांगलीतले लोक पूर्वेला असलेल्या दंडोबाच्या डोंगराच्या दिशेने काळे ढग आले की सांगलीत पाऊस पडणार असं सांगायचे आणि हमखास पाऊस यायचा . देवाला कौल लावायची मानसिकता देखील अशाच ठोकताळ्यातून आली असेल ना.

      पापणी फडफडणे मग ती डाव्या का उजव्या डोळ्याची यावर बऱ्या वाईटाचा अंदाज बांधणे असो की पालीचे चुकचुकणे असो,हे सारे पिढ्यानपिढ्या ऐकलेल्या गोष्टींमधूनच आले आहे ना.

      अंगणात कावळा ओरडतो आणि त्यातून पाहुण्याच्या येण्याची वर्दी देतो हा ठोकताळा फक्त आपणच नाही तर ज्ञानेश्वर माउली सुद्धा मानतात म्हणून त्यांनी सुद्धा लिहिले,

      पैल तो गे काऊ कोकताहे
      शकुन गे माये सांगताहे

      प्रसाद जोग.

      Delete
    2. धन्यवाद , प्रसाद ! एखाद्या विधी - पूजा या मागचं तत्व , कारण समजून घेतलं पाहीजे . त्याला नक्कीच अर्थ असतो ! नवीन पिढीला समजावून सांगितलं पाहीजे .

      Delete
  4. ‘ ठोकताळे ‘ या blog वर दोन भिन्न पातळींवर बोलता येईल.
    माझे विचार मांडतो :
    १) *लेखावर* ! लेख , blog तर उत्तमच रांधला आहे. एका शब्दावर इतकं रचता येतं अन ते अतिशय वाचनिय असू शकतं याबद्दल शाब्बासकी !

    २) ठोकताळे हा बराचसा ग्रे एरिया आहे.
    माझ्या अल्पमतिनुसार एखाद्या ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार मांडलेल्या हिशोबास ताळेबंद / टाळेबंद म्हणतात. यातला ताळे हा अक्षरसमुह घेऊन अंदाजे ठोकलेला विचार - ठोक- यांस तो जोडला की ठोकताळे.
    म्हणजेच ठोकताळे हे subjective - व्यक्तिनिष्ठ , अंदाजे किंवा भावनात्मक असू शकतात.
    ताळेबंद सारखे objective किंवा वस्तुनिष्ठ नाहीत.

    मी स्वतः वस्तुनिष्ठ - ऑब्जेक्टिव असण्याचा आग्रह धरतो कारण त्यात अचूकता असते अथवा अचूकता जास्त असते इतकेच.
    पण मग मनुष्यप्राण्याला यंत्र केल्यासारखंच होईल नाही का ! व्यक्तिनिष्ठ कल्पना ( ठोकताळे ) आहेत म्हणून तर कविता आहेत , शायरी आहे , रोमांच आहेत.
    सगळंच जर टाळेबंदात मांडल तर चौकटीच्या बाहेर डोकावता येणार नाही ‘ हे सुरांनो चंद्र व्हा ‘ म्हणता येणार नाही , कल्पनेची झेप घेता येणार नाही , जीवनातल्या लहानसहान गोष्टींचा आनंदच नाहीसा होईल.
    So in the final analysis ठोकताळे मांडत रहावे चुकलेत तर आपटी खावी अन बरोबर निघालेत तर हुर्यो करत नाचावे.
    - अरविंद आपटे , नाशिक.

    ReplyDelete
  5. सौ. कुंटेंनी ठोकताळे हा विषय समाजात परंपरागत रूढ झालेल्या पातळीवर बेतला आहे तर मी ह्या शब्दावर एका व्यक्ती पुरता विस्तार केलाय.
    -डॉ. अरविंद आपटे

    ReplyDelete
    Replies
    1. छान मत मांडलं आहेस !! ठोकताळे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ नाहीत . उलट , अनेक लोकांचे , अनेक पिढ्यांचे , अनुभव , विचार यावरुन मांडलेला अंदाज म्हणजे ठोकताळे !!

      Delete
    2. धन्यवाद , अरविंद !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Alice in Wonderland

Alice in Wonderland - 2