या या भुलाबाई...

   बघता बघता नवरात्र संपत आलं, दसरा आला  दोन दिवसांवर ... आणि कोजागिरी पौर्णिमेचे वारे वाहू लागले ... पण त्याच्या आधीच ललिता पंचमी पासून अजून एक मस्त उत्सव सुरूही झालाय ... 

    मुलींचा हादगा ... कोणी भोंडला म्हणतात ... आमच्या तिकडे, म्हणजे विदर्भात ... भुलाबाई !    तोच सण ... खास करून मुलींचा ... गाणीही थोड्याफार फरकानी तीच, आणि मुलींचा उत्साह ही तोच ... अफाट ... घट बसल्यापासूनच मुलींचे plans सुरू ... खुसुखुसु करत ... "ए, माझ्याकडे एक दिवस हं"...    "थांब, आधी पहिला दिवस माझ्याकडे" ... " हो, आम्हाला नकोच आहे ...पहिल्या दिवशी खिरापत काय ...सोपी असते ओळखायला" ... "ए, नको मग माझ्याकडे ... कुण्णा कुण्णाला ओळखता येणार नाही अशी मी आईला सांगणार आहे करायला ... !"...

     तर ललिता पंचमी पासून संध्याकाळी मैत्रिणींकडे,  शेजारी पाजारी जाणे ... भुलोजी - भुलाबाईच्या मातीच्या मूर्ती आणून त्या फुलांनी सजवणे, रांगोळ्या काढणे आणि मग गाणी ... गाणी म्हणणे, खिरापत ओळखणे ... रोज एक गाणं जास्त म्हणायचं !

तेव्हा हस्त नक्षत्र असतं , म्हणून , हादगा - भोंडल्यात  हत्तीचं महत्व !!    मधे हत्तीचं चित्र ठेवून त्याच्या भोवती फेर ... आणि खाली ठिपके काढून ठेवायचे ... किती गाणी म्हणायची तितके ... एकेक गाणं झालं की एक एक ठिपका पुसायचा ... ! तो पुसायला ही धावपळ , कोण पुसणार आधी धावत जाऊन ...!

    आमच्या भुलाबाईची गोष्ट किती सुंदर आहे !  तर,  सतीच्या मृत्यूनंतर शिवशंकर अती दुःखात होते.   ते ध्यान करत बसले ... अनेक तपं उलटली ... सतीने हिमालयाची मुलगी  'पार्वती'  असा जन्म घेतला.   मनात एकच ध्यास  की शंकर भगवान हाच नवरा.   मग ती ते ध्यानस्थ बसले होते तिथे पोहोचली ... जवळच एक आदिवासींचा पाडा-वसाहत होती ... तिथे शिवाच्या आश्रमाजवळ झोपडी बांधून राहिली.   त्या आदिवासींना आपलं नाव भुलाबाई - कोणी फुलाबाई असं म्हणतात - असं सांगितलं, आणि हे माझे पतीदेव भुलोजी ... माझ्यावर रागावले आहेत , असं सांगून त्या लोकांमधली एक होऊन राहिली.   तिथे सगळ्यांची लाडकी-माहेरवाशीण झाली, आणि मग सगळी गाणी तिच्याबद्दल ... आणि तिच्या वयाच्या मुलींबद्दल ... आणि त्यांची दुःखं, त्रास, संसारातले रुसवे-फुगवे हे गाण्यातून सहज मांडायचं ... मन मोकळं करून टाकायचं ... ते ही हसत हसत ... सगळ्यांचं तेच आहे हे पाहून ... आपण एकट्याच नाही आहोत , ही भावना  ते सगळं सुसह्य करत असावी....

    गाणी ही किती सुरेख ... सहज सुचलेली ... कधी कधी मोड-तोड-जोड केलेली  !    ऐलम्मा पैलम्मा ते आड बाई अडोणी हा प्रवास ... नुसती आठवण झाली, तरी हसू येतं चेहेऱ्यावर ... विवेक म्हणतो, "काय हसते आहेस - एकटीच" ... त्यावर एकच उत्तर ... तुला नाही कळणार ... !
    "ऐलम्मा - पैलम्मा.. गणेशदेवा ... 
     माझा खेळ मांडू दे ... करीन तुझी सेवा ... ! "        एकदा का जम बसला की मग रोज एकच काय, फेर धरायला हवी तेवढी गाणी ... 
   अक्कण माती चिक्कण माती ... खळगा तो खणावा ... अस्सा खळगा सुरेख बाई ... जातं ते रोवावं..."
      की सगळं नीट, छान छान करायचं, व्यवस्थित करायचं, आणि सुंदर करंज्या झाल्या की आईला आधी दाखवायच्या !    ... कारण ... 
     अस्सं  माहेर सुरेख बाई ... !    आणि  
      अस्सं सासर द्वाड बाई ... !  
    आणि मग हसण्याचा एक राऊंड !    कारल्याच्या वेलाचं  गाणं ही तसंच ... त्यात नेहेमीचंच..… आधी हे उरक, मग बघू ... मग ते कर, मग बघू ... असं करत सुनेचं माहेरी जाणं पुढे पुढे ढकलत जायचं ! शक्यतोवर जाऊ द्यायचं नाही !!!  पण,  आता ही आपण आपल्या स्वतःला तेच करतो ... एवढं होऊन जाऊ दे, मग बघू, मुलांची शिक्षण होऊन जाऊ दे, मग जाऊ महाबळेश्वरला,   मुलाचं लग्न होऊन जाऊ दे, मग जाऊ केरळला,  एवढं मुलीचं बाळंतपण होऊन जाऊ दे ,मग जाऊ यूरोपला ... एक काम संपलं की दुसरं हजर !  जाणं पुढे पुढे ढकलत रहायचं .... असो.

     त्याच्या पुढचं गाणं म्हणजे ...  
 " अरडी गं बाई परडी गं ...  परडी एवढं फूल गं ...
    दारी 'मूळ' कोण गं ... "    'मूळ' म्हणजे बोलावणं ... काही मुली 'मूल' म्हणायच्या, पण ते चूक आहे ... असो 'मूळ' सासरचं कोणी असेल, तर त्यानं काय आणलंय ... कंबरपट्टा ! ... 
    "कंबरपट्टा मी घेत नाही, सांगा मी येत नाही ... 
    झिपरं कुत्रं सोडा गं बाई,  सोडा गं बाई ..
    चारी दरवाजे लावा गं बाई , लावा गं बाई ... ! "      किती हा रुसवा ... आणि मग नवरा आला की ... लगेच ... "झिपरं कुत्रं बांधा गं बाई  , बांधा गं बाई... 
चारी दरवाजे उघडा गं बाई  , उघडा गं बाई... !"
       जुन्या काळच्या रहाणीचं पण केवढं वर्णन गाण्यांमध्ये !   दागदागिन्यांनी सजलेल्या मुली बाळी सुना, त्यांचं वर्णन - भुलाबाईही नटलेली ...
फुलांच्या दागिन्यांनी आणि सोन्याच्याही ... गाण्यातली सोन्याने मढलेली आणि  मातीच्या बाहुल्यांची भुलाबाई गुलबाक्षीच्या फुलांनी !...  
        या या भुलाबाई , आमच्या दारी , 
        तुमच्या अंगावर हिरवी साडी , 
        हिरव्या साडीवर बसला मोर , 
         भुलोजी चोर घरी नाही , घरी नाही .!!...
   अशी मग यमकं जुळवत जायचं ....
   एकेक दाणा पेरत जाऊ,  माळीयाच्या दारी..
 हळूच भुलाबाई , पाय टेका  , तोरड्या तुमच्या भारी ...
        तर कुठे , 
              नणंदा भावजया दोघी जणी...
               घरात नव्हतं दुसरं कोणी....
    अजून एक छान गाणं ... 
             काळी चंद्रकळा नेसु कशी....
             गळ्यात हार घालू कशी ..
     काळी पैठणी नेसून ती मुलगी दिडकीचं तेल आणायला जाते ... आणि इतकं तेल येतं की घरादाराला पुरून उरतं ... आणि सांडलेल्या तेलाचा ओघळ वेशी पर्यंत ... !   आणि वर अन्याय झाला म्हणून मनातली सुप्त इच्छा  ...        
      "दूधभात जेवायला वाढा, 
       आमचं उष्टं तुम्हीच काढा" ... !
इतरही गाणी  ,थोडंसं समाज प्रबोधन -
 शिवाजी आमुचा राणा ... 
 श्रीकांता कमलाकांता...
कृष्ण घालितो लोळण ...
       अडकीत जाऊ खिडकीत जाऊ ...
        खिडकीत होता बत्ता ....
         भूलोजीला लेक झाला , नाव ठेवा ....
 ...   गाण्यांना अंतच नाही...अजूनही आठवतात .... पुस्तकातल्या कविता मात्र सपाट ...! असो ...
    ह्या उत्सवाचं उद्यापन कोजागिरीला !  दहा दिवस रोज गाणी झाल्यावर एक-दोन जणी खिरापत आणायच्या, आणि मग बाकीच्यांनी त्या ओळखायच्या आणि गट्टम !   उद्यापनासाठी कोजागिरीला संध्याकाळी जमायचो आम्ही मैत्रिणी आणि त्यांच्या आया !    मग काय जेवणच ... पुरी भाजी, शिरा, बासुंदी ... पण त्या आधी ... एक लिंबू झेलू बाई ... हे गाणं झालं पाहिजे.         मग  .. आड बाई आडोणी,
                आडाचं पाणी काढोणी,
                 आडात पडला शिंपला,
                  आमचा हादगा संपला !
खिरापतींचं जेवण झालं की जड मनानी सगळ्या जणी घरी परत जात असू ... घरी गेल्यावर अश्विनी पौणिमेचं ओवाळणं, नंतर घरातल्यांबरोबर गच्चीवर चांदण्यात बसून दूध पिणं... ते ही कसं, तर दुधाच्या पातेल्यात थोडा वेळ तरी चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे !    लक्ष्मीला,  चंद्राला नमस्कार करून मग ते प्यायचं ... पण तरी भुलबाईचीच गाणी मनात चालू असायची ..!. 
      एक अगदी latest मजा ..! जुन्या गाण्यांमध्ये त्या वेळचं जीवन , रहाणीमान दिसायचं , असं मी म्हंटलं ...मागच्याच आठवड्यात भारती नी एक गाणं पाठवलं ... वाचता वाचता त्याची लय , ताल ,चाल समजत गेली ...भोंडल्याचं नवीन काळातलं गाणं ....!!!
    ...  एक खड्डा टाळू बाई , दुसरा खड्डा टाळू ...
........माझी हसून हसून पुरेवाट ....!!!!
       

- सौ अलका कुंटे, बंगलोर
  +९1 ८७६२३ १६३८५

Comments

  1. अलकाचे चणे कुरमुरे

    या या भुलाबाई

    माझ्या लहानपणी  आमच्या जोगेश्वरी निवासात सगळी जोग मंडळी राहायचो. वेगवेगळ्या वयाची सख्खी / चुलत भावंडं होतो.नवरात्र सुरु झालं की आमच्या घरी हादगा असायचा त्यात बहिणी आणि सगळ्या काकवा हिरीरीने भाग घ्यायच्या. माझ्या आठवणीत आईने काळ्या कापडाचा पाठीवर भरजरी झूल असलेला हत्ती शिवला होता आणि त्यात लाकडाचा भुस्सा भरला होता. हा हत्ती पाटावर ठेवलेला असायचा आणि घरातल्या मुली आणि त्यांच्या सगळ्या बालसख्या जमल्या की फेर धरून सुरु व्हायचा हादगा.

    आता सराफी दुकान बघणारा माझा भाऊ जरा वात्रट होता.काही पोरी त्याच्या मागे हळूच खिरापत सांग म्हणून मागे लागायच्या. तो त्यांना भलतीच नाव सांगायचा.

    अलकाच्या आजच्या लेखामुळे  पंचावन्न साठ वर्षांपूर्वीच्या घटना पुन्हा तपशीलांसकट आठवली आणि आठवले गोविंद बल्लाळ देवल यांनी शरद नाटकासाठी लिहिलेले गाणं .

    बाळपणीचा काळ सुखाचा, आठवतो घडी घडी
    तशी नये फिरून कधी घडी

    किती हौसेने टाकिली असती त्यात मागुती उडी
    परी दुबळी मानव कुडी
    मनी नव्हती कशाची चिंता
    आनंद अखंडित होता
    आक्रोश करण्यापुरता
    जे ब्रह्म काये ते मायबाप ही जोडी
    खेळात काय ती गोडी

    लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा असा एक अभंग संत तुकोबारायांनी लिहिला आहे आणि नाट्कार बाळ कोल्हटकरांची देखील एक कविता आहे त्यात ते म्हणतात

    बालपणीचे दिवस सुखाचे
    आठवती घडी घडी
    आठवणींना आठवणींची
    वाहतो ही दुर्वांची जुडी..

    बालपणीचे सखेसोबती
    आठवणींना अजून झोंबती
    कोणी सज्जन कोणी दुर्जन
    तरुण कोणी, कोणी वृद्ध पण
    या सर्वांनी जशी घडवली
    तशीच घडली आयुष्याची घडी
    वाहतो ही दुर्वांची जुडी !!

    ते अगदी खरं आहे नाहीतर आयुष्याची जवळपास ५० वर्ष बंगळुरूमध्ये राहूनही बालपणीच्या विदर्भातल्या त्या आठवणीत अलका रमून गेली नसती

    धन्य त्या परमेश्वराची ज्यानी आपल्या डोक्यात अमर्याद स्टोरेज कपॅसिटी असलेली  मेंदूरूपी हार्डडिस्क बसवली आहे त्या मुळे एका क्लिक सरशी ती माहिती लगेच पॉप अप होते .


    प्रसाद जोग.सांगली.
    ९४२२०४११५०

    ReplyDelete
  2. Thank you , प्रसाद ! खरंच लहानपणात रमायला खूप छान वाटतं ...कशाची काळजी नाही , जबाबदारी नाही , मनमोकळं जगता येतं ... !!! सुंदर आठवणी !!!

    ReplyDelete
    Replies
    1. Why do some people grow up ? 🤔

      Delete
    2. 'Cause they think they sre old !...

      Delete
  3. 🤗 👌 - A. G. Apte.

    ReplyDelete
  4. Thank you , अरविंदा !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Alice in Wonderland

Alice in Wonderland - 2