Black is beautiful


    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !    मागच्या वर्षातले ups and downs, सुखदुःखं,  सगळं संभाळत नवीन वर्षाचं स्वागत !!!    कारण, काळ थांबत नाही, तुमचं काय झालं याची त्याला पर्वाही नाही.  असो !

    तर, नवीन वर्ष, नवीन पान उलटलं नव्या कॅलेण्डरचं.    मागचे सहा महिने काही ना काही कारणाने काहीच लिहिणं झालं नाही.   काही सुचतही नव्हतं ... writer's block वगैरे यायला, आधी चांगला writer व्हायला पाहीजे ... पी हळद की हो गोरी ... असं ते नाही ... त्याकरता अजून बरंच लिहायला हवं ...

   हो गोरी ... गोऱ्या रंगावरून सुचलं,  आज  black is beautiful  हाच विषय घेऊन पांढऱ्यावर काळं करायचं ... तशी पण  आता संक्रांत अगदी तोंडावर आली आहे ... तिला काळा सण  असं ही म्हणतात ... 

    तर विचार करत होते ... काळा आणि सण ... हा विरोधाभास आहे ... त्याचा अर्थ काय ?   ह्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे ... काळ्या रंगाचा किंवा कोणत्याही रंगाचा विचार केला तर त्याला काहीतरी अर्थ नक्कीच असतो, आहे ... त्या त्या रंगाबरोबर जोडल्या गेलेल्या गोष्टी, प्रतीकं, संदर्भ... मग काळ्या रंगावर इतका राग का ?   अगदी जागतिक पातळीवर काळ्या-गोऱ्याचा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच, जो आजही चालूच आहे ... आणि त्यातून मार्ग निघतोय म्हणता म्हणता, आपण परत तिथेच पोहोचतो आहोत... 

    मानसशास्त्र काय किंवा मानववंशशास्त्र  किंवा तत्सम कोणतंही शास्त्र काय सांगतं ? ...विचार करायला हवा ... हे काळ्या रंगाचं भय फक्त माणूसच नाही , तर इतर प्राणीमात्रांच्याही सायकॉलॉजी पर्यंत जातं !  `उत्क्रांती होत असतांना , 'self awareness' च्या आधी प्राण्यांना सभोवतालची जाणीव होऊ लागली असणार,   Safety आणि survival , आपला वंश चालू ठेवणं वगैरे साठी. तसा सूर्योदयापासून दिवस तर ठीक असतो, पण रात्र झाली की केवळ आजूबाजूचं काही न दिसल्यामुळे नक्कीच भीती वाटली असणार ... आत्ता सगळं दिसतंय आणि तासा दोन तासांत मिट्ट काळोख ... सगळं जग चिडीचूप ... नुसता बारीकसा आवाज ... तो पण नक्की कुठून येतोय ते कळायला मार्ग नाही ... माझ्या मते म्हणून काळा रंग हा 'न दिसणे'  ह्याच्याशी जोडला गेला असणार, म्हणून काळ्याची भीती बसली !   ... खरं खोटं शास्त्र जाणे ... आणि एकदा आपण एका गोष्टीबद्दल मत केलं की आपण तीच theory सगळीकडे लावतो ,असं होत असावं !

    आपल्याकडे केशरी रंग सुख, आनंद, आध्यात्मिक उन्नती ... तर हिरवा रंग म्हणजे सुबत्ता वगैरे आपण शाळेपासून शिकतोय,  निळा रंग म्हणजे आकाश, पिवळा रंग म्हणजे उल्हास, आनंद, सूर्यप्रकाश ... गुलाबी तर सगळ्या जगाचा आवडता !   लाल रंग  म्हणजे शौर्य, त्याग !   आजकाल चॉकलेट ब्राऊन म्हणजे तर आनंद ... तो ही अगदी डोळे मिटून, गोड चव enjoy करत ... !!    प्रत्येक रंगाला कोणत्या ना कोणत्या तरी सणात प्राधान्य आहेच.   आणि रंगपंचमी तर सर्व रंगांचा उत्सव ... ! 

    पण काळा रंग ?   नेहमीच negative रंगात रंगलेला ... बाळाला तीट लावतात ... काळीच ... पण ती काही बाळाचं बाळपण highlight करायला नव्हे, तर दृष्ट लागू नये म्हणून ... ती तीट पाहिली की सगळी   दृष्ट  त्या तिटीत absorb होऊन बाळ सुरक्षित !    डोळ्यात काजळ ... ते ही  ... "इस डरसे कि पीकी नजर ना लगे ... झट नयनोंमें कजरा  लगा बैठी ! "... खरं तर काजळानी चेहरा जास्तच गोड दिसतो !   

    जिकडे तिकडे काळ्या-गोऱ्या चा संघर्ष ... लग्नाच्या वेळी  'गोरी, हजार गुण चोरी'  ... हे तर दिसतंच !    एकाच घरातल्या दोन बहिणींच्या गोरेपणात एक-दोन shade चा फरक असला की लगेच त्यातल्या त्यात काळ्या मुलीला निळा फ्रॉक आणि गोऱ्या मुलीला लाल-गुलाबी फ्रॉक.   मी स्वतः कधी निळ्या रंगाच्या टीम मधे होते, तर कधी लाल-गुलाबी टीम मधे ही होते ... ! 

    साधारण, कॉलेजमधे असतांना black is beautiful चा जमाना आला .   MissWorld मधे african मुली चमकू लागल्या.  ' काळं-सावळं ते smart'  असा विचार सुरु झाला, आणि हुश्श वाटलं ! ... तोपर्यंत आमच्या कुटुंबात मी निळ्या टीममधे गणली जायची ... मग Cleopatra आफ्रिकन होती आणि किती सुंदर होती हे LizTaylor नी सिद्ध केलं ... स्वतः गोरीपान असून !  आणि काळ्या रंगाला जरा बरे दिवस आले !

    आता आजकाल तेवढा  'वर्णभेद'  राहिला नसेल असं वाटतं.   कारण आपल्या एवढ्याश्या जगात बाकी ठिकाणी काय चालू आहे ह्याचा पत्ता आपल्याला नसतोच !   Whoopy Goldberg, Williams बहिणी, OprahWinfrey  आणि Naomi Campbell ह्या सगळ्यांनी सौन्दर्याची व्याख्याच बदलली आणि गुण -कौशल्य ह्यांनी गोरेपणावर मात केली आहे !  आता सगळ्या गोऱ्या सुंदर तरुणी, नट्या, मुली-बाळी ... सगळ्यांकडे पार्टीला जायला एक तरी LBD लागतोच ... Little Black Dress   !!!

    खरं म्हणजे , आपले देव राम , कृष्ण , विष्णू , विठोबा , हे सर्व काळे सावळेच , पण तरीही आपल्या पत्नीला बरं वाटावं म्हणून नामदेवांना तिचा रुसवा, दुःख, सल जावा म्हणून  " रात्र काळी, काजळ काळी, यमुना जळेही काळी  हो माय ..." हे गाणं लिहावं लागलं .  पण मग , संक्रांत हा सण काळ्याला कसा काय भाव देतो ?   संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला जातांनाही काळं घालतात.   एरवी कोणत्याही पूजेत काळं वर्ज्य असतं , मग संक्रांतीला कसं काय चालतं ?   ... असा विचार करून त्याच्यामागे लागले शोधायला ... ! 

    ... आणि खूप वेगळं काहीतरी सापडलं ... 
     संक्रांत हे एक पर्व, मकर संक्रमणाच्या निमित्ताने केलेला उत्सव . त्याच सुमाराला रब्बीची पिकं तयार होतात, म्हणजे सुगी-कापणीचा हंगाम.   सूर्याला , देवाला, भूमातेला, शेताला धन्यवाद देणे, थोडाफार जमेल तितका दानधर्म करणे, सर्वांना जमवून आपल्या घरचं काहीतरी देणे,  'सुघट' - सुगडं - सुंदर छोटे छोटे मटके -घडे बनवून घरचे गहू-भाज्या, धान्य देणे, असा हा आनंदाचा सण होता ... पिढ्यान पिढ्या ... ! !...
      पण त्याला दृष्ट लागली, किंवा काही चुका - घोडचुका झाल्या, नशीबं फिरली आणि मराठी साम्राज्याला एक फार मोठा तडाखा बसला ...  पानिपतचं तिसरं युद्ध ... मराठी सैन्याची धूळधाण झाली, सैन्याबरोबर गेलेल्यांची वाताहत-ससेहोलपट ... अत्याचार ... जे ही म्हणाल ते झालं ... अगदी राजापासून रंकापर्यंत सगळ्यांचे दिवस फिरले ... त्यानंतर मराठेशाही कधीच पूर्ववत झाली नाही ... त्या युद्धाला वर्ष झाली,  तरी त्या दुःखातून माणसं मनानी बाहेर पडत नव्हती ... दर घरात कोणीतरी पानिपतात गेलं होतं ...पण जगल्या -वाचलेल्या लोकांनी , सण-वार-कुळाचार तर केलेच पाहिजेत,  म्हणून करत होते , दुखवटा म्हणून काळं घालून ... म्हणून तेव्हापासून हा सण , काळा सण झाला ... तो सल अजून मनात आहे का नाही,  हे माहीत नाही, पण एक प्रतीक म्हणून काळा रंग मात्र संक्रांतीशी जोडला गेला.   ही मी वाचलेली आणि ऐकलेली गोष्ट ...आख्यायिका ही असू शकेल .... खरी खोटी माहीत नाही ... पण बुद्धीला पटणारी ... ! कारण ,दक्षिणेत संक्रांत किंवा तत्सम सण असतो , हळदीकुंकवं , वाण सगळं असतं ,  पण , मराठी लोक सोडले , तर कुठल्याही राज्यात  काळं नेसत नाहीत .आपली संक्रांत येते, तिचं वर्णन पंचांगात असतं .   ती मात्र दरवर्षी वेगळ्या रंगाची साडी नेसून येते, ... काळं कधी-मधीच नेसते !  'संक्रांत आली'  हा वाक्प्रचार पानिपतच्या   तिसऱ्या युद्धानंतरच आला,  मराठी स्वराज्यावर खरोखरच संक्रांत आली !   संक्रांत येते, तेव्हा ती ज्या दिशेकडे पहात येत असते, तिकडे दुष्काळ, दुःख असतं ... असं लिहिलेलं असतं !असो .

    हे झालं काळ्या रंगाबद्दलचं माझं मत ... आता झेब्रा म्हणजे काळ्यावर पांढरे पट्टे का पांढऱ्यावर काळे पट्टे ... अशी एक सुंदर गोष्ट आहे.   तसंच Fair आणि Black उर्फ Coloured  लोक ह्यावरही अनेक गोष्टी आपण WA वर ऐकतोच !   पण ह्या जगात काळा रंग आवडणारे ही खूप लोक आहेत, आणि मला ते खूप छान वाटतं.... कारण , मला काळा रंग आवडतो ...!! 
      एक मजा सांगते,  Ford गाड्यांचे निर्माते Henry Ford ह्यांना काळा रंग फार आवडत असे. त्यामुळे तेव्हा सगळ्या फोर्ड गाड्या काळ्याच असत.  एकदा Henry Ford ह्यांना कुणीतरी विचारलं की तुमच्या गाड्यांना दुसरा कोणता रंग का नाही, लोकांना रंगाचा choice का नाही ? त्यांच्या मनासारखा रंग असावा .   त्यावर त्यांनी उत्तर दिलं , " Yes, people can have any color ..... as long as it is black ..!! .…..
........Yes, black is beautiful  !!!...



- सौ  अलका कुंटे , बंगलोर 
   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. हो.... पानिपतच्या पराभवाचा सल अजुनही मराठी मनात आहेच ! कैक शतक उलटली तरी ती एक कधीच भरून न येणारी जखम आहेच ! आणि हा काळ्या सणाचा संदर्भ मी पण वाचला आहे !
    आणि कोणताही रंग असेना का , a thing of beauty is joy for ever !

    ReplyDelete
  2. Agree, black is beauty.

    ReplyDelete
  3. छान लिहिलंय !
    All colours look beautiful as long as they are black.
    - अरविंद आपटे.

    ReplyDelete
    Replies
    1. Ha ha , you are in good company ... Henry Ford !!

      Delete
  4. संक्रांत व काळी साडी सर्वश्रुत आहे. पण काळा शर्ट , पँट , धोतर ऐकलंय का ?
    या दिवशी साड्या नुसत्या काळ्या असून भागत नाही तर त्यावर सफेद ठिपके पण आवश्यक आहेत. मी कधीतरी ऐकलेलं आहे ते सांगतो.
    रात्री सर्वदूर बराचसा अंधार असतो.
    या दिवशी पहाटे अगदी अंधारात लवकर उठून सूर्य देवाची पूजा करत असत ( करायची असते ! कितीजण करतात ते देवास ठाऊक. ).
    बारकाईने बघितल्यास लक्षात येईल की हा सामाजिक सण म्हणून उरला आहे.
    आसमंताचा काळा रंग व आकाशातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्या लक्षात घेता त्यास मॅचिंग म्हणून पांढऱ्या ठिपक्यांची काळी साडी नेसून स्त्रिया पहाटेच्या अंधारात सूर्योदयाची वाट बघत. असा प्रघात होता. त्यातली पांढऱ्या ठिपक्यांची काळी साडी तेव्हडी प्रथा म्हणून उरली आहे.
    -अरविंद.

    ReplyDelete
    Replies
    1. हो , अगदी बरोबर ! 👍😊

      Delete
    2. हो , अगदी बरोबर !! 👍👌😊

      Delete



  5. अलकाचे चणे कुरमुरे

    Black is beautiful


    तुझा ब्लॅक इज ब्युटीफुल ब्लॉग वाचल्यावर बुद्धिबळातल्या घोड्यासारखे आठ ठिकाणी माझे विचार धावू लागले.

    पांढरं म्हणजे चांगलं आणि काळं म्हणजे वाईट अशी संकल्पना बहुदा अनादी काळापासून चालत आली असावी. तू लिहिल्या प्रमाणे दिवसा सगळं दिसत आणि रात्री काळोख झाल्यावर काही दिसत नाही म्हणूनही असेल गीतकार देखील लिहून जातात ,

    उजेडात होते पुण्य अंधारात पाप

    आता पूर्वीइतका वर्णभेद राहीला नसेल असं तुला वाटलं,पण प्रत्यक्षात काय घडतंय ते सांगणार झिम्बाबवेच्या अध्यक्षांचे भाषण काही दिवसांपूर्वी आपला बॅचमेट,चंद्रशेखर (Babu) कडवेकरने upload केलं होत. त्यात Racism वर त्यांनी केलेली टिपण्णी इथे देतो म्हणजे त्यांना आज देखील काय भोगावं लागत ते कळेल.

    As long as white cars still use black tires, racial discrimination will still exist.

    As long as people still regard black as bad luck and white as peace, racial discrimination will still exist..

    As long as people still wear white clothes to weddings and black clothes to funerals, racial discrimination will still exist..

    As long as defaulters are blacklisted instead of whitelisted, racial discrimination will still exist..

    Even when playing billiards, black balls go into the pocket while white balls remain on the table, racial discrimination will still exist..

    But I don't care
    As long as I still use white toilet paper to wipe my black ass.. I'm happy..!!

    वसाहतवादी इंग्रज तर इतकी हीन वागणूक द्यायचे की सार्वजनिक ठिकाणी
    Dogs & Black are not allowed
    असं लिहिलेलं असायचं.

    आजही नव्या घराला कुणाची नजर लागू नये म्हणून सुद्धा टांगतात ती
    काळी बाहुली

    आहे ना कटू सत्य.

    असो.

    आता काळं किती छान असत त्या बद्दल

    आपल्याला पोटासाठी अन्न पिकवणारी जमीन काळी असते म्हणजेच ती सुपीक असते तिला आपण आईचा दर्जा देतो

    आणि कवी लिहितात

    काळ्या मातीत मातीत तिफन चालते

    ही काळी आई, धन-धान्य देई, जोडते मनांची नाती., आमची माती आमची माणसं

    धरणी आईची माया कशी जाईल वाया

    काळे ढग म्हणजे जीवन घेऊन येणारे म्हणून त्यांना जलद असं म्हणतात आणि पांढरे ढग बिनकामाचे असतात
    म्हातारपण यायला लागलं की केस पांढरे व्हायला लागतात त्या वेळी मात्र लगेच केसांना कलप करून काळ्याखाली पांढरं झाकून अजून यौवनात मी असल्याचं भासवलं जात.

    स्त्रियांच्या आभूषणांत मोत्यांच्या दागिन्यांना महत्व असत आणि सगळ्या मोत्यांमध्ये भाव खाऊन जातो तो मात्र काळा मोती Black Pearl कारण तो सहजासहजी मिळत नाही ,म्हणूनच काळा असूनही तो अमूल्य असतो.

    सोन्याची शुद्धता तपासायला सराफ वापरतात तो कसोटीचा दगड देखील काळाचं असतो आणि तोच लखलखणाऱ्या सोन्याची शुद्धता सांगतो

    शेवटी काळ्याची थोरवी सांगताना मेहमूद च्या एका चित्रपटातलं गाणं मला आठवलं,

    हम काले है तो क्या हुवा दिलवाले है

    प्रसाद जोग.सांगली

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , प्रसाद ! खूप छान लिहिलं आहेस !! 👌👌😊

      Delete
  6. अल्का कुंटे, संक्रांत आणि काळ रंग ह्यांचा एकमेकांशी संबंध बरोब्बर मांडला आहे.लेखन शैली छान.नेहेमी असे ब्लाॅग वाचायला आवडतील.
    प्रसाद जोग यांचा त्यावरील अभिप्राय पण उत्तम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Alice in Wonderland

Alice in Wonderland - 2