नेमेचि येतो मग पावसाळा ...
नेमेचि येतो मग पावसाळा ... तो येतो जूनमधे . पण असाच 'नेमेचि' येणारा एक दिवस म्हणजे - ८ मार्च ... International Women's Day ! त्या दिवशी जग अगदी वेगळं असतं, वेगळं दिसतं, वेगळं ऐकू येतं ... खूप जण खूप काही बोलतात त्याबद्दल, news मधे, TV वर, मोबाईलवर, पेपरात ... जिकडे तिकडे बायकांचा उदो उदो, anybody who thinks he is somebody , बायकांच्या समाजातल्या role बद्दल, स्थानाबद्दल, योगदानाबद्दल बरंच काही बोलतो ... क्वचित कुठल्या झोपडपट्टीत, चाळीत जाऊन एखादं फूल, नाहीतर मिठाईचा डबा देऊन येतो..... ४-५ बायकांना शाल, श्रीफळ वगैरे देऊन सत्कार करतो ... दोन -चार वाक्यं सावित्रीबाई , जिजाऊंबद्दल बोलतो ... आणि मग उरकला दिवस !...
मुळात हा दिवस आला कसा ? तर १९१७ साली रशियामधे लोकांचे हाल होत होते, अन्न -पाणी मिळत नव्हतं, तेव्हा रशियन बायकांनी मिळून बंड पुकारलं ... 'Bread and Peace' ही त्यांची मागणी होती ! त्या आधी समान पगार, कामाच्या वेळा, आणि मतदानाच्या हक्कांकरता अमेरिकेतील महीलांनी २८ फेब्रुवारी १९०९ साली संघर्ष सुरु केला, म्हणून हा दिवस Womens' Day म्हणून साजरा केला जात होता. पण रशियन बायकांच्या बंडानंतर ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महीला दिवस ठरवला गेला. त्यानंतर ही बराच काळ गेला आणि १९७५ साली UN नी ८ मार्च हा दिवस निश्चित केला ! हा दिवस नक्की कोणी आणि कोणत्या साली ठरवला , ह्या बद्दल ही खूप मतं आहेत . त्याचं असं की , क्रेडिट घ्यायला आवडतं लोकांना !! ...अजून एक गोष्ट , जी मला आज कळली ... आपल्या भारतात १३ फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय महीला दिवस' म्हणून साजरा केला जातो ! तो सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे ! ऐकावे ते नवलच ... ! सत्तराव्या वर्षी का होईना ...मला माझ्यासाठी असलेल्या खास दिवसाबद्दल समजलं ....!
पण हाच आणि एवढाच अर्थ आहे का महीला दिवसाला ? खरंच महीलांना त्यांचा योग्य तो मान, अधिकार मिळतात का समाजात ? मनुस्मृती मधे एक श्लोक आहे,
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते , रमन्ते तत्र देवता: । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ।। " .... म्हणजे त्या काळात बायकांना मान होता ! घरात, समाजात दुय्यम स्थान नव्हते. घरातल्या त्यांच्या contribution ला मान्यता होती. एवढंच नव्हे तर त्यांना शिक्षण आणि इतर सर्व बाबतीत ही हक्क , स्थान होतं . गार्गी, मैत्रेयी यांच्या ऋचा वेदात आहेत. लोपामुद्रा, अरुंधती, गायत्री, सावित्री... सर्वजणी उत्तम शिकलेल्या होत्या. त्या, सभांमधे - दरबारात वगैरे वादविवाद-चर्चा यात यशस्वीपणे भाग घेत होत्या, अगदी यमालाही हरवलं ! ...
नंतरच्या काळातली भास्कराचार्यांची मुलगी लीलावती ही गणितज्ञ म्हणून ओळखली जाते. तिची गोष्ट सर्वश्रुत आहे . शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्या वादविवाद-चर्चेत मंडन मिश्र यांची बायको, उभया भारती ही परीक्षक किंवा न्यायाधीश होती. त्याच्या पुढच्या काळात राजा हर्षवर्धन याची बहीण राज्यश्री ही त्याला राजकारभारात मदत करत असे...
त्यानंतरच्या काही शतकांत मात्र सगळंच चित्र पालटलं. काबुल-कंदाहार मार्गे परकीय आक्रमणं आली , येतच राहिली ... मुघल आक्रमणाची इतकी दहशत बसली , आणि बायकामुलींना सुरक्षित ठेवायचा हेतू पुढे इतका विकृत झाला की त्या आपापल्या घरातच बंदिस्त झाल्या. घराचाच तुरुंग झाला. काही शिकणे वगैरे तर दूरच राहीलं. तशीच परिस्तिथी होती , पण घरात डांबून ठेवणे, किंवा ५व्या -६व्या वर्षी लग्न करून टाकून आपली जबाबदारी दुसऱ्याच्या गळ्यात बांधणे हे solution नाही, असं आता वाटतं. त्यावेळी नाईलाज असेल ...अगतिक होते लोक ...
हीच परिस्तिथी शतकानुशतकं चालू राहीली ... आणि चालूच राहीली .. ती अजूनही चालू आहे ... प्रमाण कमी झालं असेल, पण शून्य नाही, हे नक्की. आपलं नशीब थोर , म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांसारखा राजा मिळाला , आणि , आपण दिवसा , ताठ मानेने लग्न - कार्य वगैरे करू शकलो . ...
पण , ह्या भीतीचंच अजून एक टोकाचं उदाहरण म्हणजे पडदा आणि बुरखा व त्याचे प्रकार. पूर्वी राजघराण्यांमधे - राजपुतान्यात मुख्यत्वेकरून - पडद्याची चाल होती. राजघराण्यातील स्त्रिया सहसा बाहेर राजदरबारात वगैरे येत नसत . हा पडदा मान म्हणून ही असेल कदाचित , त्यांना शिक्षण आणि युद्धकला म्हणजे ढाल तलवार - घोडेस्वारी वगैरे सगळं शिकवलं जायचं. तर , दुसरीकडे मुसलमानांमधे बुरखा पद्धत.... कशाला ? ते तर आक्रमक होते , जेते होते , त्यांना कसली भीती ? !... का त्यांचा त्यांच्याच समाजावर-पुरुषांवर विश्वास नव्हता की ते सभ्यपणे मर्यादेनुसार वागतील ? ? ?
काही लोक मनुस्मृतीतील एका श्लोकाचं उदाहरण देतात , आणि आपल्याच संस्कृतीला नावं ठेवतात .
" पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा: , न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति ।।
पण हा श्लोक स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्यापेक्षा, घरात डांबून ठेवण्यापेक्षा , त्यांचं रक्षण किंवा त्या अमूल्य आहेत , त्यांना जपलं पाहीजे , या अर्थाने आहे . किंवा , जरा वेगळा विचार केला , तर , इथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा अर्थ अभिप्रेत असावा , आणि स्वैराचार नसावा , असं म्हणायचं असेल ...हे माझं मत. तसं नसेलही, पण कोणतंही वाक्य out of context घेतलं, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि चूक ते चूकच. मग ते दुसऱ्या कुणाचं असो वा आपलं ! निदान 3000 वर्षांनी का होईना , आपण चूक सुधारण्याचा चांगला प्रयत्न करतोय , हे नक्की !!
एखादं घर हे सुसंस्कृत आहे का नाही, हे श्रीमंती, शिक्षण, समाजातलं स्थान यावर ठरत नाही. सगळीच श्रीमंत माणसं आळशी, उद्धट आणि दुष्ट नसतात. सगळीच गरीब माणसं अती बिचारी किंवा असहाय नसतात. सगळीच शिकलेली माणसं माणुसकीने वागत नाहीत, आणि तथाकथित अडाणी-निरक्षर लोकांनाही सभ्यतेचं चांगलं भान असतं. ह्या सर्वच ठिकाणी - घरांमधे मुलींना-बायकांना मुद्दाम वाईट वागवत नसतील ही, पण लहान लहान गोष्टींतून, साध्या बोलण्यातून त्या घरातले विचार-मानसिकता आपल्याला कळते !.. बऱ्याचदा आपण चुकीचा विचार करतोय, मुलगा आणि मुलीत फरक करतोय , हेच लक्षात येत नाही, ... इतकं ते अंगवळणी पडलेलं असतं ... चूक मुद्दाम अशी नाही, पण विचार जास्त सखोल हवेत ... !
काही वेळा एका ठराविक साच्यातले, खुजे विचार वीट आणतात. काही कुणाची चूक झाली तर चिडा, रागवा, ओरडा, ... पण ती चूक generalise करून, त्यावरून सगळ्या स्त्री जातीवर jokes मारू नका ... बायकांवर जोक्स करणं , हे आता जुनं झालं, नाही का ...! एखाद्या बाईचं पाऊल वाकडं पडलं की लोकांचा थयथयाट ... अरे, पण पाऊल वाकडं एकटीचं नाही पडलं ना ... ? अहल्येला दगड करून टाकलं, शाप देऊन ... पण तिला तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन फसवणारा इंद्र ? तो आपला शाप 'commute' करून घेऊन 'सहस्त्रनयन' हा ' किताब' मिरवत राहीला !... का ? स्त्री आणि पुरुष ... समान कायदा नको ? गुन्हा करणारा इंद्र मोकाट आणि निर्दोष अहल्या शतकानुशतकं दगड ... तिने काय क्षमा- याचना केली नसेल ? ...खरं म्हणजे इथे तिची चूकच काय ...? 'नाही' म्हणाली असती आणि खराच नवरा असता , तर त्याने नक्कीच शाप दिला असता ....तिने काय करायचं ... ???....
आणखीनही बऱ्याच गोष्टी फार त्रास देतात मनाला. माझं HDFC बँकेत खातं आहे, काही FDs पण आहेत. त्यातलं काही mature झालं की त्यांचा Relationship Manager फोन करतो आणि माझ्या नवऱ्याला सांगतो की mature झालं. हे तो मला का सांगत नाही ? तो इतका judgemental का, की मला financial matters कळणार नाहीत ? मी बाई म्हणून, का मी म्हातारी म्हणून , का अडाणी असेल म्हणून ? का त्याला बाईशी बोलायचा कमीपणा वाटतो ? ही कोणती mentality आहे ? आणि ते ही बंगलोरसारख्या शहरात ? मग लहान गावात वगैरे तर काय करतील कोण जाणे ? ....
मला आणखीन एका गोष्टीची चीड येते. बाईचा-मुलीचा वेष पाहून त्याप्रमाणे त्यांना मिळणारी वागणूक. एखाद्या , साड्यांच्या दुकानात जावं आणि बघावं. Posh कपडे असले की अगदी अदबीने तिला काय हवं नको ते जातीने बघणार. जरा old fashioned बाई असेल , तर पाहून न पाहील्यासारखं ... टळली आपल्या आपण, तर बरं ... असा विचार ... आणि जरा साधेसे कपडे असतील तर ती almost पारदर्शक किंवा ..."काय पाहीजेय इथं ...? " ...असंच ! अरे माणसा , साडी च्या दुकानात एखादी बाई मोहोरी विकत घ्यायला येणार नाहीये , भले साधीशी साडी घेईल... ! जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या Pygmalion ( My Fair Lady ) मधे एलायझा ( Eliza ) म्हणते की , "Whether a lady or a flower-girl, it is not how she behaves, it is about how she is treated " !!..... एकदा , विमानच काय , अख्खी एअर लाईन विकत घ्यायची ऐपत असलेल्या सुधा मूर्तींची साधी रहाणी पाहून business class वाल्या एका बाईने त्यांचा अपमान केला, तेव्हा त्या दुसऱ्या बाईची लायकी कळली ! आपण कसं वागतो, ह्यावरून आपली किंमत कळते, दुसऱ्याची नाही ... !
मला हे सगळं खरंच कळत नाही. एकीकडे देवीची पूजा, जगन्माता, माउली वगैरे आणि दुसरीकडे घरातल्या बाईला मारझोड - कधी शब्दांनी, काही ठिकाणी काठी किंवा जे हातात येईल त्यानी ! दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करायचं आणि ते झालं की लग्नात माहेरून हुंडा - बिंडा काही आणलं नाही- लग्नात पुरेसं दिलं नाही , म्हणून सुनेला उपाशी ठेवायचं ? आल्या लक्ष्मीला तोरण लावायचं आणि पुढच्या क्षणी तिचं पायपुसणं ?... हे सगळं कधी बदलणार ?...
अशीच एक गोष्ट म्हणजे , आजकाल येणाऱ्या पोस्ट्स . ऑरगॅनिक खा , शुद्ध खा , बाहेरचं नको , इतपत ठीक आहे , पण , घरी जात्यावर पिठं दळा , पाटा वरवंटा , उखळ - मुसळ , चुली वापरा ? आणि , मग नोकऱ्या कधी करा ? संसाराला पैशाचा 50% हातभार कसा लावा ? ... हे असलं सगळ्या लिहिणाऱ्या लोकांचा एक महिन्याचा कॅम्प घ्यावा . झाडू पोछ्यापासून सुरुवात करूया , दळण कांडण , चुली पेटवणे इथपासून ते रात्रीची भांडी घासण्यापर्यंत ...via स्वयंपाक , धुणं वगैरे .…..first hand experience !!! ...
असो ,...काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका अगदी elite group च्या get-together ला जाण्याचा प्रसंग आला. सर्वजण hi-fi लोक, सभ्य, सुसंस्कृत वगैरे सर्व गुणांनी परिपूर्ण ... तो माझा गैरसमजच होता, हे नंतर कळलं ... general गप्पा चालू होत्या. कोणत्या तरी घटनेबद्दल बोलत होते सगळे जण ... "फारच मोकळीक दिली आहे, नको तितकं स्वातंत्र्य " ... वगैरे वगैरे ... आणि अचानक एक जण म्हणाला, ... "स्वातंत्र्य वगैरे सगळं झूट आहे ... बस म्हटलं की बसली पाहीजे आणि उठ म्हटलं की उठली पाहीजे ... पायातली वहाण पायातच ठेवली पाहीजे " ... ही सभ्यता ? हे सुसंस्कार ? हे शिक्षण ? ...
एकविसाव्या शतकात जर ही परिस्थिती असेल, तर येऊ द्या नेमेचि एक दिवस ... तेवढ्या पुरतं तरी कौतुक होऊ दे ...मस्त मजा करा ... गप्पा करा , हसा - खेळा , शॉपिंग करा ... आले , तर नवरा - मुलांबाळांसह , आपल्याला ते कधीच नकोसे नसतात ..... नाही आले, तर त्यांच्या शिवाय ...एक दिवस नसतील आपल्याबरोबर , तर काही जग वगैरे बुडत नाही ....!!!खुष रहो , ऐष करो ....!!!! Enjoy , Sweeties , you deserve the best ...... !!!
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
*अलकाचे चणे कुरमुरे*
ReplyDelete*नेमेचि येतो मग पावसाळा*
आजचा महिला दिनी लिहिलेला अलकाचा ब्लॉग तिनं अगदी पोटतिडिकीनं लिहिला आहे. त्यात तिनेच प्रश्न उपस्थित केले आणि त्या पैकी काहींची उत्तर सुद्धा तिनंच दिली आहेत. त्या वर काही प्रतिक्रिया द्यायची म्हणजे देणाऱ्याची देखील कसोटीच असेल. त्या मुळे काही वेळा गाडी पटरी सोडायची शक्यता नाकारता येत नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.
वेद ,शास्त्र, पुराणापासून सगळ्या अगदी आत्तापर्यंतच्या बऱ्याचशा कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख लेखात केला आहे.स्त्री ही Boss असेल तर तिच्या हाताखाली काम करताना समाजात आजही पुरुष अवघडले दिसतात हे सत्य आहे. स्त्रीची हुशारी सहजासहजी मान्य होताना दिसत नाही. अगदी पुढारलेले देश सुद्धा त्यात भेदभाव करताना दिसतात. सुधा मूर्तीचा उल्लेख अलकानं केला आहे त्यांना टाटा मध्ये महिला इंजिनियर म्हणून सुरवातीला त्यांना नाकारलं होत, त्यावर झगडून झाल्यावर त्यांना तिथे नोकरी मिळाली होती ही वस्तुस्थिती आहे.
प्रभू श्रीरामा बरोबर सीतेने १४ वर्ष वनवास भोगला म्हणून तिचा गौरव होतो त्याच वेळी लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही देखील तितकीच वर्ष राजप्रासादात राहूनही वियोगाच्या आणि विरहाच्या धगीमध्ये होरपळत होती. तिला वंदन करताना कवी राजा मंगळवेढेकर लिहितात उर्मिले त्रिवार वंदन तुला. पण हा झाला अपवाद. बाकीच्यांनी तिला कायम दुर्लक्षित केलं.
पूर्वी अगदी लहान वयात लग्न व्हायची. रोगांच्या साथी यायच्या आणि त्यात खूप जण दगावायचे. यात बाई मेली असेल तर सुतक संपल्याबरोबर पुरुष दुसरं लग्न करायचा आणि पुरुष मेला तर पुरुषाच्या बरोबर सहगमन करत स्त्री सती जायची. नंतर काळ बदलला स्त्री ला विकेशा व्हावं लागायचं आपण लहानपणी अशा आलवणि आज्ज्या बघितल्या आहेत. यात त्यांची काय चूक होती.
साड्यांच्या दुकानाचा उल्लेख तिच्या लिखाणात आला आहे. पण म्हणतात ना एक नूर आदमी दस नूर कपडा अशी म्हण आहे तस जग रूपावर भाळतं,एखादंच कोणी संत चोखोबा सारखे अभंगातून म्हणतात *काय भुललासी वरलिया रंगा* पण काय करणार ही जगरहाटी आहे.
एका elite group च्या get-together चा प्रसंग लिहिताना तिने वहाणेचा उल्लेख केला आहे त्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन स्त्री ही *भोगदासी* आहे अशा मानसिकतेतून आला आहे. पण अशा लोकांसाठी वहाणेचा संदर्भ देत तुकाराम महाराज म्हणतात *तुका म्हणे ऐशा नरा,मोजुनी माराव्या पैजारा*
निखळ मैत्री ही फक्त समलिंगी असते असं मानणारी समाजव्यवस्था विजातीय मैत्री कडे वेगळ्या चष्म्यातून पहात असते. त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होईल तो सोन्याचा दिवस असेल.
पुराणकाळापासून समाजाला,संस्कृतीला दिशा देण्याचं काम स्त्रियाच करतात. म्हणून त्यांचा गौरव करताना आपण पंचकन्या: स्मरेतन्नित्यं महापातकनाशम्॥ म्हणतो.
पण एक दिवस असाही येईल आणि मग सारेजण म्हणतील
*बाईपण भारी देवा*
प्रसाद जोग.
सांगली.
Thank you , प्रसाद ! खरंच जीव जळत असतो . कधी बदलणार गे सगळं ? तू लिहिलं आहेस , त्या स्त्रिया म्हणजे वाळवंटातील oasis होत्या . त्यांच्या मुळे आपण इथवर आलो . स्त्रिया आता सर्व fields मध्ये आपलं कौशल्य दाखवत आहेत , तरी majority ची परवडच असते . हे सुधारेल , अशी आशा करूया !
Deleteअलका, खूप पोटतिडकीने लिहिले आहेस. तुझे विचार मान्य आहेत पण आजच्या नव्या पिढीच्या मुलींचे विचार मी रोज ऐकते आणि ज्याला स्वातंत्र्य, समता म्हणतो आहोत त्याचं किती भयानक वास्तव तयार होतं आहे हे जाणवतं.. .. आई वडील असणारा नवरा नको, लग्नानंतर स्वतंत्र वेगळा राहणार असशील तरच आता हो म्हणणार.. eqality च्या गोष्टी बोलणारी मुलगी तिच्यापेक्षा जास्त शिक्षण, जास्त पगार असणाराच साथीदार हवा म्हणते तेव्हा तीच male dominance मान्य करते ना.. स्वातंत्र्य म्हणजे काय हे वाटेल तसे कपडे घालून , धिंगाणा घालायचा.. कुणी बोलायचे नाही, रागवायचे नाही.. शिक्षण घेतले , मोठ्या पगाराच्या नोकऱ्या केल्या म्हणजे तुम्ही सगळी बंधने झुगारून टाकायची ? बंधनातूनच नाती दृढ बनतात... कुटुंब व्यवस्था टिकते.. लग्नानंतर 8 दिवसात वैचारिक मतभेद जाणून घटस्फोट घेतलेल्या मुली आहेत..... असो.
ReplyDeleteतू म्हणतेस , ते खरं आहे , संजू , पण ह्याला बऱ्याच प्रमाणात आपली आणि जरा आपल्याहून लहान पिढी जबाबदार आहे . सासू सासरे नकोत , असं म्हणणाऱ्या मुलींचे आई वडील त्यांना हेच शिकवतात का ? वाट्टेल ते कपडे घालू देणं , उशिरापर्यंत रात्री बाहेर असणं , हे ते कसं चालू देतात ? स्वातंत्र्याचा अधिकार मिळाल्यावर , त्या बरोबर येणारी जबाबदारी ? हे भान शिकवायला आपण कमी पडलो ! मला वाटतं , ही त्या नाण्याची दुसरी बाजू किंवा दुसरं extreme ... असं माझं मत .
Delete*लिहिलं खूपच छान आहे.* या ब्लॉग मधे लेखिकेचा राग ठळकपणे दिसतो.
ReplyDeleteया विषयावर लिहू बोलू तेव्हडं कमीच आहे.
लेखिकेनी स्त्रियांना समाजाकडून दिली जाणारी वागणूक हा एकमेव मुद्दा चर्चिला आहे. *मी त्यांच्या ब्लॉगच्या गाभ्याशी सहमत आहे.*
त्यापुढे जाऊन मला काही म्हणावंस सुचवावस वाटतंय. ते मांडतो.
ब्लॅागचे contents एकांगी वाटलेत. तूम्ही एक स्त्री आहात म्हणून बायकांवर होणाऱ्या अन्यायाचं वाईट वाटणं , राग येणं स्वाभाविक आहे. *स्त्रीयांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून कमी लेखणं अमान्यच आहे.* जगातल्या सगळ्या भागात हेच चित्र दिसतं.
मुळात *भेदभावाचं अस्तित्व* ही खरी दुर्देवी वास्तविकता आहे.
विश्वाच्या सुरुवातीपासूनच असेल का हे ? पुराणातले दाखले कमीअधिक प्रमाणात distorted असू शकतात.
आपल्या भागात मात्र स्त्रीलिंगी देवाची , देवीची पूजा होत होती , आजही होते. ती तोंडदेखली नाही हे पण सर्वत्र मान्य आहे.
म्हणजेच सरसकट प्रत्येक स्त्रीला आपण कमी लेखत आलेलो नाही.
आपल्या कडे रझिया सुलतान , राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर , राणी चेन्नम्मा , रुद्रम्मा , the only man in the entire indian cabinet असं वर्णन केलेली इंदिरा गांधी ……..
संपूर्ण जगावर सत्ता गाजवणारी इंग्लंड ची राणी , क्लिओपात्रा…
…………. ही यादी भली मोठी होऊ शकेल.
या वर नमूद केलेल्या स्त्रियांचे वर्चस्व *जवळपास* सगळ्याच पुरुषांना मान्य होते.
वेगवेगळ्या पातळींवर कधी स्त्रीया तर कधी पुरुष वरचढ ठरत असतील असं मला वाटतं व त्यामुळे सरसकट स्त्री-पुरुष equality ची कल्पना व्यर्थ वाटते . स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळे आहेत.
आपण सगळे प्राणी बघावेत. सिंह दिवसभर लोळतात . सिंहीणी शिकार करतात पण त्या ताज्या लुसलुशीत मांसावर पहिला हक्क रावसाहेबांचा !
The bottom line is ‘ Muscles rule the world.’ आणि हे नैसर्गिक आहे , हे आपलं डिझाईन आहे , DNA आहे असं मला वाटतं .
*आपण इतर प्राण्यांचा विचार बाजूला सारू व फक्त मानव जातीवर बोलू .*
“ आमचाच समूह श्रेष्ठ “ हा अकर्तुत्ववान मंडळींचा आवडता उद्योग ! समाज स्त्रियांना कमी लेखतो , खालचा दर्जा देतो, त्यांच्यावर जोक्स करतो. हे सगळं चूक आहेच. पण We can do nothing about it. Smile and move on.
त्यात वाईट वाटून घेऊन आपलं स्वास्थ्य बिघडवून घेण्या सारखं विशेष काही नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. *कदाचित ते पुर्णत: चुकीचं असेलही.*
हे चित्र कधी बदलणार , कसं बदलणार असले विचार मला पेल्यातलं वादळ वाटतं.
To overpower others is an instinct . If one can not achieve it by raising oneself he does it by the next best thing. ‘ _pull her down ! ‘_
I believe trying to show others in poor light is an instinctual drive. Let us consider the following.
स्त्री - पुरुष विषमता च्या आधीचा thought काय असेल ?
We versus they !
The discussion ends here. Homo Sapiens Sapiens are scripted in the *‘ we - they ‘ operating system. *It is not necessarily gender based.*
ज्यांना ‘ आम्ही - इतर ‘ या विचारसरणीमुळे झळ बसते ते प्रोटेस्ट करतीलच.
काळे - गोरे ( युरोपियन्स - आफ्रिकन्स ) , पाश्चिमात्य - पौर्वात्य, धनाढ्य - निर्धन , मालक - गुलाम , ही जात - ती जात आधारीत अशी शेकडो we - they ची samples सापडतील. एका समूहानी दुसऱ्या समूहावर अत्याचार करणे , त्यांना कमी लेखणे हे पूर्वापार चालत आलेले आहे , चालत राहील.
( मी १९७५ च्या सुमारास मराठी मासिकात एक कार्टून बघितलं होतं. त्यात एक फाटका माणूस भरबाजारात एका निटनेटक्या माणसाच्या थोबाडीत मारतोय असं चित्र होतं अन खाली लिहिलं होतं “ *पुण्याचा नॉनमॅट्रिक सुध्दा अमरावतीच्या एम.एस.सी. च्या तोंडात मारतो* “.
This cartoon illustrates that superiority - inferiority is not only gender based. Geographies also impart false sense of superiority.
भूभाग , जात, रंगरूप , स्त्री पुरुष या सगळ्या सगळ्या उदाहरणांवरून काय दिसतं ? कर्तव्यशून्य मंडळी काहीतरी मुद्दा शोधून काढून स्वत:स ग्रेट वगैरे समजून दुसऱ्यास तुच्छतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करतीलच.
मला वाटतं दुर्लक्ष करावं , मनातल्या मनात हसावं अन पुढे चालावं .
धरतीवर बदल होतच असतात.
*उद्या हा स्त्री पुरूष भेदभाव नक्कीच संपेल. पण दुसरा कोणता तरी शोधून काढला जाईल हेही नक्की.*
तळटीप : मी इथे स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला किरकोळ issue समजतोय असा अर्थ काढू नये. ते दुर्दैवी असेल.
— डॉ. अरविंद आपटे. नाशिक.
९४०३५१८२०९
Hope my response doesn’t measure longer than the blog.
ReplyDelete- Arvind Apte.
Thanks a lot , अरविंद !
Delete