पुरुषोत्तम मास

  

    आजकाल पुण्यात कुठेही जा, सगळीकडे flex लागले आहेत ... अधिक मासानिमित्त ... भजन - पूजन - कीर्तन ... विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, भागवत वाचन ... देवळांमधे विविध पूजा ... आणि मिठाईच्या दुकानांत अधिक मासाकरता अनारसे !    हे सर्व अधिक मासानिमित्त आहे म्हटल्यावर ठरवलं की ह्याबद्दल काहीतरी लिहायचं ... आणि मग शोधायला लागले ...

     पहीलं पुस्तक ... संपूर्ण चातुर्मास ... तर त्यात अगदी जुजबी माहिती ... चला,  पण सुरुवात तर झाली .   आणि मग मिळेल तसं लिहीत गेले.   मुळात प्रश्न की अधिक मास म्हणजे काय ... तो येतो कसा ... त्याचा हिशोब कसा करतात ... काहीच महिने अधिक येतात ... वगैरे ... आणि जितकं शोधू तितकं सापडत गेलं  ...

    सौर वर्षातले दिवस ३६५ पण तिथ्या पाहिल्या तर ३७१, आणि चांद्र वर्षात ३६० तिथ्या येतात.   म्हणजे दर वर्षी ११ तिथ्यांचा फरक पडतो.   दर ३ वर्षांनी ३३ तिथ्या होणार आणि  नवीन चांद्र वर्ष थोडं थोडं आधी सुरु होणार ... मग सगळे सणवार आणि ऋतूंचा ताळमेळ कसा ठेवायचा ?   अशानी तर दिवाळी केव्हातरी उन्हाळ्यात, किंवा गौरी गणपती हिवाळ्यात ... ?    

    आपले सणवार सगळे ऋतूंशी निगडीत आहेत, तसंच खरीप-रब्बी आणि येणाऱ्या पिकांवरच , आणि त्या वेळी असणाऱ्या हवामानाला योग्य असेच  त्या त्या सणाचे पदार्थ - नैवेद्य , प्रसाद अवलंबून असतात.  ... आपल्या पूर्वजांनी ते तसेच बेतलेले आहेत, आणि हा तिथींचा गोंधळ दुरुस्त करण्यासाठी ही अधिक महिन्याची सोय त्यांनी करून ठेवली आहे.

    आपल्या पूर्वजांना सौरमान - चांद्रमान यांची उत्तम माहिती होती, नक्षत्रं - ग्रह - तारका आणि त्यांचे भासमान भ्रमण, त्यांच्यातला apparant किंवा visible संबंध ही त्यांना माहीत होता. त्याचं गणित ही माहीत होतं ,  astronomy चं ज्ञान, भूमिती, त्रिमिती सगळं त्यांनी संशोधन केलं ..... आपण करंटे की आपल्याला पाश्चिमात्य लोकांकडून त्याचं validation करून हवं असतं.   त्यांनी सांगितलं की आपल्याला पटतं ... मग आपण म्हणतो ... "हो हो , आमच्या पूर्वजांना हे माहीत होतं "... हसं होणारच नं आपलं ...

    असो, तर अधिक महिन्याबद्दल अजून एक महत्वाची माहिती , म्हणजे चांद्र महिन्यानुसार प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.   ज्या चांद्र महिन्यात सूर्य पुढच्या राशीत जात नाही, तो महिना  'अधिक'  मास म्हटला जातो.   आणि त्या नंतर येणाऱ्या महिन्याला  'निज'  मास म्हणतात.   ह्या वर्षी आता अधिक जेष्ठ चालू आहे आणि १५ जून नंतर निज जेष्ठ सुरु होईल.  आणि ही २८-३० दिवसांची - ३३ तिथींची gap भरून निघेल. 

  ... पूर्वीच्या काळी , तसं काहीच कारण नसतांना ह्या अधिक मासाला मलीन मास - मल मास असं नाव मिळालं.   त्या महिन्यात लग्न-मुंज-वास्तुशांत ही मोठी तीन शुभ कार्य करत नाहीत...  ह्याबद्दलची एक गोष्ट आजीमंडळी सांगत असत ... संध्याकाळी परवचा म्हणून झाल्यावर, रामायण-महाभारतातल्या गोष्टी किंवा अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी, माहित्या, दंतकथा, पुराणातल्या कथा , श्लोक ... कितीतरी informal गोष्टी !... त्यातलीच एक अधिक मासाची ! तर , एकदा ह्या अधिक मासाला खूप वाईट वाटलं आणि तो रडत श्रीविष्णूंकडे गेला, आणि म्हणाला की ,"देवा मला कोणी वाली नाही, नाव ही नाही.   मी अपवित्र आहे ..." तेव्हा श्रीविष्णूंनी त्याला आपलंसं केलं, त्याला आपलं नाव दिलं आणि सांगितलं की शुभकार्य नसेल, पण ह्या महिन्यात भजन-पूजन-दान धर्म केल्यास विशेष पुण्य मिळेल ... आणि माझी भक्ती सगळ्यांना खूप शांती, सुख-समाधान देईल ...त्यांच्यावर माझी  कृपा असेल !म्हणून हा 'पुरुषोत्तम मास' !

    हा महिना असा ३३ तिथी मिळून झालेला म्हणून ३३ ला महत्व ... ३३ कोट देव ... असा ही काही जण संदर्भ लावतात - प्रत्येकाचं आपलं मत ! मग ,  इतपत माझी जिज्ञासा शांत झाल्यावर ( details मधे गेले तर माझंच अज्ञान उघडं पडायचं ... इथेही चुका असतील तर क्षमस्व ... मी मला समजलं, उमजलं तसं लिहिलं ... )  

    मग ३३ अनारसे आणि जावयाचा मान ... तो कसा आला ते बघूया म्हटलं ... !    लहानपणचं आठवत होतं.   आजी अधिक महिना आला की  अनारसे करायची, आणि माझ्या आईवडिलांना समारंभपूर्वक म्हणजे औक्षण वगैरे करून काहीतरी मोठी gift सोनं-चांदी वगैरे  आणि अनारश्यांचा डबा द्यायची.   मी तिला विचारलं एकदा, "दरवेळी अनारसे का ?    करंज्या दे की ... किंवा चकल्या का नाही ... ?"    तेव्हा सगळे मला हसले, पण आजी म्हणाली, "अगं, अनारसे हा  स्पेशल  पदार्थ आहे.   तो खूप जुन्या काळचा आहे.   महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे.  तेव्हा त्यांना 'अपूप' म्हणत.   अपूप म्हणजे जो खराब होत नाही, नासत - कुजत नाही असा ... करंजीतलं खोबरं खवट होतं, चकलीला वास येतो,   काही पदार्थांना  जसे  लाडू-मिठाईला बुरशी येते ... त्या सगळ्यांपेक्षा अनारसा खूप जास्त टिकतो ... आणि अधिक मासात ३३ तिथ्या म्हणून ३३ अनारसे ... हा देवी लक्ष्मीचा आवडता पदार्थ ... आणि तुझी आई तिच्या घरची लक्ष्मी, आणि जावई म्हणजे विष्णूचं प्रतीक मानतात, म्हणून अनारसे द्यायचे ... "    धाकट्या बहिणीच्या लग्नात आईवडिलांनी जेष्ठ जावयाचा मान केला, आणि त्या वेळी आम्हाला नमस्कार केला, तेव्हा 'नको नको' म्हणत मागे सरकून पळून जावसं वाटलं होतं ... पण तेव्हा जावई-मुलगी हे लक्ष्मी-विष्णूचं प्रतीक - हा संस्कार-  ही संस्कृती हे कळलं ... 

    अजून एक मजेदार माहिती ... काही लोक अनारश्यां ऐवजी धोंडे नावाचा पदार्थ करतात.   तांदुळाच्या पिठीची उकड काढून , किंवा गव्हाच्या कणकेच्या पारीत पुरण भरून त्याचे मोदकाच्या एवढे चपटे गोळे करतात, आणि उकड असेल तर वाफवून अन कणकेचे असतील तर तळून घेतात.   ह्यांना धोंडे म्हणतात! ते तुपाशी खायचे !   ह्या रेसिपीच्या शेवटी त्या सासूबाईंनी लिहिलं होतं, असे धोंडे करा आणि आपल्या 'धोंडोपंतांना' द्या !   मनात आलं, ह्यांना जावईबापूंनी चांगलंच खर्चात पाडलेलं दिसतंय ... ! 

    ह्या महिन्यात लोक खूप वेगवेगळे संकल्प - नेम वगैरे करतात, हे मी पाहिलंय.    इतकी वर्ष बंगलोरमधे राहिल्या मुळे काही गोष्टी फक्त ऐकलेल्या होत्या, पण पाहिल्या नव्हत्या.   तिथे राहून तिकडच्या बऱ्याच नवीन गोष्टी कळत होत्या, पण इथल्या महाराष्ट्रातल्या miss होत होत्या ... तर नुकत्याच एका अधिक महिन्याच्या कार्यक्रमाला हजर असायचा योग आला.   व्याही मंडळींकडे माधवीच्या आत्यांनी अधिक महिन्यानिमित्त ३३ मेहुणांना   जेवणाचा घाट घातला !   वेळेवर कोणी येऊ शकत नाही, अडचण असते, म्हणून थोडी जास्तच म्हणजे ४० वर जोडपी बोलावली होती ... म्हणजे ८० लोक ... !   अधिक महिन्यातल्या प्रत्येक तिथीचं एक मेहूण ... लक्ष्मी-विष्णू म्हणून कल्पिलेलं ...! अशा समारंभाला आपल्याला बोलावणं असणं, म्हणजे केवढा मान, आणि आपलं भाग्य  !   

      जेवणापूर्वी विष्णुसहस्रनाम, गीतेतला ' पुरुषोत्तम योग' हा पंधरावा अध्याय ! भागवतातील काही वाचन !   ऐकून कान तृप्त होत होते ! एरवी ,  फक्त फोटोत पाहिलेली मंजुळ वात आणि ती लावलेलं निरांजन  -तबक !   ती वात बनवण्याचं कसब आणि तो सगळा कार्यक्रम पाहून डोळे  निवले !  त्यानंतर सुग्रास जेवण, दक्षिणा, मोगऱ्याचा गजरा, सौभाग्य वाण, अत्तर इत्यादी उपचार,  gift  ...सगळं अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत ! अशी पाचही ज्ञानेंद्रियं तृप्त झाली ! ..त्यांना खूप खूप शुभेच्छा !!

    ह्याच संदर्भात एक खरी घडलेली गोष्ट !    ३५-३६ वर्षांपूर्वीची .   माझे एक काका-काकू पुण्यातले.   त्यांनी हे व्रत-नेम-समारंभ म्हणा- केला.   त्यांनी एका देवळात ३०-३ मेहूणं जेवायला बोलावली होती.   देऊळ बारा-साडेबाराला बंद झाल्यावर तिथेच सभागृहात पानं मांडली होती.   तयारी चालू होती.   तेव्हाच एक आजीबाई देवळात आल्या.   रोज देवदर्शन करून जेवायचं हा त्यांच्या नेम.   त्यांनी ही सर्व तयारी पाहिली आणि तिथल्या उपाध्यायांना विचारलं की," हे काय चालू आहे ?    कोणतं व्रत आहे ?  त्यानं काय होतं  ? ..". अगदी कथा-कहाण्यासारखं !   उपाध्यायांनी त्यांना सर्व सांगितल्यावर "बरं,  येते " म्हणून निघाल्या.   मनात विचारचक्रं भिरभिरत असावीत.   कर्म-धर्म संयोगाने त्यांना समोरून एक केळीवाला डोक्यावर टोपली घेऊन येतांना दिसला.त्याला थांबवून ,सगळी गोष्ट सांगितली आणि त्याच्याकडून ७० केळी जेवायच्या तयारीपाशी ठेवून दिली.   माझी काकू म्हणाली की," आमच्याकडचं जेवण झालं की मग तुमची केळी देऊ."   मान डोलावून त्या आजीबाई बाहेर आल्या आणि त्या केळेवाल्याला पैसे विचारायला लागल्या.   तर तो म्हणाला, "आजी, खरं तर इतके रुपये झाले, पण तुम्ही त्यातले निम्मेच द्या ... उरलेले पैसे म्हणजे माझंही व्रत समजा  ... मी काही ३०-३ मेहूणं जेवायला घालू शकत नाही, पण एवढं तर करू शकतो !"   आजीबाई म्हणाल्या, "अरे, पण तुझं नुकसान नाही का ? आता तू दिवसभर काय विकणार ? "   तर तो म्हणे, "आजीबाई, सकाळी ५ वाजता गुलटेकडीच्या पलीकडून केळी आणतो.   आज चांगली मिळाली , म्हणून जास्त आणली, पण १२ वाजेपर्यंत एकही केळं विकलं गेलं नाही ... आणि अचानक तुम्ही थांबवलं ... अन सगळा माल एका दमात विकला गेला.  नुकसान कसलं ?   उलट देवाची कृपाच झाली ! एकदम पैसे मिळाले, आणि पुढची पायपीट पण वाचली ... आणि व्रताचं पुण्य मिळालं , त्याचा कसा हिशेब करायचा ... मी आज भरून पावलो !" ....

   ... एवढं समाधान मनात असणं  ... देवाची कृपा याहून ती काय ... ?



- सौ अलका कुंटे, बंगलोर 

  +९१ ८७६२३ १६३८५ 

Comments

  1. उत्तम लेख ! 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot ! 😊

      Delete
    2. अलका नेहमीप्रमाणे कुरकुरीत लेखन खरंच वेगळी माहिती. केळ्यांची गोष्ट भावली. भिडली !
      - विनायक ( अनिकेत) जोशी

      Delete
    3. Thank you , विनू ! 😊

      Delete
  2. अलकाचे चणे कुरमुरे

    पुरुषोत्तम मास

    अलकानं अधिक महिन्याबद्दल सखोल विश्लेषण करून संगतवार माहिती दिली. तिच्यात असलेल्या कोलंबसा मुळे घरबसल्या माहिती मिळाली.दर तीन वर्षांनी येणारा हा अधिकमास आपलं पंचांग एकदम अद्ययावत करतो म्हणून तर त्यात लिहिलेल्या तारखा आणि वेळ अगदी काटेकोर असते. त्याच सगळं क्लिष्ट गणित सोपं करून मांडून अवघड सोपे झाले हो केलंस.

    Alka You are great.

    या विशेष महिन्यात (जावई} दशमग्रहाला जरा जास्त महत्व दिलं गेलय. सासू सासरे स्वतःचा खिसा जाळीदार करून घेऊन जावयाचा उदोउदो करतात.त्याला जाळीदार अनारसे देतात . हल्ली म्हैसूर पाक किंवा घीवर सुद्धा देतात त्याला भारी भारी भेटवस्तू देतात.

    कोल्हापूरमध्ये एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो वजनाची (अंदाजे ४ लाख रुपये किमतीची) खास शुद्ध चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून दिली होती. कोल्हापूरकरांचा नाद खुळा

    पुण्यात लागलेल्या एका फ्लेक्स वर बिल्डरने अधिक मासात जावयाला फ्लॅट द्या अशी जाहिरात करून जावयाच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत.

    माझा जावई मात्र माझ्या सारखाच या सगळ्याच्या विरुद्ध मताचा आहे. ह्या सोपस्कारांना त्याने फाटे द्यायला सांगितले आहेत.

    या महिन्यात उत्सवप्रिय लोक ३०+३ दाम्पत्यांना मेहूण बोलावून त्यांना मिष्टान्न भोजन देऊन वर जाताना त्यांची संभावना असे ब्राह्मण जेवुनी तृप्त झाले, विडा दक्षिणा देउनी बोळविले करून पुण्य पदरात पडून घेतात.

    मालिन मासाचं नाव पुरुषोत्तम मास होण्याची कथा वाचल्यावर मला माझ्या साताऱ्याच्या डिलरची आठवण आली त्यांचं नाव होत पुरुषोत्तम ठक्कर.पण सगळेच त्यांना उत्तमशेठ म्हणायचे.एकदा त्या बद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले अरे आता म्हातारा झालो ना. त्या मुळे आता पुरुष गेला आणि राहीला फक्त उत्तम. आहे ना पुरुषोत्तमची मजेशीर फोड.

    शेवटी एक गंमत

    अधिक मासाच पेन्शन वेगळं मिळणार का ? आणि ठेवीवर या विशेष महिन्याचं व्याज मिळणार का ? असे PJ सुद्धा आले .

    प्रसाद

    ReplyDelete
  3. खूपच छान माहिती पण इतकी वर्ष झाली मी कधी माहेरी पण हा प्रकार ऐकला नाही माझ्या सासरी पण नाही तर पुण्यामध्ये मला तू जास्तच ऐकायला मिळतोय तेव्हा आश्चर्य वाटतंय की आमच्या बहिणी बहिणी जेव्हा आमच्या मुलाचं हे अधिक मासात केलं आणि चांदीची वाटी चांदीचा दिवा आणि 33 प्रकार सगळे खाण्यातले आणि एक ने अजून दोन-तीन जणींनी केलं तेव्हा कळलं मी विचार करायला लागले की हा मी त
    आजपर्यंत आमच्या जावयास असं कुठेच प्रकार केलेला नाहीये आणि त्यांना तो मान्य नाही मुख्य म्हणजे हे नुसतं आपलं तुम्ही गिफ्ट म्हणून काहीतरी द्या आपण हे एवढी जेवण घालणं वगैरे हे सगळे प्रकार अर्थात मलाही जमण्यासारखं नाही मी कशाला पण एखाद्या वेळेला हा प्रकार किंवा असे जेवण चांगले वाटत असेल. पण हे सगळं जमायला पाहिजे आणि मनातनं तीव्र इच्छा असली पाहिजे तरच हे शक्य आहे पण तुझी माहिती सांगितली ते मला फार छान वाटलं धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद !!😊

      Delete
  4. गणितीय क्लिष्ट आकडेमोड एकदम सोप्प्या भाषेत उलगडून मांडलीस.
    त्याव्यतिरिक्त सामाजिक पौराणिक माहिती मनोरंजक !
    आपल्या पूर्वजांना आकाशातल्या घडामोडी बद्दल सखोल ज्ञान होते. शंका नाहीच !
    *तुझी लिहिण्याची शैली छानच असते. तसे प्रत्येक वेळी सांगणे unnecessary वाटते.*
    अभिनंदन !
    लिहीत रहा.
    -अरविंद आपटे , नाशिक.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , अरविंदा !!😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful