... ही वाट दूर जाते ... १


    दीड एक महिन्यापूर्वी आपली  'मेघमीत' ठरली, आणि काय करू न् काय नको , असं मला झालं.   अजून' माडाच्या बनातच' रमलेली मी, आता मेघमीत मध्ये कधी पोहोचले ते कळलंच नाही ! शाळेतल्या मित्र मैत्रीणींबरोबर ! मेघmeet ...बरसात ...पावसाची , गाण्यांची , मजेची , आनंदाची !!! मनात केलेली तयारी हळू हळू प्रत्यक्षात येऊ लागली, आणि बघता  बघता आम्ही सांगलीला शाळेत पोहोचलो.   नेहेमीसारखं  घरून शाळेत वेळेवर पोहोचावं तसं !   तिथून प्रसादच्या घरी पोहोचलो आणि आपली ट्रिप खरंच सुरु झाली !   मजा, जोक्स, हसणं  ... मी तर बाहेर चपलांबरोबर सगळा औपचारिकपणा टाकून कधी घरची झाले ते मला कळलंच नाही. Thanks to   स्नेहा, रिद्धी आणि भारती  !!! डाळिंब्यांचा भात , अंजीर रबडी ....! मग रात्री फ्रुट सॅलड ...!! इच्छा भोजन !!!...

    दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहाने मंडळी निघाली ! मुली अगदी गजरे घालून !  इडली ,वडा शिरा , बटाटेवडा ....!!  मजा करायचीच  , हवं ते करून !   बघता बघता साताऱ्याचं  प्रियांका शू मार्ट आलं आणि shopping ला उधाण आलं !   खरंच, एरवी शॉपिंग म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो ! ... तिथे १५ - २० मिनिटात माझ्याही हातात एक चपलांची बॅग !   मलाच प्रश्न  पडला की , ही मी तीच आहे का नेहेमीची !   

    तिथे आपल्याला पुण्या - मुंबईच्या मित्रांच्या गाड्या join झाल्या आणि पुढचा प्रवास सुरु झाला !  गावं खेडी मागे पडली आणि आपण त्या आपल्या स्वप्नातल्या गावाकडे निघालो !   आपली वाट चालली होती ...दूर दूर दूर ... हिरवे गार डोंगर दऱ्या, हिरव्याच्या किती shades, त्यात शेतं आली, लहान मोठी झाडं झुडपं, मधेच त्यात रंगीत ठिपके, रस्ता हळू हळू अरुंद होत होता.   थोड्याच वेळात दोन नंदी असलेल्या येवतेश्वराच्या देवळाशी पोहोचलो.  दर्शन घेऊन कासच्या पठाराच्या वाटेने पुढे निघालो.   कासच्या धरणाच्या पायऱ्या, त्यावरून वाहणारं पाणी, अधून मधून दिसणारी वेगवेगळी पांढरी फुलं आणि तुरे !  फोटो काढू का डोळ्यांत साठवू ?  कॅमेरा ऑन करून डोळ्यांनी कुरणं पहात  ... वाट चालू होती !...

    वाटेत आता पाऊस धुकं सुरु झालं !   अरे काय मेघमीत आहे ना, मग पाऊस धुकं हवंच !   आणि धुकं नव्हे खरे खुरे ढगच !  ते इतके खाली आलेले की डोंगरावर आणि आपल्या उंचीला !  '....जेथे मिळे धरेला आभाळ वाकले ते' .... आहा, किती सुंदर त्यातून आपण निघालेलो स्वप्नांच्या गावात !  ....जेथे खुळ्या ढगांनी रंगीत साज ल्यावा ... पण ढगांचा स्वतःचा शुभ्र साज इतका सुंदर की अजून रंग कशाला हवेत ? ... 

    तिथून पुढे निघालो, म्हणायला २४ - २५ किलोमीटर अंतर,  पण आमचं गाव काही येईना. वाटेत विचारलं तर 'हे पुढे आहे' आणि अंतर विचारलं तर असेल १० - १५    किलोमीटर.    "अजून १५ किमी ?   काहीतरी खाऊया का ?   हां , उघडा एखादा डबा ..". असं करत हळूहळू डबे आणि चिवड्याची पाकिटं उघडायला लागली !   वाट आपली चालली होती ! मग आलं पत्ता विचारणं.  रस्त्यात कुठेही बोर्ड नाही, दुपार झाली म्हणून माणसंही नाहीत,  मग उलट्या दिशेने जाणाऱ्या गाडीला,  मोटरसायकल वाल्याला हात दाखवून थांबवून विचारणं ... आणि त्यांनी १५ किमी म्हटलं की एकच हशा ! ते १५ किमी काही संपेचनात ... त्या लोकांचे हातवारे पाहून ते काय म्हणत असतील असं guesswork , ... memes सारखं ! हसून हसून पुरेवाट ... मात्र आता जरा जरा धीर सुटायला लागला, भूक पण लागायला लागली.   येऊ दे रे बाबा लवकर आमचं गाव !  किती वळणांवर गाडी वळली मोजमापच नाही ... मालती पांडे यांना सुध्दा त्या गाण्याचा वीट आला असता !   ...आणि एकदम आपला रिसॉर्ट दिसला !  लाल लाल कौलारु  छप्पर ... खेड्यामधले घर कौलारु  ... !     

    एवढा प्रवास झाल्यावर , जेवण गोड लागणारच !    जेवण वगैरे झाल्यावर खरा सुरु झाला गप्पांचा फड !   सुरुवात गाण्यांनी, खरं म्हणजे सगळी ट्रिप ही गाण्यांचीच होती !   दर वेळी, त्या वेळेला शोभेल असं गाणं फिट्ट बसणारं !   किती गाणी म्हटली कोण जाणे, ...  मनमुक्त गीत गावे ! .....  हसणं , गाणं , खेळ आणि freaking out !   कधी केलं नसेल ते करून घ्या !   सगळे आपले मित्र !   आपला मित्र विनायक ( अनिकेत ), त्याला मिळालेला पुरस्कार आणि आधी प्लॅन करून केलेलं त्याचं कौतुक !   मित्र असावेत तर असे !   सगळेच आपापल्या क्षेत्रात माहीर ! दिलखुलासपणे एकमेकांच्या कौशल्याला दाद देणारे ! कौतुक करणारे ..!!!......पुन्हा एकदा Congrats  विनू आणि स्मिता !...




Comments

  1. किती सुंदर वर्णन ! अगदी मेघोत्सव !

    ReplyDelete
  2. Khub.chan lila ahey tu.,mast👌👌

    ReplyDelete

Post a Comment