चित्रकला
कालच एक गाणं ऐकलं. जुनंच . "यह कौन चित्रकार है, यह किस कवीकी कल्पना ... " सिनेमातलंच ! बाकी details जाऊ द्या ... पण एखादं सुंदर चित्र, आणि त्याचा निर्माता / निर्माती यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं ..त्यांचं नाव माहीत असो का नसो ... चित्र सुंदर आहे का नाही हा प्रत्येकाचा आपला आपला विचार ... पण ते काढणाऱ्याची किमया नक्कीच सुंदर ! जे वाटतंय ते कागद किंवा तत्सम कशावर तरी उमटवू शकतोय ... एक विचार, कल्पना मनात येते ... हळूहळू आकार घेते ... मग ती कागदावर उतरते ... असा हा चित्राचा जन्म - प्रवास ! आपली कल्पना मांडण्याची इच्छा, पद्धत ... !
इतिहासपूर्व काळ, किंवा पुरातनकाळ किंवा undocumented काळापासून आपल्याजवळ ही कला आहे. कोकणात रत्नागिरी , सिंधुदुर्ग परिसरात आजकाल खूप कातळशिल्प सापडत आहेत. पठारावर कोरलेली चित्रं ... प्रचंड मोठी चित्रं . शेजारपाजारच्या खेड्यातले लोकं त्यांना राक्षस चित्रं म्हणतात. त्या काळी कागद नव्हता , म्हणून दगडावर कोरली . त्यांना कातळ - चित्रं म्हणायला हवं . साधारण ३३,००० वर्षांपूर्वी म्हणजे mesolithic काळात ही चित्रं काढली - कोरली. त्यात प्राणी, पक्षी, मासे, झाडं सगळं आहे ! आणि, त्यावर सध्या संशोधन चालू आहे. तशीच भीमबेटका इथली चित्रं. कुणी काढली, केव्हा काढली, हे सामान्य माणसाला तरी माहीत नाही. जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे गुहांमधे वगैरे मनुष्यवस्ती होती आणि तिथे चित्रकला सापडते. कधी दैनंदिन जीवन, कधी काहीतरी स्पेशल 'वेगळी' घटना किंवा काही rituals - नाच वगैरेची चित्रं . त्यात गेरू, झाडांची पानं कुटून केलेला हिरवा रंग, निळीसारखे पदार्थ, काही प्राणिजन्य रंग ... कारण चित्रकले बरोबर रंगकला ही येणारच ... तिची जुळी बहीण म्हणून ... ! हे माझं मत. त्याचं एक उदाहरण म्हणजे अजिंठा ! तिथली चित्रकला-रंगकला तर सर्वश्रुत आहेच !...पण , खूप नंतरच्या काळात .
आपल्या पुराणातल्या गोष्टींमधे ( इतिहासात ) उषा-अनिरुद्धाची गोष्ट आहे. राजकन्या उषेला एकदा स्वप्नात एक सुंदर राजबिंडा युवक दिसला ... तिने ही गोष्ट आपली सखी चित्रलेखा हिला सांगितली. चित्रलेखा ही नावाप्रमाणे चित्रकलेत प्रवीण. तिने श्रीकृष्णाचे चित्र काढले. उषा म्हणाली, "हा नाही, पण थोडा असाच ", ... मग चित्रलेखेने प्रद्युम्नाचं चित्र काढलं, तर उषा म्हणाली, "खूपच मिळता - जुळता ", मग चित्रलेखेने अनिरुद्धाचं चित्र काढलं ... आणि मग उषेचं स्वप्न खरं झालं ... पण चित्रलेखा ... कृष्ण, प्रद्युम्न यांची चित्रं ती काढू शकत होती ... ! मला तिचंच जास्त कौतुक वाटतं ! ... इथे आपण पावसाचा सीन काढू पहावा, आणि ढग इतके काळे काळे की बघणाऱ्याला वाटावं की रात्रच काढलीय ... असो ...
त्यानंतरच्या काळात अजिंठा सारखी काही ठिकाणं सोडली, तर सगळा भर चित्रकाळेपेक्षा लेण्यांवर होता. जास्त टिकाऊ पण वेळही तेवढाच जास्त. मधल्या हजार दोन हजार वर्षांत लेणी आणि लेण्यांचंच जास्त sophisticated किंवा सामान्यांच्या आवाक्यातलं असं, म्हणजे उत्तम शिल्पकला असलेली मंदिरं दिसतात. ती रंगवायची जरूरच नाही. ही लेणी मला चित्रकलेचं ३D स्वरूप वाटतं . त्यात चुकीला माफी नाहीच ... !! मुगलांच्या काळात त्यांनी अनेक सुंदर वास्तू बांधल्या, त्यात चित्रकलेपेक्षा inlay कामच जास्त. दगडाच्या ऐवजी संगमरवर, कोरीवकामात खरी रत्न, पितळेच्या, सोन्या-चांदीच्या तारा वापरून सुंदर कलाकुसर ... चित्रकलेचं आणखीन एक रूप ... असंच मला वाटतं ! दुर्दैवाने ज्यांनी हे केलं, त्यांचं नाव कुठे राहीलंच नाही ...
नंतर ... आपला इतिहास पुरेसा पुसून टाकल्यावर युग आलं ते पाश्चात्यांचं ! Michaelangelo , Rembrant, Van Gogh , Monet यांची चित्रं खूप प्रसिद्ध झाली. ती चित्रं आहेतच सुंदर ! एका कादंबरीत - Agony and Ecstacy - मध्ये मायकेलअँजेलो यांचं चरित्र - त्यात त्यांचे प्रयास, चित्रकला, मूर्तीकला यांना वाहून घेतलेलं आयुष्य हे समजलं ! da Vinci ह्यांच्या बद्दल आपण काय बोलणार ? Mona Lisa - जी जगभर कुठेही दिसते आपल्याला ! अगदी पानपट्टीच्या ठेल्यापासून ते मोठमोठ्या महालात तिची प्रतिकृती दिसते ... आणि Louvre तर तिचं देऊळच म्हणावं लागेल !...
... एखादे वेळी असं होतं, की आपण एखादं चित्रं पहातो आणि ते अतिशय आवडतं ! का ? माहीत नाही ...कोणते निकष ... माहीत नाही ... पण आवडलं चित्र ! त्यातलं काहीतरी पटलं ... काय पटलं ते माहीत नाही ... तसं माझं साल्वेदोर दली यांचं एक चित्र पाहील्यावर झालं ! त्यात सगळीकडे घड्याळं आहेत ... जिथे पहावं तिथे घड्याळं ... त्या चित्राने मला झपाटल्या सारखं होतं ... ! van Gogh यांचं starry night सुद्धा माझं खूप आवडतं आहे. तसंच एक फ्लॉवरपॉटचं चित्र मी कुठेतरी पाहिलं, आणि ते पहात बसावंसं वाटलं. आपली नजर सगळ्या फुलांवरून फिरते, पानांवरुन हिंडते आणि पुन्हा त्या फ्लॉवरपॉट वर येते. तिथून पुन्हा सगळं चित्र हिंडून पुन्हा तिथेच ! सुर्यफुलं असलेला फ्लॉवरपॉट ...३-४ तरी महान चित्रकारांनी हे चित्र काढलं !! Picasso ची चित्रं न समजण्यासारखी ... Guernica ... आपली नजर तिथेच खिळून का रहाते हे कोडंच. मला ते चित्र आवडत नाही ... पण तरी पहात असते मी ... त्यातल्या बाई(?)चं दुःख ...
जगभर हिंडून फिरून माणूस परत आपल्या घरी येतो , तसं , मी पुन्हा परत येते ती राजा रविवर्मांच्या चित्रांच्या पायाशी ... ! अक्षरशः !! केरळ मधल्या एका राजघराण्यातले ते ... चित्रकलेच्या प्रेमापोटी मुंबईला आले ...आणि, आपल्या देवांना कागदावर रूप मिळालं. त्या काळी प्रिंटिंग अगदीच रांगतं बाळ होतं, फोटो हा पर्याय जवळ जवळ नव्हताच, पण हळूहळू प्रिंटिंग सुधारलं आणि परवडेल असं पण झालं ... आणि आपले देव घराघरात - फोटोफ्रेम रूपात पोहोचले. महाराष्ट्रात तर असे एकही घर नसावे, जिथे लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांची 'combined' फोटोफ्रेम नसेल !
राजा रविवर्मांची चित्रं एकसे एक. आपल्या पौराणिक कथांच्या सर्व नायिका त्यांनी कागदावर साकारल्या. दमयंती, शकुंतला, सीता, द्रौपदी पासून त्यावेळच्या तिथल्या संस्थानाच्या, दक्षिण भारतातल्या राण्यांपर्यंत एकसे एक paintings ! प्रत्येक नायिकेचा चेहेरा वेगळा ... आणि सुंदर दागिने, कपड्यांच्या चुण्यांपासून ते हातावरच्या रेषांपर्यंत ... सगळं ... जसा काही फोटो !!! असा हा सिद्धहस्त कलाकार ... ! त्यांचं नाव कुणाला एक 'टायटल' म्हणून, गौरव म्हणून वापरलं जावं ... एवढी थोरवी ... !!!!....
आणि झालंही तसंच ! कोल्हापूरचे एक चित्रकार-रंगकार ... हळदणकर ! लहानश्या गावातले पेंटर ... असं त्याकाळी वाटत होतं ... आता नाही ... ते आपल्या धाकट्या मुलीला दिवा घेऊन जातांना पहातात काय ... तिला तशीच उभी रहा म्हणतात काय ... आणि एक अप्रतिम, अजोड चित्रकृती - Lady with the lamp - निर्माण होते काय ... आणि ते इतकं प्रसिद्ध होतं की लोकं डोळे झाकून त्या चित्राला 'राजा रविवर्मांचं ' म्हणून जाहीर करून टाकतात ... !!! हो, डोळे झाकून शब्दशः ... कारण चित्र कोणी काढलं हे वाचलंच नाही, पाहीलंच नाही ... ! तेव्हा हळदणकरांना काय वाटले असेल ... छान वाटलं का राग आला ?.. राग नाही येणार ... इतक्या सुंदर कलाकृतीला जन्म देणारा, मनाने देवाच्या इतक्या जवळ पोहोचलेला असतो की त्यात नकारात्मक भावनांना जागा असणं शक्यच नाही ... !
त्यानंतरच्या काळात दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकरांची चित्रं ... कॅलेंडरवर ... शिवाजी महाराज आणि त्यांचा घोडा ! अशी खूप चित्रं ... नंतर मग M F हुसेन ... त्यांचं घोड्यांचं चित्र आणि अनेक. त्यांची चित्रं खूप famous झाली, आणि बरीच infamous पण ! त्यांच्या एका चित्रा बद्दल खूप गदारोळ झाला. ... पण , खजुराहो आणि बाकीही सर्व मंदिरातील शिल्पं हौसे हौसेनं बघायला जाणाऱ्या मंडळींना ते एक चित्र का खटकलं कोण जाणे ... तो कुणाचा अवमान नव्हता, ते त्यांचं expression होतं ... मला आवडणारं त्यांचं चित्र म्हणजे बाळकृष्णाचं झोळीतलं चित्र ... इतकं गोड बाळ आणि यशोदा ! ...
R K Laxman यांची व्यंगचित्रं म्हणजे तर चित्रकलेचा एक वेगळा प्रांतच आहे. ती चित्रं मी नक्कीच पहाते . त्यांच्याच तोडीचा व्यंगचित्रकार म्हणजे Mario Miranda ! अशीच एक खूप आनंददायी चित्रकला म्हणजे चारुहास पंडितांचा 'चिंटू' . चिंटूची चित्रं पाहिली की सगळा शीण नाहीसा होतो ! शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, प्रभाकर ठोकळ यांच्या व्यंगचित्रांनी आपल्याला खूप रिझवलं, अनेक गोष्टी tolerate करायची शक्ती दिली, आपल्याला हसायला शिकवलं ... ! मी कॉलेजात असतांना असाच एक cult होता ... Kim यांची 'Love is' cartoons . ही चित्रं तेव्हा खूप पॉप्युलर होती.
ह्यात एक उल्लेख करावासा वाटतो तो त्या कलाकारांचा, जे हात नसल्यामुळे , तोंडात किंवा पायाच्या बोटात ब्रश धरून चित्रं काढतात आणि त्यात रंग पण भरतात. असे कलाकार आहेत आणि त्यांची संस्था Association of Mouth and Foot painters , त्यांच्या कलाकृती वापरून कॅलेंडर्स आणि ग्रीटिंग कार्ड्स बनवते आणि त्यांच्याकरता उत्पन्नाचे साधन होते. ह्या कलाकारांबद्दल मला नितांत आदर आहे !
काही अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सोडले , तर मधल्या काही वर्षातल्या चित्रकारांची तर नावंही माहीत नाहीत, इतकी दूर गेले आहे ह्या कलेपासून ! गायतोंडे , रवी परांजपे ! परांजपे यांचं एक चित्र माझ्याजवळ आहे . अगदी जपून ठेवलं आहे नवीन घरात लावायला ! आणि , मिलिंद मुळीक यांची सगळी पुस्तकं आणून ठेवली आहेत , painting शिकायला ..!!!
लहानपणी join the dots नी ती सुरु झाली. मग magic painting book - पाण्यात ब्रश बुडवून चित्राला लावला की ते रंगीत व्हायचं. असा प्रवास सुरु झाला. मग रांगोळी - ठिपके जोडून, तर कधी त्यांच्या अवती-भवती, मग बहिणीच्या आणि स्वतःच्या हातावर आगपेटीच्या काडीने मेंदी ! त्यानंतर आपल्या साडीवर, ड्रेसवर डिझाईन काढणं ... थोडीफार fabric paint ने पुताई ... ... असं करत ... जमेल तेव्हा, जमेल तसं, करत माझा हा चित्रकलेचा प्रवास चालू आहे !
पण मी माझ्या ह्या हौशीकरता एक वाट शोधली आहे ... वारली पेंटिंग ... महाराष्ट्रातील आदिवासींची कला. ह्यात साध्या सोप्या सरळ रेषांमधे त्यांचं सगळं जीवन, दिनचर्या नोंदवून ठेवली आहे. आदिवासींनी जपलेली जिवंत कला आहे ... पूर्वापार चालत आलेली प्रतीकं, चित्रं आणि एका ठराविक साच्यातली - थोडीफार stylised अशी ही कला आधुनिक गोष्टींनाही जागा देतेय. आजकाल ह्यांच्या चित्रांत विमानं आहेत, सायकल दिसते, गाडीसम काहीतरी ... अशा गोष्टी दिसतात. मला हे पेंटिंग कितपत जमतं, हा वादाचा विषय असेल ही ,पण ते करतांना मला खूप मजा येते ... !!
चला, आता इथेच थांबते ... नात शाळेतून यायची वेळ झालीय ... आज ती मला zentangle शिकवणार आहे ... म्हणजे काय कोण जाणे ... आपलं काम काय ... ती शिकवेल ते शिकायचं ... कारण ....तिचं drawing माझ्यापेक्षा चांगलं आहे ... असं सगळे म्हणतात ... माझी मुलं सुद्धा ... !!!
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
*अलकाचे चणे कुरमुरे*
ReplyDelete*चित्रकला*
अश्मयुगापासून माणूस उत्क्रांत होत असताना भाषा विकसित झाली नव्हती तेंव्हा एकमेकांशी संवाद साधायला चित्रलिपीची सुरवात झाली असावी. आणि माणसाने निसर्गात दिसणाऱ्या गोष्टी चित्रबद्ध करायला सुरवात केली. सुरवातीच्या काळातली चित्रकला अगदीच ओबडधोबड असली तरी संवाद साधायला पुरेशी होती त्यातूनच अलकाने लिहिल्याप्रमाणे कातळशिल्प आकाराला आली. काळ जसा बदलत गेला तशी चित्रकला बदलत गेली त्यात रेखीवपणा येऊ लागला. कागदाचा शोध लागण्यापूर्वी भूर्जपत्रावर चित्र चितारली जाऊ लागली. इजिप्त मधल्या पिरॅमिड मध्ये पपायरस च्या पानावर चित्र काढून माहिती लिहिली जायची.
आता जरा अलीकडच्या काळात जाऊया .
एका राजाला एक डोळा नसतो. त्याला स्वतःच चित्र काढून पाहिजे असत. एक चित्रकार राजाला दोन्ही डोळे असलेले चित्र काढतो, ते बघून राजा चित्रकाराला हाकलून देतो. थोड्या दिवसांनी दुसरा चित्रकार एक डोळा नसलेलं चित्र काढतो, ते बघून व्यंग जाहीर केलंस म्हणून त्यालाही हाकलून देतो. नंतर एक हुशार चित्रकार येतो आणि राजाचे मृगया करत असताना नेम धरत असलेले चित्र काढतो. त्या मुळे एक डोळा बंद असला तरी चित्राला बाधा येत नाही आणि राजा संतुष्ट होऊन चित्रकाराला भरपूर बिदागी देतो
नावाजलेल्या बऱ्याच चित्रकारांची भली मोठी यादी तुझ्या लिखाणात आली आहेच त्यात थोडीशी भर घालतो. आपलं बालपण चांदोबा मासिक वाचण्यात गेलं त्यातली रेखीव चित्र आजही चटकन डोळ्यापुढे येतात.वर्षानुवर्षे विक्रम आणि वेताळ तसाच होता.
वसंत सरवटे यांनी पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली कशा असतील ते दाखवलं. तर अनिल अवचटांनी एकदा बोलताना सांगितलं की, त्यांना शान्ता शेळक्यांचं चित्र काढायचं होत तर त्या म्हणाल्या, "अरे सोपं आहे माझं चित्र काढणं एक मोठं गाठोडं काढायचं आणि त्याच्यावर दुसरं छोटा गाठोडं काढायचं की झालं माझं चित्र.सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर उत्कृष्ठ चित्रकार आहे. त्या वर्णनावरून रेखाचित्र ते काढू शकतात. पोलीस तपास सुरु असताना त्यांनी अशी रेखाचित्र काढली आहेत.
त्रिमिती चित्रकला हा आणखी एक वेगळाच प्रकार आहे यात चित्रांना जिवंतपणा आणला जातो. याला लोकांची पसंती असते.
पुलंनी पानवाला हे व्यक्तीचित्र लिहिताना त्याच्या गादीवर असलेल्या चित्राचं अफलातून वर्णन केलं आहे..ते लिहितात,आकाशात विमान आहे, विमानातून बाहेर डोकावणारा पायलट आहे, पुलावर आगगाडी आहे आणि खालच्या पाण्यात गलबत आहे ,त्यात कमळ फुललं आहे .खाडीच्या कडेला राजवाडा आहे त्यावर वेलकम असा बोर्ड आहे. राजवाड्यातल्या बागेत श्रीकृष्ण पावा वाजवतोय आणि राधा आगगाडी कडे पहाते आहे. हे चित्र पाहून ते म्हणतात स्थळ,काळ, वेळ कशालाही न जुमानता काढलेले हे चित्र पाहून मी धन्य झालो.
चित्रपटसृष्टी देखील चित्रकारीच्या प्रेमात असते म्हणून त्याचे गीतकार लिहितात
*जो बात तुझमे है,'तेरी तसबीर मे नही* ,
*तसबीर बनाता हू ,तसबीर नही बनती*
*मानसीचा चित्रकार तो,तुझे निरंतर चित्र काढतो*
मॉडर्न आर्ट हा एक चिंतनाचा विषय असलेला चित्र प्रकार. हे चित्र म्हणजे कॅलिडोस्कोप सारखं असत. बघणाऱ्या प्रत्येकाला त्या चित्राचा वेगवेगळा अर्थ जाणवत असतो आणि माझ्या सारख्या सामान्य लोकांसाठी ही चित्र म्हणजे डोक्यावरून जाणाऱ्या बाउन्सर बॉल सारखी असतात.
आता जमाना बदलला. नवीन क्रांती झाली आणि आता तर आर्टिफिशल इंटीलिजन्स च्या माध्यमातून चॅट जीपीटी मुळे काहीही करता येऊ लागलंय.
माझं पाल्हाळ संपवताना तुझ्या या लेखाच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीची आठवण आली. तिच्याबद्दल लिहिलं नाही तर सगळंच व्यर्थ होईल. आपण सारेजण हात थरथरायच्या वयात आल्यावर आपली ही मैत्रीण आता चित्रकला शिकते आहे. आहे ना ग्रेट मैत्रीण. बस नाम ही काफी है
*संध्या आराणके*
प्रसाद जोग.