चित्रकला - २
आपण जेव्हा एखादं चित्रांचं प्रदर्शन बघायला जातो, तेव्हा एका वेगळ्या जगात पोचल्यासारखं वाटतं ! एक चित्र म्हटलं, तर त्या मागचा विचार तर सोडाच, पण ते काढतांना किती गोष्टींचा विचार करावा लागत असेल, असं वाटतं ! कोणतं माध्यम, कसा surface, त्याचं काय मटेरियल, कोणते रंग, कोणती शैली ... किती पैलू एका चित्राचे !
आता आपण चुनखडी, गेरू इथपासून कुठल्या कुठे पोचलो आहोत ! रंगीत माती - minerals चे प्रकार, water-colors, oil paints, acrylic paints, इतकंच नव्हे तर transparent - पारदर्शक paints ... अजून कसले कसले paints, त्यासाठी लागणारं नवनवीन साहित्य, ब्रशने पेंट करायचं एवढंच नाही तर आता चाकू सुद्धा आणि thumb and finger painting म्हणजे लहानपणी रंगात हात बुडवून करत होतो त्याचा official प्रकार ! आणि हे साहित्य बनवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या ! surface म्हणाल, तर सारवलेल्या जमिनी पासून special effects दिलेल्या भिंती ते काचेचे panels ! चित्राच्या शैलीचेही किती प्रकार नवे-जुने आदिवासी style, कलमकारी, फुलकारी,मधुबनी,कांगरा, राजस्थानी ... नुकतीच मैत्रिणीच्या मुलीने काढलेली तंजावर शैलीची चित्रं पाहिली, त्यात तिने सोन्याची पूड असलेला पेंट वापरला होता ! semi-precious खडे आणि रत्नांची पूड असलेले पेन्ट्स मायकेलअँजेलो यांनी Sistine chapel चं ceiling पेंट करतांना वापरले..... आता तर अगदी miniature चित्रांपासून ते मोठमोठी मुरल्स !!!... जितक्या खोलात जावं तेवढं कमीच !...
पण हे सगळं हाताशी नसतांना, कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात आपल्या मनातली कल्पना किंवा विचार रेखाटायचे आदिवासी ! वारली चित्रकला ! केवळ सरळ रेषा, गोल, त्रिकोण, ह्यांच्या placement वरून आपलं आयुष्य, दैनंदिन जीवन, भाव-भावना दाखवायच्या ! अगदी आळशी माणूस, कामातला माणूस, राग, वैताग, माया, आनंद-दुःख इथपर्यंत !
कदाचित हाच विचार पुढे जात, चित्रकलेचं एक diversification किंवा deviation अस्तित्वात आलं असावं ... चित्रलिपी आणि त्यानंतर लेखनकला ! जसजसा माणूस समूहाने राहू लागला, टोळ्या करून हळूहळू त्यांना माहीत असलेल्या जगाबाहेर विखरू लागला, तेव्हा त्यांचा एखादा प्रमुख किंवा म्होरक्या आलाच ! आणि थोडेफार नियम,कायदे, नोंदवून ठेवण्यासारखे प्रसंग, महत्वाची माहिती हे सर्व फक्त स्मरणशक्तीवर अवलंबून न राहता, काहीतरी कायम स्वरूपी व्यवस्था असावी ,अशी जरूर भासली असावी आणि ह्या विचारधारेतून चित्रलिपीचा उगम झाला असावा ... !
चित्रलिपी ! इ.स.पू. ३,२०० च्या सुमाराला आताच्या इराण-इराक भागात सुमेरियन संस्कृती होती. त्यांनी जगातली पहिली चित्रलिपी केली. Cuneiform लिपी ! उलट सुलट शंकू, सरळ रेषा अशी चिन्हं असलेली लिपी. त्यानंतर आलेल्या बॅबीलॉन संस्कृतीने ही लिपी आपलीशी केली. त्यांचा राजा हम्मुराबी याने केलेले नियम, कायदे, इतर टोळ्यांशी-राज्यांशी करार, व्यापार-उदीम, त्याचे हिशेब हे सगळं त्याने ह्या लिपीत लिहून घेतले. दगडाच्या लेखणी-पेन्सिल सदृश्य तुकड्यांनी किंवा बांबूसारख्या टणक गवताच्या काड्यांनी ओल्या मातीच्या पट्ट्यांवर शंकू-रेषा काढून , मग ते वाळवून हे केलं गेलं ... आणि लेखणी जन्माला आली ! त्याही नंतरच्या असिरिअन लोकांनी पण ही लिपी जिवंत ठेवली !
चित्रलिपीचं एक अति सुंदर उदाहरण म्हणजे इजिप्शीयन लोकांचे hieroglyphs ! इ . स. पू .3000 ! निसर्गातले पक्षी, प्राणी, सूर्य, झाडं, इतकंच नव्हे तर आपले डोळे वगैरे आणि इतरही गोष्टी तलवारी वगैरेची प्रतीकं वापरून हे hieroglyphs तयार केले ! ही चित्रं papyrus च्या पानावर काढली जात आणि ती टिकाऊ पण असायची, आपल्या भूर्जपत्रांसारखी ! एक उदाहरण, डोळ्याचं चित्र म्हणजे ' मी पाहिलं' किंवा 'मला दिसलं' अशा अर्थी !
त्याच सुमाराला भरभराटीला आलेली आपली सिंधू संस्कृती ! हडप्पा इथे सापडलेल्या नाण्यांवर, ठशांवर ही लिपी आहे. अक्षरं आणि आकडे पण आहेत. काही तामिळ अक्षरांशी साम्य आहे, पण ही लिपी अजून वाचता आलेली नाही. निसर्गाचा घाला म्हणा किंवा सरस्वती नदीचं पात्र बदलणं, परकीय आक्रमण अशात ती संस्कृती लयाला गेली आणि ती लिपी नामशेष झाली ...
आपल्या देशात इतक्या भाषा आहेत आणि त्यांच्या लिप्याही खूप वेगवेगळ्या ! आपण संस्कृत, मराठी, हिंदी देवनागरी लिपीत लिहितो. पण सम्राट अशोकाच्या काळात त्याचे शिलालेख, स्तंभ ह्यावर लिहायला धम्मलिपी वापरली होती. धर्म प्रसाराकरता वापरल्यामुळे हिला धम्मलिपी असे नाव दिले गेले. पुढे हीच ब्राम्ही लिपी म्हणून नावारुपाला आली.
आपल्याला माहीत असलेले सर्वात जुने लिखित महाभारत हे काश्मीर प्रदेशातल्या शारदा लिपीत लिहिलेले आहे. त्यातूनच पुढे मैथिली, नेपाळी, बंगाली, देवनागरी वगैरे लिप्या आल्या. पुरातन तेलगू लिपीपासून दक्षिण भारतीय लिप्या आल्या !
Slavic किंवा पूर्व युरोपिअन लिप्यांमधे आणि roman लिप्यांमधे बरंच साम्य असतं ... पण चिनी-जपानी लिप्यांचं जगच वेगळं. अक्षरांपेक्षा एक चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दसमूहाचं, वाक्प्रचाराचं प्रतीक ... ते लिहिणं म्हणजे काढणं आणि वाचणं तेच जाणोत ... उभ्या आडव्या आणि एकमेकींना छेदणाऱ्या रेषा ... लक्षात कसं ठेवायचं ... फारच किचकट ... आपल्याला झेपत नाही ... !
आपल्या लहानपणी अजून एक अशीच सुंदर , सोयीची अशी लिपी अस्तित्वात होती ! अनेक जण ती शिकले ! कधी हौस म्हणून ,तर कधी गरज म्हणून ! सुमारे 50 वर्षांपूर्वीची लिपी ....short hand ! अनेक कुटुंबांना या लिपीने पोटापाण्याचा व्यवसाय दिला , जगायला हातभार लावला , आयुष्य तारून नेली... ! आता मात्र ही पण लिपी कालबाह्य झाली आहे .
आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी गोष्ट. आपली घटना ! ती मूळ हस्तलिखित आहे ... हिंदी आणि इंग्रजीत ! घटनेचे मुखपृष्ठ शांतिनिकेतन इथले प्रसिद्ध चित्रकार श्री नंदलाल बोस यांनी सोन्याच्या रंगानी काढले आहे. त्यावर आपली सगळी राष्ट्रीय प्रतीकं आणि नक्षीदार वेलबुट्टी आहे. आतल्या पानांचे समास, borders त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेले आहेत. आणि दोन्ही भाषांतील घटना श्री प्रेमबिहारी रायजादा यांच्या हस्ताक्षरात आहे !
चित्रलिपीचा अजून एक सुंदर आविष्कार म्हणजे calligraphy ! सुंदर, रेखीव, वळणदार अक्षरं ... आणि त्यांचं मूळ स्वरूप न बदलता त्यावर नक्षीचा साज चढवणं ... ! हे करायला चित्रकला यायला हवी, नव्हे चित्रकाराचं मन हवं ! आणि ...आपलं स्वतःचं वेगळेपण दाखवणारी प्रत्येकाची आपली सही ! !!! Graphology जाणणारे लोक त्या सहीवरून आपला स्वभाव, मानसिकता, आणि वागणूक जाणू शकतात. आपल्या मनाचा एक आरसाच हा !...
पण .... माझ्यापुरता चित्रकला आणि लेखनकला यांचा परस्पर संबंध मला माझ्या मुलांनी शिकवला ! थोरला लहान असतांना तो छोटी छोटी चित्र खूप काढायचा आणि म्हणायचा, "....चित्र बघ, मग तुला कळेल ... ". ह्या उलट धाकट्याचं ! तो KG मध्ये A, B, C, D शिकत होता, तेव्हा एक दिवस शाळेतून आल्यावर मला म्हणाला, "thank God , मला आता C-A-T असं लिहिता येतं ... नाहीतर, दर वेळी माऊचं चित्र काढायचं म्हणजे किती पंचाईत झाली असती माझी ... " !
तेव्हा कॉम्पुटर किंवा मोबाईल फोन असते , तर मी त्याला एक smily किंवा ठेंगा असं latest चित्र लिपीत उत्तर दिलं असतं ....!!!!
ता.क. : आताच चेन्नईच्या The Hindu ह्या वर्तमानपत्रातली बातमी गुगलने सांगितली की साधारण दोन हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या काही पिरॅमिड मधे दक्षिण भारतातील लोकांनी तामिळ सदृष लिपीत 'मी इथे होतो' असे कोरलेले आहे आणि हे एक नाही अनेक जागी आहे.
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+ ९१ ८७६२३ १६३८५
वाह्.... उत्तम लेख..... दोन लेखांत 5000 वर्षांचा चित. रकमेचा आणि लेखन कलेचा उहापोह केलास...... 👏👏👏
ReplyDeleteखूप छान माहिती पूर्ण लेख आणि शेवटचं जे आहे की तमिल अक्षर किती सापडली म्हणजे लोक कुठून कुठपर्यंत गेली असावी असा अंदाज येतो
ReplyDeleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteचित्रकला - २
कविवर्य वि.वा.शिरवाडकरांची क्षमा मागून
चित्र कशावर काढावं ?
चित्र कशावरही काढावं
चित्र कुब्जेच काढावं
चित्र मेनकेच काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र गोंदून काढावं
चित्र मेंदीने काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र मयसभेत फजिती झाल्याचं काढावं
चित्र शरपंजरी भीष्माचार्यांचं काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र अणुबॉम्बच्या स्फोटात जखमी झाल्याचं काढावं
किंवा मुंबईवर हल्ला झाला त्याच काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र हनुमंताच्या हृदयात असलेल्या श्रीरामाच काढावं
चित्र राधेच्या हृदयात असलेल्या श्रीकृष्णाचं काढावं
चित्र कशावरही काढावं
ज्याला तारायचं,त्याच्यावर चित्र काढावं ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही चित्र काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र बाणानं घायाळ झालेल्या सावजाच काढावं
चित्र मदनबाणांन विद्ध झालेल्याच काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र कागदावर काढावं
चित्र कॅनव्हास वर काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र रस्त्यावर काढावं
चित्र भिंतीवर काढावं
चित्र कशावरही काढावं
चित्र जलरंगात काढावं
चित्र तैलरंगात काढावं
चित्र कशावरही काढावं
कारण
चित्र आहे माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
आणि त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
म्हणून चित्र कशावरही काढावं
कारण चित्रच आहे
भविष्यकालातील अभ्युदयाची आशा
एकमेव
प्रसाद जोग