घर पहावं लावून ....
लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून ... अशी आपली म्हण आहे. त्यातला पहिला पार्ट तर झाला ! आता दुसरा पार्ट ... जो असा की आपण एकदाच काय, दोनदा - तीनदा करून बघू शकतो ... ! पहिल्या पार्टचं नको बोलायला ... आपल्या चुका आपणच कशाला जगजाहीर करा ... पण घराचं तसं नाही ... कुटुंब मोठं झालं म्हणून ... relocate झालो म्हणून ... सगळ्यांनाच दुसरा पार्ट पुन्हा पुन्हा व्हावासा वाटेल आयुष्यात ... निदान मला तरी तसं वाटत होतं ...
... तर , त्याची गोष्ट ... लग्न झालं आणि मी सासरी आले. एकत्र कुटुंब ... म्हणजे सासू सासरे आणि आम्ही दोघे ... घर सगळं लागलेलं ... सर्व सुस्थितीत ... त्यामुळे भाजी आणि किराणा सोडलं तर नवीन गोष्टी आणणे - नवीन संसार लावणे वगैरे काही नव्हतं ... just सगळं जपून वापरणं ! आपल्या हातून आल्या-आल्या काही मोडायला नको, असाच विचार ! माझं सगळं काम जरा भीत भीतच ... दीर बहरीनला होते म्हणून घरात 'फॉरीन'च्या वस्तू खूप, त्यामुळे अजूनच भीती ... आधी त्याचं तंत्र शिकायचं, आणि मग वापरायचं ! सुट्टीत माहेरी आले की मैत्रिणींच्या गप्पा असायच्या ... आम्ही दिवाळीत गॅस घेतला, फ्रिज घेतला ... नाहीतर नवीन सोफा घेतला ... वगैरे ... की मी गप्प ... त्यांना सांगायला माझ्याकडे काहीच नसायचं ! मी गप्प हे पाहून त्या म्हणायच्या, "तू का गं गप्प, काय खरेदी केलीस ... का आम्हाला सांगायचं नाही " आता काय सांगणार मी ? ... नाही म्हणायला गाडी नव्हती, पण गाडी म्हणजे काय खाऊ आहे का ? की गेले दुकानात, पाहील्या दोन चार ... अन् घेतली एक !
त्या वेळी एक कविता खूप viral होत होती ... viral म्हणजे, सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात, किंवा जिथे कुठे local talent ला वाव असेल, तिथे प्रत्येक ठिकाणी कोणीतरी ही कविता वाचायचीच ... 'ऊन ऊन खिचडी, त्यावर तूप .'.. त्यानी मला भयंकर चिडायला व्हायचं ... अरे, नवीन घर लावावंसं वाटलं, तर त्यात चूक काय आहे ? त्यातलं 'वेगळं रहाणे' ह्या पेक्षा नवीन घर लावायची हौस आहे , ती पहा ना ... त्याची अशी खिल्ली नका उडवू ... ती इच्छा काही चूक नाहीये ... घर तोडायची इच्छा नाहीये ... असो ... तर तेव्हा फक्त थोडं फार सामान-वस्तू आणणे इतपतच ... हौस मागायची ... मैत्रिणी हे पण सांगायच्या, "अगं, two wheeler पण घ्यायची आहे, पण आत्ता नको म्हंटलं, पुढच्या गुढी पाडव्याला बघू ... हा 'crunch' तेव्हा मला कधी जाणवलाच नाही ...
त्यानंतर दहा वर्षांनी स्वतःचं घर बांधलं, आणि मग घर पहावं बांधून ... म्हणजे काय ते कळलं, पेक्षा घर पहावं लावून ...म्हणजे काय ते कळलं ! घराचं बांधकाम चालू असतांना सिमेंट, दगड, स्टील ... ह्यांच्यापासून मी दूरच राहिले. आपल्याला काय करायचंय, करेल तो, त्याला कळतंय ... सिमेंट महाग झालं ... मजूर सुट्टीला पळाले ... त्याचं मला सोयर न सुतक ...मनाशी एक ठरवलं होतं. नवीन घरात रहायला गेले की सगळं नवीन, मॉडर्न, लेटेस्ट आणायचं ... तुटकं-फुटकं ... out, आणि लेटेस्ट in , मग मी कुणाचं ऐकणार नाही ... single tub automatic washing machine, मोठ्ठा food processor, vacuum cleaner ... झालंच तर on केल्यावर आपल्या आपण पेटणाऱ्या गॅसच्या शेगड्या ... किती किती स्वप्नं ... !!! त्यावेळची स्वप्नं अशीच असायची ...
वर्षभरात घर बांधून झालं आणि सामान-सुमानासकट नव्या घरात दाखल झालो ! टेम्पोच्या ७-८ फेऱ्यांत सगळं सामान नवीन घरात पोचलं ... आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही बशी फुटली नाही का कपाचा कान ... कुठल्याही खुर्चीचा पाय मोडला नाही ! काहीही खिळखिळं झालं नाही, की काही डुगडुगायला लागलं नाही ... किमान फ्रिजचा गॅस सुद्धा लीक झाला नाही ... सासूबाई-सासरे म्हणाले, "हे सगळं जुनं फर्निचर, वस्तू टिकाऊच असणार, आजकालच्या सारखं दोन-चार वर्षात मोडणाऱ्या गोष्टी नाहीत त्या ..." त्यावर आणखीन म्हणजे विवेक म्हणाला, "हे सगळं चांगलं असतांना नवीन कशाला ? उगीच काय फेकायचं ... जेव्हा जसं मोडेल तसं लेटेस्ट नी replace करू, ... by the way टेम्पोवाल्याचे पैसे दिले मी ... पण आता बँकेत ४००च रुपये आहेत आणि अजून ६ दिवस आहेत पगार मिळायला ... घराच्या बांधकामात सॉलिड खर्च केला आहे आपण ..." मी अजूनच गप्प ... ठीक आहे ... रणचंडीचं रूप आणणं तसं सोपं आहे, पण पैशाचं सोंग ... ? ... मी माझे प्लॅन्स back-burner वर टाकले, आणि सगळ्यांसाठी ऊन ऊन खिचडी करायला घेतली ... माझ्या प्लॅन्स ची खिचडी तोवर गार ढोण ... !
पण देवाची कृपा झाली आणि त्यानंतर पुन्हा आता म्हणजे ३७ वर्षांनंतर मला नवे कोरे घर लावायचा चान्स मिळाला. Reconstruction ला गेलेला फ्लॅट, हो नाही, करता करता मागच्या महिन्यात हातात मिळाला. पावणे तीन वर्षात मिळायची गोष्ट - हळू हळू करत, जाते का रहाते, का गेलं सगळं हातातून, बुडलो का काय, वगैरे situation मधून जात जात, त्यापायी दोघांच्याही तब्येतीची धूळधाण करत, सर्व तऱ्हेचे stress घेत घेत, एकदाचं कसंबसं करून , भांडून - तंडून फ्लॅटची किल्ली हातात आली ! आणि माझ्या प्लॅन्स ची खिचडी मी deep freeze मधून बाहेर काढली ... जरा thaw होऊ दे, मग बघू ... !..
जुना फ्लॅट रिकामा करून बिल्डरला देतांना, त्यातल्या सगळ्या वस्तू देऊन टाकल्या होत्या. आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या जुन्या वस्तू, जाळीचं कपाट , लोखंडी कपाटं, पलंग, सोफा, टेबलं सगळं मोडकळीला आलेलं. त्यात खूप जीव अडकला होता तेव्हा ... पण ते सामान ठेवायला खूप पैसे पडणार होते म्हणून देऊन टाकलं होतं ... म्हणून मी सरसावले ... नवीन सामान आणायला !
छोटासा कलश ठेवून आम्ही नवीन घरात प्रवेश केला ... वय वर्षे सत्तर ... ! नव्याची नवलाई ... म्हणून मित्र-मंडळी हसत-चिडवत होते ... second innings म्हणून काय present देऊ असं ही विचारत होते ! म्हटलं, " काहीही नको, please ... मला माझी हौस करू द्या ... please !"
त्या आधी बंगलोरहून तिथे असलेलं जास्तीचं सामान ... duplicate-triplicate ( असा काही शब्द असेल तर, ... नाहीतर नवीन शब्द coin केल्याचं श्रेय मला ) असं होतं ते तिथून आधीच पाठवून दिलं होतं. तीन पोळपाट लाटणी .. सासूबाईंचं, आईचं आणि मनीष-देविका सिंगापूरला जातांना इथे टाकून गेले त्यांचं ! ३ पराती, २ घरात न मावणारी टेबल आणि खुर्च्या, २-३ शेल्फ, मधेमधे येणारं एक कपाट ... extra वाल्या वाट्या-भांडी ताटं , गाडी-उश्या ... एकूण १५ खोकी ... ! अरे हे सगळं जुनं इथून तिथे ... तर मग नवीन काय आणायचं ? ..मग माझ्या स्वप्नांचं काय ... पण म्हंटलं , पाठवून देऊया, इथे तरी जरा जागा होईल ... माझी खिचडी thaw होत होती ...
तरी पण १५ खोक्यांच्या पलीकडेही सामान आणायला भरपूर स्कोप होता. आता white goods ही एक गरज झाली आहे, luxury राहिलेली नाही ... म्हणून आम्ही दोघे आणि बहीण निघालो शॉपिंग ला ... अगदी विजयी मुद्रेनी ... दुनिया मेरी मुठ्ठी में ... फोन गच्च पकडून ... Gpay करायला ... दुकानात थंड स्वागत ... "काय पहायचंय ? ... ( काही घेत नाहीत ... AC मधे १० मिनिटं घालवतात ... काहीतरी बघतात ... काहीही discount मागतात ... आणि जातात पुढच्या दुकानात ) ... असं त्या त्या salesgirl च्या चेहेऱ्यावरचं वाचलं ... "खूप घ्यायचंय ... आधी washing machine ... चार पाहीली आणि एक short-list ... एक काम done !... मग mixer , इस्त्री, microwave , २ geysers ... मी लिस्ट मधून एकएक tick off करत होते आणि मग ते लोक खरं खरंच ... "काय चहा-कॉफी आणू का ?".. फ्रिज घेतल्यावर "cool drink हवं का मॅडम ... ?" ... "नको, पण उद्या दुपारी नक्की डिलिव्हरी द्यायची" ... अशी धडाधड खरेदी केली ... मी खूष ... इतकं Gpay करूनही फोन काही गोष्टीतल्या खिशासारखा हलका वाटत नव्हता ...
तिथून निघालो ते फर्निचर च्या दुकानात ... घरात बसायला फक्त ३ स्टुलं प्लॅस्टिकची ... म्हणजे सोफा-कपाटं ही आता luxury नाही ... असा विचार करत ... ते घेऊन टाकलं ... मग एक मोठा आरसा असलेलं ड्रेसिंग टेबल ( साधी एक टिकली लावायला ) आणि wardrobe ... दुसऱ्या खोलीकरता एक आरसावालं कपाट , dining table, पलंग ... घर लावायची खुमखुमी होती ती पूर्णच करायची होती ...
सगळं करून - ऑर्डर देऊन, पैसे भरून दमून-भागून घरी आले ... आता उद्यापासून electrician, plumber, carpenter, कंपनीवाले installation करायला येतील ! पुढचे दहा दिवस आता बघायला नको, हे लोक आपलं घर take-over करणार ... आपण कोपऱ्यात बसायचं , त्यांच्या मध्ये मध्ये करायचं नाही आणि त्यांच्या मागे घर झाडत रहायचं ...
इतकं हिंडून , ते ही उन्हात . पुण्यात ४२° कधी कोणी ऐकलं होतं ...?... विवेकला म्हटलं ... " बापरे, ... अजून पंखे-दिवे बसायचे आहेत ... इतका भयंकर उन्हाळा, कसं रे होणार आपलं ... आपण एक AC घेऊन टाकूया का ? म्हणजे लगे हाथ ते ही काम होऊन जाईल ... जरा जीवाला सुकून - दिलासा ...हे असलं आगीत होरपळणं नको ..... तर तो म्हणतो कसा ... "बाई , ह्या उन्हाळ्यामुळे AC अगदी चणेकुरमुऱ्यासारखे विकले जाताहेत, पण installation करता आठवडाभर वाट पहायला लागेल, त्यापेक्षा कूलर घेऊया, आत्ताच गाडीत टाकून घरी नेता येईल, की उद्या पासून ठंडा ठंडा कूल कूल ... शिवाय सध्या बँकेत आहेत पैसे , पण अजून उरलेलं आयुष्य जायचंय आपलं ... आणि आता पगार मिळत नाही ... "
"ईssssssक्स ... तो प्रॉब्लेम आहेच का अजून ..?"
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
Bravo ! I’m proud of you.
ReplyDelete— Arvind.
Thanks a lot !
Deleteया वेळेला घर लावण्याच्या प्रक्रियेची साक्षीदार मी होते ! घरातील least imp गोष्टी म्हणजे भिंतींवर ची चित्र आणि फ्रेम्स , त्या पहिल्या दिवशी लागल्या आणि मग उलट्या क्रमाने घर लागत लागत गिझर्स आणि सोफा सर्वात शेवटी आले !
ReplyDeleteखूप मस्त वर्णन ! 👌👌👏👏👏