लग्न पहावं करून - २


       ' मुलीचं लग्न म्हणजे फारच कठीण. मुलाचं लग्न करायला काय लागतं ? '  असं आपलं एक लोकमत असतं.     मुलीच्या आई - वडिलांच्या बाजूने सगळं जग असतं, आणि मुलाच्या आईवडिलांवर - खरं म्हणजे आईवरच -  सगळे टपून बसलेले असतात - आता ही कुठे चुकते आणि हिला कसं पकडायचं .... 

        आणि खरंच, आपलं अज्ञान उघडं पडणं, ह्याच्याइतका दुसरा पचका नाही.   माझा अनेकदा झाला - माझ्याच पक्षाकडून. झालं असं की, लग्नाचा मुहूर्त करणे, सामान भरणे, अशा निमित्ताने नणंदा - भावजया - बहिणी - जावा असा बायकांचा 'अड्डा' असायचा आणि एकीकडे कामं करत, गप्पा - प्लॅन्स चालू असायचे. अशीच व्याहीभोजनाची चर्चा चालू होती.     'मेन्यू काय ? कितीजणं ? काय द्यायचं ? काहीतरी वेगळं करायचं - तेच तेच नको बाई ' वगैरे .         "त्यांच्याकडच्या प्रत्येक बाईला एक गिफ्ट-हॅम्पर दे गं  "      "आणि आपण पण खूप नटायचं गं ."  एक मत आणि एकमतही ! "       " आयडिया, आपण बकुळ-हार करूया का ?"    असंही एक मत.  

        मला एका वेळेला एकाच गोष्टीचा विचार करता येतो. इथे तर ३-४ प्रश्नांवर, ३-४ ग्रुप्स,  ३-४ मतं मांडत होते.   मी विचारात पडले.   ५०-६० माणसं म्हटली व्याही-भोजनाला,  म्हणजे त्यातल्या अर्ध्यातरी बायका असणार,  म्हणजे २५-३० जणींना  बकुळीचे गजरे करायचे ... म्हणून मी म्हटलं, "आता बकुळीची झाडं कुठे शोधू मी इथे? आणि फुलं वेचणार कोण ?   ती ओवणार केंव्हा ...?"     त्यावर सगळ्या सुन्न.     बहीण म्हणाली, " वेडी का खुळी ?  खरे बकुळीचे गजरे ?            मी सोन्याचा बकुळ-हार म्हणत्येय,  तो आपल्याला घालायला, खरी फुलं झाली असतील आता   'endangered' , ...  एवढी बंगलोरमध्ये राहून तू अशी गं कशी ... ? "

        माझा पडलेला चेहरा पाहून भावजय मदतीला धावून आली .  " अगं , तू चंद्रहार कर नं गं व्याहीभोजनाला..."    मी पुन्हा विचारात पडले.  मुलाचं लग्न म्हणून नवऱ्याला कितीही पिळता आलं तरी त्याला लिमिट आहेच नं .         चालू खर्च पहाता, अजून दागिने करायला कुठेतरी खटकत होतं . तो नवरा असला म्हणून काय झालं, त्याच्या जिवाचा नको का विचार करायला कधीतरी  ?      म्हणून मी म्हटलं, " नको बाई, आता कसलाही दागिना करणार नाहीये मी स्वतःकरता ..."  तर सगळ्याजणी एकदम तुटून पडल्या, " अय्या, काय गं हे, चंद्रहार हा तुमच्याच तिकडचा पदार्थ असतो. तो कर म्हणतेय ती व्याही-भोजनाला .... एवढी बंगलोरमध्ये राहून तू ...."  .वगैरे वगैरे . 

        हे संपतंच आहे, तोपर्यंत सगळ्यात धाकटी बहीण पोहोचली. स्वैपाकपाणी, घरदार, स्वतःचं करीयर सांभाळून, पुष्परचना , स्टॉक-एक्सचेंज, पर्यावरण, संस्कृतीजपणूक वगैरे सतरा पिंपळांवर तिचा वावर असतो. जरा  'उनाड' पंथातली आहे .     आली  तीच मुळी जग जिंकल्याच्या आवेशात. " जय हो ... मी पिचोड्या घेऊन आलेय ... आजचा दिवस सार्थकी लागला !... "    सगळ्या जणींच्या चेहेऱ्यावर आदर-कम -कौतुक -कम-असूया असे 'थ्री-इन-वन ' भाव आणि मी पुन्हा विचारात !

        हे 'पिचोड्या' काय असावं ? भूसवड्या , चिकोड्या , मुगोड्या असा काही तळायचा पदार्थ, का खास इंदौरच्या 'कचौडी' सारखी काहीतरी भरलेली पुरी - बिरी किंवा मग जुन्या काळी 'चिरड्या ' का 'चुनड्या ' नामक छोट्या साड्या का ओढण्या मिळायच्या, तसं काही ... - आठवा ... ' तुज पगडी, मज चिरडी, आणखी शेला कोणाला ? ...' किंवा ' नको रे कृष्णा, रंग फेकू, चुनडी भीsजते ...' -         कोणीतरी ह्या शांततेचा भंग करायला हवाच होता, म्हणून मी जरा भीत-भीतच म्हटलं, " वा , छान, पण पिचोड्या म्हणजे काय असतं ?"  आणि पुन्हा एकच गिल्ला झाला,      " पिचोड्या म्हणजे काय माहीत नाही ?  अगं , एक तऱ्हेच्या बांगड्या !     ...   कमालच आहे ...  एवढी बंगलोर मध्ये ..."  वगैरे  वगैरे  वगैरे .... 


Comments

  1. कित्ती गम्मत मला दागिन्यांची नावं माहीत करून घ्यायला खूप आवडते कित्ती वैविध्य आहे आप्लाय दागिन्या त

    ReplyDelete
  2. Wonderful!! Many thanks. - nvj

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

पुरुषोत्तम मास