ठकी ते बार्बी - एक प्रवास

     

    माझा सांगलीतला वर्गमित्र, प्रसाद जोग लिहीत असतो.  मोठी व्यक्तिमत्वं हे त्याचे विषय.  किंबहुना तो कशावरही लिहू शकतो, आणि ते ही अभ्यासपूर्ण - तारीख वार आणि व्यवस्थित संदर्भासहित.  त्याने आज बार्बी ह्या बाहुलीच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर लेख लिहिला WApp वर !  ती कशी अस्तित्वात आली, प्रसिध्द झाली आणि मग जगभर नुसती घराघरात पोहोचली असे नाही, तर त्यांचा अविभाज्य भाग बनली , असं !   ते वाचतांना स्वतःच्या नकळत, मी कधी  माझ्या बालपणात पोहोचले ते कळलंच नाही.  आताशा, मी जास्त तिथेच रमत असते ,असं मला वाटतं !

    बाहुली म्हटलं की पहिली बाहुली म्हणजे  'ठकी'च !  माझ्या वयाच्या बहुतेक सगळ्यांच मुलींकडे ती असायची.  त्रिकोनी असा cross-section,  आणि ८ - १० इंच उंच !  पिवळा, लाल, निळा , हिरवा  सगळ्या रंगात रंगलेली !  ती कधी, कशी, आली ते माहीत नाही, पण आता आठवते ती जरा रंग उडालेली आणि तरीही माझ्या खेळात सामील झालेली ! ... नंतर ती कुठे गेली तेही आता आठवत नाही ! 

    त्यानंतर माझा एक मोठा बाहुला होता !  गुड्डु त्याचं नाव.  त्यावेळी आम्ही दिल्लीत होतो, त्यामुळे त्याचं नाव हिंदी भाषिकांसारखं !  त्याकाळी केशरी - भगव्या रंगाच्या प्लास्टिकच्या बाहुल्या असायच्या,  छाप्यातून काढलेल्या, फक्त आकार लहान - मोठे !  तसाच हवंगुड्डु ,  माझा फारच लाडका !  त्याला कडेवर घेऊन मी सगळीकडे फिरायची.  एकदा मी त्याचा हात ओढला आणि काय झालं कुणास ठाऊक ... त्याचे हात, पाय डोकं सगळं सुटं झालं ... मी भोकाड पसरणार  ... तेव्हढ्यात आई धावत आली, "अरे देवा, हे काय झालं ?  आता काय  करायचं हो बाबा ?"      बाबा धावत आले.  "ओ हो हो, आता आमची good girl  काय करेल ?"     तेंव्हा 'अच्छी बच्ची'  'good girl'    ही विशेषणं नव्हे,  पदव्या वाटायच्या आणि त्यांना जागणं ही नैतिक जबाबदारी तेव्हाही मला कळत होती !  त्यांचं दुःख आणि माझा आत्मसन्मान ह्या दोन्हीकडे पाहून मी रडणं cancel केलं !   "जाऊ दे, आपण दुसरा आणू ...."  मीच त्यांचं सांत्वन केलं ... नंतर बऱ्याच उशिरा कळलं की ही त्यांची trick होती !  किंबहुना strategy च ... ! 

    तेव्हा कडक प्लास्टिकच्याही बाहुल्या असायच्या.  त्यांना कचकड्याच्या बाहुल्या म्हणत !  त्याही मी खूप जमवल्या होत्या !  शिवाय कापडी, लोकरीच्या, लाकडाच्या, किल्लीच्या- किल्ली दिली , की खाऊ खायची action , बाटलीतून ग्लासात ओतून दूध प्यायची action !!!!... कितीतरी तऱ्हेच्या... पण गुड्डु तो गुड्डु !  त्यानंतर दिवाळीला मी आजोळी गेले. तिथे गेल्यावर दिसेल त्याला मी गुड्डु कसा तुटला ते सांगितलं असावं !  माझ्या मामा-आजोबांनी दुसऱ्याच दिवशी दोन मातीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे बाहुले समोर ठेवले.  एक छान रंगीत निळी पँट, पिवळा शर्ट, लाल कॅप वाला, आणि एक पांढरा शुभ्र, मोठ्ठा आणि डोक्यावर बल्ब !   हा बल्बवाला  कधीच हातात मिळणार नाही , हे ओळखून मी रंगीतवाला घेतला !  आणि त्याला कडेवर घेऊन खेळायला पळाले !  त्याचं नाव लुच्चू !  बसलेल्या पोजमधे, गुढघ्यावर कोपरं टेकवून दोन्ही हात हनुवटीखाली !  हसरा !  तो माझा आणि फक्त माझाच !  शेजारच्या मामांनी एकदा माझ्या सर्व बाहुल्या आणि मी आणि लुच्चू असा फोटोही काढला ! हा बाहुला ३० - ३५ वर्ष टिकला !  नंतर , एकदा माहेरी गेले असतांना आई म्हणाली, "यावेळी तो लुच्चू घेऊन जा आपल्या घरी, आता आम्हाला नाही होत त्याला बघणं !"   मी म्हटलं, "त्याला काय बघायचं असतं ?  कपाटावर तर बसलेला असतो.  मी  इथे आले की त्याला पहायला खूप आवडतं ... इथेच राहू दे ... "     ते चुकलं माझं.  त्यानंतर दोन वर्षात माहेर नाहीसं झालं ... आणि त्या प्रलयात तो कुठे वाहून गेला कोण जाणे ... पण तो फोटो आहे अजून !

    शाळेत असतांना एकदा आजी-आजोबांनी इंग्लंडहून एक छान बाहुली आणली, गोरी गोरी सोनेरी केसांची !  मी म्हटलं, "नकोय मला, showcase मधेच ठेवणार आहेस नां, मग कशाला देता ? "   बहुतेक आईलाच वाईट वाटलं असावं ... मला ती खेळायला मिळाली !  मी तिला खूप कपडे शिवले, मण्यांचे दागिने केले ... तिचे उघडमीट करणारे निळे डोळे !  ती खूप म्हणजे खूपच लाडकी !   माझी मुलंही - मुलगे - तिला खेळात घ्यायचे.  त्यांच्या tricycle - स्कुटरवर ती ही पुढे-मागे बसलेली असायची !   तिने बहुधा त्यांना 'caring' शिकवलं असावं...  किंवा मुलं -मुली असा भेदभाव नाहीसा केला असावा !  अगदी  आत्ता आत्ता ,  काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती होती.  पण शेवटी ते प्लास्टिक आणि ते disintegrate होतंच !  कोणी कितीही 'नाही' म्हणा !  ४०० वर्षं वगैरे अजिबात लागत नाहीत ... नाईलाजाने मी ती टाकली . माझ्या इतकंच मुलांनाही वाईट वाटलं ...

     आता मी नातीशी खेळत असते तेव्हा तिच्या १० - १५ बाहुल्या असतात !  आता ठकी , कचकडं गेलंय .. खूप सुंदर बाहुल्या ,  त्यांना  छान छान नावं... नोनी, डोई, मेमे, जोजो ,  मिनी, लोला ... !  नावंही नातीने शोधलेली !  त्यात २ - ३ बार्बीही   आहेत.  पण अजून तरी , माझ्या मते बार्बी इथे, माझ्या नातीच्या खेळात रुजलेली नाही.  त्या नेहेमी लांबच असतात.  बाकी सगळ्यांना 'भरवणं, अंघोळ घालणं - खरी खरी, झोपवणं ,  सगळं चालू असतं.  त्यांच्या करता स्वेटर, टोपी, फ्रॉक वगैरेची ऑर्डरही असते मला ... आणि विसरले ,की बोलणी ही खावी लागतात.  "हे काय आजी, अशी कशी विसरतेस, आता birthday पार्टीला काय घालेल ती ?" .. मग मला शिंपीदादाचं feeling येतं ... !  मग  मी चिंध्यांची पिशवी बाहेर काढते, आणि   express फ्रॉक शिवते, त्याला टिकल्या, लेस, मणी, रिबिनी लावते.... 

    ..अशीच,  एक दिवस पार्टी सुरु होती ... पार्टीला बाकीच्या बाहुल्यांबरोबर दोन्ही बार्ब्या ही !!   

"अरे वा, या होत्या वाटतं, इतका वेळ दिसल्या नाहीत ... "     

"आजी, त्या बाळं नाहीयेत, त्या वेगळ्या आहेत ... त्यांना party animals म्हणतात" .... 

" ऑ ?".. .

"..त्यांचे कपडे बघ, असले कपडे लोकं फक्त पार्टीला , function ला घालतात."  

"तुला गं काय  माहीत ?... "      

"तू TV बघ, त्यात prize ceremony मधे अशा girls असतात ... !आपण तसले कपडे घालत नाही..."

    माझे डोळे खाडकन उघडले !...  त्या बार्बी  बाहुल्या ,  बाळं नाहीयेत, वेगळ्या आहेत ... हे माझ्या आठ वर्षाच्या नातीला कळतंय ! ...म्हणजे , त्या तिच्या  'मैत्रिणी' ह्या catagory मधे यायला अजून वेळ आहे .... ! हुश्श ....

     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

नेमेचि येतो मग पावसाळा ...