इन - थिंग


        हळदीकुंकवाला जायचं म्हणून चपलाच घालत होते आणि मुलाने विचारलं,     " आई, बाहेर चाललीस ? कधी येणारेस ?... " मी बाहेर निघाले की सगळ्यांना काय होतं कोण जाणे. मी मात्र हे प्रश्न कोणाला विचारायचे नसतात कारण त्यांचा मूडच जातो म्हणे.     " हळदीकुंकू  .... ७।।  ला येतेय, आणि वाढते जेवायला ..."  मी पुढे काही बोलायच्या आताच तो म्हणाला, " आणि ही मॉडर्न - आर्ट सारखं काड्या गोळे चौकोन त्रिकोण छापलेली साडी घालून ? माताश्री , प्लीज ..."     हे काय नवीनच ? ह्याला काय करायचंय माझ्या साडीशी ?  मी म्हटलं, " हे बघ , ते जुनाट काठापदराचे बोळे नेसून मला कंटाळा आलाय, आणि हे चांगलं सिल्कच आहे. "     " आई गं , आजकाल एथनिक घालतात गं .. ' इन थिंग ' ! तू जरा मॉड हो नं ..."    "एथनिक म्हणजे मातीचे डूल आणि लाकडाच्या बांगड्या नं. मुळीच नको. मी अशीच बरी आहे. तुम्ही आपलं बघा ..."    वाटलं त्यापेक्षा एथनिकच खूळ जास्तच बोकाळलंय तर ...आजकाल मुलांचं हे खूप असतं . सगळ्यांत लक्ष्य आणि आई-वडिलांचं रोज शिक्षण चालू असतं . 

        एकदा असाच आला आणि म्हणाला, " आई गं , उद्या कॉलेजमधे  ' एथनिक डे '   आहे. मी धोतर नेसून जाणार आहे. "  लगेच त्याचा धाकटा भाऊ मदतीला सरसावला.     " दादा, असं कर.    तू एक ' जुट्टू '  चिकटवून घे आईकडून  ' छपरावर ' ! नाहीतर एक फेविकॉलवाली  शेंडी, आणि एक गिटार .... अगदी मस्त लुक... 'इन थिंग' !  " आयडिया चांगली आहे ..."      मोठाही काही कमी नाही.    " मागच्या वर्षी एक सिनियर, पणजी-टाईप साडी घालून (?) आली होती  . तिचा फादर ' बिग शॉट ' आहे.  त्याने एक बैलगाडी अरेन्ज केली होती ...."     " ओह, सो... स्वीट ... "     तेवढ्यात पोहोचलेल्या भाचीने ही आयडिया अगदी ' सही ' असल्याची पावती दिली !                 तो मोटरसायकलवरून  निघाला तेंव्हा हळूच देवाला म्हंटलं , सांभाळ रे बाबा ह्याला, कुठे टोक-बिक अडकू नको देऊ ... !

        दोनच दिवसांनंतरची गोष्ट धाकटा कॉलेज मधून आला. " मम्मू , दमलीस का ?"     " काय करून हवंय ?" तशी मी आजकाल पटकन विरघळत नाही.     " माझ्या चार-पांच  मित्रांना घरी बोलवू जेवायला ?"    " ऑं ? होस्टेलमधे राहतात का ? नाही म्हणजे घरी येताहेत जेवायला ..."    " छे छे , हे आमच्या कॉलेजच्या ' एक्सचेन्ज प्रोग्रॅम ' मधे आलेत. एक मलेशिअन शीख - तो फाळणीनंतर तिकडे गेला,  एक जर्मन,  एक जपानी .  .... त्यांना इंडियन - फूड बघायचंय खाऊन. असं काही तरी कर की त्यांना सगळं कळेल ..."     " शक्य नाही. एका जेवणात तर अजिबातच नाही.   नाहीतर मग छोले - दोसा , पुरणाच्या पोळ्या आणि सरसोंका साग किंवा ढोकळा - सांबार असं काहीतरी ... म्हणजे चारी दिशा चीत ...? "    " प्लीज, मला खाली पहायला लावू नकोस माँ, अगर तुम्हे अपने बेटेकी इज्जत ..."        " बास ..."

        आणि मी तयारीला लागले, लसणीची चटणी, मिरचीचा ठेचा, भरली वांगी, पिठलं, करंज्या ... मनाला येतील ते खूप पदार्थ करून ठेवले. मित्र आले, जेवले आणि ... सगळं संपवून परत गेले ! चवीने जेवले ... मुलगा मात्र माझ्याकडे पहायला पण तयार नव्हता !

        ते गेल्यावर सोफ्यावर डोकं धरून बसला. " आई गं, तू अगदी काटाच काढलास  माझा.  पार्टीला पिठलं ? ... आणि करंज्या ...? आणि उसाचा रस ...? अगदी इज्जत का फलूदा ..... देवा , मला उद्या ताप येऊ दे ... म्हणजे कॉलेजमधे तोंड दाखवायला नको ...?     " मला कळेचना एव्हडं काय झालं ते. म्हटलं ,     " का रे सोन्या, एव्हडं चिडायचं कशाला ?   सगळे ' एथनिक ' पदार्थ केले मी ... अगदी आजकालची  ' इन - थिंग '  !!!!  ..... 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland