लग्न पहावं करून - ३
मुलाचं लग्न झालं . रिसेप्शन ही झालं. सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले. अन् मग सगळ्यात आवडता कार्यक्रम उरला. प्रेझेंट्स काय काय मिळाली हे पाहणं . आणि नवरे मंडळींचा आवडता उद्योग - हिशेब लावणं.
माझा अन बहिणीचा नवरा. दोघं मिळून हिशोब पहात होते. लग्नाच्या निमित्ताने आम्ही किती पैसे उडवले ते. आणि मोठा मुलगा आणि नवी सुनबाई प्रेझेंट्स उघडणे आणि यादी करणे ह्यात गर्क. धाकटा त्यांच्याच खनपटीला बसून राहिला. कितीही हटकलं तरी उठेचना . त्याला मिळालेली प्रेझेंट्स ते दोघं ढापत नाहीत नं हे पहायला . गप्पा चालूच होत्या ....
एकदम धाकट्याला काहीतरी सुचलं, .... .... म्हणाला " ह्या लग्नात बरंच काही समजलं , खूप गोष्टी कळल्या." "अरे असंच असतं . कार्याच्या निमित्ताने बरंच शिकायला मिळतं. " माझी उपदेशामृताची बाटली-चमचा नेहेमीच तयार असतो. " तुझी सिक्रेट्स कळली .... . तुला tribal songs अन tribal dance येतो हे माहीत नव्हतं . "
" tribal songs ? कधी रे ? " "तेंव्हा नाही का, तुम्ही सगळ्या काहीतरी funny गोष्टी कुटत होतात आणि songs म्हणत होतात ... ." "तो घाणा भरला तेव्हाचं का ? .. ती tribal songs नाहीत, त्या ओव्या असतात, देवांना बोलवायला, कार्य सुरळीत पार पडावं म्हणून. त्यांना फारतर ethnic गाणी म्हणू शकतोस ." "पण देवक म्हणजे तेच असं तूच म्हणाली होतीस ... आणि तुमची गाणी इतकी off - key होती की , .. आलेले देव पळून गेले असते ... " धाकटा माझा पिच्छा सोडायला तयारच नव्हता.
" आणि तो tribal dance , दादा, you were lucky , तू नव्हतास तेव्हा ते. मला हरकाम्यासारखं पकडलं होतं रे . ... सगळ्याजणी आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये जमल्या नव्हत्या का मेंदी आणि बांगड्या घालायला ..." "घालायला नाही -- भरायला " इति मी . "आणि तो काही tribal dance नाही काही. तुमच्याच ' कझीन सिस्टरच्या फॉरिनच्या मैत्रिणींना ' आपलं ' कल्चर ' पाहायचं होतं नं, म्हणून आपला फेर धरला होता आम्ही ..."
मी म्हणाले .
"भीषण दृश्य रे दादा, सगळ्या जणी मेंदीचे हात अस्से धरून नाचत - उडया मारत होत्या अन गोलात फिरत होत्या, tribal च ..." "पण तू आलासच का तिथे ?" "तूच सांगितलंस आणखी खुर्च्या आण म्हणून. नाहीतर मला काय करायचं होतं तिथं. आणि दादा, एका कोपऱ्यात आपल्या केटररचे दोन वेटर्स, बायकांना चाट आणि पाणीपुरी करून देत होते. इतके भेदरलेले होते. बायका त्यांच्या भोवती , कोणाला कमी तिखट, कुणाला जास्त, गोड चटणी नको, कुणी मऊ पुऱ्या, काहीच्या काही.... , मला भीती वाटली. एखादी जरी 'ऑर्डर ' चुकली असती ना, तर त्यांनी त्या दोघांना त्यांच्याच माठात बुडवलं असतं ! ..." त्याचं बोलणं ऐकतांना हसता हसता पुरेवाट होत होती.
" आणि सगळ्यात शॉकिंग , आई , तुला ब्लॅक मॅजिक येते हे मला माहीत नव्हतं ... ."
" ब्लॅक मॅजिक ? काहीतरीच काय ? त्या नवीन सुनेला काय वाटेल अरे .... " मी घाबरलेच .
" नाहीतर काय, त्या दिवशी सगळे कार्यक्रम संपल्यावर, तू ह्या दोघांना बसवलंस , काहीतरी हात-वारे केलेस, आणि गॅसवर तव्यावर काहीतरी टाकलंस . मग sparks आले,आणि घरात funny वास, I never could have believed की तुला black magic येते.
" ए, ती दृष्ट काढली रे मी, आजीनी सांगितलं म्हणून. ती ' evil eye ' undo करायला असते ..., कोणी spell घातलेच तर ते मोडायला असते ... "
" you mean more powerful black magic . आणि spell तोडायला, आधी तो spell माहीत पाहिजे, तरच मग त्यातल्या cracks कळतात ... हॅरी पॉटर झिंदाबाद !"
" नाही, ती ब्लॅक मॅजिक नाही. आम्ही spell ला over-ride करतो, bypass करतो, सगळ्या बायकांना येतं . त्यात काहीही ब्लॅक नाहीये..." मी त्याला पटवून देत राहिले .
" बालकस् , आमच्या वेळी एक मस्त गाणं होतं ... " नको ते, नको त्या वेळी सुचलं नाही तर तो नवरा कसला ?
" तुमच्या आईला पाहीलं की मला तेच गाणं सुचायचं , ....
.
.
... She is a black magic woman ..... "
.
.
.... नवीन सुनबाई अवाक् , आणि मी सुन्न ! ! .... इति .
वाचताना खूप मज्जा आली
ReplyDelete