रिझल्ट
माझी मुलं मला मार्क्सिस्ट म्हणायची. त्यात श्री. कार्ल मार्क्स ह्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या पुस्तकाचं मी फक्त नावच वाचलंय. तर ते 'marxist ' नसून 'marksist' असं आहे. ही आयडिया बहुतेक मुलांनी कुठून तरी 'चोरलेली' असावी . एवढी हुशार असती तर मार्कांवरून कळलं असतं ... ! पण मीच नाही, सगळं जगच आजकाल मार्क - मार्क करत असतं. मुलांचं 'valuation' करायचं ते एक scale आहे. त्याला इलाज नाही . ह्यावर दोन्ही बाजूंनी वाद होऊ शकतो. पण ह्या नाण्याला तिसरीही बाजू आहे, त्याचं काय ? आणि ती बाजू माझ्याच वाट्याला येते ....
माझा पेशाच असा होता की, दरवर्षी मे - जून म्हंटलं की माझा जीव वर - खाली व्हायचा . कधी पोटात गोळा यायचा , तर कधी उड्या माराव्याशा वाटायच्या .रिझल्ट म्हंटलं की धडधडायचं , फोन वाजला की ठोके चुकायचे !! ... असो .
पण , खरंच , ज्यांची मुले १०वी - १२वीत असतात त्यांच्याकडे तर असं वातावरण असतं, जसं काही बकासुराला जेवण पाठवायचा दिवस असावा ...
एका वर्षी दोन मैत्रिणींची मुलं १०वीला होती. रिझल्ट आल्यावर मी कौतुकाने फोन केला. माझ्याच नशिबाने म्हणा, त्याला अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले होते. फोनवरही भयाण शांतता मला जाणवली.
" ... काय ?"
" काही नाही ... रिझल्ट आला नं ..."
" अं ... हो ... ९४ टक्के ..." ती म्हणाली.
" अरे वा, पेढे हवे हं ." असं मी म्हटलं. त्यावर पुन्हा भयाण शांतता .
" it is ok , बघू पुढे काय होतं ते. मूड अगदी ऑफ झालाय " असं ती म्हणाली .
" अगं मार्क फक्त महिनाभर . शेवटी पैसा - यश - कीर्ती सगळं पुढच्या शिक्षणावर असतं ... " मी मनापासून सांगितलं. पण तिला खजील करायलाच मी फोन केला असं आजही तिचं मत आहे ...
दुसऱ्या मैत्रिणीलाही फोन केला. तिने काय म्हणावं ? " काय, कमी मार्क मिळतील असं वाटलं नां सगळ्यांना ? ९४ टक्के मिळालेत म्हणावं ... आता एकदम सर्वांची बोलती बंद !" तिचं म्हणणं खरंच होतं , एवढ्या फैरी झाडल्यावर पुढे काही बोलायची माझी हिंमतच नव्हती !
पुढच्या वर्षी जेव्हा माझ्याच घरी रिझल्ट होता , तेंव्हा मी शांतच राहिले. एवढंच नव्हे तर इतरांच्या चुका आपण करायच्या नाहीत म्हणून मीच स्वतः माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीला फोन केला. कमी जास्त काही न बोलता मार्क सांगितले. चांगलंच बोलले.
आठ दिवसांनंतर ती कोणालातरी म्हणत होती " अगदी फोन करून मार्क सांगितले ... ९४ टक्के म्हणजे काही एवढे ग्रेट नाहीत ... पण ... असतो एकेकाचा स्वभाव ...शाळेत असतांनाही ती अशीच 'भापत' असायची ... नसत्या गोष्टींसाठी ..."
तेव्हापासून ठरवून टाकलंय , जसा पुरुषांना पगार, अन् बायकांना वय विचारू नये, तसंच आता मुलांचे मार्क विचारायचे नाहीत ... नसता डोक्याला ताप ... !
Comments
Post a Comment