पसारा
खूप दिवसांनी मैत्रीण जेवायला आली होती. अगदी जिवाभावाची मैत्रीण, जिला सगळं सांगावं, सगळ्यांची गाऱ्हाणी करावीं, तिचा सल्ला घ्यावा आणि निश्चिन्त व्हावं ! घरातल्यांशी फारच बेबनाव झाला की मी तिच्याकडे धाव घेते. तिचा सल्ला मानायचा की नाही हे जरा पहावं लागतं, कारण ते तिच्या तेव्हाच्या 'फॅड'वर अवलंबून असतं, पण बरं वाटतं .
तर, ती आली, जेवली आणि गप्पांना सुरुवात झाली. मधूनच ती वर खाली, इकडे तिकडे बघत होती. म्हटलं, 'बाई गं , वर पाहीलंस तर जळमटं दिसतील, खाली पाहीलंस तर धूळ आणि आजूबाजूला पसारा. तू आपली माझ्याकडे पाहून बोल कशी. उगीच मला टेन्शन देऊ नकोस, आधीच सगळ्यांनी पिसाळलंय मला. पसारा करण्यावरून रोज वादावादी, हे सगळं बदलायचंय मला. पुन्हा नव्यानी सुरुवात करते हवं तर. जरा शांती-समाधान नांदू दे, कुठेतरी चुकतंय ...'
" तेच, तेच म्हणायचंय मला. सगळंच चुकलंय म्हणून तुला त्रास होतोय ! भांडणं , वाद हे तुमच्या स्वभावावर, गुणदोषांवर अजिबात अवलंबून नसतात बरं का ! तर घरात कुठे काय मांडलंय काय कुठे ठेवलंय, ह्यावर असतात. तुझ्या घरात तर चुकाच चुका आहेत ... " ती म्हणाली.
ते तर मलाही पटतं. अगदी घर बांधतांनाच चुका झाल्या. माझ्या घरात अक्षयपात्र आहे, पण तिथे तिजोरी ठेवायच्या ऐवजी मी किचन सिंक लावलं. आता तेच नेहमी भरलेलं असतं. हॉलच्या जागी मुलांच्या खोल्या असायला हव्या होत्या, म्हणजे बॅगा, पुस्तकं, हेल्मेट्स सगळं जागच्या जागी गेलेलं असतं . स्टडीच्या जागी हॉल पाहिजे होता. कमीत कमी वापर म्हणून नेहेमीच आवरलेला! ज्या खिडकीतून गोष्टींना पाय फुटतात, तिथे कचऱ्याचा डबा ! T.V. च्या आजूबाजूने स्वैपाक घर - ओटा. कारण आमचा T.V. लोटी-भांड्यापासून ते दह्याच्या सटा पर्यंत सगळं काही अंगाखांद्यावर लेऊन असतो !
मैत्रिणीचा सल्ला मी ऐकत होते. हे इथे ठेव. ते तिथे नको. चपलांचा रॅक इथे, माठ किंवा फ्रिज तिथे, हे आत्ता काढून फेक, अन् तिथे हे ठेव ...
एवढ्यात मला आठवलं, " अगं, म्हणे एक मंत्र असतो, तो म्हटला की हरवलेल्या वस्तू सापडतात किंवा कुठे ठेवल्यात ते आठवतं ...". मनात म्हटलं, घरात एवढी उलथा-पालथ केल्यावर हवं ते शोधायला सोपं होईल - मंत्र म्हंटला की ..."
तेव्हढ्यात वामकुक्षी आटपून नवरा खोलीतून बाहेर आला. " सांग सांग, मंत्र सांग, युक्त्या सांग , सगळं सांग, पण कुठे काय टाकू नये, हे ही सांग." जरा घुश्श्यातच दिसला. चालतांनाही जरा ...
.... आणि माझी एकदम ट्यूब लागली, " अय्या, सुई टोचली ? I mean सापडली तुला ? सकाळी बटण शिवायला काढली - तुझ्याच शर्टाचं - तेव्हा हरवली - पडली कुठेतरी ... तरी मी विचार करतेय की हा असा लंगडत का चालतोय म्हणून ..."
" मग ? तुला काय वाटलं, डान्सच्या क्लासात नाव घालून आलोय म्हणून ? .... "
ही ही मस्त
ReplyDelete