एक नूर आदमी

     एक दिवस मी एका मैत्रिणीकडे गेले होते.  दोघी मिळून एका लग्नाच्या रिसेप्शनला जाणार होतो. माझी ही मैत्रीण अगदी mod म्हणजे आजकालच्या भाषेत अगदी yo आहे. तिला सगळे  latest trends   माहीत असतात.   किंवा असं म्हणा, तिला हवं ते ती करते, आणि तेच latest आहे असे ठामपणे म्हणण्याइतकी ती बिनधास्त आहे ! तिची मुलगी तर तिच्या वरताण आहे. 

    मी पोहोचायला आणि तिची मुलगी बाहेर पडायला एकच गाठ पडली. " बाssय  माँ , ah mean , hi मावशी ! Have fun, माझी वाट पाहू नकोस जेवायला आई , मला उशीर होईल ... " ...अरे, ही  वाक्यं  तर 'बाबांची' असतात ! पोरींनी उचलली वाटतं ....

 ' सातच्या आत घरात ' कधीच इतिहासजमा झालं ! मी चमकून पाहीलं ... दुर्भिक्ष्यातून आल्यासारख्या हाता पायांच्या काड्या,  एका खांद्यावरून ओघळलेला  T-शर्ट, डोक्यावर अक्षरशः रंगीबेरंगी केसांचा पिसारा, नाकात सुंकलं ... एखादं बुजगावणं सुद्धा बरं दिसावं ... 

" तू अशी जाणार आहेस बाहेर ? .."  न राहावून मी मधे तोंड घातलं . 

" ऑ  मावशी, हे cool आहे गं ... असं काय करतेस?"    

" हे cool नाहीये, असं नको करु राजा, तुझा तो परवाचा पिंक ड्रेस घाल नां "    

" ... , तो ? त्याला लेस आणि फ्रिल आहे ... आणि त्यातूनही अंग दिसतंच की ... " 

मी गप्प बसले अन् ती केसांचा पिसारा हाताने आणखीन फुलवीत पसार झाली ! ....

    पण तिला काय म्हणायचं ? माझ्या मुलाचीही अशीच तऱ्हा ! " हाय मॉम, मी आला बघ."      " काय भाषा ... सकाळी सातचा गेलेला, संध्याकाळी आला ..." असे संवाद चालू असतात. त्याचं ध्यानही मला पहावत नाही. जांभळ्या रंगाचे केस, हातात कडं, दोन्ही गुढघ्यांवर फाटलेल्या जीन्स, कधी स्पेशल cool  दिसायचं असेल, तेंव्हा  मित्रांकडून चापाचं कानातलं  borrow  करतो.     " बाळा रे , फेक ते कपडे. फाटकं काय घालायचं ? आधीच तुझ्या बाबांचं होम ऑफिस म्हंटल्यावर लोकांना प्रश्न पडतात ! "    

 " फाटकं ? ह्याला तू फाटकं म्हणतेस ? हा तर मास्टरपीस आहे . Ripped jeans , मी विकायला गेलो तर मित्र ५००० रुपये द्यायला तयार आहेत."     " मग वीक ना ! तू नवीन घाल ! जुन्या झाल्या की विकून टाक ."       " आई, तू म्हणजे ना, ... काय म्हणावं तुला ... very old fashioned ... अगदी ancient  ... almost pre-historic... ! By any chance ,  तुमच्या लहानपणी डिनोसॉर वगैरे पाळायचात का तुम्ही ? ...

     हे सगळं मनात येतंय ,  तोवर मैत्रीण तयार होऊन आली .     " झाले बाई तयार ! म्हटलं सापडतंय  का नाही काही घालायला ..."  ती म्हणाली .     पंचाईत नक्कीच झाली असली पाहिजे , असं वाटलं मला.  एक भडक रंगाचा ड्रेस, अन् त्याला सगळीकडे आरसे , मणी, गोंडे ! कानातले झुमके खांद्याला टेकलेले, नाकाच्या शेंड्यापासून ते भांगापर्यंत गेलेली कुंकवाची रेघ, हातभर बांगड्या - त्याही काळ्या ! माझ्यासारख्या 'मध्यमवर्गीय बुद्वीजीवी' बाईला हे सगळं जड जातं ... फारच ... तरी आता सवय झाली आहे थोडीफार .... "

   " एकदम cool !"  मी म्हटलं.    

" हो नं ! हा माझा नवीन look आहे ... मला वाटलंच तुला हे आवडेल म्हणून ... म्हणून तर आपलं पटतं !"     मैत्रीण स्वतःच्या 'look' वर जाम खूष होती. 

    संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत उशीर झालाच.  घरात शिरल्या शिरल्या पटकन कुकर लावला आणि बसले जरा विचार करत. आपण cool दिसत नाही याचं वैषम्य वाटत होतंच .  तेवढ्यात नवरा आला. " दमलीस नां ? कशाला करतेस एवढी कडकड ? .. ए, पण तुझी ही पोचमपल्ली का काय ... आपल्या लग्नातलीच नं  ... मस्त दिसते तुला ..you look hot ...  ! "       

 " ... ! " 

    .... दिसा बाबांनो तुम्ही cool , आम्हांला आपलं hot च आवडतं ... !

Comments

  1. आम्हाला पण हॉट आवडते

    ReplyDelete
  2. भारीच😄 मी वाचते तुमचे ब्लॉग्स. छान आहे लेखनशैली. लहान लहान प्रसंग मस्त खुलवता 👌🏻

    ReplyDelete
  3. This is great Alka mavshi! Enjoying reading all your write ups

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland