भविष्य

 

     " चल लवकर, पान वाढलंय, वरण भात गार होतोय  ..." आजीची हाक आली.    " आलेच, एका सेकंदात एवढं भविष्य वाचते, आणि येते .."  असं म्हणून मी पेपर उघडला.   आतल्या कुठल्या तरी पानावर रोजचं भविष्य यायचं. अगदी एक - दोन शब्दांत . मेष - पैसा मिळेल, वृषभ - तब्येत संभाळा ... करत करत माझ्या राशीचं भविष्य - पतीपत्नीत मतभेद !   हरे राम ... दोन सेकंद वाया गेले. इथे दुरूनही कोणी 'होतकरू पती ' म्हणण्यासारखं दिसेना ! आता काय करावं ? 

     तर , भविष्य खरं -खोटं  पहाणं शक्यच नव्हतं. छापकाटा करायला नाणं उडवावं आणि ते कुठल्यातरी खाचेत उभं जाऊन अडकावं तसं झालं !  मग विचार करत बसले. ह्या भविष्याला काय अर्थ आहे ?  जगातल्या  १/१२th लोकांना हे लागू पडणार.  सरसकट.  म्हणजे  १/१२ हून जास्त माणसं आज एकमेकांशी भांडणार. आणि ह्या १/१२th  लोकांच्या other halves चं भविष्य काही वेगळंच असणार ! त्याचं काय ? पेपरात नुसतं  'धनलाभ' म्हटलं की झालं. पण धनलाभ म्हणजे काय ?   रस्त्यात १० रुपयाची नोट सापडणं, इथपासून ते १ कोटीची लॉटरी लागणं , इथपर्यंत धनलाभच.  ह्यात आपणच कुठेतरी नीट जपून ठेवलेले, सापडत नसलेले पैसे सापडणं, किंवा कोणीतरी उधार घेतलेले पैसे परत करणं, हे येत नाही . त्याला वेगळं भविष्य हवं. ' जुनी येणी वसूल होतील असं !

    एकूण भविष्य वाचणे, बघणे, सांगणे हा एक जोरात चालणारा - मरण नसलेला व्यवसाय असू शकतो. रंजले - गांजलेले, परिस्थितीने नाकी नऊ आलेले , दुखण्यांनी त्रासलेले असे लोक विश्वासाने किंवा शेवटचा उपाय म्हणून तरी भविष्य विचारायला - पत्रिका वगैरे दाखवायला  जाणारच.     ' फल ज्योतिष ' हे शास्त्र आहे का नाही, हा वेगळाच विषय आहे.   पण काहीतरी ठोकताळे असतील , statistics असेल म्हणून हे  'शास्त्र ' आहे का नाही , हा विचार करण्याइतपत ही बाब येऊ शकली.   मला कधीकधी दारावरून पायपीट करत जाणाऱ्या आणि फुटपाथवर बसून भविष्य सांगणाऱ्यांबद्दल वाईट वाटतं. ते कोणाला फसवत आहेत  ?   स्वतःला का लोकांना ? त्यांनी स्वतःचं भविष्य वाचलं असेल का ?     पोपटवाले ज्योतिषी तर धमालच !   त्यांच्या पेक्षा तो पोपटच जास्त जाणतो भविष्य !   पण काही म्हणा, पोपटाला चिठ्ठी उचलायला शिकवणं सोपं नसणार !

    एकदा  आपल्या चहाच्या कपातली  tea - leaves  वाचणारी एक बाई आली आमच्याकडे पाहुणी. त्या दिवशी मी सगळा चहा दोनदा गाळला . वाच म्हटलं,  काय ते .   ती गप्पच बसली ! तिला काही वाचण्यासारखं दिसलंच नाही.   मुळात माझ्या कपात पत्ती आली की  पोटात गेलेला चहाही बाहेर येऊ बघतो, तीच पत्ती माझं भविष्य जगासमोर उघडं करणार ?  

    काही लोकांना असते दैवी देणगी.  Face-reading,  graphology ह्यांचा मलाही अनुभव आला आहे.  अगदी अचंबा वाटावा असा.  पण तरी माझं मन ह्या सर्व प्रकारच्या  भविष्यवाद्यांबद्दल साशंक असतं. कारण , जितक्या वेळा ते खरं ठरलं , तितक्याच वेळा खोटं ही ठरलं . ' हात दाखवून अवलक्षण '  ही म्हण मला खूप पटते.  माझी मैत्रीण माझा हात रोज पहायची.  कंटाळा आला की आमचा हा उद्योग.  वर्गात, कँटीन मध्ये, बस स्टॉपवर !  मग ती सांगायची, " हं, mercurial character..."  " म्हणजे काय "   " सांगते, सांगते "...    "तुला तीन ठिकाणाहून पैसे मिळणार ... एक नवरा,  मग तुझे वडील, आणि तिसरं ..."   " म्हणजे मलाच हात पाय हलवावे लागणार .... पुढे बोल ... ती life line आणि पैसा line ह्यांचा ताळमेळ आहे का नाही ?"   "अहाहा,  I mean, अरेरे ,  तुला आज बोलणी खावी लागणार ...."     " मतलब ?"    " मतलब, आता इथून गेली, ती तुझी बस होती ! ..."      माझा हात ताणून,दाबून, मुडपून, उलटा सुलटा करून बघण्यात आणि खिदळण्यात माझी बस कधी येऊन, निघून जायची,  हे आम्हाला कळायचं ही नाही !  आणि आमच्या घरची शिस्त तिलाही माहीत होती .... गेले ते दिवस ! ...

    खरं म्हणजे हे भविष्यकथन दरवर्षी बजेटच्या आधी आणि नंतर ,बरेच लोक तासन् तास TV वर बघत बसतात.  जितके अर्थतज्ज्ञ तितकी मतं, आणि तितकीच भविष्य ! त्यातली किती खरी होतात ते कोण बघतं ?  गेली ३ - ४ वर्षं लोक म्हणताहेत की चायनाची industry पुढच्या ६ महिन्यांत implode होणार, तिथे बंडाळी माजणार वगैरे .  तिकडे तर त्यांचं उखळ  दिवसेंदिवस पांढरंच होतंय !

    आणि हे pandemic पुढच्या दीड महिन्यांत जाणार असं जगभर सांगत होते .   आता चौथ्या लाटेची वाट बघताहेत ..... !    Spiritual गुरूंना जसा गीतेचा टेकू लागतो, तसे हे भविष्यवाले Nostradamus ला धरून बसतात !

  खूप वर्षांपूर्वी रेडिओवर एक छान नाटिका-श्रुतिका लागली होती.  एका माणसाला त्याच्या मित्राने भविष्य सांगितले की ह्या ३० तारखेपर्यंत तुला ४ चाकी वाहनापासून धोका आहे. हा माणूस महिनाभर सुट्टी घेऊन घरी बसला. पुढच्या १ तारखेला ऑफिसला जायचे म्हणून सकाळी तयारी करायला घाईघाईने  उठला आणि मुलाच्या खेळातल्या car वर पाय पडून घसरला आणि पाय fracture !   म्हटलं तर भविष्य खरं - म्हटलं तर नाही !  चार चाकी वाहन म्हणून बरोबर, पण ते खेळणं - रस्त्यातलं नाही म्हणून चूक ! आणि ३० तारीख उलटल्यावर झालं म्हणून चूक, पण धोका झाला - म्हणून बरोबर !! ?

   तेव्हा आपण आपलं ठरवावं, विश्वास ठेवायचा का नाही वगैरे वगैरे ! बरेचदा विषाची परीक्षा नको म्हणून किंवा कोणाचं मन थोडक्यासाठी कशाला मोडा, म्हणून आपण काही गोष्टी करतो.  विश्वास असतोच असं नाही, आणि नसतोच असं ही नाही !

   पण तरीही कधी कधी वाटतं की जोपर्यंत रोजच्या पेपरातला किंवा कोणत्याही मासिकातला 'राशीभविष्य' हा item जात नाही, तोपर्यंत आपण ह्या चकव्यात अडकून पडणार का ?   अर्थात हे प्रत्येकाचं स्वतःचं मत आहे.  असो, आता हे बंद करते.    स्वैपाक वगैरे घरातली बरीच कामे पडली आहेत, माझी वाट बघत. 

    पण आधी नखं कापते, चार दिवस overdue आहेत.  आज नखं कापली तर, ' साचलेली कामं मार्गी लागतील '  असं भविष्य आहे ..... न जाणो, हे खरं असलं तर ..... !

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland