३६५ वा दिवस

    "आजी, हे बघ मी तुझ्यासाठी card केलंय, happy women's day  ! " नातीनी काल माझ्या हातात एक cute card ठेवलं त्यावर एक छानसं चित्र ! आत तिचं आणि माझं चित्र     " तुला कोणी सांगितलं ?"     " काल गेलो होतो नं आम्ही मॉल ला, तिथे सगळीकडे लिहीलं होतं !..."     "आजी, women's day  असतो,  तसा men's  day कधी असतो ?"  तिनं विचारलं.  नुकतीच नवऱ्याशी जरा खाटपीट झाली असल्यामुळे मी पटकन म्हटलं, " बाळा, men 's  day तर वर्षातले ३६४ दिवस रोजच असतो ..."    ती बुचकळ्यात पडली. 
 
    खरंच, उद्या मी विशेष काय करणार आहे ? खरं म्हणजे कोणती बाई काय विशेष करणार आहे ? WA वर शंभर - दीडशे मेसेजेस येतील. गावोगावी ३ - ४ महीला मंडळं एक कार्यक्रम आयोजित  करतील. कोणत्यातरी प्रसिध्द, कर्तृत्त्ववान - इथे ही  वान हा पुल्लिंगवाचक शब्दच - तर कर्तृत्ववतीला बोलावून सत्कार, फु.  गु., एक बिनकामाची  पर्स, शाल, आणि मग वायफळचा मळा ! ...     एक दिवस झोपडपट्टीत साड्या, मिठाईचे डबे , आणि गजरे वाटून महीला दिवस होत नाही

    हा दिवस कोणासाठी आहे ?Unpreviledged ,  पीडित बायकांसाठी ? का  मध्यम वर्गीयांसाठी, का उच्चभ्रू , का accomplished बायकांसाठी ?  आपल्यापैकी किती जणी उद्या स्वैपाकिणीला, मोलकरणीला सुट्टी देणार आहेत  स्त्री मुक्तीची गरज आहे ती त्यांना !  महिन्यातले चार दिवस त्यांनाही असतात, आठवड्यातली एक सुट्टी त्यांनाही हवीशी वाटते ...  'पण लक्षात कोण घेतो ?' 

    ह्याच नावाच्या ,  हरी नारायण आपटे ह्यांच्या कादंबरीने स्त्रियांवरचे अन्याय - अत्याचार रडून रडून जगाला सांगितले.  पण शाळेच्या पुस्तकात त्यातला एक धडा घालण्यापलीकडे काहीच झालं नाही.  जगभर कुठेही माणूस जरा 'मोठा' झाला की त्याच्या भानगडी सुरु होतात ( अर्थात काही अपवाद सोडून !), पण त्यांच्या बायका गप्प बसतात. माझ्या मोलकरणीचा नवरा रोज दारु पिऊन तिला मारतो. पण ती गप्पच. कारण?   पैसा ...  security ... पैसा कसला, तीच ४ घरी कामं करुन आपलं घर चालवते, तो फक्त दारु पितो अन ती दारुला आणखीन पैसे देत नाही म्हणून मारहाण . अन security ?  एका प्रसिद्ध नटीच्या नवऱ्याने लग्नानंतर तिचीच बोली लावली होती ही security ? 

    एकूण कायसगळी नैतिक मूल्यं, सदाचार, संस्कार, सभ्यतेची जपणूक हे सर्व फक्त आपण मध्यमवर्गीयांनी करायची !  त्याबद्दल खंत अजिबात नाहीये.  ते आपण करतोच - करूच.  खंत आहे ती हे न समजण्याची. 

    " मी बायकोला तिच्या मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाऊ देतो " असं म्हणणं ही स्त्री - पुरुष समानता परवानगी देतो ?  परवानगी कशाला हवी ?  जायचं असेल तर ती जाईल !  तिचं तिला ठरवू दे .जसं  तुटकं - फुटकं सामान देणं हे दान नाही , तसं 'परवानगी' देणं ही स्त्री - मुक्ती नाही.      कधी , कुठे , केंव्हा जायचं ह्याचा पोच तिला हवा,    कारण स्त्री मुक्ती म्हणजे 'बेजबाबदारपणा' नाही, हे तिलाही कळायला पाहिजे. 

    ह्याचं दुसरं टोक म्हणजे संपूर्ण पुरुष जातीला आपला शत्रू मानणं.  जिब्रान खलील जिब्रान  ह्यांनी म्हटलं होतं,  की स्त्री - पुरुष हे एकमेकांच्या विरुध्द - opponents नाहीत. ते एकमेकांना पूरक आहेत. एखादी इमारत टिकायला हवी असेल तर तिचे आधारस्तंभ एकाच बाजूला असून उपयोगी नाहीत, ते दोन बाजूनांच पाहीजेत !

    एक मैत्रीण एकदा म्हणाली, " माझी मुलगी स्वैपाक - बैपाक  नाही  हं  करणार...!"   मी मनात म्हटलं, स्वैपाक करणं ही शिक्षा नाहीये किंवा काही 'lowly' काम ही नाहीये.  ती एक विद्या आहे, समाधान आहे. अगदी आवडत नसलं , तरी ते  एक survival skill  आहे.  मुलगा असो वा मुलगी,  दोघांनाही ते यायला हवं.      एखादी सुंदर कलाकृती करण्याइतकी ती एक कला आहे.  फरक इतकाच की ती खूप छान असेल, तर  पुरावा रहात नाही !!

    रोज तेच तेच करायचा कंटाळा  येतो;  पण गायक रोज रियाझ करतो,  क्रिकेटियर रोज net practice ला जातो !  मुख्य म्हणजे  " स्वैपाक न करणं = स्त्री मुक्ती "  हे समीकरण कोणी ठरवलं स्वैपाक हे स्त्रीमुक्तीच्या लढ्यातलं शस्त्र होऊ शकत नाही. फारतर एखादा मुद्दा होऊ शकेल.     महाभारतातला भीम आणि नल-दमयंती fame  नल राजा यांना ह्या कलेनीच संकटकाळात संभाळून नेलं .    मला सांगायला अभिमान वाटतो की माझा नवरा आणि दोन्ही मुलगे उत्तम स्वैपाक करतात. अगदी फोडणीच्या पोह्यांपासून ते पुरणा-वरणापर्यंत आणि पॅकेटवाल्या पास्ता पासून ते बिर्याणी पर्यंत ! आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यात आपण काही जगावेगळं करतोय असं वाटत नाही

    तर हा दिवस आता सणासारखा झालाय !  सण म्हंटला की आपण सर्व साग्रसंगीत करतो, उत्साहाने करतो तसा  हा बायकांचा सण ! पण हा एक दिवस तिला मखरात बसवून तिचं कौतुक करण्यापेक्षा,  घरातल्यांनी रोज तिला थोडी मदत केली - निदान आपली कामं थोडीफार तरी आपण स्वतः केली, तर जास्त छान होईल !

    पण तरीही हा एक दिवस घ्या म्हणे सगळ्याजणी आपली हौस करुन !     हक्काची सुट्टी घ्या, छान छान नटा , पिकनिक करा, मजा करा, पुस्तक वाचा, हवं ते करा !   नंतर आहेच मग परवापासून पुढचे ३६४ दिवस ... येरे माझ्या मागल्या ...!

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland