आधा है चंद्रमा

 

    सिनेमा, पिक्चर, मुव्ही  ... म्हणजे रंगीबेरंगी- नव्हे - चंदेरी दुनिया ! अगदी इस्टमन कलर पासून ते अगदी रेड चिली पर्यंत !! बहुतेक सगळ्यांना आवडणारा असाच एव्हरग्रीन item  !!! आणि मग त्यात आवडता - नावडता , वास्तववादी ते Sci -fi पर्यंत असे  अनेक प्रकार !!        

      माझ्या आठवणीतला पहिला सिनेमा - नवरंग !  गोष्ट कळायचं ते वय नव्हतंच.   पण लक्षात राहीलं ते हे गाणं  ' आधा है चंद्रमा ....' ! आणि कसं कुणास ठाऊक, माझं आणि सिनेमाचं नातं अगदी तसंच आहे,  अजूनही !  मी बरेच सिनेमे अर्धेच पाहिले आहेत !

    माझं सिनेमाशी लहानपणी फारसं सख्य नव्हतं.  मला थिएटर मधल्या अंधाराची खूप भीती वाटायची आणि जरा भांडणं  सुरु झाली की  मलाच रडू यायचं, अगदी धो धो !  आणि मारामारी सुरु झाली की मी आईला - मावशीला मिठी मारून बसायची किंवा ऐन climax ला रडून रडून बाहेर !  माझ्यामुळे घरच्यांनीही पुष्कळसे सिनेमे अर्धे - पाऊणच पाहीले .  मोठेपणी मग मुलांनी त्याचा वचपा काढलाच ! परिणाम तोच - अर्धवट सिनेमा सोडून आम्ही घरी ! ...

    माझं कॉलेजचं शिक्षण अमरावतीत झालं.  लहानसं गाव . तिथे घराजवळ गणपती उत्सवात दोन - तीन सिनेमे दाखवायचे.  पोलिस लाइन चा गणपती . त्यांच्या परेड ग्राऊंडमध्ये ते स्क्रीन उभा करायचे. आणि बसायची arrangement भन्नाटच !  सगळ्यांनी खाली जमिनीवर बसायचं.  सतरंजी वगैरे आपापली आणायची.  त्याहून वरताण म्हणजे स्क्रीनच्या एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला बायका अन् लहान मुले !   आम्ही बहिणी, बरोबर ३ - ४ मैत्रिणी आणि त्यातल्या कोणाचीतरी आई असा लवाजमा , बरोबर एक मोठी सतरंजी घेऊन जायचो !  पहील्या वेळी सिनेमा सुरु झाला आणि काहीतरी विचित्र वाटायला लागलं,  असं का दिसतंय ?  काहीतरी चुकलंय.   पडद्यावर गुरुदत्तच आहे, भाषा हिंदी आहे, पण चमत्कारीक वाटतंय ! सिनेमातल्या बायकांच्या उलट्या साड्या ? पदर समोरून येऊन  डावीकडून उजव्या खांद्यावर मागे ?  गुजराथी style ही नाही...., आणि सगळे जण डावे हात वापरत आहेत ! प्रोजेक्टरमध्ये फिल्म उलटी तर नाही लावली ... आणि मग डोक्यात प्रकाश पडला ... बायकांची बसायची व्यवस्था स्क्रीनच्या मागच्या बाजूला  ... त्यामुळे सगळी mirror image !!! आख्खा 'प्यासा' आम्ही असा उलटा बघितला !  झालंच तर 'आम्रपाली' सुध्दा !  केवळ वैजयंतीमाला होती म्हणून ते सुसह्य झालं ! 

    कधी कधी असा सिनेमा चालू असतांना पाऊस यायचा.  भाद्रपद महिना म्हणजे पाऊस येणारच !  थोड्या-फार शिंतोड्यांना कोणी भीक घालत नसत, पण मोठी सर येतेय असं वाटलं, की आम्ही सगळ्याजणी उठून, तीच सतरंजी गोवर्धन पर्वतासारखी सगळ्यांच्या डोक्यावर धरून घरी धावत सुटायचो.  आणि एकदा घरी पोहोचलो की गडाचे दरवाजे बंद !  पाऊस थांबला तरी पुन्हा परत जाता नाही यायचं !  त्यामुळेही मी बरेच सिनेमे अर्धेच पाहिले ! पण असा Mirror image वाला सिनेमा फार कमी लोकांनी पाहीला असेल !

     असंच एकदा कॉलेजमध्ये , आम्ही  मैत्रिणींनी सिनेमाचा plan केला.    १४ मुलांत आम्ही ५ मुली. लेक्चरला दांडी मारून आम्ही ५ जणी थिएटरवर !   त्या दिवशी काय झालं होतं माहीत नाही, पण तिकिटांच्या रांगेत होस्टेलच्या मॅट्रन-मॅडम आमच्या पुढे ! माझी मैत्रीण होस्टेलवाली.  आधीच  permission न घेता गावात आलेली !   ती सर्द !   ती माझी ओढणी डोक्यावरून घेऊन बसली !  असो, सिनेमा तर सुरु झाला.  इंटरव्हलमधे दिवे लागल्यावर पहातो तर आमचेच २ - ३ प्रोफेसर आपापल्या 'कुटुंबा' समेवत आमच्या मागच्या रांगांमधे !  तेव्हा खूप दरारा असायचा , सर लोकांचा !   कधी इंटरव्हल संपतोय आणि दिवे बंद होताहेत असं झालं.  अंधार झाल्यावर गुपचुप  खालमानेने आम्ही पसार.  उगीच दुसऱ्या दिवशी भर वर्गात आमची 'चंपी' नको व्हायला !  एकूण काय, Dream girl अर्धाच  ! 

    आणि ... मागच्याच आठवड्यातला किस्सा !  मजा नाही, जरा भीतीच वाटली !  'Top Gun 2'  आला !  मला विमानं, war movies   खूप आवडतात .  पहिला Top Gun अतिशय आवडला होता, म्हणून धाकट्या मुलाने special तिकिटं काढली !  "आई, hitech खुर्च्या आहेत ... नीट धरून बस ... जरा हलतात हं,  screen वर विमान turn होईल तशा ...हा 4-D experience आहे ! ..."     "अरे, एवढी काही भित्री नाहीये मी !"  वगैरे झालं.  आणि सिनेमा सुरु झाला ... 

    ... सगळं छान चाललं होतं ... आणि टॉम क्रूझने जोरात त्याचं विमान तिरकं केलं  , माझी खुर्ची हलली ... आणि मला घेरी आली !    आता,  मला घेरी आली का भीती वाटली कोण जाणे ! .. एक बरं की तो बॉक्स sound proof होता ...! 

  ... अजून तो सिनेमा मी पूर्ण पाहीला नाहीये  ... !

     

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland