Diet

 

    नुकताच नवऱ्याचा एक मित्र जेवायला आला होता.  अमेरिकेहून २ - ३ महिने सुट्टी घेऊन आला होता.  एक अघळ पघळ कुडता आणि जीन्स असा वेष.  "काय चाललंय सध्या ?"  ,   'या, बसा' उरकल्यावर मी त्याला विचारलं.   "काही नाही.  सध्या एकच व्रत.  चरखा - खादी !"    "हो, ते दिसलंच,  कुडता - बिडता  ..."     "त्यावर तो म्हणाला, " छे छे, तसलं काही नाही.  माझं व्रत म्हणजे , चर-खा ... इथे चर, तिथे खा,  आणि कोणी बोलावलंच तर,  गादीवर बसून खादी !"     मला त्याचा अचंबा वाटला.  अमेरिकेतून येऊनही,  ह्याचा diet plan भलताच भारी !  मनोमन त्याचं कौतुक करत मी बटाटेवडे तळायला घेतले.  आजकाल कोणी नीट खातच नाही.  मग माझ्या सारखीची पंचाईत होते ... 

    आजकाल डाएट चं प्रस्थ फारच बोकाळलंय.  जो तो आपला कोणालातरी follow करत असतो.  माझी मुलं ही त्याला अपवाद नाहीत. आता दोन मुलं म्हटल्यावर ती दोन टोकं असणारच.  त्यांचे स्वभाव,  आवडी - निवडी  सगळंच वेगळं.  मोठा तसा खाण्याची आवड असलेला. झटपट खातो, पटपट उरकतो.  त्याला जातायेता काहीतरी तोंडात टाकायला, चरायला आवडतं.  काहीही चालतं.  आणि जेवल्यावर खारवलेलं आलं किंवा ओवा,  हाजमोला सगळं त्याच्या हाताशी असतं.  "Just in case... कोणाला लागलं तर  जवळ असावं म्हणून ."  ते त्यालाच जास्त लागतं !  त्याच्या फोन / कॉम्पुटरचा screensaver पण ice-cream cone, नाहीतर इडली सांबार ची प्लेट !    तो म्हणतो, "मी दिवेकर मॅडमना मानतो.  त्या म्हणतात, 'हवं ते खा, हवं तेव्हा खा, मधून मधून खा, ...  मला ते फार suit  होतं !"  मी म्हटलं "अरे बाबा,  त्या व्यायामाचं सांगतात त्याचं काय ?"     तो म्हणतो, "कधी ? त्यांनी कधी, कुठे म्हटलंय की इतके तास व्यायाम करा, इतकं चाला ..."     "अरे, तू फक्त पहिला paragraph वाचतोस, पुढे काय ते वाच !" ... तो  "हो"  म्हणून गुळाचा एक खडा तोंडात टाकतो ! ...   

    धाकटा त्या मानाने फारच शिस्तीचा.  'नाही' , म्हणजे नाही.   एकदा पोट भरलं की काही नाही.  कामात असला की सकाळी एकदा जेवेल आणि मग झोपेपर्यंत तहान, भूक हरपून  काम ! तो एक बंपर भरून  कॉफी करून घेतो आणि ती ८ - १० तास पुरवतो !  त्याचं म्हणणं, "करायचीच वेळ आली,  तर मी दीक्षित डाएट करीन ... एकदा तासभर खावं, मग बसावं."     "अरे, पण तुला भूक बीक नाही का लागत ?  आणि कॉफी not allowed नं !"     "अं, थोडं इकडे तिकडे चालतं ... !" 

    सुनांच्या डाएट मधे मी पडत नाही.  त्यांना हवं ते करायची मुभा आहे.  त्यांनी त्यांना आवडेल ते करावं आणि खावं ! मी त्यांना कंपनी द्यायला नेहमीच तयार आहे ! अगदी 'freedom' ....किंवा त्यांची  'space' , बरं का !

    नवऱ्याचं म्हणावं,  तर ते अजूनही गौडबंगालच आहे.  त्याला शिक्रण पोळी, गूळ तूप पोळी आवडते.   पण हे सोडून त्याला काय आवडतं अन काय नाही,  हे खरंच मला अजूनही माहीत नाही !   कोणाकडे गेलं आणि कोणी विचारलं की आपण म्हणावं, "छे हो, त्याला तिखट अजिबात आवडत नाही.  त्रास होतो... वगैरे वगैरे."   आणि पानावर  बसला की त्याने त्याच पदार्थावर ताव मारावा ... !      कधी आपण म्हणावं,  "अगं, तो सगळं खातो, थोडेसे नखरे करतो, पण खातो..."  की , मग हा  'तिखट'...  म्हणत आकाश - पाताळ एक करणार.  .. लोकं गार पाणी, काकडी , दूध ,तूप, दही ,साखर, साय,  जे मिळेल ते पंचामृत घेऊन धावाधाव करणार ... आणि मग आपल्याकडे न पहाता, हा तूप-साखर पोळीचा रोल करून खाणार !  मी त्याच्या वाटेला जात नाही  या बाबतीत ... कधी कधी वाटतं , हा बहुतेक love आणि fresh air वर जगत असावा ! इतक्या वर्षांत , मी त्याला कधीही आपण होऊन , काहीतरी घेऊन खातांना पाहिलं नाहीये !

    माझं डाएट म्हणाल, तर ... ते असं कोणत्याच चौकटीत बसत नाही !!!  Atkin's diet , GM diet अशा 'अघोरी' प्रकारांना मी घाबरते.     लहानपणी मी चुलीत बटाटे, कांदे, शिंगाडे, रताळी वगैरे जे हाताला लागेल ते घालून ठेवायची आणि ते सवडीने खायची.  चिंचेची पानं, गुंजांची पानं, गुलमोहोराच्या फुलातला कोंबडा ,इथपासून ते अगदी तंदुरी चिकन पर्यंत, माझं खाण्याचं circle पूर्ण व्हायचं !  पण ते होतं , कोणे एके काळी ! आता मात्र विचारू नका,  साखर नाही, मीठ नाही , तूप नाही , तेल नाही, मग मी काय खायचं ?... ह्याच्यासारखं मी नुसत्या love and fresh air वर जगू शकत नाही !.....

       ...न माझं कोणतं डाएट ,   न दिवेकर   ,           न  दीक्षित ,...कारण मी नेहमीच बुभुक्षित !!!......



Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland