कोणावर राज्य ?
काही महीन्यांपूर्वी, कोविड वगैरे संपल्यावर एका छानश्या ट्रिपला जाऊन आले. खूप वर्षांनी बाहेर पडल्यासारखं वाटत होतं. सुंदर ठिकाण आणि टुमदार homestay ... म्हणजे खरा खरा homestay ! सुंदर स्वच्छ खोल्या, मोठा व्हरांडा आणि अंगणात उतरणाऱ्या पायऱ्या. वरच्या पायरीवर बसून मी तिथली बाग, झाडं, फुलं ... अगदी गवत आणि काड्याकुड्या सुध्दा डोळ्यांत आणि मनात साठवत होते.
अचानक कुठून तरी फुलपाखरं उडत यावीत, तश्या २ - ३ छोट्या मुली आल्या. "नमे, ए नमे ... " अशी हाक मारताहेत तोच आमच्या homestay च्या मागच्या बाजूने 'नमी' आलीच ! बघता बघता ६ - ७ जणी जमल्या. बडबड ... बडबड ... "काय झालं नं ... " जोरजोरात हातवारे करत बोलणं !! ... मी गंमत बघत होते , .."आजी, आम्ही इथे खेळू ?" "हो, अगं तुमचंच घर आहे नां ... खुशाल खेळा." "तुम्हाला त्रास नाही ना होणार ?" "छे छे, काही नाही. ..पण मी खेळ पाहू तुमचा ?" मी विचारलं. त्यांनी जरा नाखुषीनेच माना डोलावल्या. नाखुषी असं वाटलं कारण पटकन 'हो' असं आलं नाही, असो ... आणि खेळ सुरु झाला.
"ए ... चकूया ? " ... चकूया ... किती वर्षांनी मी हा शब्द पुन्हा ऐकला ! मी तर पार विसरूनच गेले होते. लहानपणी शाळेत, घरी, काहीही करायचं म्हटलं की आधी चकण्यापासून सुरुवात. ते नाही पटलं तर मग 'अडम तडम, तडतड बाजा ... ' करत एकेकीला मोजत मोजत जायचं, गाणं संपेल त्या मुलीवर किंवा मुलावर राज्य ! पण हे राज्य नकोसं ... आपल्यावर राज्य आलं की वाटायचं बाकी सगळ्यांनी काहीतरी डाव रचलाय .. आपल्याविरुद्ध ... ! दुसऱ्यावर राज्य आलं की आपण अगदी सचोटीने वागणारे ... !
ही छोटी छोटी गाणी इतकी मजेदार ... जशी बडबडगीतं ... पण जरा मोठ्या मुलांची ! अर्थ काहीच नाही ... एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी काही संबंधही नाही , तरी पण ती खूप आवडायची ! आणि ही गाणी universal ... महाराष्ट्रात कुठेही जा, ६ ते १० वर्षांच्या 'वयोगटा'तल्या सगळ्यांना पाठ ... मोठ्यांना मात्र जरा लाज वाटत असावी.
तर, मुलींचं चकणं झालं आणि दगड का माती खेळायचं ठरलं ... 'नमी'ला मधे उभं करून तिच्या हातावर उलथ्या पालथ्या टाळ्या देत सुरु झालं ... 'कोरा कागद निळी शाई ...' आणि मला नकळत मीही म्हणू लागले! ... 'आम्ही कुणाला भीत नाही ... दगड का माती ?' ... खेळ सुरु झाला आणि मीही त्यात गुंगले. "अगं ए पळ, ती आली इकडे ... जा पळ त्या पलीकडच्या दगडावर ..". खरंच आपणही त्यांच्यात खेळायला जावं का ,असं वाटलं.
लहानपणची ही बडबडगीतं, मग कशीही कुठेही चालायची. एकदा धाकट्या बहिणीला खूप बरं नव्हतं - तर तिने हसावं म्हणून मी तिच्याशी 'अवडक चवडक दामाडू ..' नाहीतर 'अटक मटक चणे चटक ..' वगैरे खेळत बसल्याचं मला आठवतं ! नंतर ते मनात कुठेतरी बसलं असावं. इतकी वर्षं कधीच आठवलं ही नाही की म्हटलं ही नाही. पण ते होतं , जे त्या दिवशी आठवलं .
नागपूर - अमरावतीकडे हिंदी-मराठी म्हणजे ६० - ४० ! तुमची मातृभाषा असेल त्याप्रमाणे ६० ... ! आम्ही घरात मराठी आणि दाराबाहेर पाऊल पडलं की हिंदी ! त्यामुळे मित्र मैत्रिणी खेळायला जमले की लगेच आमचं 'अक्कड बक्कड बंबे बू ...' सुरु व्हायचं आणि मग 'चोर निकलके भागा ..' म्हटल्यावर पळापळीला सुरुवात !
मुलं लहान असतांना ही गाणी म्हटली असतीलही ! जसं ' अडगुलं , मडगुलं " , नाहीतर "लव लव साळू बाई " , किंवा "हात रे , हुत रे " वगैरे !! ती सगळी गाणी बाळांनी ऐकण्याची ! नंतर, "भटो भटो," किंवा 'आपडी थापडी' वगैरे जास्त ! ! आपला भट जाऊन जाऊन जाणार कुठे ... तर कोकणांत , आणि आणणार काय तर फणसच ! 'च्याऊ म्याऊ' करतांना, आईचे कान पकडण्यातच मुलांना जास्त interest ... त्याकरता ते आपडी थापडी सहन करायचे ... ! 'गर गर गिरकी, ताकाला फिरकी' म्हटलं की पुढचा लोण्याचा गोळा आठवून मुलांच्या चेहेऱ्यावर आधीच हसू यायचे !
बंगलोरमधे आल्यावर हे नसणार, असं वाटलं होतं. कन्नड मधे असेल का नसेल माहीत नाही. पण मुलं इंग्रजी शाळेत गेल्यावर दोन तीन वर्षांतच इंग्रजी चकणं ऐकू आलं ... 'Eena Meena Myna Mo '... आणि त्याहीपेक्षा आवडीचं म्हणजे 'Inky Pinky Ponky ...' !
....आता ना एवढी कोणी जमतात, ना खेळतात ... आपल्याला तर खेळणंही शक्य नाही. पण खेळायचं spirit मात्र आम्ही जिवंत ठेवलंय ...आपल्यापुरतं ! ..रात्री झोपतांना खोलीतला दिवा कोणी बंद करायचा ... सकाळी उठल्यावर चहा कोणी करायचा ... इथपासून ते, अंघोळीला कोणी आधी जायचं.....ह्यावरुन आम्ही दोघे चकतो ... किंवा मग एक अगदी साठवणीतलं खास बडबडगीत !...आदा ×× .... किसने ×× .... ! मला खात्री आहे , हे कोणीही विसरलेलं नाही !!!..
I HAD TRIED THESE SONGS COLLECTION . IT IS GREAT dhamaaal, IT WORKS WELL IN OTHER STATES LIKE GUJARATH MP AND KARNATAK BEING SIMILARITY IN CULTURE. YOUR rajya IS BEUTIFULL, BRAVO FOR NEXT XXXXX.
ReplyDeleteThanks a lot , I too know many more songs . I have written down most of them ... But don't see any future for them ...almost काल बाह्य
Delete