निर्भया
आज सकाळी सकाळी पेपरातील बातमी वाचली, आणि मूड गेलाय ... मूड गेलाय हे म्हणणं, understatement ... नव्हे gross understatement of the decade ... त्या कलकत्त्याच्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही, कारण हा गुन्हा 'rarest of rare' असा नाही , हे वाचलं आणि ... काय काय झालं म्हणून सांगू ... रक्त खवळून उठलं ... डोक्यांत एक महा प्रचंड तिडीक गेली ... अंगात आगीचा डोंब उसळला ... आपल्या अंगात कुणीतरी खंजीर खुपसावा असं काहीतरी आत तुटलं ... आणि हे definitely कलियुग आहे हे पटलं ... एरवी विशेष देव वगैरे न मानणारी मी ... अगतिकपणे देवासमोर उभं राहून म्हणावसं वाटलं ... तुझ्या राज्यात हे काय चाललं आहे .?.. पण त्याला जाब विचारणारी मी कोण ..?. अगतिकपणे.....कारण, केवळ असहाय्य्य अशी मी ... ना पुरेसं धैर्य, ना resources, ना कुठे वट, ना powerful connections ... नुसतं सभांमध्ये , मंडळात वगैरे बडबड करून, मोर्च्यांत सहभागी होऊन , भाषणं ठोकून, काहीही होत नसतं ... केवळ एकाच शब्दात सांगायचं तर ... हे सगळं केवळ पोकळ ....
निर्भया ... काय अर्थ आहे ह्या शब्दाला .? .. निर्भया , एक नाही तर अनेक ... दर वर्षाला, महिन्याला, नव्हे आता तर दर आठवड्याला निर्भयांची संख्या वाढतेय ... आणि 'निर्भया' हे काय नाव ? ... त्या सगळ्या काय निर्भयपणे त्या अत्याचारांना सामोऱ्या गेल्या ? की ," ये रे बाबा, आणि कर , काय करायचं ते माझ्या शरीराचं... ? ... त्या क्षणी भीती, दुःख, राग, चीड, संताप, inadequacy ... ह्या विचारांनी गोठून गेल्या असतील ... नुसती कल्पना करा ... आठवा ... बस मधे , लोकलमधे, गर्दीत, शाळाकॉलेजात कुणीतरी अंगाला हात लावल्यावर आपलं काय होत होतं ते ... तो संताप... तोंड दाबून बुक्क्यांचा मार परवडला ... पण हे ... ? मुकाट बसलोच नं आपण ... असला अनुभव आला नाही, अशी खोटी विधानं तर अजिबात करू नका ... आणि त्या मुलींना 'निर्भया' वगैरे दांभिक गोजिरवाणी नावं देण्यापेक्षा , स्पष्टपणे ' स्त्री बळी' म्हणा ... कुणाच्यातरी पाशवी वासनेचे ... पाशवी हा शब्द पशु या शब्दापासून आलाय खरा , पण त्यांच्यात ही rape नसतो . वंश वृद्धी सोडून , बाकी कशाची ही जाणीव नसते .
पण, हे सगळं केवळ कलियुग आहे म्हणून होत नाहीये ... हे तर कृत, त्रेता, द्वापार युगांत ही झालं ... आपल्या श्लोकातल्या पंचकन्या आठवा ... त्यातल्या चौघी जणींना अशाच प्रकारचं दुःख भोगावं लागलं ... मंदोदरीबद्दल विशेष काहीच माहीत नाही ... तिला हे नसेल भोगावं लागलं, पण universal truth ... नवऱ्याने, मुलाने समजुतीचे, शहाणपणाचे शब्द न ऐकणं , चुकलेलं दिसत असूनही आपलं काहीही न चालणं, उपेक्षितेचे जीवन जगणं,... हे तर रोजचंच ... त्यात कसला आलाय मोठेपणा ? घरातलं दुय्यम स्थान आपल्या पाचवीलाच पुजलेलं, आणि त्यामुळे डोक्यावर थापलेलं ... त्यांत काय विशेष ? रोज मरे त्याला कोण रडे !! ... पण, प्रश्न तो नाहीये ... अशा अनेक जणी पुराणातल्या , गोष्टीतल्या आणि इतिहासातल्या...केवळ एक प्यादं, एक tool म्हणून वापरल्या गेलेल्या, ... त्यांना मन-जीव आहे, हे सामाजिक norms मधे बसत नव्हतंच ! एखाद्या वस्तूसारखी वागणूक, वगैरे मी नाही म्हणणार ... त्यांना सगळ्यांना देवानी तोंड दिलेलं होतं ... फक्त ते बंद केलं होतं ... रूढींनी, परिवारांनी, समाजानी ... पण म्हणजे दुसरा प्रश्न ... की अती वा पराकोटीचे अत्याचार सहन केले की मगच पंचकन्यांच्या ओळीत बसवतात ? रोज नवनवीन आव्हानं झेलत, स्वतःच्या आत्मसन्मानाचे घाव सोसत, रक्ताचं पाणी करत जगणाऱ्या बायका, का तेवढ्या 'great' समजल्या जात नाहीत ?जाऊ दे ...
वय वर्षे - नव्हे - काही महिने वयापासून ते नव्वदीतल्या सुद्धा बायका-मुलींना सोडत नाहीयेत ... हा कसला समाज ? कोण शिकवतोय किंवा कोण शिकवत नाहीये ह्या लोकांना ? कसले संस्कार घडवतोय आपण ? वडील आईला मारझोड करत होते, हाच आदर्श ठेवून मुलगे मोठेपणी आपल्या बायकांना झोडपतात, खून करतात, कुठेतरी नेऊन विकतात ... कुठून आलं हे सगळं ? दर सिनेमात एक तरी rape scene, तो सुद्धा अगदी details मधे दाखवायलाच हवा का ? त्यातही त्या बाईचं शरीर maximum दाखवायचं ... कारण, 'it is essential for the story' ... it is the turning point ... turning point for what ??? Producers' money vaults ? आणि असे roles करणाऱ्या दीड दमडीच्या बायका ... actresses ? पैसे बनले की मग ओरडता येतंच ... casting couch च्या नावानं ! का कळत नाही हे ? की सगळेच सामील ? ह्यात सिनेमा बरोबर TV च्या serials, news वाले channels ... सगळेच सामील ...
ते जाऊ द्या, ... त्यांना कोणी 'निर्भया' मानत नाहीये ... पण त्यांच्यामुळे काळ सोकावतोय ... सगळ्याच मुली-बायका 'available' च नव्हे - तर तो पुरुषांना त्यांचा gender-right वाटतोय ... आजकाल नववी-दहावीतल्या मुलाला rape करता येतोय, पण तो वयाने लहान म्हणून दोन वर्षात सुटका ?
हा rarest of rare गुन्हा नाही ... बरोबर आहे . हे तर रोजच सगळीकडे होत असतं ... शिवाय तो आरोपी अजूनही बरेच हाल करू शकला असता, नाही का ? आणि rape म्हटलं की थोडं फार hurt होणारच, नाही का ? मग त्याबद्दल इतका हल्लागुल्ला कशाला ? ... मग तुमचं स्त्रीत्व, स्वत्व, तुमचं स्वातंत्र्य, तुमचे हक्क-अधिकार ... जाईना का तेल लावत ... आणि गम्मत म्हणजे, एरवी फालतू कारणांसाठी एकमेकांवर तुटून पडणारे सर्व समाज-सुधारक, राजकारणी, पार्ट्या, NGOs ... सगळेच गप्प ... कोणी तोंडातून एक अवाक्षर काढत नाहीयेत ... कारण तसं करणं फार inconvenient आहे ... किंवा तो नराधम 'कुणाचा तरी कोणीतरी' असेल ... शिवाय त्याला म्हणे आता पश्चात्ताप होतोय, ह्यापुढे सुधारण्याची इच्छा आहे ... तुरुंगात चार लाथा खाल्ल्यावर पश्चात्ताप होणारच नं ... त्याला जरा आम्हा बायकांच्या ताब्यात द्या बरं ... लगेच खरा पश्चात्ताप होईल त्याला ! ! !
जाऊ दे ... हे असंच चालणार ...आणि हे भोटम वाक्य म्हणत, मी ही काही दिवस असेच धुमसत घालवणार आणि मग गप्प बसणार ... अजून काय ?
अरे हो, एक राहीलंच ... आईच्या पोटातंच ज्यांचा खून झाला, त्या मुलींनो, वाईट वाटून घेऊ नका ... तुम्हाला काही कळायच्या आताच तुम्ही ह्या सगळ्यातून सुटलात , जगाच्या बाहेर पडलात ... नाहीतर जन्मल्यापासून मरेपर्यंत ह्याच चिंतेत जगावं लागलं असतं ... आम्हीही तेच करतोय ... आयुष्याची थोडीशीच वर्षं उरली आहेत, तरी अजून तेच भीतीचं सावट अवती-भोवती असतं ... कधी स्वतःसाठी, तर कधी मुली-बाळी, सुना-नातींसाठी ...
अगदी उद्या सत्ययुग आलं , तरी त्यात ती बिचारी अहल्या असणारंच नं ... पंचकन्या नंबर एक !.. हे असंच चालत रहाणार ...कालचक्र .... काळाचं रहाटगाडगं आणि त्याला घंटेसारख्या बांधलेल्या आपण ... आपलं रडणं ... आजूबाजूच्या धबडग्यात कुणाला ऐकू येणार ....आपला आवाज ... ???...
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
ReplyDelete*अलकाचे चणे कुरमुरे*
*निर्भया*
आजचा तुझा अत्यंत स्फोटक ब्लॉग आणि त्यातली जहाल भाषा वाचल्यावर त्यावर प्रतिक्रिया सुद्धा द्यायला कोणी धजावेल असं मला वाटत नाही. तुझ्यात असलेल्या धगधगत्या ज्वालामुखीची प्रखर उष्णता वाचताना सुद्धा जाणवत होती.
तू व्यक्त केलेली भावना ही संतप्त समाजाची प्रतिक्रिया आहे. फक्त इतक्या टोकाला जाऊन लिहिणं म्हणजे निखाऱ्यावर चालल्यासारखा आहे. किमान त्या बद्दल लिहिण्याचं धाडस तुझ्यात आहे तेव्ह्ड्यासाठी तुझे अभिनंदन.
जोपर्यंत स्त्रीला भोगदासी च्या नजरेने बघितलं जातंय तो पर्यंत विकृत मनोवृत्तीचे लोक अशी कृत्य करत राहतील. त्या साठी स्त्रीने सुद्धा अबला न रहाता सबला होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःची अब्रू वाचवताना हातून खून जरी झाला तरी त्या परिस्थितीत स्त्रीला निर्दोष मानावे असे कायदा सांगतो.
सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार असलेला न्यायदेवतेचा पुतळा हटवला आणि नव्या न्यायदेवतेच्या पुतळ्याचे डोळे उघडे केले आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात भारताचं संविधान दिलं आहे. न्यायदेवतेच्या नव्या रुपामुळे या प्रकरणाचा लागलेला निकाल
मलाही अपेक्षित नव्हता.
प्रसाद जोग.
धन्यवाद , प्रसाद
Deleteअलका,अगदी आमच्या भावना व्यक्त केल्यास...बातमी वाचून मलाही भयंकर संताप आला...आणि ज्याला शिक्षा झाली तो तर एक प्यादं होता..त्या मागचे सगळे नालायक , भ्रष्ट,जगात सन्मानाने मिरवणारे खरे गुन्हेगार परत तेच करायला मोकळे ?आपण कुठल्या न्यायाबद्दल बोलतोय ? भयंकर आहे..
ReplyDeleteThank you , संजू
Delete