अलक

  

    'अलक' ... म्हटलं की आजकालच्या संदर्भाप्रमाणे आपल्या मनात  'अति लघु कथा'   हेच येतं .    हा एक short-form  आहे ही ... पण  'अलक'  या संस्कृत मधील शब्दाचा अर्थ खूपच वेगळा आहे ... अलक म्हणजे केस ... लांब सडक, मऊ मऊ रेशमी, सुंदर केशकलाप - केश संभार वगैरे ... तो अचानक आठवला...... कालच मोठ्या जाऊबाईंना भेटायला गेले होते.   त्या इथे आल्या आहेत म्हणून ... आणि त्यांच्या बोलण्यात हा शब्द अचानक पुन्हा सापडला ... केसांवरून सहज गप्पा चालू होत्या ... 

    त्या सांगत होत्या ... "अगं, आमच्या लहानपणी वेणी घालणं म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा ... एकत्र कुटुंब होतं ... सणवार - कार्य वगैरेंच्या निमित्तानी सगळी जमायची ... तेव्हा सगळ्या मुलीबाळींच्या वेण्या घालणं हे एक मोठं कामच असायचं ... मग घरातली कर्ती - मोठी बाई एखाद्या काकू-मामी-आत्या ला पकडायची,  आणि "आज तुला हेच काम, मुलींच्या वेण्या-फण्या तू उरक ... बाकी आम्ही बघतो" ... असा हुकूम सुटायचा ... आणि मग सगळ्या मुली आपापला कंगवा घेऊन नंबरच लावायच्या ... आपला नंबर आला की ती काकू विचारायची ... तुला कसली  गं वेणी हवीय? ... मग मुली विचारांत ... झोपाळा, का  जिलबीची वेणी, का ४ वेण्या - दोन छोट्या-दोन मोठ्या वेण्यांत सामील होणाऱ्या, कुणाला दोन्हीकडे २-२ छोट्या, कुणाला ५ पेडी तर कुणाला ७ पेडी !    एखादी जरा वयात येऊ घातलेली ... तिला खोप्याची trial ..पुढे मागे येणारच वेळ ....!  आणि वेणी घालून झाली की घालणारी आपल्या पाठीवर दोन्ही हातांनी थाप देऊन म्हणणार, "उठा आता"  की उठून तिला वाकून नमस्कार करायचा आणि गुंतवळ काढायला आपला कंगवा घ्यायचा ... नमस्कार झाला की कोणीतरी म्हणणारच ... "दृष्ट काढा बाई आज सगळ्या पोरींची" ... किती सुंदर आठवणी ! ...  मला तेव्हा कळलं की वेणी घालून झाल्यावर आई-मावशी पाठीत धपका  द्यायच्या , तो लाडाने ... पण नमस्कार करायचं सुचलंच नाही तेव्हा ... 

    वेण्यांना नटवायचेही किती प्रकार असायचे तेव्हा ... रिबिनी, गोंडे ... !   रिबिनी तर प्लॅन करून आणलेल्या ... ह्या फ्रॉकवर ही, ह्या परकर - पोलक्यावर हीच ... माझ्या लहानपणी नुकतंच नायलॉन येत होतं ... त्याच्या खूप रंगीबिरंगी रिबिनी आणि राखी-भाऊबीजेला तर ही आवडीची ओवाळणी ... मग त्याच्या कडा शिवायच्या ... टोकाला मोती-घागऱ्या लावून त्यात value addition  करणं !    रिबिनींच्या वरची पायरी म्हणजे राजस्थानी गोंडे ... काळ्या दोऱ्यांचे, लटकते, त्यावर मोती, रंगीबिरंगी मणी, सोनेरी टोपणं ...!   मोठ्या बायकांच्या अंबाड्यावर, चक्रावर तर मोत्याचे, घागऱ्यांचे आकडे, वगैरे .. ती अंबाडा घातल्यावर टोकाला आगवळ बांधायची ! आता हा शब्द ही इतिहासजमा झालाय ....


माझ्याकडे आजीचा अंबाड्यात खोचायचा मोराचा आकडा आणि एक अग्रफूल आहे ! 


  तो रोज एकदातरी मी बघते !   आजीच्या लग्नात तिच्या खोप्यावर लावायला चांदीची फुलं कमी पडली होती ! तर केवढा गहजब झाला ... खांडव्याचे जहागीरदार आणि हे असं ... ??  ताबडतोब माणूस पाठवून नवीन फुलं आणून लावली, तेव्हा कुठं सुनमुख पार पडलं ... खरंच सुरस गोष्टी ! असं ही जग होतं ...         माझ्या लहानपणी स्पेशल समारंभांना आम्हालाही वेल - बिंदी घालायला मिळायची !  नंतर ,  शाळेत असतांना clips आल्या ... पाठोपाठ त्यात वेगवेगळे रंगही !   पण ते आमच्या नशिबात , नव्हे ,  केसांत नव्हतं ... क्लिप लावते म्हटलं की ,  आई सगळ्या क्लिपा गायब करून टाकायची ... कधी मधी म्हणजे मामा लोकांच्या लग्नात  गजरा !   कधी शेवंतीचा कलाबतु , लाल चांदीवाला ... नाहीतर निशिगंधाचा ... पण तो फार बटबटीत वाटायचा ...नखरे ...दुसरं काय...   

    दहावी अकरावीत थोडी शिंगं फुटू पहात होती, तेव्हा जरा इकडून तिकडून 'बटा काढणे' ... पण तसा प्रयत्न जरी केला तर दुसऱ्या दिवशी डबल तेल चोपडून वेणी ... अगदी 'इंदू वेलणकर' type... पण तरीही  "शालू हिरवा, पाचू न् मरवा, वेणी तिपेडी घाला ... "   अशा गाण्यांनी उगीचच मनात चलबिचल व्हायची ... एकदा आईला म्हटलं, तिपेडी वेणी काय गं ... दोन भाग करून गुंडाळ ना ... त्यावर आईनी गोष्टच सांगितली ... अगदी महाभारत काळापासून वेणी ही तिपेडीच.   तेव्हा तर तीन वेण्या घालत ... ते सौभाग्याचं लक्षण म्हणून, द्रौपदी  सुद्धा तीन वेण्या घालायची  ...!                          शाळेतल्या दोन वेण्या , ते  एक वेणी, हे स्थित्यंतर लग्नानंतर ... वेळ वाचवायला .!.. आणि मुलं झाल्यावर,  तर एक बुचडा बांधायला वेळ मिळाला की देव पावला ... !

    अशीच एक मजा ... एकदा आजीची मैत्रीण पाहुणी आली होती, खूप जॉली, मजा करणारी ... ती एक दिवस न्हायली ... आणि शनिवारी मी सकाळची शाळा आटपून घरी आले तर मागच्या व्हरांड्यात एका खुंटीला एक केसांचा झुपका टांगलेला ... मी धावत आईजवळ! ... तेव्हा शाळेत चेटूक, काळी जादू, भानामती असल्या गोष्टी फिरत असायच्या ... आईला दाखवलं, "हे बघ, काय भयानक आहे ते " ... आईनी पाहिलं आणि म्हणाली, " हात्, अगं हे मावशी-आजीचं गंगावन आहे ... हे बांधायचं केसांना, म्हणजे मोठा येतो अंबाडा ... "    Detachable केस !... मी हुश्श ...! नंतर ते आईनी तिला सांगितलं असावं ... थोड्या वेळाने मी दिसल्यावर ती आजी म्हणे, "ये, तुला लांब केस आवडतात ना, तुझी वेणी गुडघ्या पर्यंत करून देते ... जादूनी ... "   आणि सगळ्यांची हसता हसता पुरेवाट ... मला तेव्हा पहिल्यांदा  अदृश्य व्हावं ,   असं वाटलं !   आता तर खूप सुंदर style केलेले switch, wigs ,मिळतात ... नुसते pony-tail वर बसवले की झालं !.....तेव्हाही किती किती सुंदर hairstyles असायच्या ,  'चिमणीचं घरटं' हे favourite !  मावशीची एक hair-style अशीच मनात बसलेली आहे.   लांबसडक काळेभोर केस ... तिचे, आईचे, आजीचे, बहिणींचे ... तेच माझे केस मात्र जेमतेम ... भुरे ... आणि इतके कुरळे की माझी style नेहेमी केसांचं टोपलं नाहीतर शिप्तर ह्या catagory तलं  ... !   कापायचे तर नव्हतेच ... दोघी बहिणींनी सुंदर केस कापून bob केला तर मीच 'धो धो' रडले होते ... अक्षरशः ... ! त्या पुन्हा केस वाढवतील , असं त्यांच्याकडून वदवून घेतलं, तेव्हा जरा बरं वाटलं ... पण ते झालंच नाही ... असो ... आता तर काय ... मुली,बायका केस मोकळेच ठेवून हिंडतात ... "अगं अगं ... दृष्ट लागेल नं ... हे काय असं" ... हे आजीचे शब्द मनात घोळतात ... 

    त्या केसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच !  निरनिराळी तेलं ... माझ्या लहानपणी  शकुंतला Hair Oil खूपच प्रसिद्ध होतं .   ते बनवणाऱ्या कंपनीच्या कर्त्या-करवित्या  श्रीमती पुष्पाताई दुनाखे ह्यांची मुलाखत वाचली होती लहानपणी ... हे तेल बनवून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली ... खूप कष्ट करून !   ते तेल लाल रंगाचं, त्यात जास्वदींची फुलं ... त्यांची मुलाखत वाचून खूप भारावल्यासारखं झालं होतं ... सुमारे ६०-७० वर्षांपूर्वीच्या स्वयंसिद्धा ... स्वतःच्या हिकमतीवर आणि अगदी वेगळं काहीतरी successfully करून दाखवणारी महिला !

     त्या काळात शिकेकाईचं राज्य होतं ... घरी आजीची जोडलेली माणसं होती ... त्यातली एक मदतनीस - पडेल ते काम करणारी शांती ... निरोप पाठवला की हजर व्हायची.   उन्हाळ्यात एखाद्या दुपारी ती यायची, आणि मागच्या पडवीत बसून तिचं काम सुरु.   शिकेकाई,रिठ्याची झाडं अंगणातच होती.  शिकेकाईच्या वाळवलेल्या शेंगा, रिठे, नागरमोथा, संत्र्यांची वाळवलेली सालं ... सगळं प्रमाणाप्रमाणे घेऊन ती कुटायला बसायची !  आजकाल बाईकनी  जातांना  मुली बांधतात, तसं चेहेरा-नाकाभोवती पदर बांधून ती  बसायची.   थोडंसं कुटलं की चाळायचं, वरचा चाळ पुन्हा कुटायचा ... असं दोन-चारदा झालं की आजी पुरे म्हणून सांगायची.   मग उरलेला चाळ, शेंगा वगैरे ती घेऊन जायची ... हे सगळं दोन-तीन तास चालायचं ... पण नाका-तोंडाला इतकं बांधून सुद्धा ती शिंकत असायची, आणि नाक-डोळे लाल ... खूप ओशाळं वाटायचं ... आपल्यामुळे हे झालं ... "शांती, बहुत जल रही हैं आँखे ..."  असं आपण विचारावं ... तर ती म्हणे, "नहीं बाई, कुछ अच्छा चाहिये, तो थोडा दर्द तो होगा ही ..."   "हं " असं म्हणून सोडून द्यायचे तेव्हा ... आता कळतं ... ती जीवनाचं 'कसलं भारी तत्वज्ञान' सांगत होती !...

    आता शाम्पू-सिरम चं युग आहे. शिकेकाई गेली, शिकेकाईचे साबण ही  गेले ... actually मला हे शाम्पू आवडतात.   नावं ही किती मस्त ... soft and silky,   black is beautiful ..!. Yes, at one point of time ....black was beautiful ... but ... silver in your hair speaks of your experience, wisdom, maturity  ... and I value that more  ... !!!....

    जाऊबाईंशी गप्पा मारून, खाऊन-पिऊन घरी आले तरी डोक्यात विचार चालू होते ... सहज जुनी संस्कृत dictionary काढून अलक चा अर्थ पाहिला ... तर मस्त गोष्ट वाचायला मिळाली ... अलका नावाची एक परी-वनदेवी होती ... हिमालयात रहाणारी, तिचे केस खूप सुंदर, लांब होते, आणि तिच्या केसांच्या टोकांना मोती लटकत होते !   अहाहा ... काय सुंदर गोष्ट ... !!! 

    चला, केसातल्या silver बरोबर लटकणारे मोती ... निदान कल्पनेत तरी ... ! ! ! ....



- सौ अलका कुंटे, बंगलोर 

      +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. अलकाचे  चणे कुरमुरे

    अलक

    अलकाचा आजचा विषयच मुळी एकदम  वेगळा आणि अंतःपुरातला. आता त्यावर मी काही लिहिणे  म्हणजे मुलींच्यात रमणाऱ्या मुलाला चिडवतात, "पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा", तशातली माझी गत व्हायची.

    कुठेही लांबसडक केस बघितले की मला माझ्या चुलत बहिणीच्या लांबसडक केसांची आठवण येते. पुढच्या काळात ती अमेरिकेला गेली आणि transfer सिन झाला आणि तिने बॉबकट केला.

    *रॅपन्झेल*, एक राजकन्या होती  ती एका राजकुमाराच्या प्रेमात पडते म्हणून तिला उंच मनोऱ्याममध्ये बंद करून ठेवलेली असते.तिचे केस लांबच लांब असतात ते केस ती वरून सोडते आणि त्याला धरून राजपुत्र वर मनोऱ्यात जाऊन तिला भेटतो .परीकथाच ती,डोक्याला त्रास न देता ऐकायची.

    मग तीन वर्षांपूर्वी भेटली लांबसडक केसांची *अलका*. आता तिला अलका म्हणायचं की अलक ते ज्याने त्याने ठरवायच.पण विवेकने ४७ वर्षांपूर्वी तिचे केस पकडून उंच मनोरा गाठला हे नक्की.


    १९९२ साली माझे किडनी स्टोनचे ऑपरेशन पुण्याला रुबीमध्ये केले त्या वेळी तिथे anesthetist डॉक्टर बाई होत्या त्यांचे केस अक्षरशः पावलापर्यंत पोचलेले बघितले होते.

    महाभारतात द्रौपदीच्या मोकळ्या केसांना पकडून दुःशासनाने तिला फरपटत सभेमध्ये आणले आणि वस्त्रहरणाच्या अपमानानंतर दुःशासनाच्या रक्ताने जेंव्हा केस धुवेन त्या नंतरच केस बांधण्याची प्रतिज्ञा द्रौपदीने केली होती.. हे केस मोकळे ठेवण्याचे तिचे वचन भीमाने दुःशासनाचा वध करून त्याचं  रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातल्यावरच पूर्ण झाले, असे महाभारतात सांगितले आहे. बघा म्हणजे महाभारत घडायला केस सुद्धा कारणीभूत झाले.

    १९७० च्या दरम्यान आलेल्या चित्रपटातल्या  हिरॉईन डोक्यावर भला मोठा स्विच घालून डोळ्याच्या कडांमधून टोक काढून आणि बटा सोडलेल्या असायच्या. आठवून बघा छोटीसी बात मधली वारंवार बटा सावरणारी विद्या सिन्हा


    या केसांनी गाण्यांना जन्म दिला आहे. हे लिहीत असताना मला दोन गाणी आठवली.  

    सुरेश भट मल्मली तारुण्य माझे  गाणे लिहिताना म्हणतात  *मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे*  
    तर मंगेश पाडगावकर लिहितात *जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,माझा न राहतो मी हरवून हा किनारा*


    महिला वर्गाच्या खास अशा अंतःपुरातल्या प्रांतात न जाता जे सुचलं ते लिहिलं. 

    प्रसाद 

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , प्रसाद ! अरे , अंतःपुर वगैरे नाही .. लहानपणची आठवण ... एवढंच !! ते एक वेगळंच जग होतं , असं वाटतं कधी कधी ...!

      Delete
  2. 👌Dr. A. G. Apte

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , Arvind ! Your view matters ....!

      Delete
  3. अलका तू अलक्" या विषयावर खूपच छान लिहिल आहेस.मला पण बरीचशी माहिती माहित नाही. पण तुला कुठून आली हे देवालाच माहिती. खूप छान लिहिल आहेस.वाचून खूप आनंद वाटला. यातील शेवटची कथा, तुझ्या नावाला आणि केसांना साजेशीच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , शांता ! काही वर्षांपूर्वी वाचनात आलेली माहिती लिहिली , सहज सुचलं म्हणून !😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संध्याछाया भिवविती हृदया ...

Black is beautiful

नेमेचि येतो मग पावसाळा ...